Skip to content

माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग – २

माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग – २


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


श्री

मी श्रीनिवास, आज इथे समुद्रकिनारी एकटा येऊन बसलोय. लोकांची किती गर्दी आहे इथे. आपापल्या कुटुंबासोबत, मुलांसोबत कित्येक जण इथे आली आहेत. यांच्यासारख माझं देखील कुटुंब आहे. मी एकटा नाहीये. माझी बायको निशिता आणि माझी छोटी परी अर्पिता. छोट असलं तरी छान कुटुंब आहे आमचं. खरच छान आहे का? कारण निशीताला तर वाटत नाही. तिला वाटत मी बदललोय. मी तिचा आधीचा श्री नाही. खरच मी बदललो आहे का? कधी कधी माझं मलाच समजत नाही. पण तिने तरी मला समजून घ्यावं ना! आमच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली. काही बाबतीत बदल हे होणारच ना! याचा अर्थ मी पूर्णच बदललो अस होत नाही.

माझी आणि निशिताची भेट एका अर्थाने अकल्पितच म्हणावी लागेल. कारण मी कधी लग्न करेन अस मला वाटलं नव्हतं. तसा विचार पण कधी केला नव्हता. पण त्याच दरम्यान मी निशिताला भेटलो. एखाद माणूस किती अंतर्मुख आणि एकाकी असावं? आमच्या पहिल्या भेटीत तर ती नीट बोलली देखील नव्हती. तिला बोलायचच नव्हत किंवा माणसं नको होती अस नाही.

उलट एखाद्या पक्ष्याला खूप काळ पिंजऱ्यात घालून ठेवलय, यातून आपण कधी बाहेर पडू किंवा आपल्याला कोणी यातून बाहेर काढेल अशी आशाच जणू निघून गेली आहे, तो पक्षी दिवसेंदिवस स्वतःच्याच कोशात अडकत चाललाय आणि एक दिवस त्या पिंजऱ्याच दार कोणतरी उघडत. आता खरतर सर्व मार्ग मोकळे झाले आहेत, तो पक्षी त्यातून बाहेर जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. पण त्या बंदिवासाची इतकी सवय झाली आहे की दार उघडुनही बाहेर जायला मन धजावत नाही, पक्षी कावरा बावरा होत आहे.

असच काहीस मला निशीताच्या बाबत जाणवलं. कोणत्यातरी मोठ्या गोष्टीतून ती गेली आहे आणि आता स्वतःमध्येच अडकली आहे. कसलीतरी भीती तिच्या मनात बसली होती. त्यामुळे ती मोकळेपणाने बोलायला, वावरायला कचरत होती. मला हे सर्व जाणवलं असल तरी थेट याची कारण विचारण्याचा किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण डोकावण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मला ती अधिकारही नव्हता. पण तिला जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून मला तिच्याबद्दल ओढ वाटली हे खर होत. मनात कुठेतरी जाणीव निर्माण झाली की तिच्या दुःखावर आपण फुंकर घालू शकतो, तिचा सोबती होऊ शकतो. शेवटी मला तरी कोण होत? आतापर्यंतच्या आयुष्यात इतके चढ उतार पाहिले होते तेही एकट्यानेच की आता अस वाटू लागलं आपलं झालं तस दुसऱ्या कोणाचं होऊ नये. आपण कोणाच्यातरी आनंदाच कारण व्हावं.

अगदी तसच झालं. या ना त्या कारणाने माझ्या आणि निशिताच्या भेटी होत गेल्या आणि ते स्वतःच्या कोशात अडकलेले पाखरू हळू हळू मोकळं होऊ लागलं. पहिल्या भेटीत बावरून बसलेली ती मुलगी, मी तिचा कोणतरी हक्काचा माणूस आहे तस माझ्यासोबत वागू लागली. बोलायला लागली की थांबायची नाही. मी ही एकसारखं तिचं बोलणं ऐकत बसायचो. त्यातच इतका वेळ जायचा की मला काही बोलायला राहायचच नाही. पण त्याच मला कधी काही वाटलं नाही. मुळातच माझा स्वभाव काही फार बोलका, बडबडा नव्हता. मला यातच आनंद वाटायचं की कोणतरी माझ्यावर स्वतःच्या माणसासारख प्रेम करत, हक्क दाखवत, तेव्हढा विश्वास दाखवत. आपलं माणूस असण ही काही साधी गोष्ट नाही. मी ही एकटाच होतो, अश्या वेळी निशीता माझ्या आयुष्यात आनंदच घेऊन आली.

एकमेकांसोबत इतका वेळ घालवल्यांतर, समजून घेतल्यावर आम्ही लग्नाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. माझ्या आयुष्यातील खूप छान दिवस होता तो. किती खुश होतो आम्ही दोघं. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत होती. आम्ही दोघंही आता एकटे नव्हतो. आमचं छोटसं कुटुंब तयार होणार होत. लग्नानंतरचे दिवसही खूप सुंदर होते. आता घरी कधीही जाऊन चालणार नव्हत. वाट पाहणार कोणतरी होत ना! त्या फक्त चार भिंती राहिल्या नव्हता, त्यात निशीताने जिवंतपणा आणला होता. तिची मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे ती अगदी साध्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश व्हायची. अगदी साधा फुलाचा गजरा नेला तरी खुलून निघायची.

काळ पुढे सरकत जातो तस नात्याचा परिभाषा देखील बदलत जातातच. आमचं नातं पण आता पुढे सरकत होत. आमच्या आयुष्यात अर्पिता आली होती. आम्ही आई बाबा झालो होतो. नवीन जबाबदारी आली होती. त्यामुळे स्वतःला पण त्यानुसार थोड तरी बदलाव लागणारच होत ना! पण हे निशीताला का कुणास ठाऊक समजत नव्हत. तिला वाटत होत मी त्या दोघांना वेळ देत नाही.

अस नाही निशी! मी तोच आहे. पण आता मी फक्त तुझा नवरा नाही, मी एका मुलीचा बाबा पण आहे. तुमची जबाबदारी आहे माझ्यावर. मी जे काही करत आहे ते तुमच्यासाठीच करत आहे. हो; मी मान्य करतो माझी चिडचिड होते, मला माझ्या मनातलं नीट व्यक्त करता येत नाही. पण तू, तू तरी मला समजून घे ना! तू माझ्या अश्या वागण्याची कारणं विचारतेस पण त्यात समजुतीचा सुर नसतो. तक्रार जास्त असते.

मला माहित आहे काही वेळा माझं वागणं थोड चुकत. तुझ्या मैत्रिणीसमोर त्यादिवशी मी अस पटकन बोलायला नको होत. पण मी कसं सांगू तुला? लहान असताना बाबा आईला काही न सांगता कित्येक दिवस कुठेतरी निघून जायचे. कधी येतील, कसे येतील काही माहीत नसायच. त्यांच्या आठवणीने, काळजीने झुरताना मी आईला पाहिलेले आहे. तिच्या डोळ्यातलं ते दुःख मी कधी विसरू शकत नाही. आपलं माणूस आपल्या जवळ नसण्याच दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायच. बाबांच्या काळजीने झुरतच ती मला ही सोडून गेली. त्यांच्यानंतर माझ्या आयुष्यात माझं म्हणून कोण असेल तर तुम्ही दोघीच आहात. मी ही गोष्टच सहन करू शकत नाही की तुम्ही माझ्यासोबत नाही.

मला स्वतःला कामामुळे कुठेही जाता येत नाही. मी तुम्हा दोघांना माझ्यापासून कसं दूर करू? हे सर्व मी तुला नाही सांगू शकत. तुला अस वाटत आधी मी तुझ बोलणं ऐकून घ्यायचो, आता घेत नाही. पण आता गोष्ट अशी आहे की माझ्या मनातलं तू समजून घ्यावं अस मला वाटतं. आपल्या लग्नाला आता पाच वर्ष झाली. आता तरी माझ्या अश्या वागण्यामागच दुःख तुला समजावं हीच माझी अपेक्षा आहे.

आपला प्रवास आपण जोडीने सुरू केला होता, एकमेकांना सोबत घेऊन सुरू केला होता. आता आपण दोघंही दोन टोकांना गेलो आहोत. पण आपण एकत्र येऊ अशी खात्री आहे मला. तुझा श्री बदलला नाही, फक्त त्याच्या अपेक्षा बदलल्या आहेत. अस समज आता मला थोड मोकळं व्हायचं आहे आणि तुला मला मोकळं होऊ द्यायचं आहे. देशील ना माझी साथ? आता कोणाकडेच याच उत्तर नसेल कदाचित, पण काळच याच उत्तर देऊ शकेल.

निशिता अशी का वागते? वाचा भाग – १ 👇👇

माझे Mr. अचानकच असे का वागतात? | भाग – १


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग – २”

  1. Pingback: माझे Mr. अचानकच असे का वागतात? | भाग - १ - आपलं मानसशास्त्र

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!