Skip to content

कितीही मोठे प्रसंग आले तरी सारखं तक्रार करत बसू नका.

कितीही मोठे प्रसंग आले तरी सारखं तक्रार करत बसू नका.


सोनाली जे


बालपणी आपल्या सर्वांचे बऱ्यापैकी कोड कौतुक .. लाड झालेले असतात..आपल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टी पर्यंत काळजी घेणारे, आपल्याला हवे नको ते बघणारे, आर्थिक गरजा असतील, मानसिक किंवा शैक्षणिक गरजा असतील तरी सर्व मनापासून आणि तक्रार न करता आपले आई वडील आपल्या करिता रात्रंदिवस करीत असतात.. झटत असतात..किंवा अगदी आजारी असू तरी तत्परतेने डॉक्टरांकडे घेवून जाणे , औषधे आणून ती वेळेत देणे शिवाय योग्य खाणे पिण बघणे हे सगळे विना तक्रार करीत असतात.

आपण मात्र सतत छोट्या मोठ्या तक्रारी करीतच असतो ..कधी नवीन पेन्सिल..पेन किंवा इतर गोष्टी कधी खावू, कधी कपडे, सायकल, मोठे होत जावू तसे मोबाईल, लॅपटॉप, गाडी, दुचाकी असेल किंवा चार चाकी , पैसे, घड्याळ अशा एक नाही असंख्य गोष्टींची आपण सतत मागणी करीत असतो..कोणी काही नवीन घेतले आपल्याकडे नसले की लगेच ते आपल्याला पाहिजे असते. आणि ही मागणी पूर्ण केली नाही की आपली सतत तक्रार सुरू असते..हेच पाहिजे तेच पाहिजे..किती ही केले तरी समाधान नसतेच…तरी हे केले नाही ते केले नाही म्हणून तक्रार च असते..

तरी ही आपल्या मुलांच्या आनंद आणि त्यांची प्रगती याकरिता गरीब असो , मध्यम वर्गीय असो किंवा श्रीमंत पालक वर्ग हे सगळे विनातक्रार पूर्ण करीत असतात .आई वडिलांना नेहमीच असे वाटते आपल्या वाटेला जे कष्ट करावे लागले ते मुलांना नको म्हणून किंवा अनेकवेळा आपल्याला जे मिळविण्यासाठी कष्ट करावे लागले असे कष्ट मुलांना पडायला नकोत म्हणून ते मुलांना सहज उपलब्ध करून देत असतात ..तसेच आपल्या लहानपणी न मिळालेल्या गोष्टीही ते मुलांना अनेक गोष्टी उपलब्ध करून देत असतात.

आपण मोठे होवू लागतो शिक्षण पूर्ण करीत असताना ही आपले पालुपद ..तक्रार चालूच असते की हाच विषय आवडत नाही हे शिक्षक च आवडत नाहीत..शिकवत च नाहीत .. मग हा class नको तो लावू तो नको दुसरा..असे असंख्य तक्रारी चालूच असतात..मग नोकरी करिता प्रयत्न आवडीची पाहिजे सहज जमणारी पाहिजे, वेळ योग्य पाहिजे अशा त्यातही तक्रारी ..लग्न करताना मुलगी किंवा मुलगा बघताना तक्रारी..अशीच तशीच..झाल्यावर ही काहीं ना काही तक्रारी चालूच असतात.

प्रत्येकाचे आयुष्य हे कधीच सरळ नसते…आपल्या लाईफ लाईन मध्ये चढ उतार नसतील तर माणूस जिवंत नाही हे लक्षण आहे तसेच आहे सगळेच आयुष्य सुरळीत असेल जसे सगळ्याची एकच चव तर आयुष्य बेचव होवून जाईल..कधी तिखट, कधी खारट , कधी आंबट तर कधी गोड चव आपल्याला ही उत्साह देते…तसे छोटे मोठे प्रसंग आयुष्यात घडतच असतात..छोट्या प्रसंगाना आपण खूप सहज तोंड देत असतो..

आयुष्यात काही वेळेस मोठे प्रसंग ही येतात…अगदी आपली नोकरी जाईल, आई वडिलांचा आधार कायमचा गमावतो..आपला पार्टनर कधी कायमचा दूर निघून जातो …घटस्फोट असेल किंवा कामानिमत्त किंवा जीवघेण्या आजारातून मृत्यू..कधी जवळचे आप्तेष्ट असतील किंवा अगदी मुले… किंवा व्यवसायात आर्थिक नुकसान असेल..शारीरिक अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन ..दुर्धर आजार ..

कोणत्याही मोठ्या प्रसंगात डगमगून जावू नका..किंवा सतत तक्रारी करू नका..याउलट परत एकदा सांगेन आनंद , मुन्नाभाई M.B.BS. , डियर जिंदगी , खुबसुरत नवीन असेल किंवा जुना हे सिनेमे जरूर बघा ..

यात आनंद सिनेमा मध्ये तर आनंद कॅन्सर सारख्या आजाराचा रुग्ण आणि तरी ही म्हणतो मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चूने सपने सुरीले अपने…
जिंदगी कैसी ये पेहेली हाये…कभी तो हसाये कभी ये रुलाये…

बघा ना जेव्हा खूप आनंदात असतो तेव्हा कोणाला कसली तक्रार असते का?? नाही ना?? नवीन दिवस उजाडतो तो आपण बघतो..पण अशी ही काही लोकं आहेत की तो नवीन दिवस बघूच शकत नाहीत ..मग आपण किती नशीबवान आहोत की रात्री झोपून उठल्यावर सकाळी डोळे उघडुन आपण परत नवीन दिवस जगायला मिळतो आहे…आपल्याकडे कोणती कमी आहे सगळे तर आहे दोन डोळे, नाक, दोन कान , हात पाय सगळे धड, कोणतीच शारीरिक कमतरता नाही किंवा कोणतेच मानसिक व्यंग ही नाही…ज्यांच्याकडे हात पाय नाहीत ते ही जगण्याची किती धडपड करतात ..

अरूनीमा सिन्हा. यांचे उदाहरण बघितले तर त्यांची प्रचंड जिद्द लक्षात येईल, कोणतीच गोष्ट अशक्य नसते .एवढा मोठा प्रसंग घडल्या पण कुठेही तक्रार नाही, डळमळीत झाल्या नाहीत.आले त्यांनी कृत्रिम पाय असून त्रास होत असूनही कुठे त्रासिक नाही,आणि सामान्य, सुदृढ लोकांनाही अवघड वाटणारे माउंट एव्हरेस्ट सारखे शिखर सर केले..असे आदर्श असताना आपण आपलेच प्रसंग कसे मोठे आणि त्यावर मात करायचे सोडून तक्रार करत बसतो…

गोर गरीब मुले किती छोट्या गोष्टीत आनंदी असतात..कुठे टायर मिळाले तरी त्यावरून आनंदाने घसरत जातील जणू काही चारचाकी चालवीत असल्याचा आनंदच जणू.. आपण कायम आपल्याकडे जे नाही त्याचाच विचार जास्त करत असतो आणि ते नाही म्हणून दुःख करीत असतो पण आपण कायम हे विसरतो की आपल्याकडे खूप काही चांगल्या गोष्टी आहेत त्या कधी लक्षातच घेत नाही.. हात नसणारे ही पायाने सुंदर ड्रॉइंग करतात.

तर डोळ्याने आंधळे असतील तरी मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारे असतातच की ..माझी च मैत्रीण शिल्पा मैंदर्गी डोळ्याने दिसत नसून ही नृत्य विशारद आहे…तिने तिच्या व्यंगावर ही मात केली च ना …मग आपण सगळे असून एवढं काही रूटीन बाहेर गेले काही मनाविरुद्ध झाले की आभाळ च कोसळले असा मनोग्रह करून त्रास, तक्रारी करत राहतो..

जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा.. कोणत्याही प्रसंगी खचून न जाता. मीच का , मलाच का असे, माझ्याच बाबतीत का असे अशा तक्रारी सोडून द्या…आपल्याला प्रत्येक गोष्ट अनुभव देवून जात असते आणि अनुभवातून शहणपन येते म्हणतात..तसे प्रत्येक गोष्ट अनुभव म्हणून बघा त्या परिस्थिती शी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत खंबीरपणे तोंड द्या..उभे रहा..सामना करा…तक्रारी ते करतात जे कमजोर असतात..तुम्ही कमजोर राहू नका..उलट येणारा प्रत्येक प्रसंग मला नवीन काही तरी शिकवीत आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा..ही अजून नवीन संधी मिळाली स्वतः ला सिध्द करण्याची असेच समजा..

आहे ह्या क्षणाचे सुख ज्याला घेता येते तो खरा यशस्वी समजा…भले दुःखात ही जो सुख मानतो..जसे की accident झाला हात पाय गमावला परंतु पुढचे आयुष्य जगायला..नवीन अनुभव घ्यायला , अजून सुंदर गोष्टी करायला , बघायला आपण जीवंत आहोत ही मोठी देणगी समजणारे ही आहेत . जीवंत असलो तर काहीही करू शकतो..कोणतीही परिस्थिती बदलू शकतो यावर विश्वास ठेवा..स्वतः: वर विश्वास ठेवा.

आयुष्य खूप सुंदर आहे..भरभरून जगा.. जन्म आणि मृत्यू यातला प्रवास म्हणजे जगणे..जीवन..जन्म झाला म्हणजे मृत्यू निश्चित , कोणी चिरंजीवी राहणार नाही..पण कधी तरी मरणारच म्हणून जगण्याची आशाच सोडायची हे चुकीचे उलट फुलपाखरांचे जीवन अल्पायुषी असून ते जसे भरभरून जगतात तसे भरभरून जगा.. येणारा कोणताही प्रसंग छोटा असेल मोठा शांत , संयमी वृत्ती ठेवा..त्याक्षणी मार्ग सुचला नाही तर थोडा वेळ घ्या..शांतपणे विचार करा..मार्ग निवडा..प्लॅन A, B ,C तयार ठेवा..

गृहिणी सतत घरचे स्वैपाक, मुलांचे , नवऱ्याचे, सासू सासरे , दिर जावू, नणंद , भाचे ,भाची, पुतण्या पुतणी यांचे करतच असते..किंवा कधी माहेरच्या ही लोकांचे .तिने जर शांतपणे स्वैपाक केला तर सर्वांच्या अंगाला लागेल या उलट सतत तक्रार करत केले तरी कोणाच्या अंगाला ते लागणार नाही, इतरांची आणि तिची होणारी चिडचिड ही वेगळीच..
जेवढी आनंदी , हसतखेळत उत्साही राहून करेल तेवढ्याच उत्साहात घरचे ही मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवून राहतील ना..

पुढचा जन्म वगैरे माहिती नाही पण हे जे आयुष्य नशिबाने मिळालं आहे ते मनापासून जगा, सगळ्या प्रसंगाना हसत खेळत , विना तक्रार तोंड द्या आणि मग बघा स्वर्गसुख च ..
अगदी देव म्हणतो , मानतो तर मग पांडवांचा वनवास तरी कुठे चुकला ? त्यांची चूक नसताना ही कोणती ही तक्रार न करता वनवास भोगलाच ना..त्यातही किती सकारात्मक गोष्टी घडल्या त्यांच्याकडून .. साक्षात श्रीराम वनवासात गेले का..

कायम स्वतः पुरता विचार करणे सोडून दिले पाहिजे ..स्वार्थी वृत्ती आपल्या अपयशाला कारणीभूत ठरते तशी ती आपल्याला कायमच वखवखलेल्या अवस्थेत ठेवते..किंवा प्रसंगाना तोंड देण्याची ताकद नसेल तर तो कमकुवतपणा दूर करून , आपल्यातलं कोणत्या उणीवा आहेत यावर तक्रार करण्या ऐवजी मात करा..

बघा खूप धडपड केल्यावर , कोणतीच तक्रार न करता केलेली गोष्ट किती आत्मिक समाधान देवून जाते आणि मानसिक स्वास्थ्य ही..नाही तर सतत चिंता , काळजी याने मानसिक दृष्ट्या त्रस्त राहू..प्रत्येक गोष्टीला धैर्याने ..संयमाने तोंड द्यायला शिका तक्रारी करून पळपुटेपणा करू नका यात.तुम्ही तुमचीच संधी गमवून बसता ..

तसे करू नका…मुक्तपणे , स्वच्छंदपणे जगा..आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “कितीही मोठे प्रसंग आले तरी सारखं तक्रार करत बसू नका.”

  1. खुपच छान लेख आहे . वाचून खूप समाधान झाले . यातून एकाच म्हणावेसे वाटते मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. खूप छान लेख.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!