त्या दोघींना एकमेकांविषयी भलतंच आकर्षण निर्माण झालं!!
सौ. शमिका विवेक पाटील
श्रेया आणि दीपा अगदी बालमैत्रिणी, एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्याने दोघांमध्ये कमालीची मैत्री होती. एकत्र शाळेत जाणं, घरी आल्यावर अभ्यास सोबत करणं, कधी कधी गप्पा मारत एकमेकींकडे झोपून जाणं, आवडी निवडी सुध्दा सारख्याच, इतकचं काय तर बऱ्याचदा दोघींचे कपडे सुध्दा सारखे असायचे. बघणाऱ्याला वाटे दोघी सख्ख्या बहिणीच जणू.
भातुकलीच्या खेळापासून सुरु झालेला प्रवास तारुण्याच्या वाटेवर अजून बहरला. दोघींनी एकाच कॉलेज मध्ये एडमिशन घेतले. नवीन मित्र मैत्रिणी जीवनात आले पण ह्या दोघींना कोणीच वेगळे करू शकले नाही. कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षाला असताना श्रेयाला एक मुलगा आवडू लागतो. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु होते. मुलगा मॉडर्न असल्याने त्याच्या आवडी निवडी सुध्दा तशाच असतात.
मित्रांसोबत फिरणे, ड्रिंक्स, लेक्चर बंक करणे हे सगळे रोजचेच असते. श्रेया ह्या सर्वाला भाळते. तिला ह्या नवीन वाटणाऱ्या गोष्टींची सवय होते. ती सुध्दा लेक्चर बंक करणे, रात्री उशिरा पर्यंत दीपाच्या नावाने घराबाहेर थांबणे, हे रोजचेच होते. दीपाचा ह्यावर काहीच विरोध नव्हता, मात्र तिला काळजी होती की श्रेयाच्या हातून काही वाईट घडणारं नाही ह्याची.
एकदा रात्री मित्राकडे पार्टीच्या बहाण्याने तो मुलगा श्रेयाला घरी बोलवतो, ती नेहमी प्रमाणे दीपाचे नाव सांगून घराबाहेर पडते. तिथे गेल्यावर हिच्या लक्षात येते की ह्याचा काहीतरी वेगळंच करायचा हेतू आहे. त्याचे मित्र आणि तो दीपा वर कुत्र्यासारखे तुटून पडतात. स्वतःची इज्जत कशीबशी वाचवून ती घराबाहेर पडते, मात्र ओरबडल्याचे निशाण तिच्या हातावर तसेच असतात, घरी आल्यावर सर्व हकीकत ती दीपाला सांगते आणि तिला घट्ट मिठी मारून मन हलके करते.
त्या रात्री ती तिथेच झोपते, श्रेयाच्या मनात मुलांविषयी आता तिरस्कार निर्माण होऊ लागतो. दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये गेल्यावर सर्व मुलं तिच्यावर जोरजोरात हसतात हे पाहून तिला अजूनच गळून गेल्यासारखे होते, शरीरावरच्या जखमा बऱ्या होतात पण मनात कुठेतरी खोलवर घर करून जातात. घरी येऊन ती सर्व प्रकार आई वडिलांना सांगते. आपल्या मुलीने विश्वासात घेऊन आपल्याला सर्व सत्य सांगीतले म्हणून ते तिला साथ देतात आणि ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतात.
दीपा मात्र आता खुप एकटी पडते, तीची मैत्रिण सोडून जाणारं ह्या विचाराने ती अस्वस्थ होते. मात्र दूर असूनपण आपण भेटू आणि आपली मैत्री टिकवून ठेवू, असे आश्वासन दोघी एकमेकींना देतात. श्रेयाच्या बाबतीत जे झाले त्यानंतर तिचा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आजन्म लग्न न करण्याचा विचार ती करते आणि एकटीने आयुष्य जगायला सुरुवात करते. दीपा आपल्यापासून दूर आहे म्हणून मन सतत उदास होत असते, वेळ काढून ती महिन्यातून एकदा तरी तिला भेटायला जात असे.
शिक्षण पूर्ण करून दोघीपण नोकरी करू लागतात, श्रेया बिनधास्त स्वभावाची असल्यामुळे तिला बाहेर समाजात वावरणे सोपे होऊन जाते, वर्षभरात श्रेया स्वतःच्या हिमतीवर घर घेऊन एकटीने राहण्याचा निर्णय घेते मात्र दीपा थोडी शांत स्वभावाची असल्यामुळे तिला बाहेरील समाजाशी जुळवून घेणे थोडे कठीणच जात असे. इथे दिपाच्या लग्नाचे वारे वाहू लागतात. तिला चांगली चांगली स्थळं येऊ लागतात.
घरातले सांगतील त्या मुलाशी दीपा लग्न करते. आपली मुलगी चांगल्या घरात दिली म्हणून घरातले सुध्दा खुश असतात. मात्र जसे दिसते तसे नसते. ज्या मुलाशी दीपाचे लग्न लावुन दिले असते त्याच्या सवयी चांगल्या नव्हत्या. रोज रात्री मित्रांसोबत दारू, नशा कधी बाई असले नको ते नाद होते त्याचे. रात्री उशिरा दारु पिऊन आला की दिपाला मारहाण करीत असे. जर हे सर्व घरच्यांना सांगितले तर त्यांना सुध्दा मानसिक त्रास होईल म्हणून सर्व निमूटपणे ती सहन करीत होती.
बघता बघता दोन वर्ष गेली, दीपा आई होणारं होती, म्हणून घरातले सर्व खुश होते, मात्र दीपाच्या नवऱ्याला वंशाचा दिवा हवा होता त्यामुळे तिला तो सतत मानसिक त्रास देत असे. मुलगा झाला नाही तर माहेरी पाठवण्याची धमकी तिला देत असे. दीपा मात्र मूग गिळून गप्प बसून राही.
एक दिवस श्रेया दीपाला भेटायला तिच्या सासरी येते. दीपाला अशी धाकात वावरताना बघून श्रेयाची तळपायाची आग मस्तकात जाते आणि तिला सर्व सत्य परिस्थिती विचारते. घाबरत घाबरत दीपा सर्व हकीकत श्रेयाला सांगते. श्रेया क्षणाचाही विचार न करता सर्वांसमोर ती दीपाच्या नवऱ्याला कानाखाली वाजवते पुढे काहीच न बोलता तिला घेऊन निघून जाते.
दीपाला मात्र आता टेन्शन आले असते, की घरी जाऊन काय सांगणारं ? परंतू श्रेया तिला काही न विचारताच डायरेक्ट तिच्या राहत्या घरी घेऊन जाते. तिला पाणी प्यायला देते आणि जवळ घेऊन समजावते, हे सगळे पुरुष सारखेच असतात. तू कितीही मनाला समजावण्याचा प्रयत्न केलास तरी तुला आतून रोज मरण यातना देत राहणार. त्यांना आपलं फक्त शरीर हवं आहे. कधी उपभोगण्यासाठी तर कधी वंशाला दिवा जन्माला घालण्यासाठी. ह्यांच्याकडून काही अपेक्षा करणं चुकीचं आहे.
तू माझं ऐक आपण दोघी सुखाने एकत्र राहू, दोघी कमावत्या आहोत आणि दोघीही घर सांभाळण्यास सक्षम आहोत, तुझ्या होणाऱ्या बाळाला मी माझं नावं देईन पण मला सोडून कुठेही जाऊ नकोस, मला खूप छान वाटत तुझ्यासोबत. तू जवळ असलीस की खुप हायस वाटतं, कदाचित तुझं माझं नातं हे समजण्यापलीकडे असेल तरीही तू आणि मी मिळून एक नविन नातं तयार करू. ज्याला काही नाव नसेल पण अर्थ जरुर असेल. क्षणभरासाठी दीपा गहिवरून जाते, श्रेयाला घट्ट मिठी मारून जोरजोरात रडते आणि आपलं मनं मोकळं करते. तू बरोबर बोलतेस श्रेया, मला ह्या समस्त पुरुष जातीचा धिक्कार आहे. आजपासून तू आणि मी असं आपलं एक वेगळं विश्व असेल. आणि दोघीही मिळून एका नवीन पर्वाला सुरुवात करतात.
आज आपल्या समाजात अशा कितीतरी समलिंगी स्त्रिया किंवा पुरुष संसार करत आहेत. दिसायला विचित्र दिसणारे दृश्य मुळात नैसर्गिक आहे. आकर्षण हे कोणालाही कोणाबद्दल वाटू शकते, मात्र आपली दृष्टी नेहमी सकारात्मक ठेवा. दीपा आणि श्रेयाच्या बाबतीत जे काही घडलं त्यावरून त्यांना एकत्र राहणे योग्य वाटले, त्यांच्या मनात पुरुषांबद्दल घृणा निर्माण होऊ लागली, असे आपल्या आजू बाजूला राहणाऱ्या कितीतरी स्त्रियांच्या बाबतीत हे घडत असेल.
बऱ्याचदा आपण जे बघतो त्यावरच विश्वास ठेवतो, पण मुळात काहितरी दुसरा अर्थ असू शकतो ह्याचा विचार सुध्दा करत नाही. समलिंगी म्हणजे तुमच्या आमच्यासारखेच एक जोडपे असते, त्यांच्या भावनांची विटंबना करू नका तर त्यांना समजून घ्या. जमत नसेल समान वागवायला तर दुर्लक्ष करा पण त्यांच्या नात्याची चर्चा करू नका. त्यांनाही आपल्या समाजात जगण्याचा अधिकार आहे, समलिंगी म्हणून समाजापासून त्यांना वेगळे करू नका. प्रेमाने सांभाळुन घ्या. ती सुध्दा निसर्गाने बनवलेली माणसं आहेत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
भारीच लिहिलेत …..👌👌👌