Skip to content

पदोपदी येणाऱ्या संकटांनीच आजवर शिकवले, म्हणून तेच माझे गुरू!

पदोपदी येणाऱ्या संकटांनीच आजवर शिकवले, म्हणून तेच माझे गुरू!


 सोनाली जे.


गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: !!🙏🌹
गुरु विण  कोण दाखविल वाट🙏

पूर्वीपासून गुरू हाच श्रेष्ठ मानला जातो..ज्ञान, विद्या, अनुभव , संस्कार , शिकवण हे सर्व गुरू कडूनच मिळत असते . प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू हे असतातच..कोणी शिक्षकाच्या रुपात असतील , आई वडिलांच्या , भावा बहिणींच्या रुपात ..गुरूची ही विविध रूपे असतात..
आपण या मानणाऱ्या किंवा दिसणाऱ्या गुरूनांच मनोभावे पुजीत असतो.

पण असेही काही न दिसणारे, शरीर रुपी कधी ही न दिसणारे ही असतात. परंतु आयुष्यात पदोपदी येणारी संकटे हीच आपल्याला खूप काही शिकवून जातात..आयुष्याचे धडे शिकवून जातात.

संकटे ही कधी सांगून येत नाहीत..ती अचानक आलेल्या पाहुण्या प्रमाणे येतात जेव्हा आपलीं काहीच तयारी नसते  नाही मनाची , नाही आर्थिक , नाही शारीरिक …आणि अशाच वेळी आपला मानसिक तोल ढळतो.उमेद खचते.अशा वेळी जर जिद्दीने पुढे जात राहिलो तर त्यातून मार्ग निघतात च..आणि मार्ग बरोबर निघाले तर यश मिळते आणि दिशा चुकली तर अनुभव मिळतो..ते अपयश नसते..तो असतो अनुभव जो पुढच्या यशांकरिता मोलाचा ठरतो.

सध्या corona सारख्या व्हायरस चे सगळ्या जगावरच संकट कोसळले आहे पण येत्या दीड वर्षात अनेक research ही. झाले, vaccine आली, नवीन औषधोपचार ही आणि लोकं त्यांची विस्कळीत झालेली आर्थिक घडी ही थोडी फार बसवू लागले आहेत…त्याचप्रमाणे सर्व देशांची आर्थिक घडी विस्कटली होती ती थोडी फार सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत..अशा आणि नैसर्गिक आपत्ती ही असेल जसे भूकंप, जलप्रलय या सारख्या संकटानाही आपण खूप सामर्थ्याने तोंड देत असतो. आणि ही संकटे आपल्याला जीवनाचा मार्ग कसा काढायचा हे पदोपदी शिकवीत असतात.

द्वितीय महायुद्धात अमेरिकन फोटोग्राफर जो ओडोनेलने १९४५ साली जपानमधील नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर एक छायाचित्र टिपलं होतं !

जवळपास ८-९ वर्षांचा एक जपानी मुलगा आपल्या वर्षभराच्या लहान भावाचा मृतदेह पाठीवर बांधून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगेत उभा होता.

फोटोग्राफर जो ओडोनेलने अशी माहिती दिली की, त्या उभ्या असलेल्या मुलाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता आणि रडणं टाळण्यासाठी तो आपले ओठ दातांनी जोरजोरात चावत होता. इतक्या जोरात की त्याचे ओठ फाटून त्यातून रक्त यायला लागलं होतं.

जेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका स्मशानातल्या रक्षकाने त्याला विचारलं.. “ते तुझ्या पाठीवर असलेलं ओझं मी घेतो.” यावर त्याने उत्तर दिलं. “हे कुठलंही सामान किंवा ओझं नाही… हा माझा भाऊ आहे !” आजही जपानमध्ये हे छायाचित्र सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात.

एवढा बिकट प्रसंग , मोठे संकट ओढावले , स्वतः चा भाऊ गमवावा लागला तरी त्या प्रसंगी ही कणखर राहायचे आणि सामर्थ्य टिकवून ठेवायचे हे शिकून गेला आणि आपल्यालाही शिकवून गेला..

असेच आपल्याही आयुष्यात अनेक बिकट प्रसंग येतात..संकटे येतात..कधी जवळचे ..आई वडील किंवा आप्तेष्ट यांचं आपल्यापासून दुरावणे असेल तर कधी मृत्यू सारखी अटळ गोष्ट त्या क्षणी आपण खूप एकाकी पडतो .लहान वयात असेल तर आपला भक्कम आधार मग मानसिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या दोन्ही बाजूने , अर्थानं ढासळतो..अशा प्रसंगी आपण काही क्षण तिथेच थांबतो परंतु परत आपण वेगवेगळे पर्याय ., मार्ग शोधतो आणि स्वतः च्या पायावर उभे राहतो .

असेच अचानक व्यवसायात नुकसान असेल किंवा नोकरी जाणे असेल किंवा एखादा अपघात असेल तरी आपण त्यातून उभे राहतो ..कारण येणारी संकटे प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव देत असतात आणि हेच अनुभव आपल्याला प्रत्येकवेळी उभे राहण्यास मदत करतात .आपल्यात जिद्द निर्माण करतात.

असेच एक उदाहरण आपल्याला सर्व प्रसंगाना तोंड कसे द्यायचे , जिद्द कशी बाळगायची, आणि येणाऱ्या संकटांवर मात करून पुढे कसे जात राहायचे हे शिकविते.

लहानपणी जोकोविचचे आई बाबा रिसॉर्टवर काम करायचे. टेनिस महागडा खेळ असल्याने त्यांना कोर्टची फी परवडण शक्यच नव्हतं. तेंव्हा लहानसा नोवाक तिथं वेटरचं काम करून टीपच्या बदल्यात तिथे आलेल्या पर्यटकांकडून रिसॉर्टवर दोन तास टेनिस खेळायचा सौदा करायचा. आज जगजेत्ता बनलेल्या जोकोविचने स्वतः कडे पैसे येताच सर्बिया मध्ये मोफत ३० टेनिस कोर्ट्सचं संकुल उभारलं आहे, जिथे कुणालाही पैसे न देता खेळता येतं! नोवाक जोकोविच.

यंदाचं विम्बल्डन जिंकणारा हाच तो जगज्जेता. एकदाच नाही, सहावेळा जिंकलंय त्यानं विम्बल्डन. ३४ हे वय जिथं म्हातारं मानलं जातं, त्या टेनिसच्या मैदानावर जोकोविच आजही अजिंक्य ठरला.

*प्रचंड मनोनिग्रह, कणखर शरीर, कमाल मुत्सद्देगिरी, विलक्षण जोश आणि बर्फासारखी संयमी शांतता या बळावर जोकोविच जिंकला. कितीही ताण येवो, कितीही कठीण परिस्थिती असो, तो जराही डगमगत नाही. त्याची एकाग्रता भंगत नाही. आणि, समजा एखादा अगदी मानहानीकारक पराभव झाला तरी तो हलत नाही.*

म्हणून तर, एक ना दोन, आजवर वीस ग्रॅंडस्लॅम सामने जिंकलेत या पठ्ठ्याने.

जोकोविच नक्की काय करतो? तो संयमानं खेळतो. चुका करत नाही. स्पर्धकाला चुका करायला भाग पाडतो. घाई करत नाही. गोंधळून जात नाही. संधीची वाट पाहातो. आणि, मग मात्र मागे वळून पाहात नाही. जिंकतोच तो.

आणि, हरतो तेव्हाही तो ‘जोकोविच’च असतो! जगातला नंबर एक टेनिसपटू तो उगाच नाही. सर्बियातला हा पोरगा. युद्धाच्या ढगांखाली रोज रात्री एकमेकांना बिलगून झोपणारी बाल्कन देशांमधली ही पोरं आज अशी अजिंक्य कशी ठरली?

*कशामुळं?*

*जोकोविचला विचारल्यावर तो म्हणाला, “द्वेष आणि हिंसा एवढी पाहिली की, त्यातलं फोलपण समजतं. युद्ध कोणी हरलं वा कोणी जिंकलं, तरी ते अर्थशून्य आहे, हे समजतं. मग संयम आणि मनोनिग्रह वाढतो. मन शांत होतं. जगण्यातलं भंगुरपण कळतं, तेव्हा एखाद्या साधुसारखे तुम्ही अविचल होता.”*

सततच्या युद्धामुळं असेल कदाचित, पण आपली माणसं एकमेकांच्या आणखी जवळ येतात. एकमेकांचे हात हातात घट्ट धरून रोजचं रणांगण लढू लागतात. त्यातनं मृत्यूची दहशत कमी होते आणि जगण्याची असोशी वाढते. मारण्याची इच्छा संपते आणि जगण्यावरची निष्ठा वाढते. जगण्याचे खरे मोलही समजते.

माझ्यावर आभाळ कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहीन मी, अशी विजिगिषु वृत्ती मग अंगी येते.

*मन, मेंदू, मनगट अशा एकात्म भावनेनं झुंजता, तेव्हा जय-पराजयाच्या पल्याड जाता तुम्ही. झुंज नव्हेच. साधना असते मग ती.*
*मग, जिंकण्याशिवाय काही पर्यायच राहात नाही!*

आध्यात्मिक माणसं ही अशी असतात. जगणं कळलेली माणसं अशी असतात. ती निकालाच्या, फळाच्या पलिकडं जातात. पण, म्हणून लढणं सोडत नाहीत. कर्म करणं थांबवत नाहीत. उलटपक्षी, अशी झुंज देतात की ती कधीचीच जिंकलेली असतात!

विखार वा विद्वेष यानं झपाटून एखादा सामना तुम्ही जिंकू शकालही कदाचित, *पण सौहार्द, संयम आणि अशी उच्च कोटीची शांतता असल्याखेरीज तुम्ही जगज्जेते नाही होऊ शकत!*

जोकोविच म्हणून जिंकू शकतो, कदाचित. हे ज्वलंत उदाहरण ..आपल्या प्रत्येक व्यक्ती बाबत आयुष्यात असे कठीण प्रसंग , संकटं येत असतात आणि आपल्याला कणखर बनवीत असतात.आपला संयम आणि मनोनिग्रह वाढवीत असतात.जेव्हा आपल्याकडे  पर्याय च नसतात तेव्हा त्यावर मात करून विजय मिळविणे हीच गोष्ट आणि हाच एकमेव मार्ग असतो.

साक्षात दत्तगुरु महाराजांनी त्यांचे २४ गुरू केले होते. १. सूर्य २. पृथ्वी.३. वायू ४. कबुतर.५. पिंगला वेश्या ६.मृग ७. समुद्र ८. पतंगा ९.हत्ती.१०.आकाश ११ . पाणी.१२. मधमाशी १३.मत्स्य १४. बालक १५ . टिटवी १६.अग्नी १७ चंद्र १८. कुमारिका १९.साप २०. भ्रमरकिट  २१. कोळी .२२. भुंगा. २३.भ्रमर २४.अजगर

या प्रत्येकाकडून ते काही ना काही शिकले होते.डोळस वृत्ती ठेवली तर प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकता येते..
सगळी चोवीस उदाहरणे देत नाही त्यातली काही मोजकी देते जसे की..

१. समुद्र- समुद्रच्या लाटा निरंतर गतिशील असतात, तसेच जीवनातील चढ- उतारात आम्हाला खूश आणि गतिशील राहायला हवे.

२. मधमाशी– मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवून त्यात मध साठवते परंतू एक दिवस मधुहा अचानक येऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. याने शिक्षा मिळते की आवश्यकतेहून अधिक संचय करणे योग्य नाही.

३.अग्नी- परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीत स्वत:ला समायोजित करणे योग्य ठरतं.

४.कुमारिका- देवाने बघितले की एकदा एक कुमारिका धान्य कुटत होती. तेव्हा तिच्या हातात असलेल्या बांगड्यांच्या आवाजामुळे बाहेर बसलेले पाहुणे परेशान होत होते. बांगड्यांचा आवाज बंद करण्यासाठी तिच्या बांगड्या फोडून दिल्या गेल्या आणि दोन्ही हातात केवळ एक-एक बांगडी राहू दिली. नंतर कुमारिकेने आवाज केल्याविना धान्य कुटून घेतले अर्थात आम्हालाही एका बांगडीप्रमाणे एकटे आणि निरंतर वाढत राहण्याची प्रवृत्तीसह जगायला हवं.

५.तीर तयार करणारा कारागीर- दत्त देवाने एक असा तीर बनवणारा बघितला जो आपल्या कामात एवढा मग्न होता की त्याच्या जवळून राजाची स्वारी निघून गेली तरी त्याचे कामावरून लक्ष वेधीत झाले नाही. अत: आम्हाला अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करावे.

इथे दत्त महारांच्या गुरूंचा उल्लेख एवढ्याच करिता केला कारण जो श्लोक आपण गुरू पौर्णिमेला म्हणतो..गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: !!🙏🌹 यातले ब्रह्मा , विष्णू, महेश्वर म्हणजे साक्षात श्री दत्तगुरु 🙏🌹
म्हणूनच म्हणते की आयुष्यात येणारी संकटे आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टी , सभोवतालचे वातावरण हेच आपले गुरू आहे 🙏🌹

🙏🌹गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌹


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!