राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
एकटी राहणारी मुलं
“आजपासून तुमच्यासोबत कोणीही बोलणार नाही, जवळची माणसं तुम्हाला एकटी पाडतील, तुमचे कोणीही ऐकून घेणार नाही, तुमच्या भावना कोणीही समजून घेणार नाही”
दुर्दैवाने उद्या जर तुमच्यावर अशी परीस्थीती ओढावली तर फक्त कल्पना करूनच अस्वस्थ वाटते. आपण एकांत शोधू शकतो, पण अंगाशी येणारा एकटेपणा कदापी सहन करू शकत नाही. फार-फार तर महीना किंवा अगदीच वर्ष आपण आयुष्याच्या एकट्या प्रवासाची कल्पना करू, परंतु आजूबाजूला जर आपल्याला समजून घेणारी माणसं शिल्लक नसतील तर तो एकटेपणा खायला उठतो आणि मग तेथूनच मानसिक समस्या किंवा आजार जन्म घ्यायला लागतात. म्हणजेच एकटेपणाचा आपला मेंदू स्वीकार करीत नाही.
म्हणून अशी काय परीस्थीती ओढावते की आपली मुलं आपल्यापासून दूर गेल्यासारखी वाटतात. हल्ली-हल्ली फार एकटी पडल्यासारखी वाटतात. एक केस स्टडी पाहुयात….
केस :-
अपर्णा सध्या ६ वीत शिकत आहे. शांत, लाजाळू आणि पटकन भावना व्यक्त न करणारी मुलगी. त्यामुळे तिला फारसे कोणीही मैत्रिणी नाही, एक आहे ती सुद्धा कधीतरीच तिच्या शेजारी बसायला येते. कितीही वाटले तिला बोलावेसे तरी कसं बोलायचं, असे तिला प्रश्न पडतात. म्हणून नेहमी परिस्थिती टाळत असे. अभ्यासात फार हुशार जरी नसली तरी समाधानकारक निकाल हाती येतो. त्यादिवशी त्याच मैत्रिणीसोबत शाळेत जाता जाता एक चित्र तिच्या नजरेत पडले, “घाण, शी…., व्याक” हे मैत्रिणीचे उद्गार ऐकून अपर्णाने लगेच मान दुसरीकडे वळवली. त्या चित्राचा अर्थ तितकासा अपर्णाला कळत नव्हता, पण मैत्रिणीच्या किळसवाने शब्दांमुळे ती जरा भेदरली. त्याच्या २-३ दिवसानानंतर लगेचच बाबांच्या घेतलेल्या मोबाईलमध्ये बाबांनीच राखून ठेवलेली “पॉर्न साईट” अचानक तिच्या समोर खुली झाली. लगेचच मैत्रिणीचे ते उद्गार कानावर घुमू लागले. आणि तिच्याकडून मोबाईल खाली आपटला गेला. बाबा सुद्धा घाणेरडे आहेत, असा धसका तिने घेतला. मोबाईलवरील चित्र पाहून त्यादिवशी तिचे हाथ-पाय थरथरायला लागले. ४-५ दिवस प्रचंड दडपणात ती होती. त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत ती खूप एकलकोंड्या सारखी वागत आहे. रस्त्यावर दोन कुत्र्यांची पाहीलेली क्रीडा असो किंवा बाबांच्या मोबाईल मधील चित्र असो, यावरून चुकीची माहीती तिच्या मनात जात होती. बाबांचा द्वेष ती करू लागली होती. ती एकलकोंडी तर होतच होती, पण लैंगिकतेबद्दलची सदोषता तिच्या ठिकाणी वाढत होती. अगोदरच भावना व्यक्त न करणारी मुलगी आणि त्यातल्या त्यात समोर येऊन ठेपलेली अशी अवघड स्थिती, याचा तिच्या शैक्षणिक आयुष्यावर तर परिणाम होतंच होता, तसेच व्यक्तिगत आयुष्यही बिघडत होते. आणि अशा कित्येक घटना चुकीच्या मार्फत मनात शिरून मुलांचा गोंधळ वाढवत आहेत. ही स्थिती मुलांच्या ठिकाणी पुढे किती प्रमाणात वाढेल, कोण जाणे ?
लक्षणे :-
१) इतरांनी माझ्या भावना समजून घ्यावे, अशी या मुलांची अपेक्षा असते.
२) कितीही खोदून विचारले तरीही दडपलेल्या भावना त्या कोणासमोरही व्यक्त करीत नाहीत.
३) भावना व्यक्त न केल्यामुळे त्यांना चित्र-विचित्र स्वप्ने पडतात.
४) अशा मुलांना वेळीच समजून न घेतल्यास शैक्षणिकदृष्ट्या ते फारशी प्रगती करू शकत नाहीत.
५) हि मुलं स्वतःला शून्यात पाहतात.
कारणे :-
१) वरील प्रसंगाप्रमाणे एखादी घटना मुलांसोबत घडली असल्यास आणि ती घटना मनात खोलवर रुजली असल्यास नेहमीच्या स्वभावाप्रमाणे अशी मुलं एकटी पडतात.
२) आई-बाबांपैकी दोघेही लहानपणी अशा स्वभावाचे असल्यास अनुवंशिकतेमार्फत या गोष्टी मुलांमध्ये येऊ शकतात.
३) अभ्यासाचे प्रचंड ओझे-दडपण आणि त्यामुळे छंद जोपासता न आल्यामुळे अशी वर्तन समस्या निर्माण होऊ शकते.
४) अंतर्गत भावना समजून न घेतल्यामुळे किंवा त्या भावनांचा जास्त बाऊ झाल्यामुळे ही मुलं भावना व्यक्त करायला कचरतात.
उपाय :-
१) कितीही टोकाकडची स्थिती निर्माण झाली तरी अशा मुलांच्या भावना समजून घेऊनच त्यांच्याशी संवाद साधावे.
२) आपली मुलं एकटी का पडत आहेत, तसेच त्यांच्या बदलत्या भाव-भावनांकडे पालकांचे नेहमी लक्ष असावे, काही वेगळीच स्थिती जाणवल्यास मुलांसोबत मैत्रीपूर्ण चर्चा करणे केव्हाही उत्तम. परंतु अचानक जर मैत्रीचा हात तुम्ही पुढे कराल तर संशयित वातावरण निर्माण होऊ शकते, म्हणून सदैव तुम्ही मुलांसोबत मित्र म्हणून राहणे केव्हाही उत्तम.
३) मुलं जर आपल्याकडे बोलत नसली तर त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडून कानोसा घ्यावा.
४) मुलांचे चार-चौघात कौतुक करावे, त्यांनी त्यांच्या काहीशा भावना व्यक्त केल्यास पुढे बोलण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती न करता दोन्ही बाजू पटवून द्याव्यात.
५) शेवटी पालक म्हणून जर स्पर्धात्मक युगात तुम्ही हरवले असाल, तर मुलांनाच कोर्टाच्या कचेरीत उभे करण्यापेक्षा एकदा आरशासमोर प्रामाणिकपणे उभे राहून आपलं कुठे काय चुकतंय का, याचा विचार डोळ्यात डोळे घालून जरूर करावा.
शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————
लेख आवडला. मी पण अशा प्रसंगाचा सामना करत आहेत. माझा मुलगा आता 18 वर्षाचा होणार आहे. तो घरात नीट वागत नाही. मी आणि दोन मुलीशी बोलत नाही. मित्रांशी बोलतो.त्याला समुपदेशन केले तरी.