Skip to content

मुलींना माहेरून चुकीची शिकवण मिळतेय, हे खरंय का ???

मुलींना माहेरून चुकीची शिकवण मिळतेय, हे खरंय का ???


सौ. मिनल वरपे


लहान मूल ज्याला काहीच कळत नाही तो मारतो सुद्धा आणि आपले डोळे पुसायला आपल्याजवळ येतो सुद्धा.. नंतर जसा मोठा होतो तस त्याला शिकवलं जाते काय चांगल काय वाईट आणि त्याप्रमाणेच तो वागतो…नकळत घडलेल्या चुका ठीक असतात पण जाणूनबुजून केलेल्या चुका या चुकीचे विचार दर्शवतात आणि चुकीचे विचार हे चुकीच्या शिकवणीतून येतात..

अर्थात सगळेच ऐकतात अस सुद्धा नाही.. पण आपल्या शिकवणीवर आपल्या मुलांचं वागणं बोलण ठरते.. मोठ्यांचा आदर करणे, मोठ्या माणसांना उलट उत्तर द्यायची नाहीत, येणाऱ्या पाहुण्यांशी नम्रतेने वागणे हा सगळा आपल्या संस्काराचा भाग..

आणि हेच संस्कार जेव्हा कोणत्याही मुलीला दिले जातात तेव्हा ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊदेत ती सगळ्यांचं मन जिंकून घेते.. पण आजकल सगळं भलतचं घडताना दिसतेय..

मुलीने सासरी कस नांदल पाहिजे हे सांगताना त्यामधे कायम सकारात्मक दृष्टीकोन असेल, चांगले विचार असतील तर नक्कीच ती मुलगी चुकीचं वागणार नाही पण हल्ली उलट घडतेय.. मला माझ्या सासूने खूप छळल मग तू सुद्धा सावध रहा त्या कितीही गोड बोलल्या तरी त्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस, पटलं नाही की सडेतोड उत्तर देत जा मग समोर कोणीही असो.. आमच्या मुलीला आम्ही खूपच लाडात वाढवली आहे म्हणून पुढे सुद्धा तिचे तसेच लाड सासरी व्हायला हवेत आणि अगदी तसच नाही घडल की झाले रुसवे फुगवे सुरू..

कोणाच्या बाबतीत काही वाईट घडल आणि ते ऐकलं की लगेच मुलीला उपदेश देण्याची घाई असते काही मुलींच्या घरच्यांना… जे दुसरीकडे घडतेय अगदी तेच आणि तसच आपल्या मुलीच्या बाबतीत घडू नये हे प्रत्येकाला वाटण साहजिकच आहे पण त्यामुळे चुकीचे उपदेश देण्यापेक्षा चांगल वागण्याचे सल्ले दिले तर उत्तम..

माझी मुलगी खूप शिकली आहे त्यामुळे तिला आम्ही कधी काम करू दिलं नाही.. अस सतत मुलीच कौतुक इतरांना सांगत मुलीला कामाची सवय न लावणे यात कोणता अभिमान असतो कुणास ठाऊक..!! कारण गरिबीवर मात करून अनेक मुली उच्च पदवीधर झालेल्या आपण बघतो आणि त्यासुद्धा घरची कामं करून.. जमिनीवर पाय ठेवून मग त्यांना कसा नाही विसर पडत कामांचा.. कारण त्या जाणिवेत असतात.. परिस्थितीच्या..आणि शिकवण विसरत नाही म्हणून..

मुलींना सासरी चुकीचं वागण्यामागे एकतर तिचे अतीलाड कारणीभूत असतात नाहीतर मला माझ्या नवऱ्याने कायम धाकात ठेवलं माझ्या मुलीला ते दिवस बघायला लागू नयेत म्हणून.. किंवा ज्या गोष्टी मी आजवर करू शकली नाही आणि मला खूप हाल सहन करावे लागले अस म्हणत मुलीच्या मनात आधीच नकारार्थी विचार भरून तिला चुकीचं वागण्यास प्रवृत्त केलं जाते..

मग सासरी कितीही चांगली माणसं जरी असतील तरी मनात आधीच असलेल्या नकारार्थी विचारांनी ती मुलगी चुकीचे अर्थ काढून चुकीचं वागते.. आणि समजून घेण्याची सुद्धा एक मर्यादा असते जेव्हा ती मर्यादा सुटते तेव्हा होतात ते वाद.. आणि त्या वादाचा त्रास त्या मुलीला,. तिच्या घरच्यांना ( सासरी) आणि शेवटी तिच्या माहेरी सुद्धा होतोच.

म्हणून कोणत्याही मुलीच्या आईने आपल्या मुलीला काय शिकवण द्यावी हे प्रत्येक आईला कळायला हवं..जर मला त्रास झाला.. माझे हाल झालेत म्हणजेच माझ्या मुलीच सुद्धा तसच होणार आधी हे विचार डोक्यातून बाजूला काढणे महत्त्वाचे..

कारण काळ.. वेळ.. विचार.. वागणं हे कधीच एकसारखं राहत नाही.. तेव्हा स्त्रिया अत्याचार सहन करायच्या कारण त्या काळी शिक्षण नव्हत.. कुठे कस वागावं हे कळत नव्हतं.. जनजागृती नव्हती.. अत्याचार करणाऱ्या माणसांची मानसिकता चुकीची होती.. पण आज शिक्षण आहे.. कुठे कस वागावं काय बोलावं हे कळतेय.. जनजागृती आहे.. समाजाचे विचार बदलले आहेत..

आपल्या प्रगती करण्याकडे सर्वांची धावपळ सुरु आहे.. घर नोकरी.. नोकरी घर हेच चक्र सुरू आहे त्यामुळे अन्याय अत्याचार.. त्रास देणे यासाठी वेळ कोणाला आहे..

जर आपण चांगल तर जग चांगलं.. पिवळा चष्मा घातला की जग पिवळच दिसणार.. आणि चुकीचं काय योग्य काय हे ज्याचं त्याला कळेल इतकं ज्ञान प्रत्येकाला आहेच..

मग आपल्या मुलीचा संसार सर्वस्वी तिलाच करू द्यायचा.. तिला कळेल ना कुठे योग्य अयोग्य.. कधी कुठे कस वागावं हे तीच तिला शिकू द्या.. द्यायचं असेल तर सकारात्मक विचार तिच्या सोबत द्या.. चांगलं वागण्याची शिकवण द्या..

या लेखाचा हेतू फक्त इतकाच आहे.. की मनात चुकीचे.. नकारात्मक विचार घेऊन कधीच कोणी चांगल वागू शकत नाही.. आणि आजकल वाढणाऱ्या वादांमध्ये चुकीची शिकवण जास्त कारणीभूत आहे कारण स्वतःच डोक वापरण्यापेक्षा दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे अनुभवाचे बोल समजून तसच वागल जाते आणि तिथेच चुकीची सुरवात होते अर्थात सगळे सारखे नसतात यात अपवाद सुद्धा नक्कीच असतील.. पण जे चुकत आहेत त्यांनी आताच बदल केला तर नक्कीच फायदा होईल..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “मुलींना माहेरून चुकीची शिकवण मिळतेय, हे खरंय का ???”

  1. सगळी कामं मुलींनी च करायची,घर कामं आणि चांगलं वागण पण सगळ्या अपेक्षा मुली कडून हे तर चुकीचं आहे आणि सरासरीच्या व्यक्ती जरा पण त्याचं वागणं बदलणार नाही, समजून घेणार नाही,हे एकतर्फी होणे शक्य नाही…..

  2. सहमत नाही.मुलींना कामाची सवय नाही हे सांगण्यामधे चुकीचे काय आहे?म्हणजे मुली शिकून पण आज त्यांच्याकडून घरकामाची अपेक्षा पूर्वीसारखी ठेवणे चुकीचे नाही का?त्या ऐवजी आज असा बदल घडला पाहिजे की मुलाकडच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की आमच्या मुलाला पण आम्ही सर्व शिकवले आहे…दोघे मिळून घरकाम करतील.म्हणजे मुलीकडून कमविण्याची पण अपेक्षा आणि घरकामाची पण?जसे मुलिकडचे लोक तटस्थ राहावे असे वाटते तर मुलाकडच्यानी पण शिकावे तटस्थ राहायला.आणि आज मुली सक्षम झाल्या म्हणून त्या आणि त्यांचे आईवडील बोलू लागले तर आक्षेप आणि शतकानुशतके सासरची मंडळी करत होती ते बरोबर😂वा रे वा..आणि स्वयंपाक आणि घरकाम ही माणूस म्हणून प्रत्येकाला यायकच हवं…त्यामधे गरीब घरच्या मुली शिकतात पण आणि घरकाम पण करतात हे वाक्य कशाला?

  3. बरोबर आहे पण, आई वडिलांच्या चांगल्या सावनसखारामुळे किंवा प्रत्येक गोष्टीला सकारात्मक तेणे बघणे यामुळे बऱ्याच मुलींचा बळी जातो तो. विना कारण……………. 🙏🙏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!