Skip to content

आत्महत्येचा विचार करणे म्हणजेच आपल्या कर्तृत्वाचा अपमान करणे.

आत्महत्येचा विचार करणे म्हणजेच आपल्या कर्तृत्वाचा अपमान करणे.


सुधा पाटील I समुपदेशक.

खटाव (पलूस सांगली)


आपलं आयुष्य, हे निसर्गाने आपणास बहाल केलेली अनमोल अशी देणगी आहे.हे सुंदर आयुष्य वारंवार नाही! जे आहे, जेवढं आहे,ते आज आणि आताच्या क्षणात आहे.निसर्गाने प्रत्येकास वेगळं बनवलं आहे.प्रत्येकातच काहीतरी युनिक असतंच असतं.पण तरीही खूपदा आपल्याच आयुष्यावर काहीजण नाराज असतात.आपल्या आयुष्यातील सौंदर्य नेमकं कशात आहे?आपल्या जीवनाचा हेतू काय?आपला आनंद नेमका कशात आहे?आपल्या क्षमता काय आहेत? याचाच विचार केला जात नाही.

खूपदा अथक परिश्रमाने काहीजण आपलं वेगळेपण सिद्ध करतात.आणि यशस्वी होतात.पण कुठेतरी मनाला सतत जिंकण्याची सवय लागत जाते.आयुष्य हे चढ उतारांनी बनलेलं असतं.याचा काही जणांना विसर पडत जातो.आणि जरा कुठे मनाविरुद्ध घडलं किंवा अपयशाची थोडीशी मालिका आयुष्यात सुरू झाली तरीही काहीजण बिथरले जातात.आणि जणू हे अपयश आपल्यासाठी शापच आहे, आपल्या मनाला त्रास देणारं आहे, आपलं आयुष्य जणू संपवणारं आहे असा विचार करून आत्महत्येचा विचार करू लागतात.

पण अशा वेळी तुम्ही निर्माण केलेला आजवरचा यशाचा महामेरू त्यांच काय? तो कोणी दुबळ्या माणसाने केलेला नसतो ना! मग जेव्हा एखादी कर्तृत्ववान व्यक्तीच आत्महत्येचा विचार मनात आणते तेव्हा त्याच्या हातून निर्माण झालेलं “कर्तृत्व” ,त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट, चिकाटी हे सारं फोल ठरतं.असा विचार करणं म्हणजे आपणच निर्माण केलेल्या कर्तृत्वाचा आपणंच अपमान करणं!

खरं तर आपण जेव्हा आपलं कर्तृत्व निर्माण करतो तेव्हा ते कोणासाठी तरी आदर्श असतं.इतर समाज या कर्तृत्वाकडे प्रेरणा म्हणून पाहत असतो.पण जेव्हा यशस्वी व्यक्तीच आत्महत्या करतात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतात किंवा तसा विचार करु लागतात तेव्हा त्या इतक्या दुबळ्या का पडतात हा प्रश्न पडतो.कारण अशा व्यक्तींनी जे कर्तृत्व निर्माण केलेलं असतं यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि चिकाटी लागते.त्या जोरावरच ते यश मिळालेलं असतं.मग तरीही कधी कधी अशाच व्यक्ती आत्महत्येचा विचार का बर करतात?

मला असं वाटतं की,अशा व्यक्तींना केवळ जिंकण्याचीच नशा चढते.आयुष्यात येणारी हार ही त्यांना अपमानास्पद वाटते.त्यांना ते कमीपणाचं वाटतं.मग अशा वेळी आयुष्यात नैराश्य वाढत जातं.सततच्या नैराश्याने त्या नैराश्याची उच्चतम पातळी गाठली जाते.जिथे माणसाला जगण्याप्रतीची ईच्छाच राहत नाही.आणि नकळतंच आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात घोळू लागतो.पण आयुष्य ज्याला अगदी सहजपणे झेलता येत,हार जीत पचवता येते अशा व्यक्ती स्वत:ला स्थिर ठेवतात.

पण स्वत:चं कर्तृत्व असूनही कधी कधी असा विचार करणारी माणसं देखील मनानं दुबळी असतात.पण ती विसरतात की, एखाद्या अपयशाने आयुष्य संपत नाही.आपण जे यशस्वी जीवन निर्माण केलेलं असतं त्याचा मग उपयोग काय? आपणच कर्तृत्ववान असूनही आत्महत्येचा विचार करणं म्हणजे आजवर मिळवलेल्या यशाचा आपणंच अपमान करणं.

आपण यशस्वी असूनही मनानं किती दुबळे आहोत हेच इतरांना दाखवणं.जे कर्तृत्व मोठ्या कष्टाने मिळवलेलं असतं ते उपभोगणं आणि टिकवणं हेही तितकेच महत्त्वाचे असते.एखाद्या व्यवसायात, किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं असं नाही.आयुष्यातील सारे चढ उतार पचविण्याची क्षमता आपल्यात निर्माण करणं म्हणजे यशस्वी होणं होय! पण आश्र्चर्य वाटतं…

कधी कधी माणसं सारं असूनही मनानं दुबळी पडतात.आणि आत्महत्येचा विचार करू लागतात.त्यातून बाहेर पडता आले नाही की मग मनोरुग्ण बनतात.मुळात आपलं आयुष्य हेच अनेक सुख दुःखांनी विनलेलं एक वस्त्र आहे.ते कदीतरी जीर्ण होणारचं आहे.पण हे आयुष्य कसं जगायचं,यात नेमकं महत्त्व कशाला द्यायचं हेच बऱ्याच जणांना समजतं नाही.त्यामुळे जगण्यासाठी जे जे महत्त्वाचं आहे त्याच्या मागे माणूस लागतंच नाही.जे नको त्याच्याच मागे धावधाव धावत राहतो.त्यामुळेच कर्तृत्व असूनही मनाचं समाधान मिळतं नाही.मग पुन्हा पुन्हा आयुष्य संपविण्याचा विचार…!

अशा क्षणी आपणंच आपले कष्ट आठवावेत.मी आत्महत्येचा विचार करून आजवर निर्माण केलेल्या कर्तृत्वाचा क्षणात असा अंत का करावा?माझ्याच कर्तृत्वाचा मी अपमान का करावा?असाच शेवट आयुष्याचा करायचा होता तर मग आपण आपलं कर्तृत्व तरी का निर्माण केलं? इतरांनी माझ्याकडून काय आदर्श घ्यायचा? कर्तृत्व टिकवता येत नसेल तर मग ते मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न वायाच जाणार ना? ….

जेव्हा जेव्हा यशस्वी व्यक्तींच्या मनात आत्महत्येचा विचार येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या मनाला वरील प्रश्र्न विचारावेत.आणि त्यातून बाहेर पडण्याचा विचार करावा.मनाला जर सकारात्मक विचार करण्याची सवय लागली तर जगातील कोणतंही दु:खं तुम्हाला हारवू शकतं नाही.कारण सकारात्मक मन बाहेर पडण्याचा मार्ग शोधतं.आणि नकारात्मक विचार तुमच्या मनाला पुन्हा पुन्हा दलदलीत खेचत राहतात.

म्हणूनच निर्माण केलेलं कर्तृत्व जपताना मनालाही तितकंच कणखर बनवता आलं पाहिजे.आपलं कर्तृत्व हे कणखरतेच्या पायावर उभं असावं.म्हणजे ते कधीच डळमळणार नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आत्महत्येचा विचार करणे म्हणजेच आपल्या कर्तृत्वाचा अपमान करणे.”

  1. लॉकडाऊन लागल्यापासून शिक्षकाची नोकरी करत होते ती सुद्धा गेली. शिक्षक होण्यासाठी च्या सार्‍या परीक्षा TET, CTET, TAIT पास झाले…पण सरकारच्या विचित्र धोरणामुळे भरती झाली नाही. खूप निराश झाले होते.
    या वर्ष गुरुपौर्णिमा आणि माझा वाढदिवस विकास दिवशी आले होते. जवळपास दीड वर्ष मुलांसोबत काय आहे हे संवाद नसून खूप सार्‍या मुलांचे कॉल , आले मेसेज आले… त्या वेळी जाणवलं की एक शिक्षक म्हणून मी मुलांना काहीतरी दिले आहे. त्यापूर्वी माझ्याही मनात असे आत्मघातकी विचार थैमान घालत होते.
    आपला लेख वाचून मोकळे व्हावे वाटले. धन्यवाद.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!