“आयुष्यात आठवणी खूप असतात, पण आठवणींना आयुष्य नसतं ..”
मधुश्री देशपांडे गानू
माणूस सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रगत, बुद्धिमान. इतर प्राण्यांप्रमाणेच मूलभूत गरजांसकट मानवाची आणखी एक गरज असते. ती म्हणजे मानसिक, भावनिक भावविश्व. मनासारखा अदृष्य अवयव असल्याने माणूस एखाद्या कृतीचा, प्रसंगाचा , परिस्थितीचा भावनिक पातळीवरही विचार करू शकतो. माणसाच्या मनाचे दोन कप्पे असतात बाह्यमन आणि अंतर्मन. प्रत्येक गोष्टीची इथे नोंद होत असते. अंतर्मन सगळं सूक्ष्म नजरेने टिपत असते. यालाच आपण आठवणी म्हणू या.
मूल जन्माला आल्यावर अगदी कोऱ्या पाटी सारखं त्याचं मन स्वच्छ, निर्मळ, निर्व्याज असतं. म्हणूनच लहान मुलं निष्पाप असतात. अजून मनावर संस्कार झालेले नसतात. हळूहळू जसे हे मूल मोठं होत जातं , तसं तसं आई वडील, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आजूबाजूची माणसं आणि परिस्थितीनुरूप घडणारे प्रसंग या सर्वांचे संस्कार कळत नकळत त्याच्या मनावर होत असतात. त्याची स्वतःची स्वतंत्र मानसिकता, विचार प्रक्रिया आणि भावविश्व निर्माण होते. यामध्ये असंख्य आठवणी असतात. माणसांच्या, प्रसंगांच्या..
काही आठवणी अत्यंत आनंददायी असतात आणि काही दुःखदायक.. हे व्यक्तीसापेक्ष ही आहे ना! एखाद्या मुलाला शाळेतला पहिला दिवस ही आनंदी आठवण असेल तर एखाद्यासाठी नकोशी आठवण असू शकते. आयुष्यात अनेक प्रसंग येतात सुखाचे, दुःखाचे, अभिमानाचे, अपमानाचे, व्यथित होण्याचे, अगदी सर्वस्व संपलं असं वाटण्याचे.. अशा प्रसंगांना ही सामोरं जावं लागतं.
अगदी जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू, प्रेमात अपयश,करियर नोकरीत अपयश किंवा एखादं सुवर्णपदक मिळालेला क्षण, पहिलं बक्षीस मिळालेला क्षण, आईवडिलांची पाठीवर पडलेली शाबासकी, प्रेम व्यक्त करण्याचा क्षण, प्रेमात घालवलेले अनेक रोमँटिक क्षण, माणूस म्हणून अभिमान वाटेल असा क्षण, मित्र-मैत्रिणींबरोबरच्या रम्य आठवणी अशा कितीतरी आठवणी माणसाजवळ कायम राहतात.
जीवन त्याच्या गतीने चालूच असते.
आपणही वाहत्या पाण्यासारखे वाहत असतो. पण एखाद्या अवचित एकांत क्षणी, एकटे असलो तर मात्र या हव्याहव्याशा आणि नकोशाही आठवणी मनात पिंगा घालतात. अगदी एखाद्या चलचित्राप्रमाणे झरझर येऊ लागतात. यांना थोपवणे अशक्य होते. मग दुःखी कष्टी होऊन अश्रूंचे पाट वाहू लागतात. किंवा आनंदी आठवणी मनाला प्रफुल्लित करतात. चेहऱ्यावर हळूच हास्य फुलवतात. सगळे छान वाटू लागतं..
पण काहीही झालं तरी आठवणी हा घडून गेलेला भूतकाळ आहे. त्यांना आयुष्य नाही. आपण मात्र त्यांना आपल्या मनात जपलेलं असतं. यात रमून आपण आपला वेळ आणि उर्जा वाया घालवतो. हाच वेळ आपण नवीन काही शिकण्यासाठी सत्कारणी लावू शकतो. आयुष्यात बदल होत राहणारच. ते आहेत तसे स्वीकारता आले पाहिजेत.
खूपदा नकारात्मक आठवणींनी माणसं ग्रासली जातात. ते दुसरा कोणताही विचार करू शकत नाहीत. भूतकाळ मागे टाकू शकत नाहीत. ते भूतकाळातच जगतात आणि मग मात्र या सगळ्याचा त्यांच्या वर्तमानावर परिणाम होऊ लागतो. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. कधीकधी या आठवणींचा कडेलोट झाला तर टोकाचा निर्णय ही घेतला जातो. यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नाही.
अशावेळी वेळीच मानसोपचारतज्ञाची मदत घेणे अगदी गरजेचं असतं. अशावेळी जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करून फक्त आनंदी आठवणींना थारा द्यायचा आणि व्यथित करणाऱ्या आठवणी लवकरात लवकर विसरून जायच्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?? तर मनाला तशी सवय लावायची. कोणतीही गोष्ट सहज साध्य नाहीच तर त्याचा सराव अभ्यास करावा लागतो.
आपल्या आयुष्याचा डोलारा मानवी नातेसंबंधांवर उभा असतो. एखाद्याशी वाद झाला असेल आणि ते नातं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं असेल तर आपण पुढाकार घेऊन सामोपचाराने वाद मिटवावा. नातं जपावं. तेही शक्य नसेल तर त्या व्यक्तीला मनापासून माफ करावे म्हणजे त्या आठवणी त्रास देणार नाहीत. भूतकाळात, आठवणींमध्ये फार रमूच नये. “रात गयी बात गयी” हे धोरण ठेवावे. एखादी प्रेमाची व्यक्ती दुरावली, ब्रेकअप झालं तर त्या व्यक्ती सोबत घालवलेले आनंदी क्षण फक्त सोबत घ्यावेत.
वर्तमानात जगायला शिकावे. हा आत्ताचा क्षण माझा आहे आणि मी तो पूर्णपणे जगणार ही सवय लावून घ्यावी. भविष्याबद्दल जागरूक नक्कीच असावे पण भूतकाळाच्या आठवणींचे ओझे घेऊन नवीन दिवसाला आपण सामोरे कसे जाणार?? जसं आपण कपड्यांचे कपाट व्यवस्थित लावतो, घरातला कचरा काढतो, घर स्वच्छ ठेवतो त्याच प्रमाणे मनाचीही वेळोवेळी साफसफाई गरजेची आहे.
नकोशा आठवणी काढून टाकायच्या. अत्यंत सकारात्मक विचार करायचे. मनावर तसेच संस्कार करायचे. रोज रात्री झोपताना एक चांगला घडलेला प्रसंग लिहायचा. सकाळी स्वतः बद्दल पाच सकारात्मक विधाने लिहायची.. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आपल्या प्रतिक्रियेची गरज नसते हे मनाला शिकवावं. म्हणजे नोंद होणारे प्रसंग कमी होतील.
आपण सामान्य माणसे आहोत. संसारात येणाऱ्या सगळ्या प्रसंगाना जबाबदार्यांना सामोरं जावं लागतं. पण मनाची थोडी योग्य मशागत केली, थोडी विचारांना ,आठवणींना शिस्त लावली तर आयुष्य आनंदी जगता येईलच. आणि जबाबदार्याही आनंदाने पार पाडता येतील. यशस्वी होता येईल. मनुष्य जन्म एकदाच मिळतो… अशा या मौल्यवान जन्मी आयुष्याचे एकेक पान पुढे सरकताना हा आनंद कायम आपल्याबरोबर असेल…. असावा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


