स्वतःची किंमत माहीत असलेल्या व्यक्ती विकल्या जात नाही…
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
“किंमत” हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा शब्द आहे.आणि तो सर्वांना निश्चितच परिचयाचा आहे.दैनंदिन जीवनात आपण रोज हा शब्द ऐकत असतो,बोलत असतो.हाच “किंमत” शब्द आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो.जसं की-भाज्यांची किंमत वाढली..,तुला माझ्या आयुष्यात आता काही किंमत नाही..,काही गोष्टी फार किंमती असतात……वगैरे वगैरे अशी वाक्य आपण अनेकदा ऐकतो,बोलतो.पण कधी हा शब्द मनाला इतका झोंबतो की तळपायातली आग मस्तकात जायला वेळही लागत नाही.
तर कधी हाच शब्द इतका सुखावतो की आपण अगदी आनंदाच्या डोहात डुबक्या मारायला लागतो.हा शब्द इतका सवयीचा झालाय की असं वाटतं आपल्या आयुष्यात ‘किंमत’ या शब्दालाच कदाचित जास्त ‘किंमत’ असावी.”किंमत वाढली की मागणी वाढते आणि मागणी वाढली की पुरवठा वाढतो.”असं अर्थशास्त्रात आपण सगळेच शिकलो.पण वास्तविक जीवनात ते अर्थशास्त्र तंतोतंत लागू होईल असं कधी वाटलं नव्हतं.
माणूस ही कोणतीही वस्तू नाही पण तिचा भाव केलाच जातो.आणि कधी कधी मिळेल त्या किंमतीत किंवा कधी कधी ठरवलेल्या किंमतीत त्याची खरेदी-विक्री केली जाते.हो…ही काही वस्तू नाही पण खरेदी विक्री माणसाची होते.इतकच नाही तर माणूसच माणसाची खरेदी विक्री करतो.हेच खूप लाजिरवाणं आहे.
अरे…..तो विकला गेलाय, त्याला विकत घेतलाय, हा माणूस एखाद्याला विकून खाईल तरी त्याचा मागमूसही आपल्याला लागणार नाही. किंमतीसारखच याही गोष्टी आपण दैनंदिन जीवनात सर्रासपणे ऐकतो आणि बोलतोसुद्धा.भाजीची किंमत आणि माणसांची किंमत,भाजी विकत घेणं आणि माणसं विकत घेणं…. यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि माणूस कदाचित इथेच गणतो…..!!
ज्याला यातील फरक समजला तो खरोखर धन्य असेल. नाहीतर आयुष्यभर त्याचा कसा व्यवहार होईल काही सांगता येत नाही. आयुष्यात आपल्याला आपली अर्थातच स्वतःची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपली किंमत किती हे ठरवणारे आपणच आहोत.आणि आपली किंमत ठरवणं हे आपल्याच हातात असतं.पण स्वतःच स्वतःची किंमत ठरवणं इतकही सहज सोपं नसतं.अगदी भाजी विक्रेता सुद्धा २० रू. किंमतीची मेथीची जुडी १५ रूपयाला देताना खूप विचार करतो.
पण एक गोष्ट लक्षात घ्या… मेथी सजीव आहे पण बोलू शकत नाही. तिची किंमत ती ठरवू शकत नाही. तिचा भाव करणारा कोणी वेगळाच आहे. (इथे भाज्यांची विक्री होते पण भाज्यांच्या तुलनेत इथे माणसच जास्त विकली जातात किंवा विकत घेतली जातात.)अगदी तसचं…आपली किंमत ठरवायला शिका.
त्याआधी ती कमवायला शिका. नाहीतर कधी कोण येईल आणि तुम्हाला कोणत्याही किंमतीत विकून खाईल कळणारही नाही. आणि आपण कधी,कुठे नी कसे विकलो गेलो हे प्रश्नही अनुत्तरित राहतील.स्वतःच्या हातानी आपण आपलेच गळे घोटले याच विचारात आयुष्य भरकटत जाईल.स्वतःची किंमत किती नी काय होती किंवा होती का..???हे शोधायचही राहून जाईल……!!
खरचं..,आयुष्यात “स्वतःची किंमत स्वतःला माहीत असणं” खूप म्हणजे खूपच आवश्यक आहे.कारण स्वतःची किंमत माहीत असणारी व्यक्ती अशी विकली जात नाही.(अगदी क्वचितच एखादी व्यक्ती याला अपवाद असु शकते)आपण कुणासमोर झुकायच नी कुणासमोर नाही..किंवा झुकायच की नाही हे अशा व्यक्ती स्वतः ठरवतात.कुणीही ऐरागैरा येऊन त्यांची कोणत्याही गोष्टीसाठी खरेदी-विक्री करू शकत नाही.
आयुष्यात सगळ्या ठेचा सहन करत-करत यांनी स्वतःची किंमत कमवलेली असते.त्यामुळे कणभर किंमतीचीही त्यांना जाणीव असते.अपमान, अपयश, शिव्याशाप ,तुलना अशा रूतणाऱ्या काट्यांवरून या व्यक्तींनी प्रवास केलेला असतो.अशा विकत घेणाऱ्या सैतानांच्या जखमा सहन करून करून भेदरलेल्या मनाला सावरता सावरता त्यांनी स्वतःच्या किंमतीला जन्म दिलेला असतो.
आणि जन्म देणं म्हणजे सोपं काम मुळीच नाही.वेदना नी कळा सोसल्याशिवाय जसा फुलांचा जन्म होत नाही अगदी तसच….स्वतःला सिद्ध करणं,स्वतःची किंमत कमावणं,स्वतःला ओळखणं हे वेदनांमधूनच जन्माला येतं. त्यामुळे अगदी कितीही वाईट वेळ यांच्यावर आली तरीही ते स्वतःला विकणार नाही. आणि कुणी कितीही कशाचही आमीष दाखवलं तरी उगाचच कुठल्याही मोहामध्ये गुरफटून न जाता कुणाला विकतही घेणार नाही. लाचारीने जगणं नी इतरांवर कुरघोडी करणं यांच्या तत्त्वात बसत नाही.
“असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर….
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर……” या ‘विंदा करंदीकर’ यांच्या ओळी अशा व्यक्तींच्या नसानसात भिनलेल्या दिसतात. स्वतःच्या किंमतीत किती ताकद असते हे त्यांच्याकडे पाहिल्यावर जाणवतं. कुणाच्याही या खरेदी-विक्रीच्या व्यवहारापुढे “स्वतःची किंमत” कधीच मोजता येणार नाही. कारण ती सहज तराजूत मापता येणं दुसऱ्या कुणालाही शक्य नाही.तिची ताकद,क्षमता समजायला तिला कमावणचं ‘MUST’ आहे. त्याशिवाय तिची ताकद समजण अशक्य आहे.
एक गोष्ट किंचित पटते….काही लोकांपुढे कधीकधी दुसरा कोणताही Option नसतोच.किंवा त्या परिस्थितीत त्यांना काही वेगळा पर्याय दिसत नसतो.त्यांना स्वतःला विकावं लागतं इच्छा नसतानाही….!पण,मग असं स्वतःच्या किंमतीचा भाव करणं कितपत योग्य आहे….??अशा वेळी “स्व” ला तुम्ही विसरता का…??परिस्थितीत स्वतःला झोकून द्या पण स्वतःचीच किंमत करून झुकू नका.कुणासमोरही लाचार होऊ नका.नाहीतर माणूस सवयीचा गुलाम असतो असं म्हणतात… तसं समोरचा सारखा तुम्हाला विकत घेत राहील आणि तुम्ही विकले जाल….ठरेल त्या भावात…ठरेल त्या किंमतीत….!!
विकले जाल…किंवा विकला गेलाय याचा अर्थ आपण सगळेच जाणता. तर इतकच सांगेन की…स्वतःची किंमत दुसऱ्याला ठरवू देऊ नका.या मायाजालात चुकूनही , नाईलाजानेही अडकू नका.स्वतःला असं बाजारात विकायला काढू नका…वेळ लागला तरी चालेल, स्वतःची किंमत माहीत असणं किती मोलाच आणि गरजेचं आहे हे माहीत करून घ्या. पण सहजासहजी असे विकले जाऊ नका……..!!
कळकळीची विनंती.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Apratim