Skip to content

“तू खूप उशीर केलास..मागचं सर्व विसरून आज मी नव्याने जगतेय..”

“तू खूप उशीर केलास..मागचं सर्व विसरून आज मी नव्याने जगतेय..”


अपर्णा कुलकर्णी


रात्रीचे बारा वाजले होते, फोनची रिंग वाजली तशी नुपूर जागी झाली आणि लाइट्स ऑन करून तिने फोन पहिला. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या आईने फोन केला होता. हॅलो आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा, खूप मोठी हो दीर्घायुषी हो, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत आणि सगळी सुखं तुझ्या पायाशी अशीच लोळण घेऊ देत नुपूर, तुला वरचे वर असेच मोठे होताना पाहायला मला आवडेल. तिच्या आईचा आवाज नरम झाला होता, आवाजातील आर्द्रता नुपूरच्या लक्षात आली होती.

एव्हाना तिच्याही डोळ्यातून आसवे तिच्या हातांवर पडली होती पण तिने शक्य तितका आवाज नॉर्मल ठेवत आईचे आभार मानले. नेहमीप्रमाणे तिचे बाबाही तिच्याशी शुभेच्छा देऊन चार शब्द बोलले पण त्यांच्या भावना आजही त्यांनी त्यांच्या आवाजात दिसू दिल्या नव्हत्या. पण नुपूरच्या ते लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. जुजबी चार शब्द बोलून तिने फोन ठेवला. सकाळी उठून तिने सुरू केलेल्या कंपनीत तिला वेळेत जायचे होते.

नुपूर वेळेची खूप पक्की होती. शिस्तबद्धपणा आणि वक्तशीरपणा तिने तिच्या बाबांकडून घेतला होता आणि त्याचा तिला आणि तिच्या बाबांना सार्थ अभिमान होता. ऑफिसमध्ये पाय ठेवताच तिचा सगळा स्टाफ ज्याला ती कुटुंबाप्रमाणे प्रेम करत होती, त्याने बुके देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. नुपूरनेही आनंदाने त्यांचा स्वीकार केला होता. आज सगळ्या स्टाफला ती लंचटाईम मध्ये पार्टी देणार होती. सगळ्यांच्या विश स्वीकारून ती केबिनमध्ये आली. जरा वेळ डोळे बंद करून चेअरवर स्थिरावली.

आज तिने तेहतीसाव्या वर्षात पदार्पण केले होते. पण इतक्या कमी वयात एका मोठ्या नामांकित कंपनीची सीईओ बनली होती ती. तिचे हे घवघवीत यश मिळवण्यासाठी तिला अनेक चढ उतार सहन करावे लागले होते. तिने पटकन डोळे उघडले आणि कामात गुंतून घेतले स्वतःला. कारण भूतकाळातल्या आठवणीत रमून जाणे हा तिचा स्वभाव नव्हता. या आठवणींना उजाळा देऊन काहीच हाती लागत नाही, काहीच बदलता येत नाही, उलट जखमा नव्याने ताज्या होतात त्यामुळे त्यात वेळ वाया न घालवता झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्यात शहाणपण आहे असे तिचे स्पष्ट मत होते.

बघता बघता लंचटाईम झाला आणि सगळे नुपूरची पार्टी एन्जॉय करू लागले. नुपूरने तिच्या काही कलिग सोबत जेवण आटोपले आणि ती तिच्या रेस्ट रूममध्ये आली. नुपूर बऱ्याच वेळा काम निमित्ताने ऑफिसमध्ये राहायची. तिने त्यासाठी एक मावशी ठेवल्या होत्या. त्या तिची सोबत करायच्या आणि काय हवं नको ते बघायच्या. ही रूम तिच्या केबिन शेजारीच होती. त्यामुळे ती जरा आराम करण्यासाठी तिथे आली. तेवढ्यात तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे असा निरोप तिच्या शिपायाने दिला. तिने त्यांना भेटायला बोलावले, तो गृहस्थ जवळपास तिच्याच वयाचा होता. देखणा, रुबाबदार पण चेहरा मात्र निस्तेज होता. हातात एक फुलांचा गुच्छ होता, तो त्या व्यक्तीने बरोबर चेहऱ्यावर धरला होता त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. आत येऊ का ?? त्याने विचारले, तो आवाज नुपुरला खूपच ओळखीचा वाटला पण चेहरा दिसत नसल्याने तिने ओळखले नाही. आत या म्हणताच, त्याने पुढे येऊन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नुपूर असे म्हणत बुके खाली केला, समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहून नुपुरच्या पाया खालची जमीनच सरकली.

तिच्याही नकळत ती सरकन भूतकाळात गेली. नुपूर एकवीस वर्षांची असताना, तिने तिच्याच कॉलेज मधील तिच्याच वयाच्या चिन्मय सोबत लग्न केले होते. घरच्यांचा विरोध पत्करून. चिन्मय सगळ्या कॉलेजचा हिरो होता, हुशार होता. ग्रज्युएशन पूर्ण करून त्याच्याच बाबांच्या कंपनीत तो काम करणार होता. पण तिथे आधी एका साध्या एम्प्लॉइ प्रमाणे काम करून, अनुभव घेऊन मगच नवी सुरुवात करणार होता. त्याच सगळंच ठरलेलं. नुपूर आणि चिन्मय लग्न करणार हे सगळ्या कॉलेजमध्ये झालेले होते आणि झालेही तसेच. एक्साम संपताच दोघेही लग्न बंधनात अडकले. नव्याचे नऊ दिवस अगदी छान गेले. पण नंतर मात्र चिन्मयचे वागणे अचानक बदलले. तो उशिरा घरी यायला लागला, कधी कधी कंपनीत पार्टी असली की ड्रिंक घेई. खूप वेळ बाहेरच राही.

नुपूरने काही विचारले तर उडवा उडवीची उत्तरे देई. करावं लागतं नुपूर कंपनीसाठी असे म्हणत असे. नुपूरने त्याला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न केला होता. तिने तिच्या आई बाबांचा विरोध न जुमानता लग्न केले होते त्यामुळे तिथे ती त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हती. म्हणून चिन्मयच्या घरच्यांना बोलून पाहिले पण त्यांनी तिचे बोलणे ऐकून न ऐकल्या सारखे केले. तू तुझ्या मर्जीने लग्न केले आहे आणि तुम्ही एकमेकांना ओळखत होता मग आता हे असेच स्वीकारावे लागेल असे संगीलते.

तिला काय करावे कळेना. चिन्मय एकदा दोनदा दारूच्या नशेत तिच्या अंगावर धावून गेला होता. आजही जवळपास पहाटे तो डुलत डुलत आला आणि शारीरिक समाधानाची अपेक्षा करू लागला. नुपूरने नकार दर्शवला तर त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला, आता मात्र नुपुरची सहनशीलता संपली आणि तिने त्याला सणसणीत थोबाडीत दिली. त्याच क्षणी तिने घर सोडले आणि एका मैत्रिणीकडे राहू लागली. पुढचे शिक्षण केले, त्यासाठी पार्ट टाईम नोकरी केली. खूप संघर्ष केला.

याच काळात आज ना उद्या चिन्मयला त्याची चूक समजेल आणि तो परत येईल असे तिला नेहमी वाटे. पण तसे झाले नाही. हळू हळू तिच्या आई बाबांना ते समजले आणि पोटच्या गोळ्याला त्यांनी माफ करून स्वीकारले. पण आज नुपूर पूर्वीची नुपूर राहिली नव्हती. तिने तिचा स्वाभिमान कायम ठेवला होता. यशाचे उच्च शिखर गाठले होते. कोट्यावधींचा कंपनीची मालकीण झाली होती, शेकडो कामगारांची पोषणकर्ती झाली होती. स्वतःचे वेगळे विश्व, ओळख निर्माण केली होती.

आज पुन्हा चिन्मय तिच्यासमोर असा उभा राहील असे कधीच तिला वाटले नव्हते. मला माफ कर नुपूर, तू मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आपल्या नात्याला अनेक संधी दिल्या. माझे खूप अत्याचार सहन केले. पण मला समजले नाही. आज कित्येक वर्षानी ती जाणीव मला झाली आहे. दोन वर्षांपासून मी तुला शोधत आहे. मला प्लीज माफ कर. तिचे पाय धरत तो म्हणाला.

नाही चिन्मय. आता माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही उरले नाही. मी नात्यांच्या बाबतीत त्यातल्या त्यात तुझ्या बाबतीत खूप तटस्थ झाली आहे. तू मला तसे बनवले आहेस. इथपर्यंत पोहचण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला आहे, तुझ्या आठवणीत, तू परत येशील या आशेने मी कित्येक रात्री जागून रडून काढल्या आहेत. आपले नाते वाचवण्यासाठी शक्य ते सगळे मी केले पण तुला नशेची धुंदी होती. नंतर ही मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाहीस. ” तू खूप उशीर केलास… मागचं सगळं विसरून आज मी नव्याने जगतेय….”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on ““तू खूप उशीर केलास..मागचं सर्व विसरून आज मी नव्याने जगतेय..””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!