Skip to content

लग्न करण्याचं नाटक होतं ते, खरी स्टोरी वेगळीच होती!!

लग्न करण्याचं नाटक होतं ते, खरी स्टोरी वेगळीच होती!!


सौ. शमिका विवेक पाटील


त्या दिवशी तिला लग्न मंडपात नवरीच्या रुपात सजलेली बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हीच का माझी मुग्धा ?
असे मनात स्वतःला १०० वेळा प्रश्न विचारू लागला. हरलेली हिम्मत एकटवून त्याने भर मांडवात तिचा हात धरला, हा काय तमाशा लावलाय तु ? आत्ताच्या आत्ता खरं काय ते सांग घरी, मी आहे तुझ्यासोबत. तू सांग सगळ्यांना की तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यासोबतच लग्न करणारं. हात झटकत मुग्धा, ब्राम्हणाला मंत्र बोलायला सांगते.

प्लीज मुग्धा, असे नको करुस, माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला सोडून गेलीस तर मी आतून फार खचून जाईन. त्याच्या ह्या बोलण्यावर मुग्धा त्याला जोरात कानाखाली वाजवते. सगळीकडे भयाण शांतता पसरते. हवे तितके मार मला पण सोडून जाऊ नकोस. इतका कसा रे निर्लज्य तू ? तुझ्यासारखी मुलं श्रीमंत घरच्या पोरींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचा पैसा हडप करतात आणि नंतर सोडून देतात वाऱ्यावर. मी तुझी नियत चांगलीच ओळखून आहे.

Wait a minute मुग्धा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आपण शांतपणे बसून बोलू ह्यावर. अरे हट्ट, तूझी लायकी तरी आहे का माझ्या बाजूला उभ रहायची. चालता हो इथून, चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि आला तोंड वर करून, काय तर म्हणे माझं तुझ्यावर प्रेम आहे.

प्लीज मुग्धा, तोंडात येईल ते बोलू नकोस, माझं तुझ्या पैशावर कधीच प्रेम नव्हतं. मला फक्त तू हवी आहेस. जा ना आता, कशाला खोटं बोलतोय. आणि एवढंच जर असेल ना तर चार पैसे कमवायला शिक आधी. ह्या असल्या भिकारड्याला माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणे. Get lost. मला तुझं तोंड बघायची पण इच्छा नाहीय. आणि हो, थोडी तरी लाज बाकी असेल ना तर पुन्हा कधी तोंड दाखवू नकोस. मान खाली घालून तो उलट्या पावलांनी परत फिरतो.

बस् झाले, इतका अपमान सहन करून सुध्दा मी तिच्यावर प्रेम कसं करू शकतो ? तिच्या हृदयात बापाचा पैसा भरलायं नुसता. मन आहे की नाही ? स्वतःला श्रीमंत म्हणून मिरवते पण मनाने एक नंबरची भिकारी आहे. इतका हलकटपणा का सहन केला मी ? मग अशा गरीब मुलाबरोबर प्रेम करायचंच कशाला ? नुसता श्रीमंतीचा माज. थांब तू, तुला आता दाखवतोच, हा गरीब मुलगा काय करू शकतो ? नाही ना एक दिवस तुझ्या बापापेक्षा जास्त प्रॉपर्टी उभी केली तर नाव बदलेन माझं.

अदित्य एका छोट्या कंपनीमध्ये कामाला होता. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिल आजारी असल्यामुळे त्यांच्या आजारपणात जास्त पैसा खर्च होई, आई धुणी भांडी करी तर बहिण होम ट्युशन घेत असे, भाऊ अजून लहान होता त्याचे कॉलेज सुरू होते. कसली हौज मौज माहीत नाही की कसले सण वार, आला दिवस ढकलायचा. तरीही कुठले व्यसन नाही की वाईट संगत नाही.

अत्यंत संस्कारी आणि शांत असा त्याचा स्वभाव. मित्राच्या लग्नात त्याची पहिल्यांदा मुग्धा सोबत ओळख होते. मुग्धाची तारिफ करावी तितकी कमीच, लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी होती तिच्या घरावर, पण तिला तिळमात्र सुध्दा गर्व नव्हता. बापाचा एवढा अमाप पैसा असून सुध्दा रहाणीमान अगदी साधं. पण चेहऱ्यावर तेज विलक्षण. कदाचीत श्रीमंती तिच्या चेहऱ्यावरूनच झळकत असेल. मित्र मैत्रिणी पण अगदी तिच्यासारखेच साधे. तिला hi fi लोकांमध्ये फार अस्वस्थ वाटे, म्हणून वडिलांची कितीही मोठी पार्टी असली तरी ती जाणे टाळत असे.

तिला खोटं खोटं हसणं बिलकूल जमत नसे. तर, त्या दिवशी जेव्हा दोघांची भेट होते तेव्हा अदित्यला मुग्धा इतकी आवडते की बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. पण कितीही झालं तरी, सूर्याला हात लावण्याचं धाडस कोणी करू शकेल का ? मी तर एक क्षुद्र जीव. ह्या विचारांनी तो दुरूनच तिच्यावर प्रेम करु लागतो. मात्र ही गोष्ट जेव्हा मुग्धला समजते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण, तिलाही तो आवडतं असतो. बघता बघता दोघेही प्रेमाची कबुली देतात आणि लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय घेतात.

अदित्य गरीब असल्यामुळे मुग्धाच्या वडिलांचा लग्नाला विरोध असतो पण मुलीच्या प्रेमापोटी ते तयार होतात आणि थोडी फार प्रॉपर्टी ह्याच्या नावे करून कंपनी मध्ये उच्च पदावर निवड करतात. अदित्य मन लावून काम करायला सुरुवात करतो. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी मुहुर्त काढायला ते ब्राम्हणाला बोलावतात. सगळं एवढं छान सुरू असताना काय माहित कोणाची नजर लागते….

मुग्धने भर मांडवात केलेला अपमान अदित्यला झोपू देत नाही. अदित्यच्या मनात अपमानाचा बदला घ्यायचा हेच ध्येय असते. रात्रं दिवस एक करतो आणि ५ ते ६ वर्षात तो स्वतःच साम्राज्य उभ करतो. लग्नासाठी त्याला लगेच मुली सांगुन येऊ लागतात. मुग्धापेक्षा सुंदर तसेच श्रीमंत मुलगी बघून तो लग्न करतो आणि संसार थाटतो. मात्र, एकदा तरी मुग्धाला भेटायला जाणारं आणि दाखवणारं, बघ ज्या मुलाला तु गरीब म्हणून नाकारलं त्या मुलाकडे आज किती पैसा आहे. तिला खुप गर्व होता ना पैशावर, नाही तिचा सगळा माज उतरवला तर नावाचा अदित्य नाही.

दुसऱ्या दिवशी लगेच तो मुग्धाच्या सासरी तिला भेटायला जातो. बेल वाजवताच दुसरी कोणीतरी दरवाजा उघडते. मान फिरवून, मुग्धा आहे का ? तिला सांगा कोणीतरी भिकारी आता श्रीमंत बनून आलाय. हिम्मत असेल तर तोंड बघून जा. आणि जोरजोरात हसतो. कोण मुग्धा ? इथे कोणी मुग्धा राहत नाही. हे बोलत असताना पाठीमागून त्या दिवशी मुग्धा ज्याच्याशी लग्न करणारं होती तो मुलगा येतो.

हॅलो अदित्य… मी श्रेयस, मुग्धाला भेटायचे आहे ना ? तिला तुझ्यावर खुप विश्वास होता की अदित्य एक ना एक दिवस खूप श्रीमंत बनवून दाखवेल, पण सॉरी मित्रा ती माझ्यासोबत नाही राहत. तीने एका संस्थेसाठी काम सुरू केलं आहे, अनाथ मुलांचे शिक्षण आणि संगोपन करण्यासाठी स्वतःचे आयुष्य त्यांच्या स्वाधीन केले आहे. अरे, पण तुमचं तर लग्न झालं आहे ना ? मग ती तुझ्यासोबत का नाही राहत ? अदित्यच्या डोक्यात प्रश्नांचा खेळ सुरू होतो. ये आत, तुला सर्व हकीकत सांगतो.

ही माझी बायको आरती… अदित्य त्या मुलीचं तोंड बघून अजूनच विचारात पडतो. हे बघ श्रेयस, मला खरं काय ते नीट सांग. I can’t wait anymore, नक्की काय झालं माझ्या मुग्धा सोबत… रिलॅक्स, मुग्धा एकदम खूश आहे तिच्या नव्या आयुष्यात. त्या दिवशी तुमची लग्नाची तारीख काढण्यासाठी ब्राह्मणाला बोलावले होते,

मुग्धाची पत्रिका बघून ब्राह्मणाला घाम फुटला, लगेच त्याने हात वर केले आणि स्पष्ट सांगितले की ह्या मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे, हीचे ज्या मुलासोबत लग्न होईल त्याचा महिन्याभरात मृत्यु होईल. ह्यातून बाहेर निघण्याचा काहीच मार्ग नाही. आजीवन तिने अविवाहित राहिलेलं चांगले असे सांगून निघून गेला. हताश झालेले आई वडिल आणि स्वप्नांचा चुरा झालेली मुग्धा, आता पुढे काय करायचं ? ह्या विचारात पडतात. तिला सगळ्यांत जास्त तुझी चिंता होती.

तुला जर सत्य समजलं तर तू हे सर्व न जुमानता लग्न करशील म्हणून तिने माझ्यासोबत लग्न करण्याचे नाटक केले. तु निव्वळ तिचा राग करावा म्हणून तिने तुझा अपमान केला. हे सर्व झाल्यानंतर ती खूपच खचून गेली होती, दुसऱ्या कोणाच्या जीवाशी खेळण्यापेक्षा अविवाहित राहून अनाथ मुलांसाठी काहितरी केलेलं चांगलं. म्हणून तिने संस्थेत काम करायला सुरुवात केली.

भरलेले डोळे रुमालाने पुसत, कोणती संस्था आहे ती ? मला तिला भेटायचं आहे. I m sorry अदित्य, तिने हे सर्व सांगण्यास मनाई केली आहे. जर तुझं लग्न झालं असेल तर खरंच तु तिला विसरुन जा आणि नव्याने तुझं आयुष्य जग. म्हणजे ते लग्न फक्त एक नाटक होतं, माझ्या दीर्घ आयुष्यासाठी… जीच्यासोबत लढाई होती, तिने मला जिंकवून हरवले. पुढे काहीच न बोलता, अदित्य निघून जातो.

शेवटी एकच प्रश्न राहतो. पत्रिकेतील ग्रह आपल्या प्रेमाला ग्रहण लावू शकतात म्हणजे जिथे मनं जुळतात तिथे अशा ग्रहांची खरंच गरज असते का ? मुग्धा सारख्या कितीतरी मुली आज अविवाहित आहेत. पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न होऊ देत नाही. म्हणजे आता प्रेम करण्याआधी सुध्दा पत्रिका जुळते का ? हे पहायला हवे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!