Skip to content

घर हसत-खेळत ठेवणाऱ्या बायकोच्या विचारांना महत्व मिळायला हवं.

घर हसत-खेळत ठेवणाऱ्या बायकोच्या विचारांना महत्व मिळायला हवं.


सौ. मिनल वरपे


बायको म्हणजेच आयुष्याची जोडीदार.. सात फेरे जीच्यासोबत घेतले जातात तीच ती अर्धांगिनी.. जी घरात आल्यावर सहज जिच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या जातात तीच पत्नी.. जी घरी येताच सून, वहिनी, मामी, काकी यासारख्या सगळ्याच नात्यात खरी उतरते.. जिला स्वतःची माणसं ,ज्यांच्यासोबत लहानपणापासून ती हसली, खेळली, मनसोक्त जगली आहे त्यांना सोडून नविन नात्यात स्वतःला गुंफाव लागते..

घरात आल्यावर जी घराचं नंदनवन करते.. घरात कितीही टेन्शन असेल तरीही सर्वांची काळजी घेते.. कोणाला काय हवं नको ते बघते.. सर्वांची मन जपते.. जबाबदाऱ्या अगदीच मनापासून स्वीकारून जी कायम घराला आनंदी ठेवते त्याच बायकोला.. तिच्या मतांना.. तिच्या विचारांना किती महत्व दिलं जातेय.???

अग तू गप बस.. तुला काय कळते यातलं अस म्हणत जिला सहज डावललं जाते . अग तुम्ही बायका घरी बसून घर सांभाळा बस तेवढच तुमचं काम.. बाकी कशात उगाच नाक खुपसू नका इतकं जिला कमी लेखलं जाते.. हो माहितीये थोडी जास्त शिकलीस नोकरी करतेस म्हणून तुला सगळीच अक्कल आहे अस नको समजू या शब्दात जीचा अपमान केला जातो त्या स्त्रीला तू कशाला आमच्यात बोलायला आलीस तुला निर्णय नाही घ्यायचा अस म्हणत सहज कमी लेखलं जाते.. खरचं योग्य आहेका हे वागणं…

आज जग नक्कीच पुढे चाललय पण या होणाऱ्या प्रगतीमध्ये सर्वच स्त्रियांना त्यांचं महत्त्व दिलं जातं नाही . हो मान्य आहे की आज नोकरी करणाऱ्या, स्पर्धेत उतरणाऱ्या, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियाच आहेत म्हणजे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळाले आहे हे नक्कीच पण त्यासाठी सुद्धा त्यांनी किती विरोध पत्करला असेल..

आज त्या कितीही उच्च स्थानी असल्या तरी त्यांनाच ठाऊक की त्यांच्या घरात एक पत्नी म्हणून त्यांच्या मताला किती मान दिला जातो आणि हो काहींना मान मिळतही असेल पण त्यांचं काय ज्यांना.. ज्यांच्या मताला त्यांच्याच कुटुंबात .. एक पत्नी म्हणून काहीच महत्त्व मिळत नाही???

किती सहज दुसऱ्याच्या घरी येऊन त्या घराला आपलं मानते.. सगळ्या जबाबदाऱ्या मनापासून सांभाळते जर त्या पत्नीला तिच्या मतांना..तिच्या विचारांना महत्त्व दिलं तरी तिचा उत्साह नक्कीच एक विलक्षण समाधान देणार.. तिच्या विचारांनी जर काही गोष्टी घडल्या किंवा केल्या तर तीलासुद्धा संसारात नाविण्याने सगळ्या गोष्टी सांभाळायला आवडतील.

जिला सर्वांचे मन जपायला चांगलं जमते.. जी सर्वांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांचा आदर करते.. जी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करते.. जर तिच्या विचारांना महत्त्व दिलं तर नक्कीच तिला सगळ्याच गोष्टी अजून सोप्या होतील.. तिला घर सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत वाटणार नाही कारण ती तिच्या विचारांनी घर व्यवस्थित सांभाळेल.

लग्न झालं की नवरा.. सासू सासरे.. नंतर मुलांचं ऐका..हेच स्त्री च जीवन झालंय.. पण यात जर नवऱ्याने आधीच तिच्या विचारांना प्राधान्य दिलं तर.. आई तुला काय कळते यातलं हे ऐकण्याची वेळ येणार नाही..नंतर मुल सुद्धा आईच्या मताचा तिच्या विचारांचा आदर करतील..

लग्न झालं म्हणजे चूल आणि मुल हेच स्त्रीचं आयुष्य ही रित आता जरी बदलताना दिसत असली तरीदेखील आजही प्रत्येक स्त्रीला वैचारिक स्वातंत्र्य मिळालं आहेच असे नाही..तिला तिचे विचार जर समाजापुढे मांडायचे असतील तर आधी तिच्याच घरात तिच्याच घरात तिच्या विचारांना स्थान मिळालं तर नक्कीच तिच्यातील आत्मविश्वास वाढेल..

तिने काय केलं पाहिजे.. काय नाही केलं पाहिजे… हे तीच तिला ठरवू दिलं तर बरं होईल. तिच्या इच्छा.. तिच्या अपेक्षा.. तिला कसली आवड आहे.. तिच्या मनात कोणते विचार सतत डोकावतात याची काळजी घेतली तर नक्कीच आज जस हसत खेळत घर आपण बघतोय तेच हसत खेळत वातावरण आपल्याला कायम बघायला मिळेल..

कारण घरात उत्साही वातावरण ठेवण्याचं कारण जर ती असेल तर तिला जपलं.. तिच्या विचारांचा आदर केला तर नक्कीच घरातील उत्साह असाच कायम टिकून राहील..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!