स्त्रीने सर्व निमूटपणे सहन करावे पण दुसरा संसार उभारू नये…??
सौ. शमिका विवेक पाटील
दादाला जाऊन १ वर्ष होईल, खरं म्हणजे माझ्यात आणि दादात जास्त वयाचे अंतर नाही. आई वडील आम्ही दोघे आणि एक छोटी बहिण असा परिवार. वडील सरकारी शाळेत शिपाई म्हणून कामाला होते. पगार पाणी ठीक होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच. आईचा दादावर जास्त जीव, पहिला मुलगा म्हणून असेल कदाचित, पण माझ्या पेक्षा जास्त लाड त्याचे व्हायचे. ह्यावरुन मी आणि छोटी नेहमी भांडायचो मग आई कशी बशी आमची समजूत काढायची.
सगळे अगदी मस्त हसून खेळून दिवस सुरू होते आणि एक दिवस दादा दारू पिऊन घरी आला. मित्रांची वाईट संगत लागली आणि आयुष्य बरबाद करून घेतलं. नोकरी धंदा नाही, बाबांनी मला त्यांच्या शाळेत हेडमास्तरच्या हाताखाली कामाला लावले. छोटी मोठी कामे असायची पण मी मन लावून करायचो.
दादा साठी पण त्यांनी बऱ्याच नोकऱ्या आणल्या पण ह्याला एक टिकेल तर खरं ना. मित्र, दारू आणि जुगार ह्या पलीकडे त्याचे जीवन नव्हते. त्यामुळे सतत आजारी पडत असे. त्याला जास्त दारू झेपत नसे तरी उगीच बळजबरीने मित्र पाजत असत. एकदा बाजूच्या मावशींनी आमच्या आईला धडे गिरवले.
त्याचं लग्न करून टाका, म्हणजे तो सुधारेल, बायको आली की तिच्या हाताखालचं मांजर होऊन जाईल आणि मग मित्रांचा नाद आपोआप कमी होईल, दारू पण सुटेल की नाही बघा, नोकरी पण शोधेल तो स्वतःहून. आता एवढे सगळे आमिष आईला दाखवल्यावर आईने दादाच्या लग्नाचा हट्ट धरला. पण अशा बेवड्या आणि बिन नोकरीच्या पोराला कोणता बाप आपली मुलगी देणारं ?
आम्ही मुंबईमध्ये राहणारे त्यामुळे गावाकडे थोडा रुबाब होता. चुलत काकांनी दादासाठी एक स्थळ आणले, मुलगी अगदी गरीब घरातली, तिला आधीच तीन बहिणी बीन लग्नाच्या होत्या म्हणून तिच्या बापाने जबरदस्ती हीच लग्न लावून दिलं आमच्या दादासोबत. आता ते देवालाच माहीत काय बघुन दिलं असेल आमच्या घरात.
ती म्हणजे नाजूक बाहुली, वयाने अगदीच लहान असेल कारण तिच्या नजरेतून तिचा अल्लडपणा साफ झळकत असे. हसताना गालावर छोटीशी खळी पडायची, ती खळी बघण्यासाठी मी मुद्दाम तिला हसवत असे. तिचा आवाज सुध्दा अगदी तिच्यासारखा नाजूक. मला भावजी म्हणताना नजर कधीच वर करून बोलायची नाही, ती माझ्यापासुन नेहमीच नजर चोरत असे.
सकाळी ती तुळशीत पाणी घालायची तेव्हा खुप पवित्र दिसायची, देवाच्या जवळ दिवा ओवळताना ती स्वतः इतकी तेजस्वी व्हायची की मला तिच्या पुढ्यात नतमस्तक व्हावसं वाटायचं. नेहमी हसरा चेहरा, किचन मध्ये तर कितीतरी वेळा मला साक्षात अन्नपूर्णा माता जेवण बनवतेय असा भास व्हायचा. तिला बघून माझं मन एका वेगळ्याच विश्वात रमायचं. मोठ्या भावाची पत्नी म्हणून मी तिचा नेहमी आदर करत आलो. तिच्याकडे कधीच वाईट नजरेने बघितले नाही फक्त खंत एकाच गोष्टीची होती, की तिच्यासोबत जे होतंय ते खुप वाईट होतं.
जसं लग्न झालं तसं आमचा दादा सरळ मार्गाला लागला, आईच्या नवसाला देव पावला असेल बहुतेक. पण हे वर वरचे वारे किती दिवस वाहणारं. एक दोन महिने सुखात पार पडल्यावर दादाला पुन्हा दारूची नशा चढली, आणि हातची नोकरी गमावून मित्रांच्या नादाला लागला. रोज दारू पिऊन उशीराने घरी येऊ लागला. दारुच्या नशेत शिवीगाळ करू लागला.
कोवळ्या मनाची ती त्याला ह्या रुपात बघुन पुरती घाबरुन जायची, अंग थरथर कपू लागे, घामच्या धारा वाहत, तिला ह्या अवस्थेत बघताना मी शरमेने मान खाली टाकत असे.
त्या दिवशी कहर झाला, तिच्या पाठीवर मी पट्ट्याचा वळ बघितला. तिला अडवून मी मुद्दाम आईसमोर प्रश्न केला, दादाने तुला मारले का ? ती काहीच न बोलता आत निघून गेली. आई मलाच ओरडली, तुला काय करायचं आहे ? नवरा बायकोचं आहे ते बघून घेतील…
अग पण आई, असे मारणे योग्य नाही, ती लहान आहे. तू जरा गप्प बस. त्याला समजलं तर अजून तमाशा करेल. नेहमीप्रमाणे आईने त्याची बाजू घेतली आणि विषय संपवला.
मला मात्र चैन पडेना. तिचा चेहरा अगदीच हिरमुसला होता, जेवणात लक्ष नव्हते. रात्र होताच तिचा चेहरा कावरा बावरा झाला. आईला हळू आवाजात बोलली, आज मी तुमच्याकडे झोपू का ? आईने तिची काय माहित काय समजूत काढली आणि नवऱ्यासोबतच झोपायच असते असे बोलून तिला नरक यातनेच्या खोलीत ढकलले.
दुसऱ्या दिवशी तिच्या चालीवरून मी रात्रीचा आढावा घेतला आणि मनातून तिची खुप दिलगिरी व्यक्त केली. काही महिन्यांनी दादाची तब्येत खूपच बिघडली, दारूने पूर्ण त्याचा संसार उध्वस्त केला होता आणि शेवटी त्याला देवाज्ञा झाली. आई मात्र ह्या वेळेस निःशब्द झाली होती. तिने तिच्या पोरासाठी एका मुलीचे आयुष्य बरबाद केले होते. लहान वयातच तिच्यावर विधवेचा शिक्का बसला, तसही दादासारख्या बेवड्याची बायको बनुन जगण्यापेक्षा विधवा झालेली बरी.
आता तिची जबाबदारीपण माझ्यावर आली. मला तिला कुठल्याही परिस्थितीत खुश ठेवायचे होते, दादा सोबत तिने जे हाल सहन केलेत, त्या सर्वाचा तिला विसर पडायला हवा ह्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत होतो. खुप दिवसांनी तिला बरे वाटावे म्हणून मी बाजारात पाठवले, तर तिथून आल्यावर हुंदके देऊन रडू लागली.
चौकशी केल्यावर समजले दादाच्या मित्रांनी रस्त्यात छेड काढली, आणि सोबत येणारं का ? असला घाणेरडा प्रश्न विचारला. तिची आता जास्तच दया येऊ लागली. मी विचार न करता आईला सरळ शब्दात सांगीतले, मला हिच्याशी लग्न करायचं आहे, तिला मी अशी नाही बघू शकत, आज ना उद्या कोणीतरी तिचा गैरफायदा घेईल.
दादाने आधीच तिचे हाल केलेत कदाचित ती माझ्यासाठी ह्या घरात आली असेल. आईला वाटले मी सुध्दा दारू पिऊन बडबडतोय, म्हणून तिने दुर्लक्ष केले. पण माझा निर्णय ठाम होता. जवळ जवळ सगळ्यांनीच ह्या लग्नाला विरोध केला.
बाबांना विश्वासात घेऊन मंदिरात जाऊन आम्ही लग्न केले. समाजाची तीळ मात्र सुध्दा पर्वा केली नाही, आईने तर माझं तोंड बघणं पण सोडून दिलं होतं. स्वतःच्या वहिनीबरोबर संसार थाटताना लाज कशी वाटली नाही असे रोजचे टोमणे कानावर यायचे. मी ह्या सर्वांकडे दुर्लक्ष करत होतो. तिची काळजी घेणं, तिला जपणं, तिच्या इच्छा पूर्ण करणं हेच माझं ध्येय होतं.
का कुणास ठाऊक ? पण ती माझ्यासाठीच बनली होती हे आता निश्चित झालं होतं. सुरवातीला ती माझ्या जवळ उभी रहायला पण घाबरत होती, हळू हळू आता माझ्यात रुजू लागली, गप्पा मारु लागली, काही हवे असल्यास हक्काने मागू लागली. दोन महिने लग्नाला झाले पण अजून तिला मी स्पर्श केला नाही.
जो पर्यंत ती मनापासून माझा पती म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत मी तिच्यावर कुठलीच गोष्ट जबरदस्ती लादणारं नाही. तिची आणि माझी जवळीक वाढली. पदोपदी मी तिचा आदरच करत आलोय. दादाच्या कडू आठवणींचा तिला आता विसर पडत चालला असेल, इतके प्रेम करतोय मी तिच्यावर, अगदी निःस्वार्थपणे आणि म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर ते तेज पुन्हा झळकू लागले.
मला ती पूर्वी सारखी दिसू लागली. लोकांसाठी मी कदाचित चुकीचा असेन पण तिच्यासाठी मी आता सर्वस्व आहे. तना मनाचे जे हाल दादाने केले त्या सर्वांवर मी प्रेमाने मलम लावले होते. त्या रात्री आम्ही एकत्र आलो आणि ती पुर्णतः माझी झाली. तिथूनच आमच्या सुखी संसाराला सुरुवात झाली.
आपल्या समाजासाठी ह्या गोष्टी म्हणजे मोठा अपराध केल्यासारखे आहे. स्त्रीने सर्व निमूटपणे सहन करावे पण दुसरा संसार उभारू नये. काळ बदलतोय पण विचार अजून बुरसटलेलेच आहेत. तिलाही तुमची मुलगी माना आणि ताठ मानेने समाजात वावरू द्या. ती सर्व काही तुम्हाला अर्पण करेल फक्त बदल्यात तिला आदर आणि प्रेम द्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



सर्वच लेख अतिशय सुंदर असून जास्तीत जास्त व्यक्तींनी त्याचे वाचन आणि अनुकरण करणे गरजेचे आहे.
असे उत्तम विचार समाजापर्यंत पोहोचवून आपण एक प्रकारे समाजसेवाच करत आहात .
हे लेख वाचकापर्यंत पोचण्यासाठी सहभागी असणाऱ्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.