Skip to content

माझे Mr. अचानकच असे का वागतात? | भाग – १

माझे Mr. अचानकच असे का वागतात? | भाग – १


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आज खूप वर्षांनी काहीतरी लिहायला घेत आहे. खरच किती काळ लोटला असेल मला लिहून? मला कदाचित आठवणार नाही पण या डायरीवर पसरलेली धूळ त्याच उत्तर देऊ शकेल. सर्वात पहिल्यांदा जेव्हा मी ही डायरी हातात घेतली तेव्हा मी एकटीच होते. अस वाटल की माणूस नाही कदाचित पण ही डायरी माझ्या व्यक्त होण्याच माध्यम बनू शकेल, माझ्या भाव भावनांची साक्षीदार होऊ शकेल. आणि ते झालं देखील. किती मोकळं वाटलेले मला तेव्हा. अस वाटल माझी सर्व दुःख, माझा एकटेपणा कोणतरी शोधून घेतय, समजून घेतय. नंतर जणू काही छंदच लागला सर्व काही डायरीमध्ये लिहिण्याचा. अस वाटल कोणाचीतरी सोबत मिळाली आहे. मनात साठवून ठेवण्याच, दाबून ठेवण्याचं काही कारणच उरल नाही. माझ्याच प्रश्नांची उत्तरं मला यातून नकळतपणे मिळू लागली.

या गोष्टीची इतकी सवय लागलेली असताना ती सुटली कशी हे मात्र एक कोड आहे. इतके दिवस आपण लिहिलं, आता बास! अस काही मी स्वतः ला सांगून हा निर्णय घेतला नव्हता. पण एका टप्प्यावर येऊन मी हळू हळू डायरी लिहायच बंद केलं. काय काय झालं होत त्यावेळी? बाकी सर्व घटना काहीश्या पुसट आहेत, हा पण एक घटना मात्र डोळ्यासमोर आता घडल्याप्रमाणे येत आहे. श्री, श्रीनिवास माझ्या आयुष्यात आला होता. तो जेव्हा माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी आपण कोणा जिवंत माणसाकडे आपलं मन मोकळं करू शकतो, कोणीतरी आपल्याला समजून घेऊ शकत हेच विसरून गेले होते. पण त्याच्या वाढत्या सहवासाने, मैत्रीने मला ही जाणीव करून दिली की तुझ्यासाठी कोणीतरी व्यक्ती आहे, कोणीतरी आहे जी तुझ बोलण, तुझ सुख दुःख ऐकून घेऊ शकते, तुला सोबत करू शकते.

आणि हे सर्व करताना तुझ चांगल, वाईट या तराजूत मापन केल जाणार नाही. त्याचा हा सच्चेपणा माझ्या मनातील एकटेपणाची भावना घालवायला यशस्वी ठरला आणि आमच्या मैत्रीचं, प्रेमाचं आयुष्यभराच्या जोडीदारामध्ये रूपांतर झालं. लग्न करून इथे, या घरी येताना जसं बाकी सामान घेतल तसच ही डायरी देखील घेतली. परत सोबत करायला म्हणून नाही तर एक आठवण म्हणून, कधी मागे रमावस वाटलं तर तिथे जाता यावं म्हणून. त्यावेळी परत कधी याचा वापर करायचा असा विचारच केला नव्हता. कारण मला माझ्या हक्काच माणूस मिळालं होत.

आमच्या लग्नाला आता पाच वर्ष होत आली. पण आता मी जर स्वतः ला प्रश्न विचारला तर त्याच काय उत्तरं मिळेल? खरच नवरा बायको म्हणून जो मोकळेपणा, विश्वास, आपलेपणा तो किती काळ टिकला? खरच या पाच वर्षात आम्ही एकमेकांच्या अजून जवळ आलो, आमचं नातं अजून दृढ होत गेलं की आम्ही एकमेकांना अजूनच अनोळखी होत गेलो? लग्नाच्या सुरुवातीला जो स्वप्नवत वाटणारा काळ होता तो हळू हळू जसं काही दुरावत गेला. त्या काळात मी एकसारखी बोलत बसायचे पण श्री मात्र कधी कंटाळायचा नाही.

एखादवेळी काही कारणाने मी शांत झाले तर माझ्याहून तो अस्वस्थ व्हायचा. मला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो हे त्याला चांगल माहीत होत. म्हणून मुद्दाम वाटेत कधी येताना गजरा दिसला, एखाद रोप दिसल तर आठवणीने तो आणायचा. त्याच्या या गोष्टींचं किती कौतुक वाटायचं मला. आजूबाजूच्या लोकांना सांगू लागले की सर्व चिडवायचे, हे काय नव्याचे नऊ दिवस. त्यांनी काहीही म्हटल तरी मला माहित होत अस काही नाही. श्री कधी बदलणार नाही.

पण तो बदलला. आता जो श्री माझ्यासमोर आहे त्याला पाहिलं की अस वाटत याला मी ओळखत नव्हते. ज्याला मी आपला सोबती मानलं तो कोणतरी वेगळाच होता अस वाटत. तो श्री छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारा नव्हता. काही दिवसांपूर्वी कामावरून तो लवकर घरी आला तेव्हा मला आनंदच झाला होता. कोणाला होणार नाही? एरवी कामात आम्हाला दोघांना थोडा वेळ देखील घालवता येत नसे. अर्पिता आल्यानंतर तर पूर्ण वेळ तिच्यातच जाऊ लागला. पण त्यादिवशी तो लवकर आला, विचार केला अर्पिताला पण तिच्या बाबसोबत खेळता येईल. फक्त एक साधा सरळ प्रश्न होता, आज कसा काय लवकर आलास? जास्त काम नव्हत का? यामागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. तरी त्याने किती चिडाव? का? मी, आलोय ते आवडल नाही तुला? यापुढे नाही येत बाई कधीच लवकर! अस म्हणून तो खोलीबाहेर निघून गेला. त्याच्याकडून अशी काही प्रतिक्रिया येईल याची मी कल्पना केली नव्हती. मुलं झाल्यावर नवरा बायको अधिक जवळ येतात अस म्हणतात. कारण त्यांना जोडणारा एक धागा आता आलेला असतो. पण मला याउलट अनुभवायला मिळालं.

अर्पिता आता हळू हळू चालू लागली होती, बोलू लागली होती म्हणून तिला नर्सरीमध्ये घालण्याबद्दल मी त्याच्याशी बोलत होते तर तो अर्ध्या बोलण्यातून निघून गेला. कारण तर सांगितल नाहीच पण चिडचिड मात्र केली. शेवटी मीच एकटीने तिला घेऊन जायचं ठरवलं तर म्हणाला मला एका शब्दाने तुला सांगावस वाटल नाही का? स्वतःच्या विचारांमध्ये त्याला इतकं हरवलेलं मी कधी पाहिलं नव्हत.

आधी माझी अगदी निरर्थक बडबड पण ऐकून घेणारा तो आता मी काहीतरी महत्त्वाचं सांगत असले तरी ऐकून घेत नव्हता. त्याच्याकडे तितका वेळच नव्हता. मला बोलू देत नव्हताच पण स्वतः देखील बोलत नव्हता. सुट्टीत आपण बाहेर फिरायला जाऊयात का? या प्रश्नात मी त्याच्या कोणत्या स्पेसचा भंग केला होता? पण त्याला तस वाटत होत. नवरा बायको असलो तरी माणूस म्हणून त्या माणसाला थोडीतरी स्पेस दिली पाहिजे हे मला जाणीव आहे पण ही कसली स्पेस होती ज्याने आमच्यामध्ये दुरावा वाढत गेला.

आमच्यासोबत बोलायला देखील याला आता वेळ नसतो. पण मग जेव्हा मी दुसऱ्या कोणाकडे जाऊन येते म्हटल,तरी त्याला ते मान्य होत नाही. निशा माझी मैत्रीण, किती आग्रहाने म्हणाली होती, बाळाला घेऊन ये माझ्याकडे राहायला, सर्वच या! तेवढीच मजा येईल. छान वेळ घालवू. श्री च्या मनात नसेल जायचं तिच्या घरी, पण म्हणून त्याने तिच्यासमोर आम्हाला सध्या वेळ नाही आणि ही देखील बाळाला घेऊन कुठे जात नाही अस म्हणणं किती योग्य होत? बर त्यामागचा भाव हा काही सामंज्यसाचा नव्हता. घरी आल्यावर मी विचारलं तेव्हा मात्र त्याने मला ऑफिसच खूप काम असत यासारखी उत्तर दिली. त्याच हे अस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनपेक्षित वागणं मला आता अजून कोड्यात टाकतय. लगेच काहीतरी बोलून जाणं, विरुध्द वागणं. हे सर्व पाहून अस वाटत की आम्ही अजूनही एकमेकांना नीट ओळखलच नाही.

त्याच्या या वागण्याचा मला उलगडा होतच नाही, पण त्रास मात्र होतोय. या सर्व गोष्टीत माझ्याकडून काय चुकल? मीच त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या का? त्याच्या स्वभावाचा हा कोणता पैलू आहे ज्यातून हे सर्व घडतय? माझा त्रास, माझी व्यथा तर मी त्याला सांगू शकतच नाही कारण ती त्याच्यापर्यंत आता पोहोचतच नाहीये. ही डायरी अशी हातात घेतल्यावर वाटत आपण परत आधीच्या त्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत. परत एकटे पडलो आहोत. हा एकटेपणा जाईल का? तो श्री ज्याने मला या एकटेपणातून बाहेर काढलं होत तो पुन्हा माझा हात धरू शकतो का? की यावेळी माझी पाळी आहे त्याला सोबत करायची. कदाचित काळच याच उत्तर देऊ शकेल…

श्री असा का वागत आहे, वाचा भाग २ 👇👇

माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग – २


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “माझे Mr. अचानकच असे का वागतात? | भाग – १”

  1. Pingback: माझी बायको अचानकच अशी का वागते? | भाग - २ - आपलं मानसशास्त्र

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!