Skip to content

त्याने माझा वापर केला, आता माझं आयुष्य मी ठरवणार!!

त्याने माझा वापर केला, आता माझं आयुष्य मी ठरवणार!!


सौ. शमिका पाटील


आज बऱ्याच दिवसांनी आम्ही मैत्रिणी भेटणारं होतो. ओळख तशी शाळेपासूनची लग्न झाल्यानंतर सगळ्या आपआपल्या संसारात रमल्या. तरीही सहा महिन्यातून एकदातरी वेळ काढून भेटायचे ठरले होते. मग कोणी कितीही बिझी असले तरी भेटायला यायचे. जुगाड करून कशातरी भेटायला यायचो, पण त्यातही वेळगीच मज्जा होती.

पुन्हा एकदा बालपण जगायला मिळायचं, खाण्यापिण्याची हौस, खोडकर गप्पा, खळखळून हसणे सारं काही मनाला रिचार्ज करून जायचं. आणि मग पुढचे सहा महिने मस्त त्याच आठवणीत काढायचे. पण शिल्पाने त्या दिवशी अचानक भेटायचे ठरवले, तसे अडी अडचणीला भेटतो. मग ज्याला जमत असेल तसे जाऊन हजेरी लावायची.

मी आणि अजून दोघीजणी दिलेल्या वेळेत हजर झालो. पण शिल्पाचाच पत्ता नव्हता. बराच वेळ वाट पाहिल्यावर शिल्पा घाई गडबडीत येताना दिसली. सॉरी सॉरी उशीर झाला, वकीलाकडे थोडी फॉर्मलिटी कंप्लीट करायची होती. आम्ही तिघी जणी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघून एकसाथ बोललो, वकील ?

शिल्पा आणि अशोकचे लव मॅरेज, अशोक बिल्डर कडे कामाला होता त्यामुळे पैसा अगदी भरपूर आणि शिल्पा बँक मॅनेजर म्हणजे तिलाही कसली कमी नाही. १० वर्ष झाली लग्नाला तरी अजून मुल बाळ नाही किंवा स्वतःच असं घर दार नाही. आला पैसा मज्जा करून उडवायचा. भविष्याचा विचार नाही किंवा कसली सेविंग नाही.

आम्ही सगळ्या जणी चर्चा करतांना नेहमी त्या विषयावर बोलायचो, किती लकी आहे ना शिल्पा, ना मुला बाळांच टेन्शन, ना सासू सासऱ्यांच ना पैसा पाण्याचं, मस्त लाईफ एन्जॉय करायची. नाहीतर आपण बसलोय धुणी भांडी करत. पण त्या दिवशी शिल्पाच्या तोंडून वकीलाचे नाव ऐकून नक्की कशावर विश्र्वास ठेवावा हे कळेना. दिर्घ श्वास घेऊन शिल्पाने सारी हकीकत सांगायला सुरुवात केली.

लग्न झाले आणि अशोक ने स्वतःचे असे कमवणे सोडून दिले, माझा पगार जास्त म्हणून त्याने स्वतःच्या कामावर लक्ष देणे कमी केले. हळूहळू घरचा सगळा खर्च माझ्या एकटीवर टाकू लागला, आई वडील आणि दीर ह्यांची जबाबदारी पण माझ्यावरच पडली. अशोक वरचे प्रेम म्हणून मी स्व खुशीने खर्च करत राहिली. पण ह्याची त्याला सवय लागली, आमचे रहाणीमान उच्च असल्याने खर्चही तितकाच व्हायचा.

दर दोन दिवसांनी हॉटेल, पार्ट्या, शॉपिंग सुरुच असायची. रोज ड्रिंक्स करून भांडण करायचा आणि दुसऱ्या दिवशी माफी मागून गोड गोड बोलायचा, पुन्हा दोन दिवसांनी येरे माझ्या मागल्या… सुरुवातीला वाटले कामाचे टेन्शन असेल कारण त्याने नोकरी सोडली हे मला सांगितले नव्हते, म्हणून मी त्याला जास्त काही बोलत नसे. त्याचे खर्च वाढू लागले आणि आमचे वाद सुध्दा,

त्याच्या घरी काही सांगितले तर ते सरळ हात वर करायचे. माझ्या घरी सांगायची सोय नव्हती, लव मॅरेज असल्याने मला त्याचे दोष सांगता येत नव्हते आणि तुम्हा सर्वांना तरी कसे सांगणारं, वर वर सुखी दिसणारे आम्ही दोघे आतून खुप पोकळ होतो. पंधरा पंधरा दिवस संवाद होत नसे, महिनाभर आमच्यात कुठलेच संबंध होत नसत. मग कधी अचानक त्याला चूक कळायची आणि थोडे दिवस नवीन नोकरी शोधायचा प्रयत्न करायचा.

माझा राग शांत झाला की पुन्हा नोकरीचे कारण देऊन घरी बसायचा आणि उधळपट्टी सुरू करायचा. तेव्हा मला काहीच बोलता येत नसे. मात्र आतून मन खूप दुखायचे. स्वतःच्या पसंतीचे लग्न केले आणि शेवटी हे असे पदरात पडले.

सगळे अनावर झाले होते, पाणी आता डोक्यावरून जाऊ लागले. लग्नाला इतकी वर्ष होऊन सुध्दा मुल बाळ नाही, म्हणून नातेवाईक सतत विचारू लागले, अशोकशी ह्या संदर्भात बोलले तर बोलायचा अजून वेळ आहे, मला नोकरी लागली की बघू. पण मधल्या मध्ये माझे मरण व्हायचे. लोकांना उत्तरं मला द्यावी लागायची.

माझी खुप इच्छा होती, वेळेत लग्न झालं तसं वेळेत एक मूल तरी व्हावं पण ह्याच्या अशा स्वभावामुळे भविष्याची फार चिंता लागून रहायची. एक दिवस त्याच्या मित्राचा फोन आला, त्याचे बोलणे मी चोरून ऐकले, त्याचं फक्त माझ्या पैशांवर प्रेम आहे असे स्पष्ट तो मित्राशी बोलला, तेव्हापासून माझा विश्र्वासच उडाला, आणि मी ठरवले हे सर्व कुठेतरी थांबायला हवे.

माझ्या आई बाबांना मी हिंमत एकटवून सारी हकीकत सांगितली, सुरुवातीला त्यांनी नाराजी दाखवली पण पोटच्या पोरीला असा मानसिक त्रास होताना बघून मला साथ दिली. माझे काका आणि मी वकिलाला भेटलो आणि घटस्फोट घ्यायचे ठरवले. सुरुवातीला खुप कठीण गेले पण mutual understanding मध्ये divorce घेता येतो हे त्यांनी समजावून सांगितले. आत्ता पर्यंत तो सांगेल तशी मी वागत आले, हवे नको ते सर्व केले, पैसा पाणी कशाची कमी पडू दिली नाही आणि शेवटी माझ्या वाट्याला हे असे आले.

इथून पुढे मी हार मानली नाहीय, माझं अजून खुप आयुष्य बाकी आहे. मी आधी सुध्दा माझ्या मर्जीने जगत आलेय आणि पुढेही जगेन. स्वतः कमवती आहे मग लाचार का म्हणून होऊ ? अशोकला जेव्हा समजले मी घटस्फोट घेतेय तेव्हा त्याने खुप मानसिक त्रास दिला, बऱ्याच मुश्किलीने मी ह्यातून बाहेर पडलेय. अजून काही procedure बाकी आहे, काही दिवसांत आम्ही वेगळे होणारं. आणि मी स्वतंत्र.
तिला धीर देत आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत, काही लागलं तर सांग, असे बोलून तिचा निरोप घेतला.

शिल्पाची कहाणी ऐकून निःशब्द व्हायला झालं. वर वर चांगलं दिसणारं एखादं नातं आतून किती पोकळ असतं ह्याचा अंदाज सुध्दा नसतो, लोकांच्या नजरेत तिचं जोडपं म्हणजे टॉप क्लास होतं, पण वास्तव इतके कटू असू शकते हे कोणी विचार पण नाही करणारं. आज ती कमावती असल्यामुळे स्वतःच्या पायावर कणखरपणे उभी राहू शकली. तिलाही तिचं जीवन पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!