त्याला अजूनही माझा भूतकाळ माहित नाही, तो मला स्वीकारेल ना ?
सौ. शमिका विवेक पाटील
अभिनंदन अरुंधती आणि मोहन, दोघांचा जोडा अगदी छान शोभतोय, made for each other, सगळीकडून अभिनंदनाचे फोन येत होते. शुभेच्छांचा वर्षाव दोघांवर होत होता. साखरपुड्याची तसेच लग्नाची तारीख फायनल करण्यासाठी छोटेसे गेटटूगेदर ठेवण्यात आले होते. सगळीकडे कसे आनंदाचे वातावरण होते.
पण अरुंधतीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच घुसमट दिसत होती. तिचं कशात मन लागत नव्हतं. एक वेगळीच बेचैनी तिला जाणवत होती..एवढ्या सगळ्या माणसांच्या गर्दीत तिला एकटे एकटे वाटतं होते. कोणाला संशय नको म्हणून वर वर सगळ्यांशी हसत खेळत होती पण आतल्या आत ती कुठेतरी झुरत होती.
मोहन एका multi-national कंपनी मध्ये मॅनेजर होता, त्याचा मित्र परिवार खुप मोठा होता. सगळ्यांशी तो अगदी आवडीने अरुंधतीसोबत ओळख करून देत होता. माझी होणारी बायको असे जोरजोरात बोलून दाखवत होता. मात्र तिला हे सर्व कधी थांबतेय असे झाले होते.
अरुंधती आणि मोहन ह्यांचे घरच्यांच्या पसंतीने लग्न ठरवण्यात आले होते. म्हणजेच अरेंज मॅरेज होते. आधी पत्रिका जुळल्या आणि नंतर मनं. पण खरंच दोघांचा जोडा अगदी परफेक्ट होता. दोघांमध्ये कमालीचा समजुद्दारपणा होता. तरीही अरुंधती मन मोकळे करायला का घाबरत होती. त्या दिवशी तिला काहीतरी सांगायचे होते पण हिम्मत होत नव्हती. मोहनचे मात्र बरोबर लक्ष होते तिच्याकडे.
पण लोकांसमोर उगीच तमाशा नको म्हणून तोही विषय टाळत होता. कार्यक्रम पार पडल्यावर उद्या सकाळी मला नेहमीच्या गार्डनला भेट असा मेसेज त्याने अरुंधतीला केला. अरे, आज तर एवढा वेळ एकत्र होतो परत उद्या कशाला? पुढल्या आठवड्यात भेटू असे बोलून तीने विषय टाळला. काहीतरी अर्जंट बोलायचं आहे, उद्या भेट म्हणून परत मेसेज केला. आता मात्र तिला नकार देणे कठीण गेले. ठीक आहे बोलून भेटण्याची वेळ ठरवण्यात आली.
गार्डनमध्ये सकाळच्या वेळी जास्त गर्दी नव्हती, पूर्ण शांतता होती, दोघेही एका बाकड्यावर बसतात, मोहन बॅग मधून एक गुलाबाचे फुल काढतो, आणि अरुंधतीच्या हातात देतो. देताना तिला अगदी रोमँटिकपणे लव यू सुध्दा बोलतो पण अरूच्या चेहऱ्यावर थोडे वेगळेच भाव येतात. ती थँक्यू बोलून स्मित हास्य देते.
तिचे दोन्ही हात हातात घेऊन, काय झालंय अरु ? गेले काही दिवस मी बघतोय, तुझं कशात मन नाहीय, काल सुध्दा पार्टी मध्ये तुझा चेहरा उतरलेला होता. तुला मी आवडतो ना ? तुझी ह्या लग्नाला संमती आहे ना ?तुला नसेल मी आवडतं तर खरं सांग आपण हे लग्न थांबवू पण जबरदस्ती म्हणून करू नकोस. प्लीज खरं काय ते सांग. तुला दुसरे कोणी आवडते का ?
मोहनचे प्रश्न ऐकून अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येते, प्लीज अरु रडू नकोस, i don’t want to hurt u… असे बोलून तिला रुमाल काढून देतो. तू खूप छान आहेस रे मोहन, कदाचित मीच त्या लायक नसेल. तुला माझ्याबद्दल काहीच माहीत नाहीय, जेव्हा सत्य समजेल तेव्हा तू सुध्दा माझा तिरस्कार करशील. नक्की काय सांगायचं आहे तुला अरु ? सविस्तर सांग, उशीर होण्या आधी आपण ह्यातून मार्ग काढू. धीर एकटवून अरुंधतीने भूतकाळात हात घातला.
कॉलेज मध्ये असताना माझं एका मुलासोबत प्रेम प्रकरण होतं. आम्ही पुढे जाऊन लग्न करणारं होतो. पण त्याची घरची परिस्थिती बेताची होती. म्हणून माझ्या घरच्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. आम्ही पळून लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण कुठेतरी माझे संस्कार आड आले आणि मी माघार घेतली.
पुढे कधीही न भेटण्याचे आम्ही ठरवले आणि घरातले सांगतील त्या मुलाशी लग्न करणारं असे मी त्याला सांगितले. त्यानेही माझ्या भावनांचा सन्मान करून मला अडवले नाही आणि तो खुप दूर निघून गेला माझ्या जीवनातून. मोहनने रुमालाची घडी घालत तिला विचारले, बरं मग आता पुढे काय ? मी काय मदत करू शकतो ? तुला परत त्याच्याकडे जायचे आहे का ?
अरे नाही मोहन, तुला चुकीचा समज होतोय, त्याचं कधीच लग्न झालंय. मला फक्त तुला माझा भूतकाळ सांगायचा होता. अरे देवा, कपाळावर हात मारून मोहन जोरजोरात हसतो…
अगं वेडा बाई, त्यात घाबरायचं काय ? तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ना, मग बस्.. मला तू खूप आवडतेस आणि आज ज्या प्रकारे व्यक्त झालीस त्यामुळे तुझ्याबद्दलचे प्रेम तर अजून वाढले आहे. मी मनापासून तुझ्या भावनेचा आदर करतो. तुझा भूतकाळ आपल्या भविष्यात कधीच आड येणारं नाही. मी तुला खूप प्रेम करीन. वचन देतो. अरुंधतीला खुप हायसे वाटते, आणि त्याच्या हातातून रुमाल काढते व घडी घालू लागते, तुला तर रूमालाची घडी पण घालता येत नाही. दोघांमध्ये हास्याची कळी उमलते.
कधी कधी आपण आपल्या भूतकाळाचा उगीच बाऊ करत असतो. काही गोष्टींना सोडून द्यायला शिकायला हवे. जोडीदार जर खरंच समजून घेणारा असेल तर हमखास मन मोकळे करा, पण गरज नसताना आपला भूतकाळ असा समोर मांडू नका. वेळेनुसार तुम्ही त्यातून बाहेर यालही पण समोरच्या व्यक्तीने जर मनाला लावून घेतले तर कठीण होऊन जाईल. म्हणून भूतकाळाला अती महत्त्व देऊ नका.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
समोरच्या व्यक्तीची तेवढी योग्यता असेल समजुन घेण्याची तरच सांगा, नाहीतर कायम संशयाच्या भोवऱ्यात राहावे लागेल.