Skip to content

एकांत स्वतःहून घेतलेला हवा , मिळालेला नको……

एकांत स्वतःहून घेतलेला हवा , मिळालेला नको……


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


“एकांत”……. आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा बोलतो की जरा म्हणून एकांत मिळत नाही मला… थोडा एकांत मिळाला असता तर बरं झालं असतं.आणि बऱ्याचजणांना एकटेपणा आणि एकांत यातला फरकच लक्षात येत नाही. तर मित्रांनो/मैत्रिनींनो… आधी एकांत आणि एकटेपणा यातील फरक समजून  घ्या.नाहीतर एकांतासारख्या सुंदर अनुभवाला तुम्ही मुकाल….!!

मला एकांतच मिळत नाही असं बोलून कसं चालेल…? एकांत असा सहजासहजी मिळत नाही.आणि असा मिळालेला एकांत फारसा बरा नाही. एकांत आज मिळेल , उद्या मिळेल.. अशी चातकासारखी वाट बघत बसलात तर एकांत मिळणं अवघड आहे.पण आयुष्यात प्रत्येकाला एकांत हवा असतो. एकांत अस ठिकाण आहे जिथे स्वतःचं अस्तित्व नव्याने गवसतं.

म्हणून स्वतःसाठी वेळ काढून एकांत शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आणि शोधल की एखादी गोष्ट सापडते.अगदी हवाहवासा वाटणारा एकांतही…..!!

मिळणाऱ्या एकांताची अशी वाट पाहू नका.आणि मिळणाऱ्या एकांतापेक्षा स्वतःहून एकांताच्या शोधात निघालात तर एकांत काय असतो हे समजायला सोप जाईन. आणि त्या स्वतः शोधलेल्या एकांताची व्याख्याही सुंदर असेल यात काही शंकाच नाही.चला तर मग या  एकांताला थोडं शोधूयात………….एकांत काय असतो…थोडं समजून घेऊयात…..आपल्याच शब्दफुलांतून….!!

लहानपणी साधं खरचटलं , शाळेत भांडणं झाली तरी आपण आईला नाहीतर घरच्यांना सांगायचो.तेव्हा रडणं-हसणं याचा फक्त पर्यायी शब्द माहीत असायचा.पण आता मात्र त्यांचे अर्थ कळायले लागलेत.स्वतःची जागा ,एकांत या गोष्टी जाणवू लागल्यात.आयुष्यात एकांताला किती वेगळं स्थान आहे हे “एकांत” अनुभवल्या शिवाय कळणार नाही.

किती ती रोजच्या जगण्यातील धडपड,येणारी दुःख, छळणाऱ्या वेदना , नी लुप्त होत चाललेल्या संवेदना……….. यांच्यामधून एकांत मिळेल कसा..? कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं लवकर सापडत नाही. किंवा आयुष्यात नक्की काय चाललय हेही कळत नाही. ‘काल-परवा-हो-नाही-घर-ऑफीस’ यांमध्ये “स्व” चा स्वर हरवला आहे. आणि तो पुन्हा गवसण्यासाठी एकांत खूप गरजेचा आहे.एकांत नाही तर स्वतःशी संवादही नाही. एकांतात काय सापडतं किंवा एकांतामुळे काय होतं…..? तर……

१)संकटाशी स्पष्ट नजरेनं भिडणारी डोळ्यातील     ताकद
२)स्वतःशी सुसंवाद..
३)अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं.

४)संवेदनांशी नव्याने ओळख.
५)स्वतःची खरी ताकद समजते.
६)मनःशांती मिळते.

७)जगण्याच्या नव्या वाटा सापडतात.
८)भळभळणाऱ्या जखमांचे दाह शांत होतात.
९)मरगळलेल्या पंखात नवं बळ येत.
१०)शेवटी , आयुष्य सुंदर आहे पण जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याची जाणीव होते.

मी तर दहाच गोष्टी सांगितल्या.पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या एकांतात हसत हसत गवसतात.येरवी आपण काही अगदी आतून हसत नाही आणि रडतही नाही.पण जेव्हा एकांतात असतो तेव्हा मात्र मनसोक्त रडून घेतो..मनसोक्त हसून घेतो..वेदनांना वाटा मोकळ्या करून देतो.

रोज डोक्यावर घेऊन फिरणारं अगदी छोट्या छोट्या गोष्टींच ओझही हा एकांत क्षणभर का होईना विसरायला लावतो.समजा,घरी किंवा गर्दीत आपण एकटे हसतो..दगड माती फुलांशी बोलतो..तेव्हा मात्र बरीच लोकं त्याचा आनंद घ्यायचा सोडून खिल्लीच उडवत राहतात. (कदाचित त्यांना त्याच्यात आनंद मिळत असेल)मग वाटतं आपण काहीतरी वेगळच वागतोय…असे बरेच प्रसंग येतात ज्याने न्यूनगंड नी घुसमट वाढत जाते.

पण एकांतात मात्र आपण “काय चुकलं, काय नाही….” हे सहज बोलतो.अगदी सगळी घुसमट सुद्धा एखाद्या गोड फ्लायिंग किस सारखी व्यक्त करतो.”तुझं हे चुकलं. पण ते मात्र खूप छान सांभाळलस…”असं काहीतरी आपण स्वतःला स्वःताहून सांगण्याचा प्रयत्न फार कमी करतो.

एकांतात शिरल्यावर काही प्रयत्न नाही केले तरी बरं असतं.कारण एकांतात अशी जादू आहे जी “Spontaneously” आपल्याला बोलायला लावते….आणि हेच किमयागार ठिकाण,ज्याला एकांत ऐसे नाव…!!

आज मी एकांत मिळाला म्हणून जरा हे केलं-ते केलं…पण मित्रांनो अशा एकांतात एकांत एकांत वाटणार नाही. खऱ्या एकांताची व्याख्याच बदलून जाईल. म्हणून एकांताच्या शोधात निघा……..विस्कटलेल्या जगण्याची, जीवनाची फ्रेश सुरुवात हा एकांतच करून देतो.एकांत दिसत नाही पण आपल्याशी बोलतो,आपल्याला बोलायला लावतो…

हा एकांत हृदयाच्या अगदी जवळचा वाटतो.कधीतरी त्याला अलगद डोळे मिटून घट्टपणे बिलगून जा…….त्याला एकदा अनुभवून पहा,जगून घ्या..तो एकांत पुन्हा पुन्हा खुणावेल…..तुम्ही त्याला महिन्यातून एकदा तरी भेटायला धावतपळत जाल….तेही हिरव्या चाफ्याच्या कळ्या घेऊन….!!

आयुष्य सुंदर आहे… फक्त एकदा तरी एकांत अनुभवायला हवा…(स्वतः शोधलेला)..!! काय मग एकदा तरी भेट देणार नं….?? एकदा तरी अनुभवणार नं..?तो सहज सुंदर एकांत……..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!