Skip to content

अतूट प्रेमकथा..त्याच्या मृत्यूनंतरही ती त्याला जिवंत ठेवते!!

अतूट प्रेमकथा..त्याच्या मृत्यूनंतरही ती त्याला जिवंत ठेवते!!


सौ. शमिका विवेक पाटील


अजित आज पहिल्यांदा रेश्मा आणि आईची भेट करून देणारं होता. कॉलेज मध्ये ५ वर्ष एकत्र घालवल्यानंतर जॉब सुध्दा एकत्रच करत होते. दोघेही अगदी well settled होते. मात्र कुठेतरी ब्रेक द्यावा आणि संसार सुरू करावा असे दोघांनाही वाटत होते, म्हणूनच घरच्यांना विश्वासात घेऊन लग्नासाठी आम्ही जोडीदार निवडला आहे असे सांगितले. आजच्या तरुण पिढीला कोणी थांबवू शकत नाही म्हणून घरच्यांनी जास्त आढे वेढे न घेता होकार दिला.

नेहमी जिन्स टॉप घालणारी रेश्मा आज पहिल्यांदा पंजाबी ड्रेस घालून आली. बघताच क्षणी अजित एकदम घायाळ झाला. फिकट निळा रंगाचा, फुल्ल स्लिव असलेला ड्रेस आणि त्यावर छोटीशी टिकली, कानात मस्त झुमके त्यात बांगड्यांची किणकिण… हे सारं पाहून अजितला पुन्हा नव्याने रेश्माच्या प्रेमात पडावेसे वाटले. कुरळ्या केसांच्या बटा आणि त्यातून येणारा सुगंध अजितला वेडावत होता.

रेश्मा, आज थोडं फिरु ना आणि नंतर घरी जाऊ, मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. का रे ? मध्येच काय झालं ? काही नाही ग… बस् असचं, तुला ह्या ड्रेस मध्ये बघुन खूप छान फील झाले. मस्त गप्पा मारू थोड्या वेळ आणि मग जाऊ. अजितने एवढा फोर्स केला की रेश्माला नकार देताच आला नाही. तू ना एकदम वेडा आहेस, सांग कुठे जायचं ? तो लगेच कार गार्डनच्या दिशेने वळवतो.

रेश्मा आईस्क्रीम खाणारं का ? अरे काय चाललंय तुझं ? आपल्याला घरी जायचं आहे, तुझी आई वाट बघत असेल. उशीरा गेलो तर उगीच पहिल्या भेटीत bad impression पडेल माझं, तुला काय त्याचं… आहे ग अजून बराच वेळ. तू वेळेच्या आधीच तयार होऊन आलीस, आणि माझे बाकीचे मित्र उगीच बोलत असतात, ह्या मुली तयारी करायला खुप वेळ लावतात पण तू खरंच खूप सही आहेस ग. किती गोड आहेस ! तुझ्यासाठी मी किती पण वेळ थांबायला तयार आहे. हो का ? आज स्वारी भलतीच खुश आहे. गार्डन मध्ये चालताना तो अचानक तिचा हात हातात घेतो, बसुया का थोड्या वेळ इथे. काही उशीर नाही होणारं..बस, इथे बाजूला…

रेश्मा, तू जीवनात आलीस आणि माझ्या जगण्याला आकार मिळाला. इतकी वर्ष झाली आपण सोबत आहोत पण मला तुझा कधीच कंटाळा नाही आला ग. जेव्हा भेटतेस तेव्हा नव्याने प्रेम करतो मी तुझ्यावर. तु माझं, पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. आता आजचंच बघ ना, तुला सांगावं पण नाही लागलं की आईला भेटायला जाताना काय घालायचं ते. तू किती परफेक्ट तयार होऊन आलीस. अरे त्यात काय, ते तर नॉर्मल लॉजिक आहे. कोणीही असती तरी अशीच आली असती.

नाही, माझी रेश्माच अशी छान वागू शकते, बाकी कोणाचं माहीत नाही. बरं अजून, काय बोलायचं आहे ते बोल आणि चल ना पटापट, उशीर नको ना व्हायला. नाही ग, उशीर होणारं… तुला माहितीये का रेश्मा, मला ना तुझ्यासोबत अख्ख जग फिरायचं आहे. आता हे काय नवीन ? आधी आईचं दर्शन घडवून दे तुझ्या नंतरचे बघू आपण काय ते. अग तुला समजतं नाहीय का ? माझं एक स्वप्न आहे, मला पूर्ण जग तुझा असा हात हातात घेऊन अनुभवायचं आहे. वेग वेगळे देश, तिथल्या संस्कृती, खाद्य पदार्थ, तिथली वैशिष्ठ्य हे सर्व काही जाणून घ्यायचं आहे.

सूर्योदय आणि सूर्यास्त मला तुझ्या डोळ्यातून बघायचा आहे. झीरो पॉईंट वर जाऊन तिथल्या पांढऱ्या शुभ्र बर्फावर तुझं नाव कोरायचं आहे. रेश्मा, अजून खूप काही करायचं आहे, बस् फक्त तुझी साथ हवी. Wow, how Romantic ! हे सारं किती रोमांचकारी आहे. मला नक्की आवडेल तुझ्यासोबत जग फिरायला. प्रॉमिस कर रेश्मा, मला सोडून कधीही जाणारं नाहीस. हा बाबा, प्रॉमिस… चल आता तरी निघुयात का ? अंधार पडत चालला आहे. आज अजित जास्तच खूश होता, आनंदाच्या भरात गाडीच्या स्पीडचा अंदाच चुकतो आणि अपघात होतो.

रेश्माला जाग येते तेव्हा ती स्वतःला हॉस्पिटलच्या बेड वर बघून जोर जोरात ओरडू लागते. जसं की गाढ झोपेतून जाग यावी तसं तिला वाटू लागतं. जे घडलं ते एक स्वप्न होतं. डोळ्यावर पट्टी असते, ती हाताने घाई घाईत काढण्याचा प्रयत्न करते पण तिथल्या नर्स तिला थोडा धीर देत थांबवून ठेवतात. अजित कुठे आहे ? मला त्याला भेटायचं आहे. अजित, अजित म्हणून ती हाक मारू लागते. तितक्यात डॉक्टर तेथे येतात आणि तिला सांगतात की, अपघातामध्ये तुझे दोन्ही डोळे गेले, एका भल्या माणसाने तुला त्याचे डोळे दान केले म्हणून तू हे जग पुन्हा पाहू शकतेस.

तिला हे ऐकून धक्का बसतो, हळू हळू डॉक्टर डोळ्यावरची पट्टी काढतात. समोर ठेवलेल्या आरशात जेव्हा डोळे बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. हे तर अजितचे डोळे आहेत. डॉक्टर कुठे आहे माझा अजित ? काय झालं त्याचं ? प्लीज डॉक्टर खरं सांगा…
रेश्माच्या डोक्यावर हात ठेवून डॉक्टर तिला दिलासा देतात. मन खंबीर करून ऐक, असे बोलल्यावर तिच्यात असलेली सारी हिम्मत गळून पडते.

ज्या दिवशी तुमचा अपघात होतो त्या दिवशी तुझे दोन्ही डोळे अपघातात जातात तर एका बाजुला अजितला खुप जास्त प्रमाणात मार लागलेला असतो. त्याला वाचवण्याचे काहीच मार्ग नसतात. शेवटच्या क्षणाला तो फक्त एवढंच बोलतो, माझे डोळे माझ्या रेश्माला द्या. तिच्या डोळ्यातुन मी तिच्यात जिवंत राहीन. एवढे बोलून प्राण सोडतो. हे ऐकून रेश्माचे रडून रडून हाल होतात. माझा अजित माझ्या सोबत नाही ह्या यातना तिला आतून खुप त्रास देत असतात. पण ती स्वतःला सावरते, अजितचे डोळे माझ्या सोबत आहेत. तो माझ्यात जिवंत आहे. मी त्याची स्वप्न पूर्ण करेन. त्याला जग फिरवेन. त्याला माझ्यासोबत जे करायचं होतं ते सारं काही मी करेन. अजित, मला सोडून जावू नको बोलला आणि तुच सोडून गेलास. हेच का तुझं प्रेम ? आता माझं प्रेम बघ….

काही दिवस उलटत नाही तोच रेश्मा बॅग भरून वर्ल्ड टूर वर जायला निघते. घरी सांगते, मी परत कधी येईन हे माहित नाही पण मी माझ्या अजितसोबत आहे. त्याची स्वप्न मला पुर्ण करायची आहेत. माझ्या डोळ्यातुन तो हे जग बघेल. इथून पुढे माझं सर्व जीवन अजितचे स्वप्न पूर्ण करण्यात जाईल. माझ्या आयुष्यात आता दुसऱ्या कोणालाही स्थान नाही. मी, अजित आणि त्याची स्वप्न….



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अतूट प्रेमकथा..त्याच्या मृत्यूनंतरही ती त्याला जिवंत ठेवते!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!