Skip to content

जेव्हा नवरा बायकोला जज करायला लागतो…

जेव्हा नवरा बायकोला जज करायला लागतो…


अपर्णा कुलकर्णी


प्राची आणि निखीलच्या लग्नाला जेमतेम चार दिवस झाले होते. प्राची किचनमधे काम करत होती. तिच्या सासरचे कुटुंब खूप मोठे होते. जॉइंट फॅमिली होती. सासू, सासरे, दोन दिर, दोन जावा, त्यांची मुले, आजी सासू, आत्या, नणंद असे बरेच लोक होते कुटूंबात. खरतर प्राचीला स्वयंपाकाची खूपच आवड होती, कोणताही पदार्थ ती खूप उत्तम बनवत असे. कारण लग्नापूर्वी ती टिफीन सर्व्हिस देण्याचे काम करत होती. तिचे बाबा तिच्या लहानपणीच गेले त्यामुळे शिक्षण सातवी पर्यंतच घेता आले तिला. पुढे शिकण्याची इच्छा असूनही शिकता आले नाही कारण घर सांभाळणार कोणी नव्हत. आईची तब्येत बरी नसायची, तिला अल्सरचा नेहमीच त्रास होत असे. तिच्या दवाखान्याचे पण पैसे प्राचीला जमवावे लागत त्यामुळे स्वयंपाकाची कामे करून ती आईचा आणि घराचा खर्च भागवत होती. त्यामुळे शिक्षण अर्धवटच राहिले.

निखिल खूप शिकलेला तर होताच शिवाय श्रीमंत होता. त्याचे कुटुंबातील सगळेच खुप शिक्षित होते.खरतर निखीलचे एका मुलीवर प्रेम होते आणि त्याने तसे तिला सांगितले होते पण त्या मुलीने त्याचे प्रेम नाकारले होते त्यामुळे तो निराश झाला होता. या सगळ्याची प्राचीला जराही कल्पना नव्हती. तर निखिलच्या आईला अशी कोणीतरी मुलगी सून म्हणून हवी होती जी संस्काराने आणि मनाने उत्तम असेल. त्यामुळे निखीलची ईच्छा नसतानाही इतकेच काय तर घरात कोणाच्याही मनात प्राची नसताना तिने निखीलचे लग्न प्राची सोबत लावून दिले होते.

प्राची आज किचनमध्ये असूनही पहिल्यांदा मन लावून काम करू शकत नव्हती. कारण तिला आठवत होते ते लग्नाच्या पहिल्याच रात्री निखीलने नको नको ते बोलून तिचा केलेला अपमान, शिक्षणावरून ठरवलेली तिची योग्यता आणि बेडवर झोपण्याचा हिसकावून घेतलेला अधिकार.

चहा …. असा निखीलचा आवाज आल्यावर प्राची भानावर आली आणि निखिलसाठी चहा घेऊन गेली. पण निखील तिच्या हातून चहाच काय पाणी पण पित नसे. तिने चहा आणला हे पाहून निखील चहा न घेताच ऑफिसला गेला होता. हे पाहून निखिलची आजी प्राचिवर खूप ओरडली होती. बिचारी प्राची रडत बसली होती, दुखावली होती पण तिच्या सासूने तिची समजूत घालून तिचा मूड चांगला केला होता.

महिना उलटून गेला होता पण परिस्थिती होती तशीच होती. प्राचीने हे नाते शक्य तितके एकटीने पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता कारण आपल्या आजारी आईला ती आता अजून त्रास देऊ शकत नव्हती. तिच्या आईला वाटत होते आपल्या मुलीने नशीब काढले, खूप छान सासर मिळाले आहे तिला. त्यामुळे प्राचीची आई आनंदात होती. दिवस जात होते एक दिवस अचानक निखीलची तब्येत बिघडली. त्याला रात्रीत ताप आणि थंडी वाजून आली. प्राचिला त्याची हुडहुडी जाणवली आणि तिने मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, घरात सगळ्यांना सांगितले आणि डॉक्टरांना पण बोलावले. या दरम्यान त्याच्या औषध गोळ्याची वेळ, खाण्या पिण्याची वेळ, त्याला काय हवं नको ते सगळ अगदी मनापासून प्राची करत होती. तिच्या कृतीतून निखील बद्दलची काळजी आणि प्रेम दोन्ही निखीलल जाणवत होते पण तो ते मान्य करायला तयार नव्हता. त्याला वाटत होते माझ्या एवढ्या शिकलेल्या आणि मोठ्या फॅमिलीत ही अडाणी मुलगी टिकुच शकणार नाही.

हळू हळू दिवस जात होते. निखिलचे वागणे बदललेले नव्हते. पण घरातल्या सगळ्या लोकांची मने प्राचीने तिच्या गोड आणि लाघवी स्वभावामुळे जिंकून घेतलेली होती. फक्त निखील आणि त्याची आजी सोडल्यास. त्याच्या आजीला ही एखादी श्रीमंत घरातील मुलगी नातासाठी बायको म्हणून हवी होती. त्यामुळे दोघेही तिच्यातील चांगले गुण कधी बघूच शकत नव्हते. पण निखीलच्या आईला खात्री होती की एक ना एक दिवस निखीलला प्राची मधील खरे गुण दिसून येतील.

एकदा घरात फक्त आजी आणि प्राची दोघीच होत्या. आजी त्यांच्या रूममध्ये बसून आराम करत होत्या आणि प्राची किचन मध्ये काम करत होती. अचानक आजीच्या छातीत खूप दुखायला लागले आणि वेदनेने त्या जोरात किंचाळल्या. प्राची पटकन त्यांच्या खोलीत गेली आणि बघते तर आजी बेडवर बेशुद्ध पडलेल्या तिला दिसल्या. पटकन डॉक्टरांना बोलावून तीने घरच्यांना ही कळवले. डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि म्हणाले, वेळेत मला बोलावलं म्हणून ठीक झालं नाहीतर काहीही होऊ शकलं असतं. त्या वेळी सगळ्यांनीच प्राचीच्या हुशारीचे कौतुक केले पण निखील मात्र काहीच बोलला नाही. या दरम्यान प्राचीने आजीची खूप काळजी घेतली आणि आजी पटकन बरी पण झाली. आजीला तिच्यातील संस्कार आणि गुण दिसले आणि त्यांनीही प्राचील नातसुनेच्या रुपात स्वीकारले.

बरेच दिवस उलटले होते, आता येत्या काही दिवसात निखील आणि प्राचीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार होते. तरीही निखीलने मात्र प्राचीला बायको म्हणून स्वीकारलेले नव्हते. एकदा त्याची आई निखिलकडे येते आणि विचारते, तू अजूनही तुझ पहिलं प्रेम विसरू शकला नाहीस म्हणून प्राचीला स्वीकारत नाहीस की खरंच तुला प्राची आवडतच नाही निखील ?? आईच्या प्रश्नाने निखील आश्चर्य चकित झाला कारण त्याच्या भावाशीवाय बाकी कोणालाच त्याच्या प्रेमाबद्दल माहीत नसतं. मी आई आहे तुझी, तू सांगितल नाहीस म्हणून मला काही कळणार नाही असे होते का ?? तुझ्याकडे बघून तुझ्या मनात काय चालू आहे ते कळतं मला निखील. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील का ??

तास काहीच नाही आई. माझ्या प्रेमाचा आणि प्राचीला न स्वीकारण्याचा काहीच संबंध नाही. मग तू का सतत तिचा अपमान करत असतोस निखील, तिला नेहमी घालून पाडून बोलतोस, आता कुठे तिच्या हातचे खायला प्यायला सुरुवात केली आहे तू. तुला दिसत नाही तुझ्या घरासाठी तू केलं नाहीस तितके तिने केले आहे. तुझ्या घराला आपले मानले आहे. तुझ आणि तुझ्या आजीच आजारपण, तुझ्या भावाचा गेलेला विश्वास तिने मिळवून दिला आहे, घरातल्या सगळ्या लहान मुलांना तिचेच वेड आहे, तुझी बायको म्हणून आजवर सगळी कर्तव्य तिने पार पाडली आहेत. तरीही तू तिला स्वीकारत का नाही ??

आईच्या बोलण्याने निखील निरुत्तर होतो आणि ऑफिसला जातो. आईचे बोलणे त्याच्या कानात घुमत असते. शेवटी विचार करून तो एका निर्णयाशी येतो. घरी आल्यावर बघतो तर सगळे त्याचाच रूममध्ये बसून असतात आणि प्राची बेडवर पडलेली असते. तो पटकन तिच्याजवळ जातो आणि विचारतो काय झालं प्राची ?? प्राचिला बोलताही येत नसतं. तेंव्हा त्याची आई सांगते आज, ती बाजारात गेली होती तेंव्हा स्कटीची धडक लागली, डॉक्टर आताच येऊन गेले,पण तिचा पाय फ्रॅक्चर आहे त्यामुळे आता महिनाभर तरी आराम करावाच लागेल. सगळे प्राचीची खूप काळजी घेत असतात. कोणी तिला पाणी देते, कोणी गोळ्या, तर कोणी सूप करून आणते. आजी तर तिच्याच उशाशी बसून असते. घरातील लोकांचं तीच्याप्रती प्रेम पाहून निखीलचे डोळे पाणावतात.

रात्री बच्चे कंपनी तिच्या सोबत खेळून झोपण्यासाठी निघून जातात. आता खोलीत प्राची आणि निखील दोघेच असतात. आज लागल्यामुळे प्राची पहिल्यांदा निखीलच्या बेडवर झोपलेली असते. निखिलने पहिल्या रात्री केलेला तिचा अपमान तिला आठवतो आणि एकाच पायावर उभ राहून खाली झोपायला जाण्याचा ती प्रयत्न करते आणि धडपडते, ती पडणार इतक्यात निखील तिला आधार देतो आणि पुन्हा तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो, प्राची मला माफ कर, आजवर मी तुझ्यावर खूप चिडलो, चुकीचे वागलो, नको नको ते बोललो. पण ती माझी चूक होती आणि आज त्याची खूपच जाणीव होत आहे मला. हा बेड जितका माझा आहे तितकाच तुझा आहे.

आजवर मी फक्त तुझा राग राग करत राहिलो, तू या घरात राहूच शकणार नाही असेच वाटत होते मला, तुझ्या शिक्षमावरून तुझी योग्यता ठरवली पण तू प्रत्येक वेळी प्रत्येक परीक्षेत खरी ठरलीस. माझ्या घरातल्या लोकांवर स्वतःच्या कुटुंबावर करावे तसे प्रेम केलेस, सगळ्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केलेस, सगळ्यांची मने जिंकून घेतलीस. मी केले नसते इतके तू माझ्या घरासाठी केलेस. पण मी मात्र सतत तुला जज करत राहिलो. तुझी योग्यता तपासत राहिलो. सगळे विसरून प्लीज मला माफ करशील ?? हे ऐकून प्राची भरल्या डोळ्यांनी होकार देते आणि नव्याने नात्याची सुरुवात करते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!