Skip to content

इतकं सहन करूनही मी जगायला शिकले….माझी छोटी कहाणी!!

इतकं सहन करूनही मी जगायला शिकले….


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


मी आत्ताची मुक्ता आणि तेव्हाची रागिणी. पण रागिणी नावासारखी मी कणखर वृत्तीची नव्हते. परिस्थिती अभावी लहानपणीच घरच्यांनी माझा सांभाळ नाकारला. चॉकलेट खाऊन कागद टाकावा अगदी तसच घरच्यांनी मला रस्त्यावर टाकलं.जेमतेम दहा बारा वर्षाची असेन मी.वयाची काही वर्षे तर मी अशीच रस्त्यावर काढली. जे मिळेल ते खायची.

कारण कुणाकडे काही मागण्याची हिम्मत माझ्याकडे नव्हती. तरी येणारी जाणारी लोकं फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायची. घेताना हात थरथरायचे पण काही इलाज नव्हता. अशीच वर्षामागून वर्षे सरली. वयात यायला लागले होते मी.पण वयात येणे याचा अर्थ उलगडून सांगणार मात्र तेव्हा कोणीच नव्हत.

घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाचा काही संबंधच आला नाही. त्यामुळे ज्ञानाची पाटी कोरीच राहिली. पण मजुरी केली की पैसे मिळतात हे माहीत होतं. मग दोन घास मिळतील या आशेने एका विटभट्टीवर मी मजुरी करायला लागले. जे काही मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे नी गप्प बसायचे मी.कारण आवाज चढवलेला मालकाला चालायचा नाही. मला शिकायची खूप ईच्छा होती. पण माझ्यापुढे फक्त अंधार दिसत होता.

कारण शिकायच म्हटलं तर पैसे लागणार…..म्हणून मी मालकाला थोडी जास्त मजुरी देण्याची विनंती केली. त्यावर मालक म्हणाला मजुरी मिळेल पण तुला मी जे सांगेल ते करावं लागेल.समजल…..?

मला शिकण्याची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. मला शिकायला पैसे मिळणार या आशेवर मी त्या मालकाला तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे असं सांगितलं. अचानक मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे विटभट्टी चार ते पाच दिवस बंद रहाणार होती. मी स्वभावाला अगदी भोळी होती.जाणत्या वयातही मला कशाची जाण नव्हती.

कदाचित याचाच फायदा घेऊन तेव्हा त्या मालकाने मला त्याच्या अलिशान बंगल्यावर नेलं. आणि आजपासून मीच तुझा करता करविता सांगत मला कायमच तिथे ठेवून घेतल. कोवळ्या वयातला कोवळा माझा देह.न जाणे कोणी नी किती किती स्पर्श केले. कितीदा नकोनको ते वार झेलले या शरिराने.

अक्षरशः लक्तरं तोडून वेशीवर टांगायची राहिली होती. मजुरी करता करता या वेश्याव्यवसायात मी कशी अडकले. काही दिवसांनी स्वतःचच स्वतःला कळू लागलं. हे जे काही चाललय ते फार विचीत्र आणि भयानक आहे.इथून बाहेर पडणं खुप गरजेचं आहे. असं किती दिवस शिकार बनून रहायच………………

खूप विचार केला मी.शर्थीचे प्रयत्न करून मी कशीबशी त्या नकोशा वाटणाऱ्या बंगल्यातून बाहेर पडले. खर तर माझीच लक्तरं तोडून त्याने मिळवलेला पैसा मला नको होता.पण माझाही नाईलाज होता.ते पैसे घेऊन मी शहराचा रस्ता धरला. मिळेल ती कामं केली.शिक्षणाची थोडी माहिती गोळा केली.

बाहेरून दहावी बारावी दिली.आणि एक चांगली नोकरी बघायला सुरुवात केली. पण माझ्यावर असलेल्या “वेश्या” या शिक्क्याने माझं आयुष्य अगदी बेजार झालं होतं. नोकरी मिळत नव्हती. येणारे जाणारे घाणेरड्या नजरेने बघायचे. जीवन संपवावं असच वाटायच मला.पुढे नशीबाने कशीबशी बरी नोकरी मिळाली. पण पुन्हा मनात भीती होतीच जुन्या गोष्टींची. कुठलाही स्पर्श झाला तरी तेव्हा मला किळस वाटायची.

शेवटी मनावर झालेला आघात मला नैराश्यात घेऊन गेले. सुदैवाने नोकरीवरील मालक चांगले होते. त्यांनी माझ्यावर योग्य ते उपचार करून घेतले. मला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली. चांगली माणसही असतात यावर थोडा विश्वास बसला….

डिप्रेशनमधून बाहेर आल्यावर मी निसर्गाच्या सानिध्यात जास्त रमले.मला निसर्ग जवळचा वाटू लागला. असच अचानक बघता बघता मला एक छोट झाड दिसलं.त्या झाडाला कोवळी पाने नी सुंदर फुलं होती. असं म्हणतात, कोवळ्या वयात माणूस खूप सहन करतो आणि नंतर तो आनंदात डोलतो.असाच काहीसा मी माझ्या आयुष्याचा तर्क लावला.आणि तर्क लावता लावता मनात आशेची पालवी फुटली……

मी समाजशास्त्रात करिअर करायला सुरुवात केली. पूर्ण खोलात जाऊन मी समाजशास्त्रात माझं शिक्षण पूर्ण केलं.मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हळूहळू मिळायला सुरुवात झाली होती. माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत. मी जिवंतपणीच मेलेलं आयुष्य जगले.

पण माझ्यासारख्या यातना कुणाच्या आयुष्यात येऊ नये.एवढं मात्र मला कळून चुकलं होतं. म्हणूनच मी अशा मुलींसाठी मुक्तांगण नावाची एक छोटी संस्था उभारली.त्यांना शिक्षण, संस्कार, नीतीमुल्ये या गोष्टींच पुरेपुर ज्ञान दिलं.

स्वतःला स्वतःची एक नवी ओळख मी करून दिली होती. मी माझं नाव मुक्ता ठेवलं. आणि नावाप्रमाणेच मुक्तपणे विहार करु लागले.माझ्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता. मी ठामपणे सांगु शकत होते की, “हो, मी वेश्या होते…” पण वेश्या म्हणजे माणुसच आहे आणि जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे. कुणी मौजमजेसाठी वेश्या नाही बनत….मूलभूत गरजा आमच्याही असतात. वेश्या असलो तरी आम्हालाही आमचा देह झाकायचा असतो……

खरच, आयुष्यात खूप सहन केलं हक्काची कुशी नसताना झाडांच्या कुशीत हंबरडा फोडला.पण इतकं सहन करूनही मी जगायला शिकले.आयुष्यात शरीर आणि पैसा यापलिकडेही एक जग असतं याची जाणीव मला सगळ सहन केल्यावरच झाली. खऱ्या अर्थाने मी आत्ता आयुष्य जगायला सुरुवात केली. खूप खचता खाल्ल्या… नको-नको ते झेललं…पण शेवटी माझा रस्ता शोधून मी माझ हरवलेल आयुष्य जगायला शिकले……..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!