योग्य जोडीदार मिळण्यासाठी योग्य मानसिकता महत्वाची असते!!
सौ. शमिका विवेक पाटील
संगीताचे वय वर्ष २४वे सुरू झाले आणि घरच्यांनी स्थळ बघायला सुरुवात केली. अशा पद्धतीने मुलं बघायचा कार्यक्रम होऊ लागला की जणू काही हिने तिशी ओलांडली.
घरच्यांचा एकच उद्देश होता की योग्य वयात योग्य जोडीदार मिळाला म्हणजे पोरीचं भाग्य उजळेल पण त्यांना कोण सांगणारं, लग्न हे योग्य वयात नाही तर योग्य जोडीदार मिळाल्याने सक्सेसफुल होते. अपेक्षांचं ओझं कमी केलं की आवडीचा जोडीदार योग्य वयात मिळुन जातो, पण एकदा का अपेक्षांना पंख लागले की वय सरले तरी जोडीदाराचा शोध काही थांबत नाही.
संगीता दिसायला बेताचीच म्हणजे सावळी, उंचीला कमी, तब्बेतीला पण जरा जास्तच, मध्यम पगाराची नोकरी एकुलती एक असल्याने थोडी लाडावलेली. वडिलोपार्जित संपत्ती पुष्कळ असल्याने होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षाही तितक्याच होत्या. लग्नात कुठल्याही प्रकारची तडजोड करायची संगीताची इच्छा नव्हती.
दोन वर्ष अशीच निघून गेली…आता वय २६वे सुरू असताना एक स्थळ येते. मुलगा इंजिनियर असतो, घरदार सुध्दा सुसंस्कृत असते. दिसण्याच्या बाबतीत मात्र संगीता खोडी काढते. घरातले पुष्कळ समजावतात तरीही हीचा नकार स्पष्ट असतो. अशी अनेक स्थळ ती नाकारते, कधी दिसण्यावरून तर कधी पागरावरून तर कधी फॅमिली मॅटर… घरातले सुध्दा समजावून थकतात, हिला अजून मनासारखा कोणी पसंत आलेला नसतो.
कदाचित बरोबर असलेल्या मैत्रिणींची लग्न अगदी योग्य जोडीदार मिळुन झालीत म्हणून ही सुध्दा त्याच भ्रमात असेल की आपल्याला पण असचं कोणीतरी मिस्टर परफेक्ट मिळेल. त्यामुळे जितका वेळ जातोय तितका जाऊदे पण कुठेही तडजोड करायची नाही, हे डोक्यात फिक्स केलेल असेल. छोट्या मोठ्या कारणांवरून ती आता नकार कळवू लागली. जसं जसं वय वाढत गेलं तस तशी मुलंही कमी येऊ लागली आणि जी स्थळ यायची ती आता वयाने मोठ्या असलेल्या मुलांची असायची.
बघता बघता संगीता ३० वर्षांची झाली. आता तर स्थळ दाखवणारे सुध्दा उडवा उडविची उत्तरं देऊ लागले. एवढा नखरा मुलीच्या जातीला बरा नव्हे. असे तोंडावर नाहीच तर पाठीमागे चर्चा करू लागले. पण म्हणतात ना, जे नशिबात आहे ते होणारच आपण फक्तं निमित्त बनून जातो. संगीताच्या मावशीने एक स्थळ आणले. विशाल आय टी कंपनीमध्ये जॉबला होता. दिसायला तसेच पगार पाणी सारं काही व्यवस्थित. चहा पाण्याच्या कार्यक्रम होतो, आणि दोघेही एकमेकांना पसंत करतात. मुलामध्ये कोणतीच कमी नसते, नावं ठेवण्यासारखे असे काहीच नसते.
दोघांना थोडं एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलता यावं म्हणून घरातले त्यांना बाहेर भेटण्याची परवानगी देतात. मॉलमध्ये भेटण्याचे ठरते, भेटून आल्यावर संगीताचा चेहरा उतरलेला असतो, घरातले उत्सुकतेने विचारतात, कशी झाली भेट ? त्यावर संगीता तोंड वाकडं करून उत्तर देते.. मला ह्या मुलाशी लग्न नाही करायचं. मला नाही आवडल्या त्याच्या आवडी निवडी. घरी सगळ्यांचा मूड ऑफ होतो. पण तिच्या मनाविरुध्द लग्न करायचे नसते, म्हणून मुलाला नकार कळवतात.
त्याच वर्षी आकाशचे स्थळ सांगून येते आणि चक्क सर्व काही जुळून येते. आवडी, निवडी, गुण इतकंच काय तर स्वभाव देखील एकसारखेच होते. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न सोहळा पार पडला. आकाश एकुलता एक असल्याने थोडा हट्टीपणा त्याच्यात होता. तसेच पैशांच्या बाबतीत अती प्रमाणात उधळण करीत असे. संगीताला हे सर्व माहित नसल्याने तिची चिडचिड होऊ लागली. तिच्या घरी सुध्दा पैशांची मागणी करू लागला होता.
सर्व इतके अनपेक्षीत होते की संगीताला आपल्या निर्णयावर पश्र्चाताप करायची वेळ आली होती. सुरुवातीचे दिवस अगदी गोडी गुलाबीचे गेले नंतर मात्र वाद विवाद वाढू लागले. छोट्या मोठ्या कारणावरून तो तिला घालून पाडून बोलत असे. एकदा दोघांमध्ये खूप कडाक्याचं भांडण झालं, तुझ्याशी कोण लग्न करत नव्हते, मी म्हणून लग्न केले नाहीतर असतीस तशीच बिन लग्नाची, स्वतःचा इतका अपमान झाल्यावर संगीताला क्षणभर सुध्दा त्या घरात रहायची इच्छा नव्हती. लग्न होऊन दोन वर्षात त्यांच्यात घटस्फोट झाला.
असाच एखाद वर्ष गेल्यानंतर एका कार्यक्रमात संगीता आणि विशालच्या आईची भेट होते. विशालची आई खुप प्रेमाने तिची विचारपूस करते आणि दिलगिरी व्यक्त करते, धीर देत तिला सांगते पुन्हा एकदा लग्नाचा विचार कर. पण ह्या वेळेस आवडी निवडी बघत बसू नकोस, विशाल अमेरिकेमध्ये सेटल होऊन वर्ष झालं. तू नकार दिल्यानंतर त्याला स्वतःमध्ये कमी वाटू लागली, आम्ही सांगू त्या मुलीशी त्याने लग्न केले आणि आज दोघेही अमेरिकेमध्ये छान सुखी संसार करत आहेत.
अरेंज मॅरेज असो की लव मॅरेज तडजोड ही आलीच. स्वतःची काळजी घे. असे बोलून त्या निघून गेल्या. संगीता आता मात्र खचून जाते. जो रुतबा काही वर्षांपूर्वी होता तो सर्व काही निघून गेलेला असतो. लोकांच्या बोथट नजरा तिला अपराधी असल्यासारखे भासू लागतात. तिच्या मनात एकच विचार घोळत असतो, नक्की लग्न काय बघून करतात ? एवढी वर्ष आपण योग्य जोडीदार मिळण्यासाठी घालवली पण आज शेवटी एकटीच राहिली. कदाचीत थोडा समजुद्दारपणा दाखवला असता तर माझा विशाल सोबत सुखी संसार असता. शेवटी काय तर नशिबाचे खेळ सारे….
योग्य वयात योग्य जोडीदार भेटणे यासाठी योग्य मानसिकता अपेक्षित असते. चालून आलेल्या संधीच सोनं आपल्याला करायचं असतं. थोडं समजून घेतलं की सगळं नीट होतं. आपल्या जोडीदाराची पसंत नापसंत ओळखून त्याचं मन राखणं म्हणजे सुखी संसार.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


संपूर्ण लेखाचा सार म्हणजे शेवटची ओळ.