Skip to content

महालक्ष्मी एक्सप्रेस….आणि मी माणसात देव पाहिला !!

महालक्ष्मी एक्सप्रेस….आणि मी माणसात देव पाहिला !!


दिलीप रामदास मोकल

मु.पो.हाशिवरे, अलिबाग, रायगड.
प्रवासी महालक्ष्मी एक्सप्रेस.


ठाणे येथून कोल्हापूरला जाण्यासाठी दिनांक २७ जुलै रात्री नऊ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसलो. सामान जास्त असल्याने थोडी दमछाक झाली होती म्हणून थोडा आराम करून मग घरून सोबत आणलेली भाकरी खाल्ली व झोपी गेलो. एसी कोच असल्याने कुठे आलोय हे कळले नाही पण नंतर समजले की पाणी वाढल्याने गाडी थांबली आहे. पुन्हा थोडा वेळ गाडी चालू झाली व परत बंद झाली तेव्हा रात्री साधारण बारा वाजले असावेत. आम्ही बारा साहित्यिक कोल्हापूर संमेलनाला दोन वेगवगळ्या डब्यातून प्रवास करत होतो. एकाच ट्रेनमध्ये असुनही एकमेकांशी संपर्क नव्हता कारण कोणाच्याही मोबाईलला रेंज नव्हती व ईलेक्ट्रीशिअन येऊन त्याने उजेडासाठी फक्त एक ट्यूब चालू ठेवली. कारण विचारता तो म्हणाला की पाणी वाढल्याने बॅटरी शाॅर्ट होईल म्हणून सर्व बंद करतोय. आता लाईट नाही तर मोबाईलचा वापरही नेमकाच करावा म्हणून मोबाईल स्विच ऑफ केला.

आमच्या साहित्यसंपदा समुहाचे प्रवक्ते वैभव धनावडे सर आमच्यातल्या एका स्त्री सदस्य जिविता पाटील यांना उशिर झाल्याने कोणाचेही संमेलन चुकू नये या हेतूने त्यानी आम्हाला पुढे जायला सांगून ते स्वतः खाजगी गाडी करून पुढे गेले व पुण्यात ट्रेन पकडतो म्हणाले त्यामूळे त्यांना सांगण्यासाठी म्हणून फोनवरून ट्रेन येणार नाही याची कल्पना दिली.
तरिही दोन चार तासात ट्रेन सूरू होईल असे आम्हाला वाटले पण सकाळी पाचच्या सुमारास कळले की आता ट्रेन तर पुढे जाणार नाहीच आणि पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे म्हणून रेस्क्यू टीम व सरकारी यंत्रणा बचावकार्यासाठी सज्ज झाली आहे. हेलिकॉप्टर हवेत गिरक्या घेऊ लागले.यादरम्यान कळले की, आमचाच डब्बा जरा जास्त पाण्याखाली असल्याने फक्त याच डब्यात लाईट नाही. तेव्हा मग दुस-या डब्यात जाऊन मोबाईल रिचार्ज करून घेतला. त्यानंतर मी खिडकीतूनच पहात होतो की सरकारी यंत्रणेला नेमका व अगदी योग्य, कमीत कमी अंतराचा रस्ता दाखवण्याचे काम गावकरी अगदी हिरिरीने करत होते. गावातील दोन तरूण पुढे धोका पत्करताना पोहत येऊन त्यांनी दोराच्या सहाय्याने पोलिस व ईतर बचावकर्त्यांना मार्ग दाखवला आणि मग बचावकायाला हळूहळू गती मिळाली. प्रथमतः खूप हळूहळू कार्य चालू होते कारण पाणी कुठे कमरेपर्यंत तर कुठे अगदी गळयापर्यंत व तेही प्रवाही त्यामुळे प्रवास्यांना सूरूवातिला महत्वाचे सामान घेण्यास सांगण्यात आले. त्यातच साधारण शंभर मीटर पर्यंत तरूणांनी रबर ट्यूबचा वापर करून व महिला व वयस्क प्रवासी यांनी छोट्या क्राफ्ट मधून रेस्क्यू टीमच्या मदतीने जायचे होते व ईतक्यानेच न थांबता पुढे दीड किलोमीटरचा रस्ता हा डोंगर व जंगलातून चालायचा होता. त्यामुळे खूप समजावल्यानंतर कोणीतरी तयार होई. पण हळूहळू जसे पाणी ओसरत गेले तसा अजून एक मार्ग खुला झाला तो म्हणजे ट्रेन पटरीवरून पाठीमागे साधारण चारशे मीटर चालल्यानंतर असाच छोट्या बोटीच्या सहाय्याने व तरूणांसाठी दोराचा वापर करून गुढगाभर पाण्यातून पण्णास-शंभर मीटरचे अंतर कापून थेट जिथे जेवण,चहा-पाणी व बदलापूरला जाण्यासाठी व्यवस्था केली होती अशा ठिकाणी पोहीचता येत होते.

यातही एक अडचण होती ती अशी की ट्रेनमध्ये काही असेही प्रवासी होते की ते गैरसमज पसरवीत असत त्यामुळे सुरक्षा यंत्रणेला अडचणीत टाकत. त्यातूनच अजून भर पडे ती पाणी ओसरल्यावर ट्रेनमध्ये प्रवेश करणा-या मिडीयाच्या कॅमरामन व संवाददाता यांची. प्रथमतः ते स्वतःच ईतके प्रकर्षाने सरकार व सुरक्षा यंत्रणेविषयी नकारात्मक बोलायचे व मग समोरच्या प्रवाशाला माईक समोर धरून बोलायला सांगायचे. आता सहाजिकच तोही काही वेगळे नाही बोलायचा पण असो, हा ज्याचा त्याचा प्रश्न की कोणी कशी प्रतिक्रिया द्यावी पण मी मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिली असती हे नक्की कारण मी नानासाहेब धर्माधिकारी व अप्पासहेब धर्माधिकारी यांच्या बैठक परमार्थाचा सदस्य आहे व त्याची अशी शिकवण आहे की, देशाने काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देऊ शकतो ते पहावे. हिच शिकवण आम्ही साहित्यसंपदेच्या साहित्यसंस्कार या आमच्या कार्यक्रमातून शाळांमधून विद्यार्थ्यांना देत असतो.कारण ते पुढे देशाचे सुज्ञ नागरिक बनावे. मला हे सर्व पाहून रहावेना म्हणून मग मीही बचावकार्य करणा-या तरुणांकडून योग्य माहिती घेऊन वेगवेगळ्या डोब्यांमध्ये जात व प्रवाशांना ख-या परिस्थितीची जाणीव देत व आता तुम्ही निघा हे सांगत फिरू लागलो. कारण पावसाची चिन्हे परत दिसू लागली होती व जर खरेच पाऊस जोरदार पडू लागला तर पुन्हा तेच होणार होते. आमच्या आगोदर आमच्या सोबत पण दुस-या डब्यात प्रवास करणारी मंडळी आतापर्यंत डोंगराच्या वाटेने सुरक्षित ठिकाणी पोहोचलीही होती त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती मिळवली व आम्हीही निघालो. आम्ही नऊ जणं निघालो सोबत बॅगांचं ओझं घेऊन. जेष्ठ लेखक सुरेंद्र बालांखे, पत्नी लेखिका कविता बालांखे व मुलगी प्रार्थना तसेच समुहातील जेष्ठ कवी रविंद्र सोनावणे सर, समुह अध्यक्षा नमिता जोशी, लालसिंग वैराट, संजय कदम, वैशाली कदम व मी. असा आमचा ताफा व सोबत पुढे मागे सहप्रवासी होतेच. चालतांना प्रत्येक क्षणाक्षणाला मार्गदर्शन करणा-या सुरक्षा टीमचे सदस्य तर आपुलकीने झटत होते.

जेव्हा बोटीजवळ पोहोचलो तेव्हा सुरक्षा रक्षक व गावकरी तरुणांची आमच्याप्रती तळमळ पहायला मिळाली. ट्रेनमध्ये जसे वृद्ध, लहान मुल असलेली स्त्री, गरोदर महिला यांना शोधत फिरत व आपुलकीने नेत असत तसेच ईथेही प्रथम प्राधान्य देऊन वेळप्रसंगी उचलून व्यवस्थित बोटीत बसवले जाई. मी सुद्धा माझ्या सोबतचे सर्व पुढे पाठवले व मला कोणीच बसू देत नाही कारण पहिले प्राधान्य वयोवृद्धांना दिलं होतं. मलाही खूप बरे वाटले व मीही दोन तीन बोट जाईपर्यंत मला करता येईल तशी मदत करत होतो. मी पाहिले की एक साठीतील महिला जीचे पायाचे ऑपरेशन झाले होते त्यामुळे खडीवरून चालल्यानंतर असंख्य वेदना होऊन त्या रडू लागल्या मी त्यांना हात देतोय ईतक्यात बोट सावरणारा एक तरूण त्याच्याकडे सरसावत म्हणाला “रडता कशाला,रडायचं नाही आम्ही आहोत ना!”मलाही त्यावेळी गहिवरून आले, अगदी जवळून देव पहात होता. शेवटी सर्व प्रवासी गेल्यावर मी ही बसून अलिकडे आलो. दूरध्वनी करून समुहातील सदस्यांना पुन्हा गाठले. एकत्र आल्यावर पुन्हा आम्हाला साहित्यसंपदेचा राज्यस्तरीय कार्यक्रम हुकल्याने गहिवरून आले. आमच्या सोबत असणा-या संमेलनाच्या अध्यक्षा नमिता जोशी यांना तर हुंदका आवरेना कारण सर्वांनीच खूप मेहनत घेतली होती दोन महिने पण असे होऊनही कोल्हापूरात संमेलन पार पडणार याचा आनंदही तितकाच सुखकर होता. आम्हीही मग चालत व्यवस्थेच्या ठिकाणी पोहोचलो.
बघतो तर सर्वकडे जिथेतिथे देवदर्शन घडत होतं. कुठे लहान तर कुठे मोठ्या रूपात. कुणी पाण्यासाठी तर कुणी चहा घ्या म्हणून आग्रह धरतो तर बिस्कीट, जेवणाचे डबे पुरवण्यासाठी कुणाची घाई. चांमटोली गावापासून बदलापूर येथे ने आण करण्याकरिता बस, पोलीसगाडी , मिनीबस अशा वहानांची व्यवस्था केली होती. आम्ही थोडे कही खाऊन निघालोच होतो तर चक्क एक बसमालक म्हणाले काही घाई करायची नाही काही खाऊन घ्या. आम्ही खाल्याचे सांगितले तरी तिघांच्या हातात पापड लोणचे व खिचडीच्या दोन प्लेट देत म्हणाले “घाबरू नका तुम्ही जेवल्याशिवाय ही बस सोडणार नाही, गेलोच तर लगेचच येऊ परत”. ईथवर न थांबता बसमध्ये बसताच चहा आणला व कुणी प्यायचे राहिले असेल म्हणून पुन्हा बसमधून उतरताना बदलापूर स्थानकात तिच व्यक्ती चहा घेऊन हजर.

जणू सा-या भारतभूमितील तिर्थक्षेत्रे सोडून सारे देव चामटेकी गावातच अवतरले होते. प्रथम पाहिले ते स्वतः संकटात पडून प्रशासनाला मदत करणारे तरूण व गावकरी नंतर मी पाहिला पंढरपूरपूरचा पांडुरंग चक्क एका बारा चौदा वर्षांच्या मुलीच्या रूपात जेवण, पाणी हवे का म्हणून सर्वांजवळ जाऊन विचारणा करत होता व लगेच पुरवठाही करीत होता. हे पाहूनपाहून. माझ्यासोबत असलेले रविंद्र सोनावणे सर लगेच उद्गारले किती आपुलकीने ती लहानगी विचारते बघा ना ! तेव्हा मी ही पटकन म्हणालो ‘अजून देवाची ओळख काय असायला हवी’.
देव सुखात भेटो न भेटो पण तो संकटात मदतीसाठी धावत असतो व आज तो चांमटोली गावातच होता आणि तो तिथल्या प्रत्येक माणसा माणसात मी पहात होतो.


मानसिक समस्येवर शास्त्रीय उपाय हवाय ???

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

1 thought on “महालक्ष्मी एक्सप्रेस….आणि मी माणसात देव पाहिला !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!