Skip to content

विस्कटलेलं कपाट आवरा, विस्कटलेलं मन सुद्धा आवरून होईल..

विस्कटलेलं कपाट आवरा, विस्कटलेलं मन सुद्धा आवरून होईल..


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


“विस्कटलेलं कपाट आवरा, विस्कटलेलं मन सुद्धा आवरून होईल…..” हे ऐकताना थोडं हसू पण येत आणि थोडं मनाला हळवं व्हायलाही होतं.विस्कटलेल कपाट आवरायला आवडतच…पण कधी कधी तेच विस्कटलेल कपाट आवरायला कंटाळाही येतो.मग या मनाच काय..??

कपाट कधीतरी का होईना आपण आवरतोच पण या विस्कटलेल्या मनाला आपण कधी आवरतो का..??कपाट आवरत नाही लवकर,मनाला काय आवरणार….??? “विस्कटलेल कपाट आवरा………..” हे Title वाचलं आणि मी असं काही बडबडायला लागले होते.पण मग बडबडून झाल्यावर वाटलं की खूप दिवस झालेय मी माझी दोन्ही कपाटं आवरलीच नाहीये.जरा आज वेळ काढून त्यांना आवरावं म्हणतेय…………………..

थोडा वेळ गेला….आणि माझं सगळं आवरून मी कपाटांच्या दिशेने माझा मोर्चा वळवला.!!आणि आधी कोणत कपाट आवरायच..?असा मला प्रश्न पडला.लहानपणीसारखच दहा-वीस-तीस असं करत वह्या-पुस्तकांच्या कपाटावर शिक्कामोर्तब केलं.वह्या-पुस्तकांच कपाट म्हणजे माझं लाडकं कपाट…!!

ते आवरायला कधी असं वेळ मिळायचा नाही पण आज खास त्याच्यासाठी वेळ काढला होता.पुन्हा थोडी तंगळ मंगळ करून झाली आणि मी “Finally” कपाटाला हात लावला.हळुहळू दरवाजा उघडला.आत बघते तर काय ..? त्या कपाटातल्या सगळ्या वस्तू अक्षरशः कोसळायला आल्या होत्या.

पण मी त्यांना अलगद सावरल आणि ते विस्कटलेल कपाट आवरायला सुरुवात केली. एक एक वही , अभ्यासाची आणि अवांतर वाचनाची पुस्तकं मी आज नव्याने न्याहाळत होते.बरेच दिवस त्यांना मी स्पर्श केला नव्हता म्हणून त्यांना कुठे खरचटलय कुठे नाही काहीच माहीत नव्हतं.इतके दिवस कपाटात बंद असल्यामुळे मोकळा श्वासही त्यांनी घेतला नव्हता.

कदाचित माझ्याचमुळे.!!पण आज त्यांना स्पर्श केला नी जाणवलं.. , काहींना ओल येऊन बुरशी लागलेय,काहींवर तर धूळ साचलेय,काही जागेअभावी घुसमटली आहेत,काहींची शाईच विरून गेलेय तर काहींचा हळुहळू एक एक तुकडा पडू लागलाय….जरा वाईटच वाटलं मला.पण रागही आला स्वतःचाच.

की आपण लक्ष दिल नाही म्हणून यांची ही अवस्था…!! आणि एक एक कप्पा विस्कटला होता. ईकडचा कागद तिकडे झाला होता.कपाटाच रूपडं अगदी अस्ताव्यस्त झालं होतं. तशी रद्दीही बरीच होती त्यात.पण आवरलच नव्हत त्यामुळे विनाकारण कपाटात गर्दीही झाली होती.आवरत गेले मग हळुहळू एक एक कप्पा…

नको असलेलं,विरलेल,खराब झालेलं सगळं टाकून दिलं.धूळ पुसली.तुटलेल्या पानांना जोडण्याचा प्रयत्न केला. काही जोडली गेली तर काही किंचितही नाही.वाटलं काहीच टाकायला नको.पण मग आधीच घुसमट होऊन काही गुदमरली होती. त्यामुळे कसतरी त्यांना निरोप दिला. नव्या पुस्तकांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून…..!!

खूप छान आवरल होतं मी कपाट.प्रत्येकाला प्रत्येकाची जागा ठरवून दिली होती.सगळी गर्दी कमी करून मोकळ अंगण तयार केलं होत जणू… त्या वह्या-पुस्तकांसाठी….!!हे कपाट आवरून झालं नी मी कपड्यांच कपाट आवरायला निघाले.हे कपड्यांच कपाट तर बघायलाच नको….कितीही आवरा याला ते विस्कटलेलच वाटतं.

वेगवेगळ्या प्रकारचे ,इंद्रधनुष्यासारखेच विविध रंगाचे कपडे सगळ्यांच्या कपाटात असतात तसेच माझ्याही कपाटात होते.पण काही फार जुनाट दिसत होते.काहींचा रंग खूप फिका झाला होता. तर काही तोकडे वाटत होते.काहींच तर फक्त आता पायपुसनं व्हायच राहिल होतं.मग काय अगदीच ज्यांच काही राहिलच नव्हतं त्यांना कपाटातून बाहेर काढलं.

प्रत्येक कप्प्यात व्यवस्थित अंतर ठेवून छान घड्या घालून कपडे ठेवले.कपड्यांचे ते विविध रंग डोळ्यांना छान वाटत होते.ब्लॅक अँड व्हाईट ते अगदी ग्रे शेडच्या रंगछटांनी सजलेल कपाट आज अगदी सहजसुंदर आणि सुटसुटीत वाटत होते.आणि का कोणास ठाऊक काय झालं…?? सहज डोक्यात विचारांच पाखरू भिरभिरायला लागलं….

विस्कटलेली कपाटं तर आवरुन झाली. पण मग विस्कटलेल्या या मनाच काय…??त्याला पण आवरायला हवं…..असं वाटलं खरं…. पण सुरुवात कशी आणि कुठून करायची हेच समजत नव्हतं….कारण मन ईतक विस्कटलेल होत की त्याचा अंदाजही लावायला नको. पण मग ठरवल जशी ही दोन विस्कटलेली कपाटं आवरली नं अगदी तसच या विस्कटलेल्या मनाला आवरायचं….आणि मग..उघडलं विस्कटलेल्या मनाच दार…त्या कपाटासारखच…..!!

वाटलं कधी याला आवरलच नाही या मनाचा पसारा तर अस्सा क्षणात कोसळेल…पण नाही… तो कोसळलाच नाही. कारण विस्कटलेला तो सगळा पसारा मनाच्या एका कोपऱ्यात निपचित दडून बसला होता.

त्या मनाच्या कोपऱ्यात अक्षरशः धूळ साचली होती.तुटलेल्या-फुटलेल्या , विरलेल्या overall सगळ्याच गोष्टी मनात साचल्या होत्या.मनातील असंख्य गोष्टींचे तर रंगच कायमचे उडाले होते.गोष्टी इतक्या जुनाट झाल्या होत्या की त्याची पायपुसन व्हायचही लायकी नव्हती.मन… मन राहिलच नव्हतं. ते काहीतरी वेगळच वाटत होतं.

त्याला आवरणं मला कठीणच जात होतं.पण ,आवरत गेले मी…….आशेचा झाडू घेऊन मनाच्या काचेवरची निराशेची धूळ झटकली.तुटलेल्या गोष्टी रिपेअर करून बघितल्या…ज्या जोडल्या गेल्या त्यांना मनात जागा दिली.ज्यांचा चक्काचूर झाला ,ज्या नकोशा , निरर्थक गोष्टी होत्या त्यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला.काही भिजत घातलेली घोंगडीही टाकूनच दिली. इतके दिवस भिजून भिजून कुजली होती ती

अक्षरशः…..सुकलेल्या पाकळ्यांना गंध तरी असतो पण या कुजलेल्या घोंगड्याच काय…??याने आयुष्यात कधी दुर्गंधी पसरते कळतही नाही.
तुटलेल्या आठवणींची, स्वप्नांची,तुटलेल्या भावनांची,मळलेल्या विचारांची मनातील गर्दी कायमची कमी केली.आणि सगळ्या चांगल्या गोष्टींची नीटनेटकी घडी करून स्वतंत्र कप्प्यात त्यांची मांडणी केली. कसंबसं आवरल एकदाचं त्या विस्कटलेल्या मनाला…….!!

पण विस्कटलेल मन आवरताना समजलं…किती मोठा आहे मनाचा पसारा.जड जड विचारांनी भरलेला.इथे अनावश्यक गोष्टींचीच जास्त गर्दी आहे. “Let it go”…असं म्हणायला आपल्याला जमलं पाहिजे. आपणच दुर्लक्ष करतो आपल्या मनाकडे मग ते विस्कटत जातं हळुहळू…नको तो पसारा वाढत रहातो…आणि या मनाच्या पसाऱ्यामुळेच आयुष्याचा पसारा वाढत जातो….

आपल्या मनात एखाद “DE-Clutter” च Switch नक्की लावून घ्यावं.माहीत आहे, कपाटासारखच विस्कटलेल मन आवरणं इतक सोपं नाही. पण ते अशक्यही नाहीये.आणि विस्कटलेल मन आवरणं किती आणि का गरजेचं आहे तेही समजलं.आठवड्यातून नाही किमान पंधरा दिवसातून एकदा तरी या मनाला आवरणं खूप गरजेचं आहे.

या मनाला आवरलच नाही तर ते अजून विस्कटत जाईल आणि मग त्याला आवरण नंतर मात्र खूप कठीण जाईल. आणि आयुष्य केव्हा गुंतागुंतीच होईल लक्षातही येणार नाही. म्हणून कपाट असो वा मन…दोन्हींचा पसारा वेळेवर आवरा.कारण विस्कटलेल्या, गर्दीच्या जागेपेक्षा कोणतीही स्वच्छ, स्पष्ट आणि सुटसुटीत जागा जास्त सुंदर आणि सुखद वाटते…..!!

आणि झालाच पसारा तिथे तर आवरायला सहज सोपं जातं.तर मग विस्कटलेल्या मनाची मानसिकता लक्षात घेऊन त्याला आवरण्याचा नक्की प्रयत्न करा.आणि तेवढं ते विस्कटलेल कपाट आवरायला मात्र विसरू नका….कारण कपाट आवरता आवरता आता तुम्ही तुमचं मनही आवरणार आहात…….So….”Wake Up….And De-Clutter your Mind…..”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “विस्कटलेलं कपाट आवरा, विस्कटलेलं मन सुद्धा आवरून होईल..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!