प्रेम_आणि_आकर्षण
(नाशिक)
कॉलेजचे दिवस बहुतेकांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात. अर्थात ते त्यावेळी समजतेच असे नाही. बारावीचे वर्ष चालू होऊन चार पाच महिने झाले होते. त्याच काळात मला एक नवीन मित्र मिळाला होता. रवी… अगदी बिनधास्त. जे मनात येईल ते लगेच बोलून टाकणारा. त्याच्या चेहऱ्यावर काळजी किंवा भीती मी कधी बघितलीच नाही. मला त्याचे कौतुक यासाठीही वाटायचे कारण मी मुलींशी बोलायला खूप घाबरायचो तर हा कोणत्याही मुलीसमोर जाऊन उभा राहायचा आणि म्हणायचा… ‘मला तू आवडतेस. तुझा होकार असेल तर चिठ्ठी देईन, आणि नकार असेल तर दुसरी पाहीन.’ यावरून दोन तीनदा त्याने मुलींचाही मार खाल्ला होता. एक दिवस तर एका मुलीने याचे नाव तिच्या भावाला सांगितले. तिचा भाऊ चार पाच जण सोबत घेऊन आला. कॉलेजच्या गेटवरच त्यांनी रव्याला धुतला. मारून झाल्यावर हा त्यांना म्हणतो… ‘या कॉलेजमध्ये तुमच्या बहिणी कोण कोण आहेत हे मला आधीच दाखवून ठेवा, म्हणजे मी त्यांना सोडून बाकीच्यांना मैत्रीबद्दल विचारेन.’ त्याच्या या बोलण्यावर काय बोलावे हे त्या मुलांनाही समजेना. शेवटी… ‘ठीक आहे… उद्या दाखवतो’ म्हणत ते निघून गेले आणि हा अगदी काहीच झाले नाही असे दाखवत कपडे झटकत मी उभा होतो तिथे आला.
“यार… सॉरी… पण ते ५/६ जण होते म्हणून मला भीती वाटली आणि मी मध्ये पडलो नाही.” मी ओशाळून म्हटले.
“अरे बरे झाले मध्ये पडला नाहीस ते… नाहीतर तुलाही धुतला असता त्यांनी. माझे काय… मला सवय आहे याची. तू नको वाईट वाटून घेऊस…” तो बेफिकीरीने म्हणाला.
“आता काय तू उद्या तुझ्या मित्रांना घेऊन येणार? त्या मुलांना मारायला?” मी विचारले.
“नाही रे… ती पोरगीच आपल्याला फॉर नाही तर तिच्या भावाशी भांडून काय उपयोग? आता दुसरी… माणसाने कायम व्यवहारी असावं.” तो म्हणाला आणि मग आम्ही थोडा वेळ गप्पा मारून आपापल्या घरी आलो.
काही दिवसांनी मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आले. एका मुलीने रव्याला ‘होकार’ दिला. त्याचा आनंद गगनात मावेना.
“मिल्या… चल माझ्या बरोबर.” मला काहीसे ओढतच तो म्हणाला.
“कुठे?”
“वर्गात…”
“कशाला?”
“अरे तिथे मला व्यवस्थित बसून चिठ्ठी लिहिता येईल. आजच तिला देतो.” त्याने सांगितले. मलाही तो चिठ्ठीत काय लिहितो हे पाहण्याची उत्सुकता होतीच. आम्ही आमच्या वर्गात गेलो. सिनीअर कॉलेजचे वर्ग भरायला १०/१५ मिनिटे अवकाश होता. आम्ही पहिल्याच बेंचवर बसलो. त्याने लगेचच वहीचे एक पान फाडले आणि लिहिले. ‘प्यार के कागज पे, दिल की कलम से, पहली बार सलाम लिखा, मैने खत महबूबके नाम लिखा’.
“अरे तू तर गाणेच उतरवून काढतो आहेस.” मी म्हटले.
“मिल्या… समजा तिने फसवले आणि ही चिठ्ठी सरांकडे दिली तर? उगाच रिस्क नको. एकतर माझे वडील पोलीस आहेत. कॉलेजमधून त्यांना बोलावणे गेले तर मला सगळ्यांदेखत पट्ट्याने धुतील. ही चिठ्ठी तिने सरांना दिली तर मला उलटून पडता येईल.” त्यानंतर त्याने चिठ्ठीची घडी घातली आणि आम्ही तिथून निघालो. पण त्यावेळी मला खरंच त्याच्या दूरदर्शीपणाचे कौतुक वाटले. अर्थात तिनेही ती चिठ्ठी हसत स्वीकारली आणि त्यांचे प्रेमप्रकरण चालू झाले. त्यामुळे साहजिकच कॉलेज सुटल्यानंतर होणाऱ्या आमच्या गप्पाही कमी झाल्या आणि मी घरी लवकर जाऊ लागलो.
“काय रे… आजकाल तू लवकर घरी येतोस?” आईने विचारले.
“हो… कॉलेज सुटले की लगेच घरी येतो.” मी उत्तर दिले.
“मग आधी उशीर का व्हायचा?”
“अगं आधी मी आणि रव्या गप्पा मारत बसायचो.”
“मग? आता काय झाले? तुमचे बिनसले का काही?”
“नाही गं… आता त्याला नवीन मैत्रीण मिळाली आहे. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे अनेकदा तर ते कॉलेजचा तास बुडवून कॉलेजरोडच्या एखाद्या झाडाखाली बोलत उभे राहतात. काय बोलतात काय माहित… पण खूपच हळू आवाजात त्यांचे गुळपिट चालू असते.” मी सांगितले आणि आईच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.
“खरे सांग… तू त्याच्याबद्दलच सांगतो आहेस ना?” आईचा स्वर काहीसा मिश्कील होता.
“हो ना… माझे काही असते तर मी घरी लवकर थोडाच आलो असतो? रव्या म्हणत होता, ते कॉलेज संपल्याबरोबर एकमेकांशी लग्न करणार आहेत.” मी काहीशी कौतुकाने सांगितले आणि आईला हसू आले.
“का? तुला खोटं वाटतं?”
“अरे त्याला नीट मिसरूड फुटले नाहीये अजून.”
“म्हणजे… तुला त्यांचे प्रेम खोटे वाटते?”
“प्रेम खोटे नाही… पण त्यांच्यात प्रेम आहे हेच मला वाटत नाही.”
“का?”
“कारण या वयात एखादी व्यक्ती आवडणे याला ‘प्रेम’ म्हणत नाहीत तर ‘आकर्षण’ म्हणतात.”
“पण म्हणजे आवडणेच ना? मग त्यात फरक काय?”
“आहे… खूप मोठ्ठा फरक आहे. पण या वयात ते समजत नसल्यामुळे मुलं आकर्षणालाच प्रेम समजतात आणि मग चुकीची पावलं उचलतात.”
“म्हणजे ही गोष्ट वाईट आहे तर.” मी म्हटले.
“नाही… वाईट म्हणत नाही मी… या वयात मुलाला मुलगी आवडणे किंवा मुलीला मुलगा आवडणे हे नैसर्गिकच आहे. आणि नैसर्गिक गोष्ट वाईट कशी असेल?” तिने म्हटले आणि माझ्या मनातील संभ्रम वाढत गेला.
“आता तू एकीकडे मुलं आकर्षणाला प्रेम समजून चुकीची पावलं उचलतात असेही म्हणतेस, म्हणजे वाईट गोष्ट… आणि दुसरीकडे म्हणतेस ते नैसर्गिक आहे तर वाईट कसे असेल? एक काही तरी सांग ना… ही गोष्ट चांगली, की वाईट?” मी पुरता वैतागलो.
“अरे आकर्षण वाईट नाहीये… तर त्या गोष्टीला अतिशय महत्व देवून जे चुकीचे निर्णय घेतात ती गोष्ट वाईट आहे.”
“म्हणजे कसे?”
“थांब तुला माझ्याच मैत्रिणीचे उदाहरण देते. तुला माझी मैत्रीण नीला माहिती आहे ना?”
“हो… तुझ्या बोलण्यात खुपदा तिचा उल्लेख येतो.”
“हं. तीच. ज्यावेळी आम्ही मॅट्रिकला होतो त्यावेळेसची ही गोष्ट. तिचे वडील सैन्य अधिकारी होते. घरात खूप शिस्तीचे वातावरण. तिचा मोठा भाऊ सुभाष… तो मोठ्या कंपनीत नुकताच दुभाषा म्हणून नोकरीला लागला होता. तशातच तिला एक मुलगा आवडला. त्याचे नाव उत्तम. ही शहरातील श्रीमंतीत वाढलेली. तो गावाकडून शिकण्यासाठी भावाकडे आला होता. दिसायला वाईट नव्हता तो. पण वागण्या बोलण्यात खेडवळ छाप होतीच. हिला तो कसा आवडला हाही एक प्रश्नच होता. पण लवकरच त्यांचे सुत जुळले आणि नीलाच्या वागण्यात फरक पडू लागला. मी, मंगल, शोभा व्यवस्थित शाळेत जात होतो पण नीला मात्र शाळेचे नाव सांगून त्याला भेटायला जायची. दोन तीन वेळेस तिने त्याच्याशी आमचीही भेट करून दिली होती. पण अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? लवकरच ही गोष्ट तिच्या घरी समजली. खूप गोंधळ झाला तिच्या घरी. पण दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते. एकतर त्यांची जातही वेगळी, आर्थिक परिस्थितीतही कमालीची तफावत, सामाजिक वातावरणही अगदीच भिन्न त्यामुळे पुढेमागे त्यांचे लग्न होणे अगदीच अशक्यप्राय गोष्ट होती. चित्रपटात या गोष्टी चालून जातात कारण तो तीन तासाचा कालखंड असतो. ज्यावेळी कायम एकमेकांसोबत राहण्याची वेळ येते त्यावेळी सगळ्या गोष्टी बदलतात. पण त्या वयात त्यांना कुणी याबद्दल सांगायला गेले तर ते लगेच त्यांचे शत्रू बनत होते. शेवटी कसेतरी करून तिच्या वडिलांनी तिच्याकडून ‘परत उत्तमला भेटणार नाही’ असे वचन घेतले. काही दिवस त्याप्रमाणे ते एकमेकांना बिलकुल भेटले नाहीत. मग आमची परीक्षा जवळ आली. तिने ‘एकबोटेकडे अभ्यासाला जाते आहे’ असे घरी सांगितले आणि उत्तमला भेटायला गेली. बराच वेळ झाला तरी मुलगी आली नाही म्हणून तिचे वडील आपल्या घरी आले. आता मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती त्यामुळे मी त्यांना सांगितले की अनेक दिवसांपासून ती मला भेटलेली नाही. आणि ती आमच्याशी फारसे नीट बोलतही नाही. त्याचा त्यांना धक्काच बसला. त्यावेळी कुणी मुलगा मुलगी बागेत बसलेले दिसले की नाशिकचे पोलीस त्यांना पोलीस स्टेशनला घेवून जायचे. आणि मग दोघांच्याही घरच्यांना स्टेशनमध्ये बोलावून घ्यायचे. तिचे वडील घरी पोहोचतात न पोहोचतात तोच एक पोलीस त्यांना बोलावण्यासाठी त्यांच्या घरी आला. ‘आम्ही तुमच्या मुलीला एका मुलासोबत बागेत भेटताना पकडले आणि पोलीस स्टेशनला नेले आहे. तुम्ही कुणीतरी तिथे येऊन तिला घेऊन जा.’ असे सांगितले. हा त्यांच्यासाठी खूपच मोठा धक्का होता. इतकी शिस्त लावूनही आपली मुलगी बिघडली हे त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनी अंथरून धरले. वडिलांची अशी हालत बघून नीलालाही तिच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला आणि नीला-उत्तम प्रकरण तेवढ्यावरच संपले. अर्थात घरच्यांनी लवकरच तिचे लग्नही लावून दिले. तिचा नवरा सैन्यात अधिकारी पदावर आहे. आता तिला दोन मुले आहेत. या मे महिन्यात आपण नाशिकला गेलो होतो त्यावेळी ती अगदी योगायोगाने मला भेटली. बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. पण उत्तमचा विषय ना तिने काढला ना मी.” आईने सांगितले.
“बापरे… म्हणजे तुमच्या काळात देखील अशा गोष्टी घडत होत्या?” मी काहीशा अविश्वासाने विचारले.
“अरे काळ बदलला तरी माणसाच्या भावना त्याच असतात. राधा ही कृष्णाची प्रेमिका होती असेच बरेच जण म्हणतात ना? म्हणजे त्यावेळी ही या गोष्टी होत्याच की.” आईने समजावले.
“आई… मला वाटते नीला मावशी आणि त्या मुलाचे एकमेकांवर खरे प्रेम नसणारच…” मी ठामपणे म्हटले.
“असे तुला का वाटते?”
“कारण खरे प्रेम असते तर त्यांनी एकतर लग्न केले असते किंवा लग्न होत नाही म्हणून आत्महत्या तरी केली असती.” मी म्हटले आणि आईचा चेहरा काहीसा गंभीर झाला.
“तू असे म्हणतो आहेस कारण तुला प्रेम आणि आकर्षण यातील फरकच नीटसा समजला नाहीये. वरवर बघता आकर्षण आणि प्रेम यांच्या मुळाशी आपली आवडच असते. पण आकर्षणात आपण फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतो, तर प्रेमात समोरच्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतो. यामुळेच आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्या सोबत राहू लागली की तिच्याबद्दल असलेले आकर्षण कमी होऊ लागते. अनेकदा तर ते संपते ही. पण प्रेमात मात्र तसे नसते. इथे विचार समोरच्या व्यक्तीचा करत असल्यामुळे ती व्यक्ती आपल्या सोबत असो वा नसो… प्रेम कायम राहते. आता राधा कृष्णाचेच उदाहरण बघ ना… तू कुठे वाचले आहेस का राधा आणि कृष्ण यांनी लग्न केले म्हणून? मग काय त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम खोटे ठरते का?”
“ओके… मग मला असे सांग, प्रेमात जर समोरच्या व्यक्तीचा विचार करायचा असतो तर मग लोकांचा ‘प्रेमभंग’ झाला असे का म्हणतात. आणि मग असे लोक आत्महत्या का करतात?”
“एकतर मला हा शब्दच पटत नाही. कारण माझ्या मते प्रेमाचा भंग होत नाही. आणि जर त्याचा भंग होत असेल तर त्याला प्रेम म्हणताच येत नाही. बाकी मुलं आत्महत्या करतात कारण त्यांनी फक्त स्वतःचा विचार केलेला असतो. आणि मी तुला आताच सांगितले की प्रेमात स्वतःचा नाही तर दुसऱ्यांचा विचार करायचा असतो म्हणून. काय… पटतंय का?”
“हं… थोडं थोडं…”
“काय आहे ना. या वयात माणूस खूप पटकन इतरांवर विश्वास ठेऊ लागतो. त्यामुळे एखाद्याने म्हटले की आपण जगून एक होऊ शकत नाहीत तर मरून एक होऊ… त्यावर लगेच विश्वास ठेवला जातो. पण ते मुलं हा विचार करत नाहीत की दीड दोन वर्षांपूर्वी तर आपल्याला आपला प्रियकर किंवा प्रेयसी कोण, कुठे होते हेही माहित नव्हते. तरी आपण आनंदी जीवन जगलो. मग उद्या ते दूर गेले तर असा खास काय फरक पडणार आहे? एक सांग… आईचे आणि मुलाचे नाते सगळ्यात महत्वाचे असते हे तर तू मान्य करशील? पण एखाद्या वेळी एखाद्या मुलाची आई त्याला जन्म दिल्याबरोबर देवाघरी जाते. तरी ते मुल वाढतेच ना? आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतेच ना? मग एखाद्या व्यक्तीशिवाय रहाणे शक्य नाही हे कितपत योग्य वाटते? चल बाकी सोड, आपले भाडेकरू दिगंबर आणि रुपाली यांनीही प्रेमविवाह केला हे तर तुला माहितीच आहे. पण आजूबाजूचे लोक त्यांच्याबद्दल काय सांगतात आपल्याला? ‘ते रोज भांडण करतात, कधी कधी दिगंबर तर रूपाच्या अंगावरही हात टाकतो.’ याला प्रेम म्हणायचे का? आपल्या पासून लांब असलेली वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला आवडू लागते. ती आपल्याला मिळाली पाहिजे असे वाटणे याला आकर्षण म्हणतात, ‘ती आपल्याला मिळत नाही म्हणजे काय?’ ही भावना म्हणजे अहंकार. आणि या सगळ्या भावनांचं आयुष्य खूप लहान असतं. एकदा का ती मिळाली की ती नित्याचीच गोष्ट बनते. मग त्यावेळी दुसरी एखादी गोष्ट जी आपल्यापासून लांब असते आणि आपण तिच्याकडे अकर्षले जातो. हाच मानवी स्वभाव आहे. ते म्हणतात ना… दुरून डोंगर साजरे… या बाबतीतही ती म्हण तंतोतंत लागू पडते. ही गोष्ट ज्यांना समजत नाही ते आत्महत्या करतात. त्यांच्या घरातील लोकही चार दिवस अश्रू ढाळतात, वर्षभर घरात फोटो लावतात आणि नंतर फोटोवरील धूळ देखील झटकली जात नाही. यालाच जीवन म्हणतात. त्यामुळे जेंव्हा तुझ्या वयाची कुणी मुलं प्रेमाबद्दल बोलतात त्यावेळी मला हसू येते. एक लक्षात ठेव… प्रेम सांगावे लागत नाही, ते आपल्या कृतीतून लोकांना दिसते.” तिने म्हटले आणि मी गप्पं बसलो. अर्थात ते सगळे मला त्यावेळी पटले होते असे मात्र मी बिलकुल म्हणणार नाही. मी यापासून लांब राहावे म्हणून तिने मला दिलेली ती उदाहरणेच वाटली.
आपली आई किती बरोबर बोलत होती हे मला समजायला जवळपास दोन वर्ष लागले. या काळात कधी कधी आई विचारायची… ‘कायरे… काय म्हणतोय तुझा मित्र आणि त्याची मैत्रीण?’ आणि मी ‘त्यांच्यात खरे प्रेम आहे हे तिला ठासून सांगायचो’. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी फक्त स्मित झळकायचे. जसजसा काळ जाऊ लागला, रवी आणि त्याच्या मैत्रिणीचे वाद वाढू लागले. बरे वादाची जी कारणे होती ती माझ्या मते अगदीच किरकोळ होती. तिच्या मते रवी अजूनही दिसेल त्या मुलींकडे बघत असतो आणि रवीच्या मते ती कायम त्याच्यावर संशय घेत असते. शेवटी एक दिवस हे वाद खूप विकोपाला गेले आणि दोघांनीही एकमेकांना दुषणे देत त्यांच्यातील नाते संपवले. ज्यावेळी मी हे आईला सांगितले त्यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर कायम झळकणारे स्मित नव्हते.
“मिलिंद… एक सांगते. समजा पुढे चालून तुझ्या बाबतीत असे काही घडले तर उदास होऊ नकोस. आत्महत्येसारखा घातक विचार तर मनातही आणू नकोस. जीवन खूप मोठे आहे आणि त्या मानाने काही दिवसांचे आकर्षण ही खूप छोटी गोष्ट आहे. आणि अशा गोष्टी आपल्या मुलांच्या बाबतीत घडू नये यासाठी पालक कायम प्रयत्नशील असतात. कधी समजावून सांगतात तर कधी रागावतात. पण त्यामागे त्यांची आपल्या मुलांबद्दलची काळजी असते. अजूनही या गोष्टींचा त्रास मुलांपेक्षा मुलींना जास्त होतो. अनेकदा मुलं नाते तुटले तर एकतर व्यसनाधीन होतात किंवा सूडाला पेटतात. या दोन्ही गोष्टी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना त्रासदायक ठरतात. त्यामुळे या बाबतीत कायम सावध रहा.” तिने सांगितले.
“आई… विश्वास ठेव… अशा काही गोष्टी माझ्या बाबतीत जर कधी घडल्या तर मी ना व्यसनाधीन होईन, ना आत्महत्या करेन, ना मनात सुडाची भावना ठेवेन.” मी आईला वचन दिले आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.
या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा
Khup chaan…ajachya mulnach chitra barobar rekhayly
Shahar n gaav ge comparison discriminating aahe….. Aani aarthik comparison pan…… Ase paramerer lagane chukich aahe…… Lekh purnatah barobar nahi…… Comparison vali maansikta disty….. Tya goshti chukichya aahet…… Lekhamadhe……. Baki baryapaiki mandnyacha prayatn thik aahe…..
अप्रतिम…..
खूपच छान. मी एक शिक्षिका आहे आणि अश्या गोष्टी अजू बाजूला होताना मला नेहमीच अनुभव येतो. कधी कधी काही मुले विश्वासात घेतले की आपणहून सांगतात. त्या वेळी त्यांना असे मार्गदर्शन करायला याचा खूप फायदा होईल. अगदी योग्य आणि सोप्प्या पद्धती त विचार मांडले आहेत.
असेच साहित्य आपण प्रकाशित करावे .
मिलिंद जोशी ह्यांचा लेख उत्तम
प्रेम आणि आकर्षण यावर आईनं मुलाला दिलेलं उत्तरं … …….. .
” प्रेमात स्वतःचा नाही तर दुसऱ्यांचा विचार करायचा असतो ”
मिलींद जोशींचा लेख खूप आवडला आपण हा लेख आपल् मानशास्त्र या ग्रुपवर शेयर करून तुम्ही समाज उपयोगी काम केले आहे त्याबद्दल मनप्रवाह ग्रुपच्या वतीने मी आभार मानतो असेच दर्जेदार साहित्य आपण आपल्या ग्रुपवर प्रकाशित करत रहा जेणे करून सायकॉलॉजिस्ट ना ते उपयुक्त असेल आणि ते जोशी सारखे योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील हा लेख वाजून अनेकांना चे डोळे उघडले असतील असे मला वाटते खरतर हा विषय पालकांसाठी उपयुक्त आहे आपल्या पाल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन करावे याचे उत्तम उदारहण आहे …… प्रा महेश पाटील मानोसोपचार तञ्
प्रत्यक्ष मुलामुलींना आणि मोठ्यांनाही अशी समज दिली पाहिजे