“आपल्याला आपल्या चुका न दिसणं हीच सर्वात मोठी चूक आहे.”
मधुश्री देशपांडे गानू
“ज्या व्यक्तीने कधी काही चूक केली नाही त्याने नवीन काही करण्याचा प्रयत्नच केला नाही.”
हे वाक्य आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ “अल्बर्ट आईन्स्टाईन” यांचं. माझे वडीलही भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते ते नेहमी एक वाक्य सांगतात “माणूस हा शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो.”
परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे मानव. सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान. प्रत्येक माणूस दुसऱ्या पासून वेगळा. प्रत्येक जण स्वतःपुरता अद्वितीयच. माणसाचं आयुष्य त्याचे नाते संबंध, त्याची सामाजिक, आर्थिक पत प्रतिष्ठा, त्याचा स्वभाव, त्याचे गुण वैशिष्ट्य आणि त्याचे असलेले दोष या सर्व मितींनी बनलेलं असतं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. त्यावर झालेले संस्कार वेगळे.
प्रत्येकाच्या भोवतालची परिस्थिती वेगळी. आयुष्यात आलेली माणसे आणि त्यांचे अनुभव हेही वेगळे. त्यामुळेच प्रत्येकाची आयुष्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी. एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. यातून माणूस भलाबुरा घडत जातो.
आता माणूस म्हणून आपण सर्वज्ञ आहोत का? तर नाही. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण, दोषरहित नाही. प्रत्येकात काही अधिक, काही उणे असतंच. आपण माणूस म्हणून प्रगल्भ होताना अनेक अनुभवातून, दिव्यातून जात असतो. तेव्हा आपल्या हातून जशा चांगल्या गोष्टी घडतात तशाच काही चुकाही होतात. इथे आपण फक्त चुका दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या माणसांबद्दलच बोलणार आहोत. ज्यांना चुका कधी मान्य होत नाहीत अशी माणसं स्वतःच्या आयुष्याचे कायमचे नुकसान करून घेतात.
आपण शाळेत असताना उत्तरपत्रिकेत चुकीचे उत्तर लिहिले तर त्याचे गुण मिळतात का? नाही ना! जे बरोबर उत्तर आहे त्यालाच “गुण” मिळतात. आणि चुकलं की गुण मिळत नाहीत. मग हेच आयुष्यासाठी लागू आहे. पुढच्या वेळी जसे आपण कमीत कमी चुका होतील आणि जास्तीत जास्त गुण मिळतील यासाठी जोमाने सराव, अभ्यास करतो, हेच अगदी हेच आयुष्याला ही लागू होतं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या हातून चुक ही होतेच..
आई आपल्या मुलीला आणि आता मुलालाही स्वयंपाकाचे धडे देते तेव्हा मुलांना लगेच भीती वाटते. अरे! आपलं हे चुकलं. मला हे कधीच जमणार नाही ,असं त्यांना वाटू शकतं. पण आज जे आई तुम्हाला अधिकारवाणीने शिकवतेयं ते तिच्या हातूनही कधीतरी चुकलंचअसेल. ती ही एका रात्रीत नाही काही शिकली.
अगदी गोल पोळी आता यायला तिला किती वेळा सराव करावा लागला असेल. जर सुरुवातीला तिने मला जमत नाही म्हणून सोडून दिलं असतं तर! हे तर खूप साधं उदाहरण झालं. अनेक जगद्विख्यात खेळाडू, व्यावसायिक लेखक, गायक, नेते, शास्त्रज्ञ, कलाकार यांच्याकडून किती वेळा चुका झाल्या असतील. आज ऑलिंपिक चालू आहे. स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याकरता किती वेळा चुका केल्या असतील आणि किती वेळा चुका सुधारल्या असतील.
आपल्याला जेव्हा यशस्वी व्हायचं असतं, यशस्वीतेचं उंच शिखर गाठायचं असतं तेव्हा अहम् बाजूला ठेवून, नम्रपणे आपली चूक स्वीकारून पुढे जायचं असतं. जो चूक मान्य करतो त्याला पुढे जायची, शिकायची संधी मिळत जाते. एखादा कलाकार किती वेळा एक शॉर्ट देण्याचा सराव करत असेल तेव्हा तो अचूक वठत असेल. कलाकार म्हणून सर्वांगाने त्याची वाढ होण्याकरता त्याला चुका मान्य कराव्याच लागतील. नाहीतर आजच्या जीवघेण्या स्पर्धेत तुम्ही कधी विस्मरणात जाल हे कळणारही नाही.
माणूस हा अत्यंत स्वार्थी, अहंकारी प्राणी आहे. अगदी अर्ध्या हळकुंडाने गोरी होणारी माणसं असतात. थोडंसं यशही त्यांच्या डोक्यात जातं. मग स्वतःच्या चुका त्यांना दिसत नाहीत. परिणामी कालांतराने अशी माणसे एकटी पडत जातात. चूक मान्य करण्यातच मोठेपणा आहे. साधारण असा समज आहे की चूक मान्य करणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे. अरे मी चूक मान्य केली तर समोरचा मोठा होतो, त्याचा अहंकार सुखावेल.
मला कमीपणा येईल. पण असं नसतं. आपली चूक प्रांजळपणे मान्य करणं हे शौर्याचं काम आहे. त्याने आपण एक माणूस म्हणून प्रगल्भ होतो जर आपण आपली चूक मान्य केली नाही तर आपण समोरच्या व्यक्तीला तर दुखावतो पण स्वतःला फसवत असतो. अनेक नाती, मित्र-मैत्रिणी केवळ एका चुकीने आपण कायमचे घालवून बसतो. कारण चूक मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा आपल्याला दाखवता येत नाही. केवढा हा अहंकार! अहंकार हा केवळ माणसाचे नुकसान करतो. आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही. आपल्याला पक्कं माहित असतं की आपण चूक केली आहे.
काजल नावाच्या हिंदी सिनेमात एक सुंदर गाणं आहे. “तोरा मन दर्पन कहलाये, भले बुरे सारे कर्मौ को देखे और दिखाये “.आपलं मन आपल्यालाच खात असतं. अशावेळी चूक मान्य केली तर आपल्या मनावरचा ताण तर हलका होतोच. आणि आपली नाती , आपले संबंध आपण वाचवू शकतो.
माणसाने स्वच्छ, मनमोकळे असावं. प्रेम, राग, लोभ, माया, संताप, नाराजी सहज व्यक्त करतो ना पण तसेच चूकही लगेच आणि अहं न बाळगता मान्य करावी. नुसती मान्य करू नये तर ही चूक परत होणार नाही याची काळजी घ्यावी. चूक मान्य करून पुढे जाण्यातच शहाणपण असतं.
हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हांला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर साथ देतो. आपल्याला यशस्वी, प्रगल्भ, परिपक्व असं व्यक्तिमत्त्व घडावं असं वाटत असेल तर चूक कबूल करावी. बर्याचदा असं होतं की , चूक लक्षात येते पण वेळ निघून गेलेली असते. आणि आयुष्यभर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही.
कोणत्याही घरगुती, व्यावसायिक, सामाजिक नात्याचा पाया हा संवाद आहे. हा संवाद अबाधित राहिला तर नाती अबाधित राहतील. पर्यायाने समाज निरोगी , सुदृढ राहील. तेव्हा कधीही आपली चूक झाली तर सरळ माफी मागा. मन मोकळं करा. मनावरील ताण हलका करा. तुमच्या आणि तुमच्या जवळच्या प्रेमाच्या माणसांचं आपल्या आयुष्यातील मूल्य जाणा. आपली हक्काची प्रेमाची माणसं हीच आपली खरी संपत्ती आहे. हे कायम लक्षात असू द्या. आनंद द्या आणि आनंद घ्या….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


