Skip to content

लग्नाला १० वर्षे झालीत, तरी दोघांमध्ये कोणतेच संबंध नाहीत!!!

लग्नाला १० वर्षे झालीत, तरी दोघांमध्ये कोणतेच संबंध नाहीत!!!


सौ. शमिका विवेक पाटील


मयुरी आज खुप खुश होती. तिच्या लग्नाचा १० वा वाढदिवस होता. नवऱ्याला सरप्राइज द्यायचं म्हणून घरीच सगळा बेत आखला. इतर दिवशी पूर्ण परिवार सोबत असतो पण आज तिला फक्त एकांत हवा होता, ती आणि सागर ह्याशिवाय तिला घरात दुसरे कोणीच नको हवे होते. सगळ्यांच्या मदतीने तिने मस्त कँडल लाईट डिनर प्लॅन केला पण घरच्या घरीच.

मस्त बेडरूम मध्ये व्हाइट बेडशीट त्यावर गुलाबाच्या पाकळ्या, मोगऱ्याचा सुगंध देणारे रूम फ्रेशनर, मेणबत्तीचा तो मंद मंद प्रकाश, बेडरूमच्या खिडकीतून येणारी हवेची झुळूक आणि मध्येच वाजणारी बांगड्यांची किणकिण… सगळं किती परफेक्ट होतं. दरवाज्याची बेल वाजते. सागरला बघून मयुरी गालातल्या गालात हसते आणि हातातली बॅग घेऊन आत जाते. सागर जसा रूम मध्ये प्रवेश करतो तेच त्याचा मूड एकदम फ्रेश होऊन जातो.

लाल रंगाची शिफॉन साडी त्यावर मोकळे केस, कमरेला नाजूक साखळी, अन् हातात हिरवा चुडा जणू काही नववधू. तिच्या चेहऱ्यावरील तेज सागरला अजूनच घायाळ करते. तिच्या मोहक रुपाची सागर तोंडभरून स्तुती करतो, गप्पांच्या ओघात जवळीक साधणारे क्षण येतात, मयुरी सागरचा हात घट्ट पकडून ठेवते आणि मिठी मारणार तोच सागर विषय बदलून तिथून निघून जातो.

मयुरीला त्याचा दुर्लक्षितपणा लक्षात येतो. ती पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. तेव्हाही तो तिचा हात झटकून बाजूला होतो. डोळे पुसत मयुरी जेवणाची तयारी करायला घेते, जेवण झाल्यावर ती त्याला बेडरुम मध्ये घेऊन जाते, आणि तिथले दृश्य बघून तो पुरता पाघळतो. आता मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होणारं हे मयुरीच्या लक्षात येते.

सागर रूम न्याहाळत असताना ती पाठीमागून घट्ट मिठी मारते, आता कसा सोडून जाणारं तू ? असा खोडकर प्रश्न त्याला विचारते. सागरला घाम फुटतो आणि जोरात तिच्यावर ओरडतो. स्टॉप इट मयुरी, दिवसभर कामाचे खुप लोड होते सो मला आज थकायला झालंय. मी झोपतो. तुझं आवरलं की आराम कर आणि हो, औषधं घ्यायला विसरू नकोस. मयुरीकडे पाठ करून तो झोपी जातो. मात्र मयुरी अजूनही त्याच मूड मध्ये असते, ती त्याला उठवण्याचा खोडकर प्रयत्न करते तरीहि सागर काही हलत नाही. उलट अजूनच डोक्यावर चादर घेऊन झोपायचे सोंग करतो.

इथे मयुरी आता बैचेन होते, एका बाजूला बडबड सुरु करते, तुझ्या जीवनात कोणीतरी दुसरी असेल म्हणून तुला माझ्यात इंटरेस्ट नाहीय, दुसरीकडे तोंड मारत असशील मग माझी गरज कशी वाटेल आता, किती वर्ष झाली मी हे सहन करतेय, आधी वाटायचे आपलं नातं मुरण्यासाठी तू वेळ देत आहेस पण एवढी वर्ष झाली त्या प्रसंगानंतर तू मला जवळ सुध्दा केली नाहीस, सागर उठ, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच्या आत्ता दे नाहीतर उद्या मी माझ्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करीन.

माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुला समजत कसं नाहीय, मला तू सर्वांगाने माझा म्हणून हवा आहेस, नुसते मिठीत घेऊन झोपवतोस रोज पण त्या पलीकडेही माझ्या काही इच्छा असतील ना. मयुरीच्या बोलण्याकडे तो पुरता दुर्लक्ष करतो, मला झोप आली आहे प्लीज आपण उद्या काय ते बोलू. डोकं ऑलरेडी खुप दुखतंय. दुखुदेत डोकं, फुटलं तरी चालेल पण आज काय ते मला खरं सांग. कोण दुसरी असेल तुझ्या जीवनात तर स्पष्टपणे बोल. मी नाही मध्ये येणारं. पुन्हा तिची ती बडबड सुरु करते.

वैतागून सागर उठतो आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. माझे राणी, तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कोणीच नाहीय. तू नको ते विचार डोक्यात नको आणुस. झोप शांत. ये अशी माझ्या बाजूला. तिची समजूत काढतो, औषध देऊन लाडाने झोपवण्याचा प्रयत्न करतो. तिला गाढ झोप लागते. तिच्या अंगावर चादर ओढून तो खिडकीत जातो आणि सिगरेट पेटवून तो दिवस आठवू लागतो.

लग्न होऊन ५ वर्षांनी मयुरी आई होणारं होती, एखादया नवसाची पुण्याई बोलावी लागेल. सगळे खुश होते, पण दैवाची इच्छा काही निराळीच असते, ७ व्या महिन्यात मयुरीला कळा सुरु झाल्या आणि काळाने घात केला. मयुरीने मृत बाळाला जन्म दिला. तिची शारिरीक परिस्थिती अत्यंत नाजुक झाली होती, मरणाच्या दारातून तिचा दुसरा जन्म झाला होता.

मात्र डॉक्टरांनी बजावले की मयुरीला कोणताही मानसिक धक्का बसत कामा नये अन्यथा तीचे मानसिक संतुलन बिघडू शकते. तसेच तिच्या गर्भाशयाला खुप दुखापत झाली आहे, ती पुन्हा जर आई बनत असेल तर तिच्या जीवाला धोका आहे, शरीर संबंध ठेवताना सुध्दा तिच्या गर्भाशयाला ईजा पोहचू शकते त्यामूळे तीचे जीवन आता तुमच्या हातात आहे, एवढे बोलून डॉक्टर सागरला धीर देतात.

सागरने मन खंबीर करून पुढच्या वाटचालीस सुरुवात केली. त्या क्षणापासून ते आज पर्यंत त्याने मयुरीला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. घरच्यांनी दुसरं लग्न कर म्हणून खुप जबरदस्ती केली तरीही त्याने मयुरीची साथ सोडली नाही. औषधं घेतली की मयुरीला गाढ झोप लागते, त्यामुळे आदल्या रात्रीचा विसर तिला सहज पडतो. मी जी कहाणी बनवून सांगतो ह्यावर ती विश्वास ठेवते, बऱ्याचदा तिला शंका येते पण लडिवाळपणे तिची समजूत काढता येते. आता उद्याही उठल्यावर मी जेव्हा हसत तिला मिठीत घेईन तेव्हा तिला रात्रीचा विसर नक्कीच पडला असेल. ती मानसिक रुग्ण समाजासाठी आहे पण माझ्यासाठी ती माझी पत्नी आहे. जिच्या फक्त असण्यावर मी मनापासून प्रेम करतो.

आपल्या समाजालासुध्दा सागर सारख्या निस्सीम प्रेम करणाऱ्या पुरुषाची गरज आहे. पत्नी फक्त शारिरीक सुख किंवा वंशाला दिवा देऊ शकते, ह्या असल्या बुरसट विचारांचा नायनाट केला पाहिजे. ती सुध्दा एक भगवंताने बनवलेली कलाकृती आहे. तिचा आदर करा, तिला जपा…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “लग्नाला १० वर्षे झालीत, तरी दोघांमध्ये कोणतेच संबंध नाहीत!!!”

  1. Really nice thought … I want you to give some guidance on gay but married …its difficult for that men to control his emotions how to deal the situation

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!