Skip to content

‘ती’ला ही बोलायचंय आणि ‘त्या’ला ही…पण मग सुरुवात कोण करणार ???

चुकतंय कुठं ?


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


आज तिला त्याचं बोलणं काहीसं खटकलं. तिनेही त्याच्या बऱ्याचश्या कुरापती मनात साठवून ठेवल्या होत्या. तो आंघोळ करून बाहेर आला. तिची ८.३४ ची रेल्वे पकडण्याची घाई नेहमीप्रमाणे. तरीसुद्धा त्या घाईत ती त्याला टिळा लावल्याशिवाय घराबाहेर पडत नसे. पण आज दोघांच्याही मनात काही वेगळीच अस्वस्थता होती. दोघेही अबोल झाले होते. इतके अबोल की, टिळा न लावता ती निघून गेली आणि तोही टिळा लावण्यासाठी पुढे आला नव्हता. यातून दोघेही बहुधा एकमेकांकडे बोट दाखवून ‘चूक तुझीच आहे…तू पुढाकार घे’ असे जणू अप्रत्यक्ष सांगत असावेत.

घरापासून ते स्टेशनपर्यंत आज खूप लवकर पोहोचले असे तिला वाटत होते. कारण मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला होता. रस्त्यावरून येताना भान हरवलं होतं तिचं, दोनवेळा तर समोरून येणाऱ्या व्यक्तींना धडकली होती ती. तो सुद्धा काहीवेळेनंतर ऑफीससाठी निघाला. तेथे पोहोचल्यानंतर समजले की, ऑफीसच्या चाव्या घरातच विसरलो. तिने तयार केलेला डब्बा मात्र सोबतच होता. दोघांचेही मन काही रमेना. जसजशी वेळ सरत होती तसे आता मात्र दोघांनाही कळून चुकले होते की, आपल्या संसारासमोर हा प्रसंग फार क्षुल्लक आहे.

शेवटी राहून राहून तिने त्याला मिसकॉल सोडला जेणेकरून त्याचा फोन आला तर आपण पुढाकार घेऊया. हे तिने मनाशी ठरवले. त्याने तिचा मिसकॉल पाहीला आणि त्यानेही ठरवले की तिचा फोन आला तर आपण पुढाकार घेऊया. तिने त्याच्या फोनची अर्धा तास वाट पाहीली, हीच स्थिती त्याची सुद्धा होती. शेवटी त्याने तिला सलग ३ वेळा फोन केला, ती दुसऱ्या कॉल वर बोलत होती. ती फोन मध्येच कट करून त्याच्याशी बोलुही शकत नव्हती. कारण 3 वाजताच्या महत्वाच्या मिटिंग साठी ती कंपनीच्या बॉस शी बोलत होती. तिचे बोलणे झाल्यावर तिने लगेच त्याला फोन केला. त्याने फोन उचलला. हॅलो बोलून दोघेही शांत झाले. कारण त्याच्या दृष्टीने बॉल आता तिच्या कोर्टात होता, तिने सुरुवात करावी असे त्याला वाटत होते. परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत होती. पण त्या शांततेचा जसा वेळ वाढत होता, तसा त्याचा अर्थ बदलत होता. तो फाटकन उत्तरला, “काही नाही, घराची चावी शेजारी ठेवली आहे, एवढंच, चल बिझी आहे”. असे बोलून त्याने कट केला. आता त्याच्या रागाबरोबर तिचाही पारा चढला. आणि दोघांच्याही मनातला तणाव आणखीन वाढला.

त्यातून समस्या सुटण्यापेक्षा अजून वाढताहेत हे दोघांनाही मात्र कळत होते. परंतु एकमेकांसाठी एकमेकांनी पुढाकार म्हणून केलेले प्रयत्न याबद्दल दोघेही अनभिज्ञ होते. मलाच संसार टिकवण्याची गरज आहे की काय, या भ्रमाने बाजू अजून भक्कम केली.

आणि हाच भ्रम कित्येक संसार उध्वस्त करीत आहे.

सांगा मग तर…………………….

चुकतंय कुठं !!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

7 thoughts on “‘ती’ला ही बोलायचंय आणि ‘त्या’ला ही…पण मग सुरुवात कोण करणार ???”

  1. Dnyandeo चव्हाण

    आमचं तर नेहमीच आहे … मला तर माझीच स्टोरी वाटली.. पण हे तर सगळीकडेच आहे.. पण कथानक एकदम छान

  2. Vilas Ashok Jadhav

    अतिशय सद्यस्थितीतील उदाहरण.
    सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात हे चित्र दिसत. दोघानांही समजत असत बोलन गरजेच आहे मात्र Ego मधे येतो.
    खुप सुंदर लेख

  3. हे किरकोळ आहे. शिकलेल्या जोडप्याने अहंकार बाजूला ठेवून बोलणं गरजेचं आहे. संवाद हाच महत्वाचा दुवा आहे. माझ्याकडे बायको डायरेक्ट सासूला आणते. लग्न कोणाबरोबर केलंय हेच कळत नाही.
    संसारात संयम, सहनशीलता, आदर आणि विश्वास या गोष्टी खूप महत्वाच्या असतात.

  4. Balasaheb sapate

    माणसाने भावना व्यक्त करणे खूप गरजेचे आहे. पण त्याला/तिला वाटते की समोरच्याला काय वाटेल त्याची/तिची काय इच्छा आहे. हे कळण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे आहे पण इथेच तो चुकतो म्हणुन फसतो.

  5. Navnath N Lahire

    Actually we have to have empathy for other person and try to understand their viewpoint and take things positively instead of taking negative meanings of their actions and deeds.

  6. अशीच काही स्तीती आहे आमच्याकडे सुद्धा खूप मार्मिक आहे हे ………

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!