Skip to content

मानसिक ऊर्जेचे योग्य नियोजन कसे करावे ? वाचा लेख!

मानसिक ऊर्जेचे योग्य नियोजन कसे करावे ? वाचा लेख!


मधुश्री देशपांडे गानू


ही चराचर सृष्टी, प्रत्येक सजीव एकाच ऊर्जेने, चैतन्याने बनले आहेत. हे तर सर्व मान्य आहेच. ही ऊर्जा तुमचा श्वास, तुमचा प्राण, तुमची बुद्धिमत्ता, तुमची पंचेन्द्रियांची क्षमता, तुमचे मन यामध्ये कार्यरत असते. प्रत्येक सजीव ही ऊर्जा कशी वापरतो हे महत्वाचं आहे.

प्रत्येक मनुष्य हा काहीतरी आयुष्याचे ध्येय घेऊन जन्माला येतो. फक्त जन्माला आला, वाढला, शिकला, नोकरी, लग्न नी वंशवृद्धी आणि गेला.. असं नसतं. तर प्रत्येकाचं काही जीवित कार्य असतं. पण बरेचदा आपल्या मनावर, शरीरावर , बुद्धीवर सामाजिक कौटुंबिक बाह्य संस्कार इतके होतात की आपल्याला आपल्या स्वतःची जाणीव होत नाही.

आणि मेंदू मध्ये, मनामध्ये अनेक काहीही उपयोग नसलेल्या गोष्टी, घटना, प्रसंगांची नोंद केली जाते. आपल्या चौकस स्वभावामुळे आपण आजूबाजूला काय घडतंय याची उगाचच निरुपयोगी माहिती आपल्या मनात साठवत असतो. प्रत्येक वेळी ही माहिती उपयोगी पडतेच असे नाही. काहीवेळा या निरुपयोगी माहितीमुळे भीती वाटणे, नैराश्य येणे असे घडू शकते.

हा मनातला कचरा वेळीच दूर करता आला यायला हवा. किंबहुना तो जमणारच नाही म्हणून काही गोष्टींच्या खोलात न जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. सध्या कौटुंबिक ताणतणाव खूप वाढले आहेत. काही माणसे भिडस्त स्वभावाने नको ते प्रसंग ओढवून घेतात, तिथे स्पष्टपणे नाही म्हणायला शिकायला हवं. कित्येकदा सासु-सुनांच्या भांडणात नवर्याला पराकोटीचं नैराश्य येतं.

माणूस हा अगदी लहानपणापासून पंचेंद्रियांनी दिलेली माहिती साठवून ठेवत असतो. सुप्त मनात अशा अनेक गोष्टी दडलेल्या असतात. जसजसं वय वाढत जातं तसं विचारांची प्रगल्भता असेल तर काय पाहायचं? काय ऐकायचं? काय बोलायचं? आणि काय करायचं नाही? हे ती व्यक्ती नक्की ठरवू शकते. आणि आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवू शकते. कारण त्या व्यक्तीला स्वत्वाची जाणीव झालेली असते. आपला आनंद, आपलं आरोग्य कशात आहे हा निर्णय घ्यायला ती सक्षम असते. आता हे लगेच घडतं का? तर नाही. यालाही सराव हवाच पण इच्छा शक्ती ही हवी.

जसा हंस पाण्यातून दूध वेगळे करून दाखवतो त्याच प्रमाणे मनावर वेळोवेळी संस्कार व्हायला हवेत.  आपण भारतीय “लोक काय म्हणतील?” या आजाराने ग्रस्त असतो. आणि सतत लहानपणापासून आपली कोणाशीतरी स्पर्धा चालू असते. आपली कुवत, क्षमता, परिस्थिती, आर्थिक स्थिती याचा कोणताही विचार न करता फक्त स्पर्धा करायची. सकस स्पर्धा तरी ठीक आहे ती आपल्याला प्रगतिपथावर नेते. पण केवळ आंधळी स्पर्धा करताना पालकच दिसतात. तिथे मुलांची काय कथा?

शेजाऱ्यांनी गाडी घेतली म्हणून मला पण हवी. जर ती घेण्याचे आर्थिक बळ नसेल तर लगेच पालकांना नैराश्य येते.. कारण शेजाऱ्यांनी गाडी घेतली ही बिन उपयोगाची माहिती आम्ही इतकी महत्त्वाची करून टाकतो की आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडते. सतत गाॅसिप करणाऱ्या बायका “उसकी साडी मेरी साडी से सुंदर कैसे??”याचा ताण घेताना दिसतात.

तासन तास राजकारणावर गप्पा मारत वेळ आणि ऊर्जा फुकट घालवणारी, भांडणारी पुरुष मंडळी दिसतात.  खरंच विचार केला तर या सगळ्या माहितीचा तुम्हांला तुमच्या जीवनात, तुमच्या घरात काय उपयोग आहे? पण नाही आम्ही आमची ऊर्जा यात वाया घालवणार. एखादी चा मुलगा मेडिकल ला गेला तर माझा पण मेडिकल लाच जाईल.. अरे पण त्याची कुवत आहे का? यापेक्षाही त्याला त्या विषयाची आवड आहे का? याचा पालक विचारच करत नाहीत.

याचे कारण नको त्या गोष्टींच्या खोलात जाण्याची सवय आपल्याला त्याचा उपयोग आहे की नाही याचा विचारही करत नाहीत. याने त्या मुलाला नैराश्य येते.

आता तर सोशल मीडियामुळे सगळे जग एका बटणावर आलं आहे. असंख्य आकर्षित जाहिराती जगण्यातील बेगडीपणा, दिखाऊपणा याने समाज पछाडला गेलाय. सहज गोष्टी मागवल्या जातात. गरज असो वा नसो. स्टेटस महत्वाचा. सहनशक्ती तर जवळपास नाहीशी झाली आहे.

वस्तू, माणसं, नाती, प्रेम सगळं लगेच आत्ता या क्षणी हवयं. मिळालं नाही तर लगेच नैराश्य.  एखाद्या व्यवसायात, एखाद्या टप्प्यावर अपयश आलं की लगेच आत्महत्या. कारण गोष्टींच्या खोलात जाण्यापेक्षा आहे त्या गोष्टींच आपल्यावर येऊन आदळत आहेत. पौगंडावस्थेतील मुलांना मिळणारी  आगाऊ माहिती या गोष्टी खोलात आणि नको त्या अशास्त्रीय मार्गांनी कळल्यामुळे लग्न संस्थाच धोक्यात येते की काय असं वाटू लागलं आहे.

अशावेळी स्वतःबद्दलची नकारात्मक भावना वाढीस लागू शकते किंवा एखादं वाईट कृत्यही हातून घडू शकते. मी कमी आहे, माझ्यात उणीवआहे ही भावना जोर धरू लागते. परिणामी नैराश्य, अनेक मानसिक आजार, शारीरिक आरोग्यही धोक्यात येतं. आज मानसोपचार तज्ञांची, समुपदेशकांची जगात सगळ्यात जास्त गरज आहे.

सतत त्याच त्याच मारा करणारी, नकारात्मक बातम्या दाखवणारी, अतिशय टुकार दर्जाहीन मालिका दाखवणारी, कोणतंही बंधन नसणारी माध्यमं.. सहज उपलब्ध म्हणून पाहिलं जातं. आणि याचा संपूर्ण समाज व्यवस्थेवर सूक्ष्म पण खोल वाईट परिणाम होतोय.

सामान्य संसाराचा गाडा ओढणारी माणसं.. आज तसेही रोजच्या जगण्यातील ताणतणाव खूप वाढले आहेत. आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी घडत असतात. लक्ष दिलं तर मन प्रत्येक गोष्ट टीपकागदा सारखे टिपत असते. कोणत्या बऱ्या-वाईट गोष्टींचा मनावर खोल परिणाम होईल हे सांगता येत नाही.

कोणत्याही ऐकीव घटनेच्या आघाताने मन जखमी होईल, भीती वाटेल, नैराश्य येईल हे सांगता येत नाही. सध्या आपण अत्यंत नाजुक अशा कोविड काळातून जात आहोत. सतत या बातम्या बघितल्याने प्रचंड भीती अनेकांना ग्रासते आहे. परिणामी मानसिक स्वास्थ्य बिघडलेले रुग्ण वाढत आहेत.

अतिशय मौल्यवान असलेली आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा आपण कशी उपयोगात आणतो, हे आज खूप गरजेचे आहे. आपल्या मनाचा, विचारांचा आपल्या शरीरावर अतिशय खोल परिणाम होत असतो. जर मनाला सकारात्मक विचारांची सवय लावली, चांगला ऐकायची, पाहायची सवय लावली तर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते.

माझी ऊर्जा मी योग्य ठिकाणी वापरेन हा संकल्प आणि कृती केली तर शारीरिक आरोग्यही उत्तम राहते. मी माझ्या अनेक लेखांमधून हे वाक्य नेहमी लिहिते की “आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या प्रतिक्रियेची गरज नसते.” आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुमच्यात खरा बदल घडतो. मी माझं आयुष्य, माझं कुटुंब , माझं आणि माझ्या कुटुंबाचं मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जास्त महत्त्वाचं आहे,

हा विचार हा विचार प्रत्येकाने केला तर समाजही निरोगी सुदृढ होण्यास मदत होईल. यासाठी दिवसातून एकदा तरी ध्यान करा. डोळे मिटून दहा मिनिटं शांत बसा. ध्यानाचे खूप फायदे आहेत. मन शांत, आनंदी, निरोगी असेल तर प्राप्त परिस्थितीतही बदल करता येतोच. नको असलेल्या गोष्टींच्या खोलात जाऊन मानसिक स्थैर्य हरवण्यापेक्षा मनातील नोंदी आनंददायी, सकारात्मक कशा होतील यासाठी प्रयत्न करा. तुमची मानसिकता आरोग्यपूर्ण बनवा. आणि तुमचे आणि तुमच्या प्रेमाच्या माणसांचे जीवन यशस्वी, आनंदी बनवा..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!