मुलांचं कोवळं भावविश्व आणि पालकत्व !!

मुलांचं कोवळं भावविश्व आणि पालकत्व !!


डॉ. सुमेधा हर्षे I 922477041


मुलं ही देवाघरची फुलच असतात. कळीचे फुलात रूपांतर होण्यासाठी झाडाला वेळोवेळी खत,पाणी, सूर्यप्रकाश जरूरी असतं तसेच मुलांच्या विकासासाठी सुदृढ शरिराबरोबरच सुदृढ मनही तितकंच आवश्यक असतं.

मुलाच्या सर्वांगीण विकासातूनच त्याचं जबाबदार व्यक्तिमत्व घडत असत. आपल मन हे भावनांना नियंत्रित करत. मुलांच्या विकासात शारिरीक, बौद्धिक आणि भावनिक विकास असे महत्वाचे टप्पे आहेत. आज आपण मुलांच्या भावनिक विकासाबद्दल जाणून घेऊ .

मुलांच्या भावनिक विकासाचे ठोकपणे पाच महत्त्वाचे टप्पे असतात.

१)स्वतः बद्दल जागरुकता
२) समाजिक जागरुकता धो

३) एखाद्या गोष्टीचा विचार करणे
किंवा मग एखादी गोष्ट समजवून घेणे.
४) निर्णय घेण्याची क्षमता आणि

५) नात्यांच्या बांधिलकीत राहता येणे, नाते टिकवता येणे, नाते निर्माण करता येणे.

ही कौशल्येच सुदृ ढव्यक्तिमत्वाचा पाया आहेत. भावनिक वाढ सर्वच वाढींवर परिणाम करते.

०-२ वर्षे

ही वर्षे मुलांच्या भावनिक आणि शारीरिक वाढीची महत्त्वाची वर्ष असतात. काही संशोधकांच्या मते छोट्या बाळांना विस्तृत प्रमाणात भावना जाणवत असतात. ते आपल्याशी बोलून संवाद साधू शकत नाहीत पण ते रडून, हसून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.(non verbal communication).

भूक लागली तर रडणे, आईचा चेहरा बघून हसणे, एकदम दचकणे, डायपर भरले तर चिडून रडणे अशा चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये फरक करायला सुरुवात होते. तसेच आईने मिठीत घेतले की आनंद, आई दिसली नाही किंवा डायपर भरले तर असुरक्षिततेची भावना येणे, अस्वस्थता वाटणे अशा भावना ह्या काळात दिसून येतात.

ह्या काळात आईची जवळीक, आईचा स्पर्श, आईचे स्तनपान खूप खूप आवश्यक असते. आई काही ताण -तणावातून जात असेल, आजारी असेल‌ तर त्याचा वाईट परिणाम बाळावर होतो. मग ते चिडचिड करायला लागत.

या काळात बाळाला मिठीत घेणं, त्याला सुरक्षित वाटेल अशी वर्तणूक करणं खूप जरुरी असतं. ह्या छोट्या-छोट्या कृतीतून बाळाची भावनिक वाढ होत असते. घरातल्या सगळ्यांची प्रतिक्रिया देणं खूप खूप जरुरी असतं. ते ( बाळ) तुमचा चेहरा निरखत असतं.

त्याच्या प्रत्येक कृतीवर तुम्ही प्रतिसाद द्यायला हवा. तुम्ही जेवढा त्याला प्रतिसाद द्याल, जेवढे त्याच्याशी बोलाल तेवढी बाळामध्ये भावनिक वाढ चांगली होत जाते. आणि मग पुढच्या सुदृढ व्यक्तिमत्त्वाचा पाया घडत जातो.

दोन ते तीन वर्ष:-

या काळात मुल जास्त परिणामकारकरित्या प्रतिक्रिया द्यायला शिकतं. कारण ते ह्य- काळात बोलायला शिकतं ( verbal communication). त्यांची शब्दसंपत्ती वाढत असते. स्वत:च्या भावना बोलून, देहबोलीतून व्यक्त करायला शिकतं. ह्याच काळात मुलं हट्ट करायला शिकतात. त्याला टॅंट्रमस्( tantrums) म्हणतात. रडून आकांत करणे, एखादी गोष्ट मिळाली नाही तर जमिनीवर लोळणे, जोरात ओरडणे असे प्रकार घडू लागतात.

ह्या वेळी पालकांनी त्याच्यावर ओरडून अथवा रागवून किंवा मारून हा ही समस्या सोडवू नये. तर शांतपणे परिस्थिती हाताळावी. हट्ट म्हणजे भावनांचा निचरा न होऊ शकणे. अशावेळी सहानुभूतीपूर्वक नजरेने त्याच्याकडे बघा, कुठल्याही परिस्थितीत संयम सोडू नका. त्याच्या चांगल्या गोष्टींची स्तुती करा (reward method). पण खोटी स्तुती किंवा फाजील लाड नकोत. त्याच्या भावनांना चांगलं वळण देणे हे तुमच्या हातात आहे.

घरातल्या लोकांचे संवाद सतत त्याच्या कानावर पडत असतात. हा काळ भाषिक विकासाचा असतो. त्यामुळे मुलांशी सुसंवाद साधा, त्यांना त्यांच्या हट्टाचे कारण विचारा, त्यांना त्यांचे मन मोकळे करू द्या. प्रत्येक वेळी, नको, नाही असे नकारार्थी शब्द वापरू नका.

तीन ते पाच वर्ष-

ह्या काळात भाषिक विकास अजूनच प्रगल्भ होत जातो. या काळात मुलांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे बऱ्यापैकी जमायला लागतं. त्यांचे पाचही ज्ञानेंद्रिय ( sensory organs) कार्यरत व्हायला लागतात. ह्याच काळात मुलं बालवाडी किंवा प्री-स्कुलमधे ( preschool) जायला लागतात. सामाजिक वातावरणातलं त्यांचं हे पहिलं पाऊल असतं. समाजाशी पहिला सुसंवाद असतो.

हा टप्पा, हा प्रवास अनेक नवनवीन आव्हानांना भरलेला असतो. आता मुले आई पासून वेगळी व्हायला लागतात( detached). त्यांचं जग विस्तारत जातं. घरापेक्षा नवीन वातावरणात ते रमायला लागतात. त्यांचे समवयस्क मित्र-मैत्रिणी बनतात.आईची जागा आता शिक्षकांनी (टीचरस्) घेतलेली असते.

ह्या वेळी बरेचदा मुलं शाळेत जायला नकार द्यायला लागतात, न जाण्याचा हट्ट करतात. शाळेत जाण्यास नकार देण्याची अनेक कारणं असू शकतात. एक म्हणजे घराच्या सुरक्षित वातावरणापासून दूर जाण्याची त्यांना भीती वाटत असते.

आईला सोडून जायची भीती वाटत असते किंवा असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात घर करते. तसेच कधी कधी शाळेतलं वातावरणही कारणीभूत असतं.

बरेचदा शिक्षकांकडून प्रेम, आपुलकी मिळत नाही किंवा शाळेतले वातावरण खेळकर, आनंदी नसेल तर मुलांना शाळेचे आकर्षण वाटत नाही. अशा वेळेस त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना कारण विचारले पाहिजे. आपण प्रेमाने विचारले तर मुलं नक्कीच मन मोकळे करतात. आपल्या समस्या तुम्हाला सांगू शकतात. मग आपण त्यांचे निवारण केले पाहिजे.

०-५/६ वर्ष

ह्या काळात आईने मुलाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवला हवा. तिने उत्तम वेळ (क्वालिटी टाइम) त्याच्याबरोबर घालवायला हवा. विविध विकासात्मक खेळण्यांच्या मदतीने त्याची सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) तिने वाढवायला हवी. मुलांमधे सकारात्मकता निर्माण करायला हवी. चित्ररुपी गोष्टी, चित्रांद्वारे शिक्षण त्याला द्यायला हवं. सुमधुर संगीत त्याला ऐकवायला हवं. मोकळ्या हवेत, मोकळ्या मैदानांवर त्यांना खेळवायला हवं. या काळात त्यांच्यावर अतिरिक्त ताण-तणाव यायला नको.

आज-काल शिकवण्यांचे (ट्युशन्सचे) फॅड खूप वाढले आहे. अगदी चार, पाच वर्षांची मुलं एवढ्या वेळ शाळा करून परत ट्युशनला जातात. त्यांची झोप अपुरी होते, ती थकलेली असतात. शाळा सकाळी लवकर असते त्यामुळे त्यांची रात्रीची झोप पूर्ण झालेली नसते. त्यामुळे त्यांना थकवा येतो, तणाव येतो, ती चिडचिडी होतात. त्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा येतो. तसेच पालकांनी स्वतःची वर्तणुक, बोलणे शुद्ध ठेवायला हवे. तसेच एकमेकांमधली भांडण, हेवेदावे मुलांसमोर चर्चिले जाऊ नयेत. तेव्हा पालकांनी ह्य गोष्टींचा विचार करणे खूप खूप आवश्यक आहे.

आपलं मूल सुदृढ आणि आनंदी असायला हव आणि त्याची पायभरणी ही घरातूनच होते.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.