Skip to content

प्रत्येकाच्या मनात एकमेव हाच प्रश्न…”सध्या ती व्यक्ती काय करत असेल?”

सध्या तो काय करतो? – भाग २


जयश्री हातागळे


काही व्यक्ती काही ठराविक काळासाठीच आयुष्यात येऊन जातात. पण संपूर्ण काळ ते आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. उठता-बसता एकच विचार रेंगाळत असतो मनात….त्याच व्यक्तीचा…..

राहुलने विचारले तेव्हा निशा, तिच्या आयुष्यात असं कोणीच नाही, म्हणाली खरी….

पण, विचारांचं वादळ घोंगावत होतं….सध्या तो….?

निशाच्या घराजवळच दिनेशचं घर होतं. बऱ्याचदा त्याचं निशाच्या घरी येणं-जाणं असायचं. शिवाय दोघे एकाच कॉलेजमध्ये…. कधी त्यांच्यातील जवळीक वाढली कळलंच नाही. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये रोज मस्त गप्पा मारायच्या मित्र-मैत्रिणींसोबत…. मस्त दिवस चालले होते. निशाला त्याच्याशी बोलल्याशिवाय करमतंच नव्हतं. तो दिसला नाही तर निशा बेचैन व्हायची. हळूहळू ही ओढ प्रेमात बदलली.
त्यालाही निशा खूप आवडायची. सतत तो तिला सरप्राईज देऊन नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा…. तिच्या चेहर्यावरचा तो ओसंडणारा आनंद नजरेत भरून घ्यायचा. तिचं हसणं, तिचं दिसणं पुरता पागल झाला होता तिच्यासाठी.

अचानक एक दिवस घराबाहेर कोणाच्यातरी भांडणाचा आवाज आला. निशा आणि निशाच्या घरातले बाहेर येऊन बघतायेत तर काय? निशाचा भाऊ विनीत आणि दिनेश यांच्यात मारामारी सुरू होती. बहुतेक निशाच्या भावाला निशा आणि दिनेशच्या प्रेमाबद्दल बाहेरून समजले होते. म्हणूनच त्या दोघांमध्ये ही भांडणं सुरू होती. दोन्हीकडच्या फॅमिली आता भांडणात उतरल्या होत्या ते सगळे भयानक दृश्य बघून निशा खूपच घाबरली होती.ती भांडणे मिटावी म्हणून निशाने पुढे येऊन सांगितले की, आमचे दोघांचे काहीही नाही.विनित अरे, तुला कोणीतरी खोटं सांगितलंय…प्लीज थांबवा भांडणं ….पण विनित ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी निशाच्या आईने निशाला शपथ घ्यायला लावली. निशा खरं सांग दिनेशचं आणि तुझं खरंच काही आहे का?

निशा प्रचंड घाबरली होती. ही भांडणं तूर्तास थांबावी या हेतूने निशा “नाही” म्हणाली. निशा आणि दिनेश वेगळ्याच द्विधा मनस्थितीत सापडले होते. एकमेकांवर असलेलं प्रेम त्यांना यावेळी कबूल करता येत नव्हतं…. तसं केलं असतं तर, खूप भयानक परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे दोघांनीही एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा या ठिकाणी उल्लेख नाही केला.

दिनेशला या भयानक अवस्थेत पाहून निशाला प्रचंड त्रास होत होता…. डोळ्यातुन ओघळणारे पाणी निशा कोणाच्याही नकळत पुसत होती…. खूप हतबल होती ती…..

निशाने आमच्या दोघात तसं काहीही नाही असं कबूल केल्यामुळे दोन्हीही फॅमिली आपापल्या घरी परतल्या….

परंतु, निशा आणि दिनेशच्या घरचं वातावरण चांगलंच तापलेलं होतं….. त्याच दिवशी लवकरात लवकर निशाचं लग्न उरकण्याचा फतवा काढण्यात आला. तर इकडे दिनेशला पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला मामाकडे पाठविण्याचे ठरले.

निशा खूप रडत होती ती काळ रात्र सरता सरत नव्हती.निशाला वाटत होतं इथून निघून जावं आणि दिनेशच्या कुशीत खूप रडावं.आता प्रेमाला बगावत करावीशी वाटत होती पण ते इतकं सोप्पं नव्हतं….निशाच्या खिडकीतून दिनेशचं घर स्पष्ट दिसायचं, कशीतरी ती काळरात्र सरली.सूर्यकिरणं खिडकीतून आत डोकावू लागली. आपण एकाच प्रसंगावर अडून बसतो.त्याच क्षणांत गुरफटलेलो असतो, पण निसर्गचक्र अविरत सुरूच असतं. निशाची नजर खिडकीतून बाहेर गेली. दिनेश बॅगा घेऊन कुठेतरी निघण्याच्या तयारीत असल्याचं दिसलं. निशा खूप बेचैन झाली, खूप अस्वस्थ झाली…. त्याला समोर पाहून निशाला वाटत होतं दिनेशला जाऊन घट्ट मिठी मारावी.

परंतु तिच्यावर असलेल्या मर्यादा आणि बंधनांची शृंखला ती काही केल्या तोडू शकली नाही…. तिच्याकडे स्वतःचं मन मारण्या खेरीज दुसरा कुठलाही पर्याय नव्हता….

दिनेशने बॅगा उचलल्या…. निशाच्या घराकडे पाहिलं तर निशा खिडकीत उभी होती. दुरून एकमेकांकडे बघतानाही….. त्याच्या मनातील प्रश्न आणि निशाच्या नजरेतील घालमेल स्पष्ट कळत होती…. एकमेकांपासून दूर जाताना मनाची होणारी तडफड दोघांनाही अस्वस्थ करत होती….. न बोलताही ते दुरूनच नजरेने खुप काही बोलून गेले….. मजबूर होता तो तिथे आणि निशा इथे दोघेही निरुत्तर…..दोघेही हताश….

दिनेश बसस्टॉपच्या दिशेने चालू लागला. आणि निशा त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे व्याकूळ नजरेने पहात राहिली…. निशाला कळून चुकलं होतं, या प्रेमाचा शेवट आता इथेच झाला आहे…. दिनेशला ती हरवून बसली आहे अगदी कायमचं. घरच्यांचे ऐकण्याशिवाय निशाकडे अन्य पर्याय नव्हता.

अगदी दोन-तीन दिवसांतच निशाला बघायला एक स्थळ आलं…. बरोबर! ते स्थळ राहुलचं होतं.

पाहताक्षणी राहुलला निशा आवडली होती आणि राहुलच्या घरच्यांना देखील…. निशाला राहुल आवडला आहे की नाही हे विचारण्याची तसदी निशाच्या घरच्यांनी नक्कीच घेतली नाही…. समोरून होकार आला आणि निशाच्या घरच्यांनी लग्नाची तयारी सुरू केली…. लग्न अगदी थाटामाटात पार पडले.

निशा तडफडत राहिली, तळमळत राहिली परंतु सो-कॉल्ड मर्यादा तिने ओलांडल्या नाहीत…. तिने स्वाधीन केलं होतं स्वतःला…. राहुलला तिने कधीच काहीच कमी पडू दिले नाही…. तिने त्याच्या हक्काचं त्याला सर्व काही दिलं…. स्वतःचं सर्वस्व त्याला बहाल केलं… राहुलला…. तिच्या अस्वस्थ मनःस्थितीचा कधीच अंदाज आला नाही…. खरंतर निशानेच त्याला कधी तसं जाणवू दिलं नाही. तिच्या जबाबदाऱ्या ती योग्य प्रकारे निभावत होती.

काही गोष्टी काळजावर अगदी खोल कोरल्या गेलेल्या असतात…. तसाच दिनेश अजूनही तिच्या हृदयात त्याचं अस्तित्व कुठेतरी एका कोपऱ्यात कायम टिकवून होता.

आणि ते तसंच राहणार होतं आठवणींच्या रूपात कायम….

निशा, मर्यादा ओलांडणार नाही ही देखील काळ्या दगडावरची रेघ! माणूस काही नीती-मूल्यांमध्ये स्वतःला बांधून ठेवतो आणि आयुष्यभर त्या आधारावरच स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करतो.

निशा भूतकाळातल्या त्या आठवणींमध्ये विचारांमध्ये गढून गेली होती. पण हे सगळं आठवत असताना निशाला धस्सं झालं होतं…. तो प्रसंगच खुप भयानक होता दोन जीवांना वेगळं करणारा….. दिनेश निशाचं पहिलं प्रेम होतं आणि पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. निशानेही जपलंय ते हृदयात… कोणाच्याही नकळत..

“तो कुठेही असला तरी, सुखी असावा एवढंच वाटतं निशाला”

निशाने स्वतःला सावरतच डोळ्यांमधून, तिच्याही नकळत वाहणाऱ्या अश्रुंना पुसत एक दिर्घ श्वास घेतला…. आणि बंद करून टाकलं दिनेशला तिच्या हृदयाच्या कप्प्यात आठवणींच्या रूपाने… आणि पुन्हा ती वर्तमानात परतली….

मात्र, तो सध्या काय करत असेल? हा विचार तिच्या मनात घोळत राहिला…. पुढील काही दिवस तरी……

समाप्त…. ??

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती असते, जी सध्या काय करत असेल?असा प्रश्न पडण्यासारखी…


भाग १

??

क्लिक करा


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “प्रत्येकाच्या मनात एकमेव हाच प्रश्न…”सध्या ती व्यक्ती काय करत असेल?””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!