उद्या कोणी तरी मदत करेल म्हणून आज बसून राहू नका !!!
सौ. वृषाली बनसोडे I समुपदेशक
उद्या कोणी तरी मदत करेल
म्हणून आज बसून राहू नका
काल सकाळी वॉकींगला जाताना एक माणूस कपाळाला हात लावून बसला होता. त्याच्या मनात नेमका काय विचार चालू असेल असा का कोणास ठाऊक विचार मनात येऊन गेला.
घरी आल्यावर, अंघोळ, चहापाणी, झाल्यावर निवांत वेळी पुन्हा त्याच माणसाचा विचार मनात आला. काय हवं असेल त्याला, मदत हवी असेल का?त्याचा केविलवाणा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता…
आणि पुन्हा मागे घडून गेलेला प्रसंग आठवला. ५वर्षांपूर्वी अनूजाचा बाबा लंडनला ऑफिसच्या कामासाठी गेला होता.अनूजा तेव्हा ५ वर्षांची होती.घरात पार्टी ठेवली होती, पार्टी जवळजवळ संपतच आली होती, आणि प्रतिभा आमची कामवाली जोरात धावत आली बाईसाहेब अनूजा बेबीडॉलला खूप ताप आला आहे,
आम्ही धावत जाऊन बघीतलं तर अनूजा तापली होती डोळे पांढरे केले होते, काही केल्या आवाजाला प्रतिसाद देत न्हवती, मला काय करावे सुचेना मी कोसळून गेले. पुन्हा स्वत:ला सावरून…. कोणीतरी मदत करा असे म्हणून वेड्या सारखी ओरडत सुटले माझ्या मागे कोणी आहे की बरोबर कोणी आहे याचे काहीच भान नव्हते…
तेवढ्यात एक म्हातारी आजी माझ्या जवळ येवून मला हलवत होती अाणि म्हणाली तुला कोणाची काय गरज तु आदि शक्ती आहेस, माता जिजाऊची कृपा आहे आपल्या महिलांवर रडतेस काय सावर स्वत:ला…
आणि मी त्यावेळी खरच स्वत:ला सावरलं डोळे पुसले पळत जाऊन लेकराला घेतलं आणि गाडी काढून स्वत: तिला हाॅस्पिटलमध्ये नेले, डॉक्टरांनी अनूजाला वेळेत घेऊन आल्याचे सांगितले…
त्यावेळी मला जाणवले कोढून आले हे बळ माझ्यात, कोणी साथ दिली, जादूची कांडी फिरली… ती आजी कोढून आली आणि मला जागं करून गेली.
खरंच आपण आपल्यातल्या शक्तीला जाग करायला पाहिजे, मी परिपक्व आहेच पण ती परिपक्वता आजमावून बघता आली पाहिजे. आपण हारतो , म्हणजे जिंकण्याची पण शक्यता आहे, कारण हरण्याची दुसरी बाजू जिंकणे आहे, निराशा आली म्हणजे आशा ही कुठेतरी आहेच ती येईपर्यंत वाट बघण्याचे पेशन्स मात्र ठेवले पाहिजे.
मला कोणीतरी येईल आणि मदत करेल असा विचार करत बसण्यापेक्षा मलाच करायचे आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीही करणार नाही.”तुझं आहे तुजपाशी…. ” मात्र काय? ते आपणच शोधले पाहिजे.
उद्या कोणी तरी येईल आणि मला मदत करेल याला काहीच अर्थ नाही.दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः वर विश्वास ठेवू.
फार फार तर काय होईल अपयश येईल, एकदा, दोनदा, तीनदा पण त्यातून पाया पक्का होईल. स्वत:वर विश्वास ठेवा तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज लागणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


