“आम्हाला आमच्या पोरांना श्रीमंत नाही तर आनंदी असलेलं बघायचंय..”
दादासाहेब श्रीकिसन थेटे
मला माझ्या मुलांना माझ्या बालपणातले ते दिवस परत दाखवायचेत… ज्यात होती वाहणारी नदी, झाडांची गर्दी, पक्षाची किलबिल, हिरवी शेत आणि प्रसन्न चेहऱ्याची माणसं…! पण आजच्या परिस्थितीनं मी मनातून घाबरलोय… भविष्याच्या चिंतेने..! मला दिसतोय भविष्यातला वाळवंट माझ्या शेतशिवारातला…! मला दिसतात माणसं पाण्याच्या थेंबासाठी तडफडताना…! मला दिसतायेत जनावरं आ वासून मरताना…! वाघ, सिंह, हत्ती, बिबटे नि जंगलातले सगळेच पशु पक्षी माणसाच्या कळपात येऊन हैदोस घालताना..! मी पाहतोय सृष्टीचं वैभव जळताना…!
माझ्या लहानपणीची खळखळून हसणारी नदी आज खोलवर जाऊन कुठे लपलीय दिसत नाही..! पंचमीचे झोके लटकायचे, मोठं मोठे आग्यामोहळ बसायचे, ते मोठया खोडाचे झाडंही कुठेच दिसत नाही..! उन्हाळ्यात दिवसभर उन्हाच्या सोबतीने चिमणी कावळ्याची चिवचिव- कावकावं, बगळ्याची निळ्या आभाळातली सफर, नि पावशाचा ऐकू येणारा कुहू कुहूचा आवाजही आता ऐकायला मिळत नाही..! घरातल्या हापशिखाली उन्हाळी लागली म्हणून तासनं तास बसायचो; तरीही हापशिनं एका दांड्यात पाणी देणं कधीच सोडलं नव्हतं; तीच हापशी आता कोणत्या भंगारात आणि कोणत्या भावात विकल्या गेली हेही कळलंच नाही.! शेताच्या दांडातली ओली माती खाऊन काय आनंद मिळायचा, त्यावेळी मनाला नि पोटाला; पण आता पावसाळ्यातही दांड तसा ओला काही होत नाही..! नदीकाठच्या विहरीत काठावरून पाण्यात मारलेला सूरसुळूका आरपार दिसायचा; त्याच विहरीचा खोलवरचा कोरडा काळा पाषाण आता मनाची आग विझवू शकत नाही..! जनावरपुढं पडणारी हिरवीगार मका, ज्वारीची धांड आणि उसाची वाढे आठवली की चारा छावणीला बांधलेल्या जनावरांचा वनवास असह्य वाटतो…!
भावांनो.. पाणी कधी तेलाच्या भावात विकायला लागलं… आणि झाडाखालची थंड हवा कधी अत्तराच्या भावाची झाली हेही कळलंच नाही..! या वर्षीच्या उन्हाच्या चटक्यानं मात्र जगण्याच्या जाणिवेचा काढलेला चट्टाच एवढा जिव्हारी लागलाय की, आता कळतंय आपल्याच हातानं स्वतःचा किती मोठा घात केला..! आता पश्चातापशिवाय मी काहीच करू शकत नाही का.? … तर ह्या प्रश्नावर मी माझ्या पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला..! कारण मला काळजी आहे माझ्या मुलांच्या उद्याच्या भविष्याची..! कारण माझं अस्तित्वच शिल्लक राहणार नसेल तर माझी कुठलीही कमाई व्यर्थच ना..! मला माझ्या मुलांना माझ्या बालपणातले ते दिवस परत दाखवायचेत… ज्यात होती वाहणारी नदी, झाडांची गर्दी, पक्षाची किलबिल, हिरवी शेत आणि प्रसन्न चेहऱ्याची माणसं.
शेवटी आयुष्य काय असतं तर भरभरून जगणं, पण निसर्ग कोपल्यापासून आता आमच्याकडे सगळं मन मारूनच चाललंय. पिण्याचं पाणी जपून वापरावं लागतं. एक बकेट पाण्यात घरातल्या सगळ्यांना अंघोळ करावी लागते. उनं पडलं की आता बाहेर पडता येत नाही. हवा सुद्धा आता फॅन आणि कूलर मधून विकत घ्यावी लागतेय. हापशाचं शुद्ध पाणी गायब झाल्यापासून पाणी बॉटल मध्ये विकत घ्याव लागतंय. पाखरांची किलबिल, सनउत्सवाची लगबग टीव्ही वरच पाहायला मिळते. आम्ही तिसरी चौथीला नदीच्या डोहात पोहायला शिकलो, आमची पोरं गुडघ्याभर पाण्याला पाहूं आश्चर्य व्यक्त करतात. पुरेसा पाऊस, पुरेस पाणी आणि निसर्गाची सावली असली म्हणजे तो गारवा माणसा माणसात जाणवायचा. आता मात्र मनाला गारवा मिळण्यासाठी कुठंतरी पर्यटनाला जावं लागतंय. झाडाखाली कुच्चर वट्यावर बोडखे झालेले दात खिदळताना दिसायचे, पण आता तेच वाढत्या गर्मीत दमा होऊन अंथरूनाला खिळून पडलेत. पाणी होतं तेव्हा प्रत्येक माणूस मनातून हिरवळीसारखा वाटायचा; पण आता चिंताग्रस्त माणसं दुष्काळसारखी कोरडी कोरडी भासतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पैशांन खरेदी करता येणार नाही, एवढा अनमोल झालाय. बैलगाडीत आलेली धान्याची आरास, जुपलेल्या बैलाची ओवाळणी करण्यासाठी वाट पाहणारी, गाडीत असलेल्या खंडी खंडी गावरान धान्याची पूजा करणारी शेतकरीन आता रेशनच्या एका कट्ट्यासाठी लाईनला उभी असलेली दिसते. जो पोशिंदा मन मन धान्याच्या कणगी साठवून ठेवायचा तोच अन्नाला मुकला जाऊन फाशी घेऊ लागला. त्याची कुटूंब उपासमारीने घायाळ झालेली दिसतात हल्ली.
ज्या गोष्टी निसर्ग भरभरून द्यायचा त्याचं गोष्टीसाठी आम्ही आज धडपडतोय. ऑरगॅनिक दूध, ऑरगॅनिक धान्य, ऑरगॅनिक फळ, ऑरगॅनिक अन्न, ऑरगॅनिक हवा, ऑरगॅनिक औषधी या शब्दाखाली जे संपवलं तेच विकत घेण्याचा हट्ट आम्ही धरून बसलाय. पण आम्हाला विसर पडलाय असा हट्ट किती दिवस पूर्ण होणार याचा.. हा हट्ट पूर्ण करणयासाठी आम्ही काही करतोय का..? हा हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्हाला निसर्गाच्या मुळाशी जावं लागेल. त्यासाठी अधिक झाडे लावावे लागतील.
मोकळी शुद्ध हवा झाडंच देतील. झाडांमुळे प्रदूषण रोखेल. वातावरणात समतोल निर्माण होईल. झाडांमुळे माती वाहून जाणार नाही, त्यामुळे पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढेल. पाणी पातळी वाढल्यामुळे पारंपरिक जलस्रोत अबाधित राहतील. झाडाच्या पानांमध्ये पाणी टिकून राहील. त्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरळीत होईल. झाडामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन शुद्ध हवेबरोबरच प्रदूषण नियंत्रणात येईल ज्यामुळे तापमान वाढ, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ यावरही नियंत्रण येईल. या सर्वांचा परिपाक मान्सूनवर होईल. पाऊस वेळेवर आणि मुबलक होईल. पुन्हा नद्या खेळू लागतील, जमिनीत पाणी टिकून राहील, झाडाच्या सावलीत पशु, पक्षी आणि माणसे देखील किलबिल करायला लागतील. शेत हिरवी झाली तर प्रत्येकजण मातीशी जोडून राहील. जगाला जगवणारा शेतकरी, मरणाला न कवटाळता जगावं कसं हे सगळ्यांना शिकविल. हापशीच्या दांड्यात पाणी बाहेर पडेल. व्यसनाकडे न झुकता नवनिर्मितीसाठी इथला तरुण धडपडताना दिसेल. सगळीकडे आनंदी आनंद असेन.
आपल्या पुढच्या पिढीसाठी काही द्यायचं असेल तर तो आनंद त्यांना द्यायला हवा. आयुष्य काँक्रीटच्या जंगलात राहून नव्हे; तर निसर्गाच्या जंगलात राहून समाधानी होऊ शकत हे सगळ्यांना पटवून सांगावं लागेल.त्यासाठीच आपल्याला जेवढे नष्ट झालेत त्यापेक्षा जास्त झाडे लावावे लागतील आणि जगवावी लागतील. कारण आपली पुढची पिढी पाण्यासाठी गळे कापताना आणि हवेसाठी तोंडावर ऑक्सिजन मास्क लावुन फिरताना आम्हाला पहायची नाही. तर आमच्या पुढच्या पिढीच्या चेहऱ्यावर भरभरून जगण्याचा आनंद आम्हाला पाहायचाय…
शेवटी आपला पोरगा किती श्रीमंत होईल, या पेक्षा आपला पोरगा किती आनंदी राहील हेच महत्वाचं ना..! आम्हाला आमच्या पोरांना श्रीमंत नाही तर आनंदी असलेलं बघायचंय..!त्यासाठी झाडे लावावे आणि जगवावे लागतील…!
चला जगाला पुन्हा आनंदी बनवूया..
झाडे लावूया..झाडे जगवूया…!
पालकांच्या व्हाट्सऍप समूहात सामील व्हा !
शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणात आपण कॉउन्सिलिंग करतो,
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !