राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम ?
हा फार मोठा पेचप्रसंग पालकांच्या ठिकाणी निर्माण करण्यात माथेफिरूंना यश आलेलं दिसतंय. कारण आपलेच मराठी पालक या आभासी विश्वात बिथरलेले दिसत आहेत. इंग्रजी माध्यम मध्ये टाकले नाही तर भविष्यात स्पर्धात्मक युगात आपली मुलं बाहेर फेकली जातील. या भ्रमानेच आत्तापर्यंत घात केला. सरकार मराठी शाळांना उच्चतम दर्जा देण्यात अपयशी ठरली नसून तर आपणच मराठी शाळांकडे आपली नाकं मुरडली आहेत. जर पटसंख्याच नसेल तर कसली शिक्षक भरती आणि कसलं डिजिटल शिक्षण.
बाल मानसशास्त्र सांगतं, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषाच सर्वोत्तम. इतकं साधं, सरळ आणि सोप्प आपलं मराठी वाक्य बाजूला सारून इंग्लिश-विंग्लिशांना मिठ्या मारायच्या, हे सुजाण पालक म्हणून हितावह नाही आणि नसेल. हा काही इंग्रजी द्वेष नसून मराठीचा अट्टहास आहे. कारण शास्त्रच तसं सांगतं.
मला अजूनही आठवतं, आमचे शाळेतले दिवस. त्यामधला जो जिवंतपणा होता. तो आजच्या बाजारीकरणात निघून गेला. यावर कदाचित तुम्ही म्हणाल, त्याकाळी स्पर्धा नव्हती, आत्ता प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यावर मी म्हणेल की, स्पर्धा वाढली नसून लुटणारी टोळी वाढली आहे. अमुक क्लास, तमुक क्लासच्या नावाखाली बेसुमार लूटमार सुरू आहे. ज्यामध्ये हकनाक बळी जात आहेत, आपली मुलं. कारण लाखो रुपये इंग्रजी शाळांमध्ये खर्च केलेत म्हणजे तुमच्या अपेक्षांचा पारा तर चढणार. ज्यामध्ये ज्यावयात मुलांनी खेळायला हवं, मस्ती करायला हवी, काही वस्तूंची तोडफोड करायला हवी या संपूर्ण बालपणावर तुमच्या-आमच्याकडून मुलांना तणावात्मक स्वरूपात एक सप्रेम भेट मिळणार !
एकदा मातृभाषा हस्तगत केली की जगातल्या कोणत्याही भाषा शिकण्याचा स्पीड वाढतो. ज्यांना आपली मातृभाषा निदान लिहिता, बोलता आणि वाचता येत नाही, त्यांचा ज्ञान संपादनाचा वेग हा कमी होतो. म्हणजेच लहानपणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलगा शिकला आणि भविष्यात क्लास वन ऑफिसर झाला, तर संशोधनानुसार क्लास वन ऑफिसर पेक्षाही काहीतरी उच्च करण्याची क्षमता जन्मजात त्याला मिळाली होती, परंतु केवळ बालवयात ज्ञान संपादनाची भाषा ही मातृभाषा नसल्यामुळे त्याच्यातला विकास खुंटला, हे इतकं समजण्यासारखं सोपं आहे. फक्त भ्रमाचा चष्मा खाली उतरवावा लागेल.
आणि मराठी जिल्हापरिषद शाळेत शिकून ज्यांनी आत्तापर्यंत अटकेपार मराठी झेंडे रोवले आहेत, अशांची यशोगाथा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ठेऊन आपआपल्या मुलांच्या उज्वल भविष्याचं सुंदर स्वप्न पहावं लागेल.
या माझ्या लेखाने पालकांची मनं दुखावली असली तरी चालेल, पण या कचाट्यातून बाहेर काढणं, यथायोग्य माहीती देणं हे आमच्यासारख्यांचं कर्तव्यच !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————-