“एखाद्या साध्या सरळ मुलीच्या काय अपेक्षा असतात…पहा!”
मधुश्री देशपांडे गानू
“लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची”
हे “कन्यादान” चित्रपटातील पी. सावळाराम यांनी लिहिलेले आणि आदरणीय लतादीदींनी गोड आवाजात अविस्मरणीय केलेले गीत सर्वांनाच परिचित आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत “लग्न” हा जीवनाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या शिवाय मनुष्य जन्माला पूर्णत्व येत नाही असे मानणारे आपण. अगदी आदिम काळात मानव प्रकृतीप्रमाणे वर्तन करत असेल. इतर प्राण्यांप्रमाणेच. प्रकृती कडून संस्कृतीकडे जसा त्याचा प्रवास झाला तसं समाज नियम आणि सामाजिक बांधिलकी आकाराला येऊ लागली..
समाजाची घडी नीटनेटकी, नियमित असण्यासाठी लग्नसंस्था आकारास आली. मूळ हेतू शरीर संबंध प्रस्थापित करून वंशवृद्धी करणे हाच होता आणि आजही आहे. पण प्रगत काळाप्रमाणे, बदलत्या काळानुसार यात बदल होत गेले. आणि यामध्ये असणार्या अपेक्षाही बदलत गेल्या.
लग्न हे केवळ दोन शरीर-मनांचे मिलन नसून त्यामुळे दोन कुटुंबांचे कायमस्वरूपी नातेसंबंध जोडले जातात. दोन परस्पर भिन्न परिस्थितीत वाढलेली माणसे जन्मभरासाठी एकत्र येतात. अशा वेळी हे पवित्र नातं अक्षय होण्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन उत्तम साथ देणे आवश्यक असते. अनाकलनीय आणि अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. लग्न ही अत्यंत तरल, हळुवार गोष्ट आहे.
समाजाच्या अवास्तव आणि कालबाह्य अपेक्षांनी कोणाचीही मने दुखावली जातात आणि हे ओरखडे कायम राहतात, असं होऊ नये. आता हळूहळू बदल होत आहेत. तरीही ग्रामीण भागांत आणि काही शहरी कुटुंबातही हुंड्या सारख्या अनेक कुप्रथा आजही आहेत.
आज मुलगा असो वा मुलगी ही बहुतेक उच्चशिक्षित असतात. स्वतःचे करिअर स्वतः घडवणारे असतात. आर्थिक दृष्ट्या दोघांनीही सक्षम असणे ही तर काळाची गरज आहे. शहरी भागात मुली स्वतंत्र, पुढारलेल्या विचारांच्या असतात. त्यांच्या अपेक्षा ही प्रचंड वाढलेल्या आहेत. केवळ स्त्री-स्वातंत्र्याच्या दिखाऊ कल्पनांनी मुली अवास्तव अपेक्षा ठेवतात. पण आज आपण अगदी मध्यमवर्गीय, संस्कारी कुटुंबात वाढलेल्या साध्या सरळ मुलीच्या लग्ना बाबतच्या आणि एकूणच सहजीवनाच्या अपेक्षा पाहणार आहोत. अशा मुलींची संख्या आजही जास्त आहे.
साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली अनेक भावंडात किंवा दोन भावंडात वाढलेली साधी सरळ मुलगी. आईची शिस्त, वडिलांचे लाड आणि मध्यमवर्गीय संस्कारात मोठी झालेली. व्यवस्थित शिक्षण घेतलेली, आर्थिक दृष्ट्या सक्षम. अशी ही मुलगी तारुण्यात येताच तिच्या लग्नाची बोलणी सुरू होतात. तारुण्यसुलभ भावना तिच्याही मनात असतातच. प्रत्येक मुलीचे आपल्या जोडीदाराबद्दल एक स्वप्न असतं. एक चित्र असतं मनात चितारलेलं. अगदी पांढऱ्या शुभ्र घोड्यावरचा राजकुमार तिला नको असतो. पण मनासारखा जोडीदार तिला हवा असतोच ना!
आपल्या घरा पेक्षा चांगलं घर असावं. चांगलं कुटुंब मिळावं. नवरा समंजस असावा. सुखासमाधानाने लग्न मुलं-बाळं असा सुखाचा संसार करावा अशी तिची अपेक्षा असते. नवरा चांगला मिळवता असावा. आपल्या पेक्षा शिकलेला असावा. सर्वसाधारण सगळ्या सुखसोयी त्याच्या घरी असाव्यात. आपल्या आई-वडिलांना आपलं लग्न करून देताना कोणताही मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रास होऊ नये ही तिची इच्छा असते. या तर झाल्या भौतिक गोष्टी.
पण तिची खरी इच्छा असते आपल्या जोडीदाराचे आपल्यावर नितांत प्रेम हवं. विश्वास हवा. नवीन कुटुंबात जाताना तिच्या मनात हुरहूर ,. भीती नक्कीच असते पण तरीही सुखाचा संसार करण्याची, त्या कुटुंबात सामावून घेण्याची, त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपलंसं करण्याची एक इच्छा, उमेद तिच्या मनात असते. लग्न आणि संसार करताना येणाऱ्या सगळ्या सुखदुःखात त्याने तिला खंबीर साथ द्यावी. तिच्या मतांचा, इच्छांचा आदर व्हायला हवा.
एक पत्नी म्हणून योग्य मान त्याने द्यायला हवा म्हणजे इतरही तिचा मान राखतील. संसार दोघांचा असतो त्यामुळे जबाबदाऱ्याही दोघांनी एकमेकांच्या संमतीने निभवायला हव्यात. सुरुवातीची वर्ष हळुवार अलगद प्रेमाची सरतात. नंतर खरी कसोटी असते. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या स्वभावाशी जुळवून घेणे, एकमेकांबद्दल अवास्तव अनाकलनीय अपेक्षा न ठेवणे या सुखी संसाराच्या किल्ल्या आहेत. माणूस म्हटलं की चुका होणारच इथे जोडीदार समंजसही हवा.
एकमेकांच्या आवडी-निवडी जपणे हे तर अत्यंत आवश्यक. कधीतरी एकमेकांना कामांमध्ये मदत करणं, कधी दुखलं-खुपलं तर एकमेकांचे पालक होता येणं. अतिशय तरल आणि सुंदर असं हे नातं आयुष्याच्या, संसाराच्या धबडग्यात कोरडं, कर्तव्यपुरतं न होऊ देता त्यातला ओलावा, गोडवा, तरल पणा दोघांनीही समान जपावा. नवरा बायकोच्या नात्यापलीकडे कधीतरी प्रियकर-प्रेयसी व्हावं. म्हणजे हे नातं अबाधित, अक्षय, प्रेममय, सुखाचं समाधानाचं होईल. अशाच असतील ना एका साध्या सरळ मुलीच्या भावना.. अपेक्षा……..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Khup Sundar varnan kel ahe jar pati patni ekmekana samjle ye aayushya he khup Sundar ahe jagnyasati nahi ye vyarth ahe purna