Skip to content

शरीर जितकं फिरत राहील, तितकं मन स्वस्थ राहील.

शरीर जितकं फिरत राहील, तितकं मन स्वस्थ राहील.


डॉ.रोहिणी कोरके


स्वस्थ मन स्वस्थ शरीर. शरीर,इंद्रिय,सत्व,आत्मा यांचा सम्यक योग म्हणजे शरीर असे आयुर्वेदामध्ये म्हटले आहे.म्हणजे ज्या शरीरात स्वस्थ मन असेल तेच शरीर स्वस्थ होय.किंवा याच्या अगदी उलट जे शरीर स्वस्थ असेल तिथे स्वस्थ मन वास करते.पण हे शरीर स्वस्थ राहणार कसं तर त्यासाठी फक्त चांगल्या पद्धतीचा आहार घेणं गरजेचं नाही तर तो व्यवस्थितरीत्या पचन होऊन उत्तम दर्जाचा आहार रस तयार झाला पाहिजे तेव्हा शरीर स्वस्थ राहते.आणि पचन चांगले होण्यासाठी आवश्यकता असते ती शारीरिक हालचालीची.

म्हणून जितकं शरीर फिरत राहील तितकं शरीर स्वस्थ राहतं अन् मनही स्वस्थ राहतं ही गोष्ट आपण समजून घेऊया एका छोट्याशा गोष्टीवरून.

शेजारी शेजारी राहणारी दोन कुटुंबं कदम आणि काळभोर.दोन्ही कुटुंब छान होती.कदमांच्या घरात आजी,आजोबा,आई,बाबा अन् दोन मुलं.तर काळभोर यांच्या घरी आई,बाबा अन् दोन मुलं असं चोकोनी कुटुंब.दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते त्यामुळे एकमेकांच्या घरी जाणं येणं देणं घेणं सुरू असायचं.त्यामुळे ओघानेच मुलंही एकमेकांच्या घरी खेळायला जायची.

पण दोन्ही घरच्या संस्कार करण्याच्या पद्धतीत थोडा फरक होता.कदमांच्या घरी मुलांना बरंच स्वातंत्र्य दिलं जायचं तसेच घरात आजी आजोबा असल्याने घरात अधिक बोलकं वातावरण होतं मुलांना हट्ट करायला पाठीशी घालयला ते दोघे होते.त्यामुळे मुलं मनमोकळेपणाने बोलायची.

त्यांच्या शारीरिक व मानसिक गरजा,अडचणी बोलून दाखवायची.आणि घरात आईवडीलही त्या पूर्ण व्हाव्या म्हणून प्रयत्नशील असायचे.तर याउलट काळभोर यांच्या घरी मुलांना अजिबात स्वातंत्र्य नव्हतं.एकतर घरात माणसं कमी त्यामुळं चर्चा ,वादविवाद असं काही जास्त व्हायचं नाही.त्यात वडील कड्क शिस्तीचे असल्याने मुलांना धाक होता.आणि आई सतत कामात त्यामुळे मुलांना जास्त वेळ देऊ शकत नव्हती.

त्यामुळे मुलं मन मोकळी व्हायचीच नाही.सतत कोणीतरी मुलांच्या मागे असं नका करू तसं नका करू.त्यामळे त्यांच्यावर दडपण असायचं.मुलं छोटी होती तोपर्यंत हे ठीक होतं पण आता मुलं वाढीला लागली होती.त्यामुळे त्यांना हे थोडंसं खटकायला लागलं.त्यांना त्याचा त्रास व्हायला लागला.त्यांची चिडचिड व्हायला लागली.आणि कधी कुठे बाहेर पडू दिले नसल्याने त्यांना बाहेरच्या वातावरणाचा काही गंधच नव्हता.

त्यामुळे बाहेर पडायला मुलं घाबरायची.आणि घरात मनमोकळ वातावरण नसल्याने त्यांचा कोंडमारा होऊ लागला.साहजिकच त्याचा परिणाम मुलांच्या तब्येतीवर झाला.मुलं कोमेजून गेली.ती एकदम बारीक दिसायला लागली.त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असा नव्हताच.मोठ्या वृक्षाखाली छोटे वृक्ष जसे वाढत नाहीत,कोमेजून जातात तशी त्यांची अवस्था झाली.

याउलट परिस्थिती कदम कुटुंबात.ती मुलं रोज सकाळी उठून आजीआजोबा सोबत फिरायला जायची.फिरून आलं की त्यांना मस्त भूक लागत असे.त्यामुळे मुलं अंघोळ,देवपूजा करून मस्त नाश्ता करत.मग फ्रेश मूडमध्ये अभ्यास करून मग खेळायला जात.बरोबरीच्या मुलांमध्ये खेळल्याने त्यांची मानसिक devlopment ही व्यवस्थित होत होती.नंतर शाळा आणि शाळा झाली की १ तास मैदानी खेळ खेळून मुलं घरी येत असतं.

त्यामुळे त्यांना भूकही चांगली लागत असे आणि त्यांचं शरीरही स्वस्थ राहिलं होतं.आणि शाळेतून येताना ते रमत गमत चालत येत असत त्यामुळे रस्त्यात कोणी गरजू दिसल्यास मदत करण्याची सवय त्यांना लावली गेली होती.त्यामुळे त्यांना सामाजिक भानही चांगलं होतं.त्यामुळे सोसायटीमध्ये कुठे कोणाला काही मदत लागली की ही जोडी मदतीला हजर असायची.अशा पद्धतीने स्वस्थ मन तिथे स्वस्थ शरीर याची प्रचिती या मुलांकडे पाहिलं की यायची.

एके दिवशी कदम आजीकडे बोलत बसलेल्या असताना काळभोर काकूंनी मुलांविषयी चिंता व्यक्त केली.त्या म्हणाल्या आम्ही मुलांची इतकी काळजी घेतो तरी आमची मुलं अशी का? तेव्हा आजींनी त्यांना समजावलं तुम्ही मुलांना घरातून बाहेरच काढत नाही त्यामुळे शारीरिक हालचाल नाही,मुलांना भूक लागत नाही तसचं मुलांचं मन फ्रेश राहत नाही.त्यांना बाहेर काढा त्यांच्या बरोबरीच्या मुलांमध्ये खेळू द्या,बागडू द्या तेव्हा त्यांचं मन व शरीर स्वस्थ राहील.

त्याप्रमाणे काळभोर काकूंनी मुलांच्या दिनचर्येत बदल केले आणि थोड्याच दिवसात मुलांमध्ये छान बदल दिसून आले. म्हणूनच शरीराला चालतं फिरतं ठेवा आणि मनालाही स्वस्थ ठेवा.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!