Skip to content

लवकर ये श्री…मी वाट पाहतेय तुझी!! एक हृदयस्पर्शी कथा!

लवकर ये श्री…मी वाट पाहतेय तुझी!! एक हृदयस्पर्शी कथा!


काव्या धनंजय गगनग्रास

(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)


“अरे अजून किती वेळ होणारे तुला? मी इथे सर्व तयारी करून बसले आहे तरी तुझा पत्ता नाही. आणि एरवी मला म्हणत असतोस साया तुझ लवकर आवरत नाही, आवरत नाही. आज मी मुद्दाम लवकर तयार होऊन बसले आहे आणि तू मात्र उशीर कर.” “साया अग निघतोच आहे. deadline आहे ना गं आज! आज हा प्रोजेक्ट पूर्ण केला झाला नाही ना तर मी dead होईन बघ.”

“मूर्ख आहेस का तु? कितीदा सांगितलं आहे अस बोलत जाऊ नको म्हणून. तेही संध्याकाळच्या वेळी. तरीही तुझ असल बोलणं असतच.” “ओके बाबा, सॉरी! माफ कर. बर आता मला माझं काम पूर्ण करू देशील का? तरच मी लवकर येऊ शकेन. ओके बाय!”

सायलीने पुढे काही बोलायच्या आधीच त्याने फोन कट केला होता. श्री असाच होता. एखादं काम हाती घेतलं तर पूर्ण केल्यावाचून त्याला चैन पडत नसे. त्यामुळे त्यासाठी बोलता-बोलता फोन कट करणे वगैरे तो करत असे. मुद्दाम नाही पण त्याला सवयच लागली होती.

सुरुवातीला सायलीला राग यायचा, तिची चिडचिड व्हायची पण हळूहळू तिला पण ते सवयीच झालं. दोघांमध्ये खूप प्रेम आणि मैत्री होती इतकं की लग्नाला पुरत 1 वर्ष पण झालेलं नसताना सर्वांना वाटायचं की त्यांचं लव्ह मॅरेज आहे की काय? पण या दोघांचा अरेंज मॅरेज झाल होत. दोघांचेही नातेवाईक खूप. त्यातूनच बोलणी वगैरे होऊन त्यांचं लग्न ठरलं होतं. जेव्हा त्यांची पहिली भेट झाली होती तेव्हा श्री बोलला होता, “माझ्या फार काही अपेक्षा नाहीत.

पण मला माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी आहे जी माझी मैत्रीण असेल. आमच्यामध्ये बाकी कोणतेही नातं निर्माण व्हायच्या आधी मैत्री व्हावी आणि सर्व नाती संपली तरी मैत्री टिकावी. कारण हेच नातं व्यक्तीला शेवटपर्यंत बांधून ठेवत. एक निरपेक्ष नित्सिम प्रेमाचं नातं.” सायली तर त्याच्या या बोलण्यावर त्याच्या प्रेमात पडली. कॉलेजमध्ये असताना घट्ट मैत्री, त्यातून नंतर प्रेमाची नाती आणि काही काळातच तेच नात वाईट रीतीने तुटताना तिने पाहिले होते. त्यामुळे तिला पण अशाच व्यक्ती च्या अपेक्षा होती त्याच्याकडे काही नसलं तरी चांगलं मन असावं.

तेच तिला श्री मध्ये दिसलं. दोघांच्या स्वभावामध्ये खूप अंतर होतं. तो घरात मोठा तर ही शेंडेफळ. त्यामुळे तिच्यात ते लहान मूल होतच.
लग्न ठरवल्यानंतर व त्यानंतरच्या भेटीतही श्रीला ते जाणवलं. त्यामुळे तोही तिला तसेच वागवी. सायली देखील लाडाच्या वातावरणातून आल्याने अवखळ होती. तो अवखळपणा श्रीने टिकवला.

आश्चर्य नाही कमी कालावधीत त्यांचं नातं बहरल. सायलीने आधीच ठरवलं होतं की तिला लग्नानंतर घर सांभाळायचं आहे. लहानपणी देखील भातुकलीच्या खेळात ती फार रमायची. त्यात देखील नवरा ऑफिसमधून येईल मग मी त्याला जेवण करून देईल आणि छान छान गप्पा मारू असा तिचा खेळ असे.

लग्न ठरवताना पण श्री ला तिने हे सांगितलं होतं. त्याने विरोध केला नाही. पण त्याचबरोबर तो हेही म्हणाला होता की तुला कधी नोकरी करावीशी वाटली तरी माझा नक्की पाठिंबा असेल. त्यामुळे त्यांचा जोडा अगदी लोकांच्या दृष्टी ने अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा होता.
अशा जोडप्याचा आज लग्नाचा वाढदिवस होता आणि म्हणून सायली ची धावपळ चालू होती. बोलून तर खूप वेळ झाला होता तरी अजून श्री चा पत्ता नव्हता.

सायली फोन करत बसली होती रिंग वाजली तरी तसा परत फोन उचलला. “श्री किती वेळ काढणार आहेस, खूप कालावधी लोटला रे?” आज खरतर आनंदाचा दिवस होता. पण तरी बोलताना सायली बेचैन होत होती. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून पाणी आलं. “श्री अरे आजचा दिवस साधा नाही. तुला माहितीये ना आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. ये ना रे लवकर मी वाट पाहतोय तुझी.”

तिचं वाक्य पूर्ण होतच होता तेवढ्यात तिच्या आईने सायलीच्या हातचा फोन काढून घेतला. “अगं किती वाट पाहणार आहेस? तू गेला तुला सोडून कायमचा. का कळत नाहीये तुला? तो नाही परत येणार. सावर स्वतःला. ”

सायली रागावली, “आई असं कसं म्हणतेस तू येणार नाही. आमचा वाढदिवस आहे. तो येणार. यायला लागेल त्याला. तुला माहितीये तू आल्याशिवाय मी जेवण पण नाही. असं नाही करणार तो. त्याला ठाऊक आहे मी त्याची वाट पाहते तो नक्की येणार.” आईचे डोळे पाणावले होते. ती कळवळून सायलीचा हात हातात घेऊन म्हणाली. “अग तो नाही येऊ शकत

तो आपल्या सर्वांना सोडून गेला, कायमचा. बोलत असतानाच तिने सायली समोर पेपर धरला. ट्रक अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.
सायलीशी बोलून श्री पुन्हा त्याच्या कामाला लागला. त्याला हे काम लवकर पूर्ण करून घरी जायचे होते. त्याने त्याच्या लाडक्या साया साठी सरप्राईज प्लॅन केले होते. कधी तिला दाखवीन असे त्याला झाले. काम पूर्ण करून तो ऑफिस मधून निघाला. वाटेत त्याला फ्लॉवर शोप दिसले. सायलील lavender फार आवडत. जाता जाता नेऊया म्हणून तो ती घ्यायला गेला. घेऊन येताना आपण श्री आपल्याच विचारात होता इतका की समोरून येणारा ट्रक त्याला दिसलाच नाही. आणि जेव्हा दिसला तेव्हा वेळ निघून गेली.

इथे सायली त्याची वाट पाहत बसली. जेव्हा तिला ही बातमी समजली तेव्हा तिला या गोष्टीचा मानसिक धक्का बसला. एखादा माणूस हळूहळू सावरतो मात्र सायली त्या घटनेतून सावरू शकली नाही. तिला ही गोष्ट मान्य नव्हती की श्री तिच्या सोबत नाही. तिचं आयुष्य त्याच्या शेवटच्या बोलण्या सोबतच थांबल. शेवटी तिला मनोविकरतज्ञाना दाखवून दवाखान्यात ठेवण्यात आलं. सर्व त्यांच्या परीने उपचार करत होते. पूर्वीपेक्षा तब्येत सुधारली देखील होती.

पण अजूनही जेव्हा फोन वाजतो, जेव्हा लग्नाची तारीख दिसते तेव्हा सायली फोन उचलून तिच्या श्री शी मनसोक्त गप्पा मारते आणि त्याला कळवळून सांगते, “लवकर ये श्री, मी वाट पाहतोय तुझी!!!”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “लवकर ये श्री…मी वाट पाहतेय तुझी!! एक हृदयस्पर्शी कथा!”

  1. हृदय स्पर्शी लेख खुप खुप छान पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!