Skip to content

तुमच्यासाठी आई-वडिलांना टाकून देणाऱ्या मुलासोबत कधीही लग्न करू नका…..

तुमच्यासाठी आई-वडिलांना टाकून देणाऱ्या मुलासोबत कधीही लग्न करू नका…..


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आपलं आयुष्य म्हणजे आपले आईवडील…आपले जन्मदाते…!!आपल्याला आपले आईवडील किती प्रिय असतात हे सांगायलाच नको.पण त्यांच्या मायेच्या छायेत वाढणारे , संस्कारात घडणारे…आपण इतके मोठे होतो की त्यांना घराबाहेर काढतो.जन्म देताना कोणतीच कल्पना नसेल त्यांना की मोठं झाल्यावर हीच मुलं त्यांना असं टाकून देतील.का आपण असे इतके निष्ठुरपणे वागतो त्यांच्यासोबत….?
आधी आवडायचे तसेच आता घरचे आवडत नाहीत का…?ज्यांनी सगळं काही दिलं त्यांनाच आपण अमानुषपणे वागवतो…का.. कशासाठी..

याचा कधी विचार केला आहे का..आईच्या-वडिलांच्या लाडक्या मुलांनो…?? आणि अशा आई वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या , टाकून देणाऱ्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींनो…..जरा सावधान !! मुलींनो केवळ तुमच्यासाठी एखाद्या मुलानी आईवडीलांना टाकून देणं म्हणजे काय….?? असं तुमच्यासाठी तो त्याच्या आईवडीलांना बाहेरचा रस्ता दाखवतो.. हे तुम्हाला तरी पटतय का..??अशा या मुलाशी तुम्ही लग्न करणार का…?? जो तुमच्यासाठी त्याच्या आईवडीलांना वाऱ्यावर सोडतो.

मुलींनो तुमच्या प्रेमापुढे आईवडिलांच प्रेम , माया एवढी फिकी पडते का….?जो मुलगा तुमच्यासाठी त्याच्या आईवडीलांना टाकून देतो तो मुलगा कशावरून तुम्हाला उद्या कोणासाठी टाकून देणार नाही. कशावरून तो मुलगा तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळेल…आणि कशावरून तो तुमच्या आईवडीलांना सांभाळण्यासाठी तुम्हाला मदत करेल….?? मुलींनो,आहे का शाश्वती कसली तुम्हाला…???म्हणून अशा मुलांशी लग्न करताना जरा सांभाळून…!!

जे आईवडील दिवसरात्र कष्ट करून आपल्या मुलाला घडवतात,मोठं करतात.जे आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांच्या सुखासाठी पणाला लावतात.जगण्याच्या दिशा शोधायला मदत करतात मात्र त्याच आईवडीलांना ही मुलं ‘मुलींनो केवळ तुमच्यासाठी’ कायमस्वरूपी बाहेरचा रस्ता दाखवतात.तुम्ही काल आलेल्या मुली…तुमच्यासाठी ही मुलं जन्माआधीपासून सोबत असलेल्या , तेव्हापासून अतोनात प्रेम करणाऱ्या आईवडीलांना मात्र असे सहज विसरतात.मुलींनो मला सांगा कोणती शाश्वती आहे की तो मुलगा तुम्हाला असं कोणी काल आलेल्या व्यक्तीसाठी सोडून देणार नाही…अशा आईवडीलांची किंमत नसलेल्या मुलाशी लग्न करण्यात काय अर्थ आहे..??

पण गोष्टी अशाही आहेत—की सासु-सासरे अर्थातच मुलाचे आईवडील… बऱ्याचदा असच होतं की मुलींना त्यांची अडगळ वाटू लागते.स्वतः काही बोलणार नाहीत पण नवऱ्याला मात्र जबरदस्ती करून सासू सासऱ्यांना म्हणजेच त्याच्याच आईवडीलांना बाहेरचा रस्ता दाखवायला लावतात.तु त्यांना जायला सांग नाहीतर मी काहीतरी बोलेन…

लवकरात लवकर एक काहीतरी निवड.असा तगादा लावून मुली मुलांना त्यांच्या आईवडीलांना टाकून देण्यास भाग पाडतात.स्वतःची इच्छा नसतानाही मुलं मनावर दगड ठेवून आईवडीलांना बाहेर काढतात. (बाहेरची मुलगी आता आपली जबाबदारी असते.हे आईचे संस्कार लक्षात ठेवून)बायको ही आता आपली जबाबदारी आहे हे त्याच्या लक्षात असतं पण ज्यांनी आपल्याला सांभाळलं ,आपली कधीच आबाळ होऊ दिली नाही..त्यांच्या वाढत्या वयात त्यांचा सांभाळ करणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे हे कदाचित तो विसरत असावा.

मुलींनो याला तुम्हीच कारणीभूत असतात. मुलांवर ही वेळ तुमच्यामुळे येते.नाहीतर आईवडीलांना जीवापाड जपणारीही मुलं अजून या जगात आहेत. आपल्या चुका कितीदा पोटात घेऊन हळव्या मनाने आपल्याला माफ करणाऱ्या… , आपल्या मर्यादा ओळखून आपल्यावर अगदी ‘Unconditional’ प्रेम करणाऱ्या आपल्याच आईवडीलांना आपण असे क्षणात पोरके करतो.

त्याक्षणी त्यांना काय वाटत असेल याचा आपण थोडा तरी विचार करतो का…??आम्ही कुठेतरी संस्कार करण्यात कमी पडलो किंवा आमचच काहीतरी चुकलं….अस स्वतःच स्वतःला दोषी ठरवणाऱ्या आईवडीलांच्या जीवाची घालमेल समजत नाही का…??स्वतंत्र आयुष्य जगायचय तर ते जगा पण आईवडीलांची जबाबदारी झटकून नाही…..!मुलींनो तुमचे किंवा त्याचे—आईवडील हे आईवडीलच असतात.

ज्यांच्यामुळे या जगात पाऊल ठेवतो त्यांनाच असं हाकलून द्यायचं…??उद्या तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते हे मात्र डोक्यात अगदी ‘फिक्स’ करून घ्या.लग्न करण्यापूर्वी नीट विचार करून लग्न करा.

आणि खरचं….. , तुमच्यासाठी आणि तुमच्यामुळे आई-वडिलांना टाकून देणाऱ्या मुलासोबत किंवा मुलीसोबत कधीही लग्न करू नका.स्वतः आयुष्यभर झिजून आपलं आयुष्य चंदनासारख सुगंधी करणाऱ्या आपल्याच आईवडीलांना कधीही अंतर देऊ नका……..आणि त्यांच्या एका चुकीसाठी त्यांना कधीच रस्त्यावर सोडू नका. कारण आपले हजार गुन्हे तेच माफ करत असतात…..ज्यांना आईवडीलांची खरचं किंमत असेल अशाच मुलामुलींशी या प्रेमळ बंधनात स्वतःला झोकून द्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!