मोबाईलमुळे मुलं आई-बाबांच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर चाललेत.

मोबाईलमुळे मुलं आई-बाबांच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर चाललेत.


डॉ. सुमेधा हर्षे I ९९२२४७७०४१


प्रत्येक कळीचं फूलात रुपांतर होतांना बघणं किती सुखद असतं, नाही का? त्या झाडाला ही अतीव समाधान मिळतं असेल. मुलांना देवाघरची फुलंच म्हटलं आहे. खूप निरागस, कोवळ असतं मुलांच भावविश्व, एखाद्या कच्च्या कळीसारखचं. ती उमलण्याची विशिष्ट वेळ असते. वेळेआधीच कळी उमलतं नाही.. जर उमलायला लागली तर किंवा तिला कीड लागली तर काय होईल? ह्याच प्रश्नाच उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करूयात.

आजकाल ८ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे वर्तणूक समस्या, एकाग्रतेची कमतरता, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ, लवकर वयात येणे इ. समस्या खूप जास्त प्रमाणात वाढीस लागलेल्या दिसतात. दिवसेंदिवस ह्याच प्रमाण वाढतच चालललयं.

मुलं हाताबाहेर जाऊ लागली आहेत. ह्याला कारणीभूत कोण? तर आपण पालकच आहोत.

हल्ली मुलं सतत स्मार्टफोनवर खेळत असतात. त्यांना सर्व येतं म्हणून आधी कौतुकही वाटतं परंतू मुलांसाठी याचा वापर योग्य नाही.
हे युग ‘ “गॅझेट युग’ आहे. आजची पिढी ही स्क्रीन ॲडिक्ट झालीयं. बोटाच्या एका इशाऱ्यावर तुम्ही एका जागी बसून सहज कुठल्याही विषयाची माहिती तत्काळ मिळवू शकता. जग जवळ आले आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. अत्यंत बुद्धिमान, चाणाक्ष मुलांची ही पिढी. वेगवेगळी क्षेत्र सहज काबीज करतं आहेत. पण ह्याचे दुष्परिणामही तितकेच भयंकर आहेत. त्यांचं हेच निरागस विश्व आता उध्वस्त होत चाललाय.

मुलं खूप जास्ती प्रमाणात स्क्रिन व्यसनाच्या आहारी जात आहेत (screen addiction). त्या मायाजालात फसत चालली आहेत. नको त्या गोष्टी सहजपणे यु-ट्युब वर किंवा गुगल वर उपलब्ध असल्याने नको त्या वयात नको ते ज्ञान त्यांना मिळतं आहे.

त्यातून बहुतांश आई-वडील, दोघंही नोकरी करणारी असल्याने तसेच एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आल्याने मुलं मग ‘मेड’ (maid) जवळ किंवा एकटी राहताहेत. त्यामुळे काय चूक काय बरोबर हे सांगायला कोणीच नसतं. मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा ही मुलं घ्यायला लागताहेत. अशातच नको त्या गोष्टी बघण्यात आल्या तर त्याच गोष्टी परत परत बघण्याची चटकच लागते आहे.

पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत नाहीत. मुलं मग मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करायला लागतात. पालकांना वेळ नसल्याने मुलं आपलं मन कोणाजवळ मोकळं करणार? पालक वेळ देऊ शकत नाही मग त्या मोबदल्यात मुलांना महागड्या वस्तू भेट म्हणून देतात. स्मार्ट फोन्स, लॅपटॉप हे सगळं लहान वयापासूनच त्यांच्याजवळ असतं. मग काय त्यांना मोकळं रानचं मिळतं. मग मुलं वाहवत जाताहेत.

त्यामुळे या मुलांमध्ये खूप आधीच संप्रेरकांमधे (हार्मोन्स) बदल होत आहेत. आणि मुलं वेळेआधीच वयात येत आहेत. वयात येताना होणारे शारीरिक, मानसिक बदल मुलांना आणि पालकांना ही खूप आव्हानात्मक असतात. एवढ्या कोवळ्या वयातील मुलं तर अकालीच प्रौढ होतात. मुलं-मुली वयात येण्याच वय साधारण १३/१४ वर्ष असायचं. आता मुलं ९/१० वर्षीच वयात यायला लागली आहेत. मुलांचं हे वय खेळण्याचं वय असतं पण अकालीच वयात आल्याने त्यांच्यावर प्रौढपण, शारिरीक,मानसिक बदल लादल्या जाताहेत आणि मग त्यातून अनेक मानसिक समस्याही उद्भवू लागल्या आहेत.

मुलं नकारात्मक गोष्टींच्या जाळ्यात फसत चालली आहेत. आई वडिलांचं, मोठ्यांच ऐकेनाशी झाली आहेत. मुळात पालक आणि मुलांमध्ये एक भिंती उभी झाली आहे. बहुतांश वेळेला पालकांना आपली मुलं काय करताहेत, त्यांचे मित्र/ मैत्रिणी कोण आहेत? मोबाईलचा गैर उपयोग
होतो आहे का? ह्याबाबतीत ते अनभिज्ञ असतात.

मुलांचं स्वतः चं एक वेगळं विश्व बनतयं. त्यात पालकांना शिरकाव नाही. ही मुले मग स्क्रीनला, गॅझेटलाच आपले सर्वस्व मानायला लागली आहेत. ह्याचा दुष्परिणाम असा –

* सतत मोबाइल वापरल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. ड्राय आइज, कल्पनाशक्ती कमी होणे, अंगठा दुखणे अश्या समस्या निर्मित होतात.
* अश्या मुलांना झोपही कमी येते. ज्यांचा सरळ परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि दैनिक कामांवर पडतो.

* फोनच्या कृत्रिम प्रकाशामुळे डोळ्याचं आरोग्य बिघडतं. लवकर चष्मा लागण्याची शक्यता वाढते.
* सतत फोन वर असलेल्या मुलांची विचारशक्ती खुंटते, एकाग्रता नष्ट होते. ज्याचा परिणाम रिझल्टवर दिसून येतो

* आउटडोर खेळण्याऐवजी हल्ली मुलं स्मार्टफोनवर गेम्स खेळणे पसंत करतात ज्याने शारीरिक दुष्परिणाम समोर येत आहेत. मुलांमध्ये लठ्ठपणा खूप वाढतो आहे आणि विविध रोगांना निमंत्रण देतोय.
* मुलं आभासी जगात रमत चालली आहेत. बाहेरच्या वास्तव जगापासून तुटून एकलकोंडे होत आहेत. त्यामुळे मग त्यांच मन कमकुवत बनत आहे . त्यांची निर्णयक्षमता, आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता बनतच नाही. मग ही मुलं लवकरच नैराश्याचे शिकार होताहेत. जसं पाया कच्चा असला की घर कोसळतं अगदी तसंच ह्या मुलांचे व्यक्तिमत्त्व फूलूच शकत नाही. अगदी छोटी छोटी मुलं छोट्याशा कारणांवरून आत्महत्येचा मार्ग स्विकारताहेत.

* अनेक आक्षेपार्ह दृश्य, हिंसा असलेल्या सिरियल्स, सिनेमे मुलं बघताहेत. काय दाखवावे, काय दाखवू नये याची समजच पालकांना नाही किंवा आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण सुरु आहे. ह्या सगळ्यांचा त्यांच्या शारिरीक, मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे.

ही मुलं नकार पचवू शकत नाहीत. ह्याचे कारण त्यांना लहानपणापासून सगळं काही सहज मिळत जातं, न मागताही मिळत जातं. मग त्यांना त्याची किंमत राहत नाही. सतत जिंकायची सवय लागल्याने छोटीशी हार सुद्धा ते पचवू शकत नाहीत. आपण आपल्या मुलांना मनाने, शरिराने कमकुवत बनवत चाललो आहोत. मुलांना आपण आयुष्यातल्या आव्हानांना पेलण्यासाठी सक्षम बनवत नाही आहोत.

त्यांना आपण प्रत्येक बाबतीत आपल्यावर अवलंबून करवून घेत आहोत. त्यांच्यातल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला आपण चालना देण्यात कमी पडतो आहोत. त्यामुळे मुलं आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकत नाहीत आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारताहेत. १२/१३ वर्षांची मुलं आत्महत्या करताहेत! ही अत्यंत हादरवून टाकणारी गोष्ट आहे.

तसचं ह्याचा सर्वात भयंकर परिणाम म्हणजे मुलांमधे वाढीस लागलेली गुन्हेगारी प्रवृत्ती. १५/१६ वर्षांची मुलं अपहरण, खून , सायबर क्राईम सारखे मोठे मोठे गुन्हे करताहेत आणि ह्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जी पिढी उद्याचे जबाबदार नागरिक बनणार आहेत तीच उध्वस्त होत चालली आहे.

पालकच ह्या‌ परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यासाठी पालकांनी –

१) आपल्या मुलांना वेळ देणे (quality time) जरुरी आहे.

२) मुलांनी काय बघायचं, काय बघायचं नाही याबाबतीत पालकांनी ठाम राहिले पाहिजे. मुलांना संस्कार घरातूनच मिळतात. घरातल्या सदस्यांच मुलं अनुकरण करतात. त्यामुळे त्यांना योग्य संस्कार देणं हे पालकांचं काम आहे.

३) मुलांना दिवसभरातून केवळ तासभरच स्क्रीन मीडियाचा वापर करायला हवा ह्यावर पालकांचं लक्ष हवं.

४) पालकांनी मुलांना बाहेर खेळणे, चांगला बोध देणारी, स्वाभिमान, देशाभिमानाला चालना देणारी पुस्तकं वाचणे, चित्र काढणे ह्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.

५) मुलांवर लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे. मुलांचा मित्रपरिवार कोणता? ते काय बघतात, तुमच्यापासून काही लपवत तर नाहीत ना! खोटं तर बोलत नाहीत ना! ह्याकडे पालकांच विशेषतः आईचं लक्ष हवं. मुलांना या काळात विश्वासात घेणं खूप जरुरी असतं. प्रसंगी त्यांना शिस्तीत ठेवणंही जरुरी असतं. पण त्याचा विपर्यास करू नये.

६) ह्या वयात होणाऱ्या बदलांबद्दल मुलांशी मैत्रीच्या नात्याने बोला, समजावून सांगा. त्यांचे चांगले मित्र/मैत्रिण व्हा. त्यांना तुमचा विश्वास वाटू लागला तर मुलं आपल्या मनातलं सगळं काही तुम्हाला नक्कीच सांगणार, मन मोकळं करणार.
व्यायामाचा महत्व त्यांना कळलंच पाहिजे. त्यांना आयुष्यात येणाऱ्या विविध आव्हानांसाठी तयार करा.
शारिरीक मानसिक दृष्टीने कणखर बनवा.

जेवढी मुलं तुमच्याजवळ मनमोकळी करतील तेवढ्या तुमच्यामधे आणि त्यांच्यात सदृढ नातं बनत जाईल.

जसे झाडाला वेळोवेळी खत-पाणी घालतो, कीड लागू देत नाही तसेच सुसंवाद, भरपूर वेळ, योग्य संस्कार ह्यांचं खतपाणी मुलांना दिल ‌तर ही देवाघरची फुलं योग्यवेळी उमलतील, फुलतील, जगात सुगंध आणि आनंद पसरवतील.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.