Skip to content

प्राथमिक लैंगिक शिक्षण ही आजच्या काळाची गरज !!

प्राथमिक लैंगिक शिक्षण ही आजच्या काळाची गरज !!


डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

(स्त्रीरोग व आयुर्वेद तज्ज्ञ)
संपर्क क्र. 8793400400


टीप – सदरील लेख हा सत्य घटनांवर आधारित असुन गोपनीयते साठी नाव टाकलेली नाहीत… या लेखा मधुन फक्त मला उमलनाऱ्या वयातील मुलींचे रक्षण करायचे आहे.. पालकांनी सजग राहाण्या साठी मी लिखाण केले आहे… या मधुन मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत… याची जाणीव वाचताना राहु द्यावी ही नम्र विनंती…

“डॉक्टर मॅडम माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आईला हातभार म्हणून मी किराणा दुकानात काम करते. दुकानदार सर्वांसमोर माझ्याशी खूप चांगला वागतो परंतु मी एकटी असताना माझ्याशी अश्‍लील चाळे करतो, नको तिथे स्पर्श करतो.”

“डॉक्टर आमच्या शाळेतील एक शिक्षक माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघतात आणि वर्गात कोणी नसताना किंवा खेळण्याच्या तासाला मला नको तिथे स्पर्श करतात.”

“डॉक्टर माझी आई कामावर जाते. शनिवारी मी शाळा सुटल्यावर लवकर घरी जाते. तेव्हा आमच्या शेजारचे काका आमच्या घरी येतात आणि माझ्यावर त्यांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा जबरदस्ती केली आहे. एक दिवस तर माझा ओठ खूप सुजला होता आणि त्यातून रक्तही येत होते. अशावेळी तेच आमच्या घरी आले आणि आईसमोर मला विचारले, “अगं ताई, तुझ्या ओठांना किडा चावला आहे का ?” तरी पण मी आईला काहीच सांगू शकले नाही.”

“डॉक्टर माझ्या घरी माझी खाजगी शिकवणी घ्यायला एक शिक्षक दोन वर्षांपासून येतात. मागील एक वर्षापूसन ते शिकवताना माझ्याशी अश्‍लील चाळे करतात. माझ्या आईला वाटते की, दार लावून ते शांतपणे अभ्यास घेत असतील. एकदा तर मी आईला सांगण्याचा प्रयत्नही केला. तर आई मला म्हणाली, “एवढ्या चांगल्या सरांवर तुला आरोप करताना लाज वाटत नाही का? त्यांच्यामुळे तुला एवढे चांगले मार्कस् मिळतात आणि त्यांच्याबद्दलच तू असा घाणेरडा विचार करतेस. सिनेमा बघून तुझ्या मनाची अवस्था अशी झाली असेल आणि तुला नको ते भास होत असतील. थांब उद्याच तुझ्या बाबांना टी.व्ही. बंद करायला सांगते.”

असे एक ना अनेक अनुभव मला प्राथमिक लैंगिक शिक्षण या विषयावर कार्यशाळा राबविताना येतात..
महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये मी ह्या कार्यशाळा राबविते… अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागा पर्यन्त…

मुलींचे अनुभव ऐकल्यानंतर अक्षरश: अंगावर शहारे उमटतात. कधी काका, मामा भाऊ, शेजारचा मुलगा, ड्रायव्हर, शिपाई, वॉचमन, वडिलांचे मित्र अशा अनेक ओळखीच्या लोकांकडूनच मुलींना नको ते लहान वयात अनुभव येतात आणि या बाबतीत त्या आपल्या आई-वडिलांशीही संवाद साधू शकत नाही. कारण या व्यक्तीचे त्यांच्या आई-वडिलांशी नाते खूप प्रेमाचे, आपुलकीचे असते. अशावेळी नेमकं या विषयावर पालकांशी कसं बोलावं हेच मुलींना समजत नाही. उलट पालक आपल्यालाच रागवतील अशी त्यांच्या मनात भीती असते व लैंगिक अत्याचार करणार्‍यालाही मुलींच्या घाबरट स्वभावाबद्दल खात्री असते. त्यामुळे मुली वर्षानुवर्षे या अत्याचाराला बळी पडतात. तरी याची वाच्यता कुठे होत नाही.

एकदा मी पुण्यात एका शाळेवर माझी या विषयावरची कार्यशाळा घेत होते. त्यावेळी योग्य स्पर्श -अयोग्य स्पर्श कोणते, ते कसे ओळखावे हे मुलींना शिकवत होते. या विषयी सांगितल्यावर एक मुलगी अचानक धायमोकलून रडायला लागली. तिचे रडण्याचे कारण विचारले असता ती काहीच बोलली नाही. तिला जवळ जावून मी शांत केले आणि ऑफिसमध्ये भेटायला ये म्हणून सांगितले. व्याख्यान संपल्यानंतर ती ऑफिसमध्ये आली व मला एकांतात सांगू लागली, “डॉक्टर, ही घटना सात वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी बालवाडीत शिकत होते. रिक्षावाले काका मला घरी सोडत असायचे. सर्वात शेवटचे घर आमचे असल्यामुळे रिक्षात शेवटी मी एकटीच असायची. रिक्षातून उतरताना ते रोज माझी गालाची पपी घेत होते व त्याच वेळी माझ्या शुच्या जागी हात लावत होते. माझे ममी, पप्पा पण माझी पप्पी घेत असल्यामुळे मला यामध्ये काही चुकीचे वाटत नव्हते. परंतु तुम्ही जेव्हा आज योग्य आणि अयोग्य स्पर्श यातील फरक समजावला त्यावेळी मला आपण लहान वयात लैंगिक अत्याचाराला बळी पडलो होतो याची जाणीव झाली व मला रडायला आले.”

विविध शाळांमध्ये कार्यशाळा घेताना मला जाणवले की, लैंगिक विषयामधील अज्ञान असल्यामुळे मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार होतात. खरे तर याचे प्रमाण पाच मुला-मुलींमागे एक मूल लैंगिक शाषणास बळी पडत आहे. शाळेमध्ये कार्यशाळा घेताना मला सुद्धा सुरुवातीला या विषयावर बोलण्यास अवघड जात होते. कारण बोलण्यास सुरुवात केल्यावर माता-पालक विद्यार्थी व शिक्षक यांना सुद्धा अवघडल्यासारखे होते. ग्रामीण भागात तर या विषयावर थोडासुद्धा संवाद साधला जात नाही. बोलण्यास सुरुवात केल्यावर बरचसे माता-पालक खाली मान घालून बसतात. विद्यार्थी-विद्यार्थीनी हसायला लागतात. हे आजचे चित्र आहे. परंतु आजच्या काळात कोपर्डीसारख्या घटना जर वारंवार घडत असतील तर या विषयावर उघडपणे बोलणे व मुलांना आणि पालकांना शास्त्रोक्त ज्ञान देणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे.

आपल्याकडे शासन घटना घडल्यानंतर जागृत होत असते. परंतु तोपर्यंत आपण आपली मुलगी गमावलेली असते आणि त्याची नुकसान भरपाई ही कुठल्याही पैशाच्या देणगीमध्ये भरून येऊ शकत नाही. कारण आपण कुठल्याही वस्तूविषयी बोलत नाही तर आपण आपल्या मुलींविषयी बोलत आहोत. अशी जेव्हा जाणीव मी पालकांना देते त्यावेळी ते जागृत होतात व माझे म्हणणे ऐकून घेण्यास तयार होतात.

खरेतर आता शासनानेच प्रत्येक शाळेवर या विषयी कार्यशाळा घेण्यासाठी सदस्य नेमणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. मुला-मुलींना आपण योग्य-अयोग्य स्पर्श, प्राथमिक लैंगिक शिक्षण, मासिक पाळी व त्याच्या समस्या, प्रजनन संस्थेतील अवयवांची माहिती व कार्य, शरीरात होत असणारे हार्मोन्सबदल यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती देणे आवश्यक झाले आहे. या माहितीमुळे मुली सजग बनतात व योग्य वेळीच लैंगिक अत्याचाराला विरोध करू शकतात व त्यांचे स्वत:चे संरक्षण करू शकतात.

लैंगिक अत्याचार हे कुठल्याही वयात होवू शकतात. लहान वयातील मुलींवरही अत्याचार होवू शकतात. फक्त मुलींवरच अत्याचार होतात असे नाहीतर पिशाच्च वृत्तीचे अमानुष लोक लहान मुलांवरही लैंगिक अत्याचार करतात . याकरीता आईने सुद्धा याविषयी डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती घेऊन आपल्या मुला- मुलींना सोप्या-सहज भाषेत त्यांना विश्‍वासात घेऊन समजावून सांगावे. कारण याचे दुष्परिणाम आयुष्यभर पीडितांना भोगावे लागतात. एक वेळ शारीरिक जखम लवकर बरी होते… परंतु मनावरचा घाव लवकर बरा होत नाही….

आई ज्या पद्धतीने आपल्या लेकराला सांगू शकते ते दुसरे कोणीही सांगू शकत नाही. अगदी लहान वयातील मुला- मुलींना योग्य स्पर्श कोणते, अयोग्य स्पर्श कोणते याविषयी शास्त्रोक्त मार्गदर्शन करावे.

जसजशी मुलगी मोठी होईल तसतसे तिला पूर्ण लैंगिक शिक्षण द्यावे. या शिक्षणामुळे तिला समाजातील विकृत धोके समजतील. या लैंगिक शिक्षणामुळे “नाही” म्हणायचे धाडस व ठामपणा तिच्यामध्ये येईल. तिला स्वत:चे संरक्षण करता येण्यासाठी तिला कराटे सारखे स्व:संरक्षणाचे शिक्षण द्यावे. भविष्यामध्ये एखादी दुर्देर्वी घटना चुकून तिच्या आयुष्यात घडली तर त्याविषयी किंवा तिच्या भावभावनांविषयी तिला त्याबद्दल तुमच्याशी (पालकांशी) मोकळेपणाने बोलता आले पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट धाकाने किंवा उपदेशाच्या स्वरात विचारण्यापेक्षा तिच्याशी प्रेमाने संवाद साधा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलीवर विश्‍वास ठेवा. ती जे काही बोलत आहे त्याबद्दल शांतपणे विचार करा. लैंगिक अत्याचार करणार्‍या व्यक्ती या कदाचित तुमचा विश्‍वास संपादन करणार्‍या असतील. परंतु आपणही आपल्या मुलीला चांगले ओळखत असतो. तेव्हा ती आपल्याशी खोटे कशाला बोलेल. तिच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून प्राथमिक चौकशी करा. चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास पोलिसांची किंवा चाईल्ड हेल्प लाईनची मदत वेळीच घ्या. लैंगिक अत्याचार आपल्या मुलीवर घडला असल्यास तो कोणी व कधी केला हे विचारा परंतु हे असे का घडले व तुझ्या चुकीमुळेच घडले असे म्हणून तिला नकारात्मक, विचारांमध्ये राहू देवू नका.

मुला-मुलींना याविषयी आई-वडिलांशी बोलण्याची मोकळीक प्रत्येक घरात हवी. आपल्या मुलींना घरात प्रेम, आपुलकी व सुरक्षा मिळाली तर मुली बाहेरच्या प्रलोभनांना बळी पडत नाहीत. कधी कधी तारुण्यावस्थेत होणार्‍या बदलांमुळे सुद्धा लैंगिक अत्याचार होतात. म्हणून मुलांचे लाड पैशाने करण्यापेक्षा त्यांना पालकांनी वेळ देणे व त्यांच्या भावना समजून घेणे आजच्या काळाची गरज बनली आहे. तरच आपण विकृत लैंगिक अत्याचार रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी होऊ असे मला वाटते….


सौ. पवार (डोंबिवली) यांनी आपल्या मुलाचं करीअर कॉउन्सिलिंग करून व्यक्त केलेला अनुभव. नक्की वाचा !


शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !

————————————————————————

1 thought on “प्राथमिक लैंगिक शिक्षण ही आजच्या काळाची गरज !!”

  1. एस.एस. वैष्णव .

    या लेखात खूप महत्वाचा विषय हाताळला . ग्रामीण भागात अतिशय गंभीर स्थिती आहे .पालक सर्वच बाबतीत शाळेवर अवलंबून राहतात .२४ तासापैकी फक्त्त ६ तास विद्यार्थ शाळेत असतो .परंतू पालक सर्व बाबतींत शाळा , शिक्षक , मुख्याध्यापक यांनाच जबाबदार धरतात व त्यानाच दोष देता त् . हल्ली प्रत्येक शाळेत कोणीही या बाबींकडे जबाबारीने . वागताना दिसत नाही . वरीष्ठ पाहतील , ते करतील , त्यांच काम आहे , माझा काय संबंध असे समजून अनेक घटना टाळल्या जातात . व नंतर त्यांचे उग्र स्वरूप होते . यावर काय करता येईल ? ९८८१८८८५६२वर कळवा .

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!