तिचे डोळे पहायचो आणि लग्न झालंय हेच विसरायचो !!
सौ. शमिका विवेक पाटील
साक्षीच्या बाळंतपणाची तारीख जवळ आली होती, मलाच सर्व काही बघायचे होते. घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केले म्हणून आमचा कोणी स्वीकार केला नाही. पर्यायी गाव सोडून आम्हाला मुंबई मध्ये स्थायिक व्हावं लागलं. इथे येऊन आम्ही राजाराणीचा संसार थाटला. पगार पाणी सारं काही व्यवस्थित सुरू होते. दोघेही कामाला असल्यामुळे पैशांवरून कधी वाद वैगेरे व्हायचे नाहीत, जे काही आहे ते दोघांचे मानून संसार करत होतो. साक्षीला जेव्हा दिवस गेले तेव्हा आनंद साजरा करायला, तिचे लाड पुरवायला जवळचे असे कोणीच नव्हते. तेव्हा सरू मावशींनी खूप आधार दिला. मी आणि सरू मावशी दोघांनीही मिळून तिचे सगळे लाड पुरवले. पावलोपावली तिची खुप काळजी घेतली. मुंबई मध्ये जेव्हा आलो, तेव्हा सरू मावशींनी खोली घेण्यापासून ते काम मिळेपर्यंत खुप मदत केली.
सरू मावशी बाजुच्या खोलीत धुणी भांडी करायला यायच्या, येता जाता नजरा नजर व्हायची आणि बोलता बोलता गावचा विषय निघायचा. त्यांचं आणि आमचं एकच गाव होतं म्हणून ह्याची त्याची ओळख निघायची आणि आमच्या गप्पा रंगायच्या. त्यांना बघितले की आईला भेटल्याचे समाधान वाटायचे. साक्षीच्या बाळंतपणाचे मला खुप टेन्शन आले होते, पण सरू मावशी होत्या म्हणून थोडा धीर होता. बघता बघता तो दिवस आला आणि आमच्या घरात एका गोंडस परीने जन्म घेतला. मावशी, बाळ आणि बालंतीणीची नीट काळजी घेत होत्या अगदी पोटच्या पोरी सारखं तिला हवं नको ते विचारत होत्या. सारं काही व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक ती माझ्या आयुष्यात आली….
पावसाळ्याचे दिवस होते, कामावरून यायला उशीर झाला होता, घाई घाईने मी shoes दारात काढले आणि खोलीत शिरणारं तोच एक सुरेल आवाज कानी पडला. कोणीतरी पाळण्याजवळ बसून अंगाई गीत गात होते. मी खोलीत जायचे सोडून चार पावलं पाठी फिरलो आणि दरवाज्यात उभ राहुन ते मंत्रमुग्ध स्वर ऐकू लागलो. अरे, तू कधी आलास ? सरू मावशीच्या आवाजाने त्या सुरेल आवाजाला शांत केले.
मावशी, कोण गात होतं ग अंगाई गीत ? साक्षीच्या आवाजाने तर माझी परी जोरजोरात रडते पण हा कोणाचा आवाज होता ? बघ ना किती छान झोप लागली तिला. तितक्यात पडद्यामागून कोणाचातरी चेहरा दिसला. कोण आहे तिथे ? ही नेत्रा, माझ्या भावाची मुलगी. कालच गावावरून आलीय. आज तिला म्हटले, चल आमच्या ताई कडे तुला नेते, तिच्या बाळाला बघ तेवढाच तुझा वेळ जाईल. सरू मावशी तिच्या बद्दल सांगत असताना ती पडद्यामागून बाहेर आली आणि आई शपथ, तिचा चेहरा बघून पुरता मी भान हरपलो. नितळ कांती, तेजस्वी चेहरा,
बोलके डोळे, गुलाबी गाल, लाल चुटुक ओठ, ओठांच्या किनाऱ्यावर एक छोटासा तीळ…म्हणजे अप्सरा धरतीवर उतरवी तशी ती, बागेतलं एखादं फुल तोडून कोणीतरी माझ्या घरात सजवले जणू. अजून काय काय विचार मनात येऊ लागले. अचानक माझ्या मनाला त्या घाऱ्या डोळ्यांनी कवी बनवले. मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतोय का ? हेच कळत नव्हते. तितक्यात सरू मावशी म्हणाली, पण तिला दिसत नाही… क्षणभरासाठी तिच्यावर खिळलेल्या माझ्या नजरेवर कोणीतरी पाणी शिंपडावं असं झालं.
नेत्रा जन्मतः आंधळी आहे. रूपाने एवढी देखणी पोर माझी जगाला पाहू शकत नाही, ह्याचं खुप वाईट वाटतं ओ. लग्नाचं वय झालंय पण कोण करेल हिच्याशी लग्न ? आयुष्यभर पोर अशीच राहील. सरू मावशी सांगतेय त्यावर विश्वास बसेना. एवढी सुंदर, बोलक्या डोळ्यांची नेत्रा दृष्टीहीन आहे ? कसं शक्य आहे ? नेत्रा बाळाच्या पाळण्याचा मुका घेऊन मावशीचा हात पकडून काहीच न बोलता निघून गेली. तिचा अबोला खुप काही बोलून गेला,
मी मात्र रात्रभर तिच्या विचारात रमून गेलो. तिचे ते मधुर स्वर, तिचं रूप, ती आंधळी आहे ह्या कडे दुर्लक्ष करीत होते. किती नशीबवान असेल तो, ज्याला नेत्रा सारखी अर्धांगिनी लाभेल. सकाळ होताच सरू मावशी बाळाची अंघोळ करायला आली, सोबत नेत्रा पण होती. नेत्राला बघून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागले. प्रेमाची अनुभूती मला होत होती. चक्क एका भेटी मध्ये तिच्या रुपावर एवढा भाळलो की तिच्या विचारांमध्ये गुंतून गेलो. पण तिला ह्याची काहीच खबर नव्हती.
आता मावशी नेत्राला रोज घेऊन येऊ लागली, बाळाची अंघोळ झाली की नेत्रा अंगाई गीत गाऊन झोपवत असे. मलाही सवय झाली होती की गीत ऐकल्याशिवाय कामाला जायची इच्छा होत नसे. तिचे ते निरागस डोळे पहायचो आणि माझं लग्न झालं आहे हे विसरून जायचो. असे किती दिवस चालणारं ? मला नेत्रा आवडते, हे तिला सांगावेच लागणारं. पुढे जे होईल ते होईल….
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नेत्रा आणि मावशी सुध्दा उशीराने आल्या. नेत्राला खोलीत एकटे बघून मी हळूच कडी लावली आणि तिला जवळ घेतले. तशी ती घाबरली, कोण आहे ? मी तिच्या तोंडावर हात ठेवला, ओरडू नकोस मी हेमंत आहे. तिला काही समजेना, काय हवंय का तुम्हाला ? मी आत्त्याला बोलावते म्हणून ती पुन्हा ओरडणार तोच मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हाताने जवळ केला.
आज पहिल्यांदा तिला मी स्पर्श केला होता. तिचे ते घारे डोळे क्षणात पाण्याने भरले. अश्रूंनी भरलेले डोळे बघून मला खूप अपराधी असल्यासारखे वाटू लागले. तिला दूर ढकलले आणि बाहेर येऊन खिडकीत उभा राहिलो. माझ्या हातून मी काय पाप करणारं होतो ? एका निष्पाप जीवाशी खेळणारं होतो… माफी मागावी तरी कोणाची ? तिच्या भविष्याचा चांगला विचार करायचा सोडून मी तिला उपभोगणारं होतो. शारीरिक आकर्षण होतं ते, माझ्या हातून किती मोठं पाप घडलं असतं.
पण, आज मी नाही तर उद्या दुसरा कोणीतरी तिचा गैरफायदा घेईल. नाही, तिला मी तिच्या पायावर उभी करणारं, आंधळी असली म्हणून काय झालं ? तिला मी तिची ओळख बनवून देणारं. तिच्याकडे आवाजाची देण आहे. ती स्वतःची ओळख आवाजातून निर्माण करू शकते. मी पूर्णपणे तिला सपोर्ट करेन.
काही दिवसांतच नेत्राने संगीताची परीक्षा दिली, विविध स्पर्धेत भाग घेऊन अनेक स्पर्धा जिंकल्या आणि स्वतःचे संगीत विद्यालय सुरू केले. अर्थातच हेमंतने ह्यासाठी खुप मेहनत घेतली पण त्याने पुन्हा कधीही तिला स्पर्श केला नाही. आज नेत्राचं समाजात एक स्थान आहे, तिची स्वतःची अशी ओळख आहे. हे शक्य झालं, ते हेमंत सारखा आधार तिला मिळाला म्हणून….
निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले आहे. फक्त त्याचा योग्य तो वापर करता आला पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आलोय, तर एखादं तरी सत्कार्य करून जाऊयात. नेत्रा सारख्या किती तरी बहिणींना आपली गरज आहे. जास्त नको पण थोडी फार तरी मदत करुयात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


जबरदस्त कथा….💐💐💐
असंच वाचायला मिळावे..😊