आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही, हीच वेळ आहे स्वतःकडे लक्ष देण्याची!
सौ. सुधा पाटील I समुपदेशक
खटाव (पलूस, सांगली)
माणूस हा समाजशील प्राणी आहे.आपल्या प्रत्येक यशात,अपयशात त्याला जवळच्या माणसांची गरज भासते.आपल्या यशाचं कोणीतरी भरभरून कौतुक करावं.अपयश आलं तर मानसिक आधार द्यावा असं सर्वांना वाटत असतं.पण खूपदा आपण आपला संबंध दुसऱ्यांशी जोडत राहतो.”आपल आयुष्य आपलं स्वत:च आहे” हा महत्त्वाचा मुद्दा जगताना आपण बाजूला ठेवत राहतो.
बघा हं…”आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही”याचा माणसांवर दोन प्रकारे परिणाम होत असतो.पहिला परिणाम असा की, माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही.मला कोणी भावच देत नाही, असा विचार करत काहीजण उगाचंच झुरत बसतात.यातूनच त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होत जातो.हा अनुभव शालेय जीवनात मुलांना खूपदा येतो.
एक उदाहरण पहा…एक मुलगा होता.एकदा तो त्याच्या आईला म्हणाला, आई, सुंदर मुलांकडेच शिक्षक लक्ष देतात का? मी सुंदर नाही का?कारण माझ्याकडे शिक्षक लक्षच देत नाहीत.त्या मुलांमध्ये या गोष्टीचा इतका परिणाम झाला होता की,तो हुशार असूनही अभ्यासात मागे पडत होता.
या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की,कोणीतरी आपली दखल घ्यावी असं वाटणं ही एक नैसर्गिक अवस्था आहे.पण याचा अर्थ असा नव्हे की,कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून त्याचा वाईट परिणाम आपल्या मनावर होवू द्यावा.मुळात मानवी मेंदूची क्षमता प्रचंड असते.
मानसशास्त्र असं सांगतं की, आपल्या मेंदूचा खूप कमी भाग आपण वापरतो.जर का आपण आपला मेंदू सतत क्रियाशील ठेवला,आपण आपल्याच कार्यात मग्न राहिलो तर आपण आश्र्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी शोधू शकतो.पण आपला खूपसा वेळ इतरांचं लक्ष केंद्रित करण्यातंच जातो.
दुसरा प्रकार असा की,आपणाकडे कोणाच लक्ष नाही ना…मग जावू दे कशाला उगाचंच अति झटायच!असाही विचार करणारे असतात.पण आपण विसरतो की, आपलं आयुष्य हे आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी आणि आपल्या “स्व “विकासासाठी असतं.जेव्हा कोणाचंच आपल्याकडे लक्ष नसतं तेव्हाच खरं तर आपण आपल्या आतमध्ये डोकावून स्वत:ला ओळखू शकतो.
आपण नेमके कोण आहोत? आपल्या क्षमता काय आहेत हे आपण याच काळात ओळखून घेऊन अधिकाधिक प्रयत्न करु शकतो.आपण इतरांच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा,कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून झुरण्यापेक्षा याच काळातआपणंच आपल्या क्षमता ओळखून त्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करु शकतो.आपल्या “स्व” चा विकास हाच खरा मानवी आयुष्याचा विकास असतो.
आपली तुलना जगाशी करण्यापेक्षा ती आपल्याशीच करावी.म्हणजे आपल्या त्रुटी वेळीच आपल्या लक्षात येत राहतील.युद्धात जसं शत्रूला गाफील ठेवून हल्ला केला जातो अगदी तसंच इतरांच आपल्याकडे लक्ष नसतं तेव्हा आपण फक्त आपल्यातंच गुंतून रहायचं असतं.यातूनच आपणंच आपली प्रगती साधू लागतो.आपला वेळ गुंतून राहतो.आणि यातूनच नवनिर्माण होऊ शकतं.आपल्यातील सामर्थ्य ओळखण्याची आणि ते सिद्ध करण्याची हीच वेळ असते.
दुसरी बाजू अशी की… माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही ना…मग जावू दे….मीच माझ्याकडे लक्ष देईन…मीच माझा आनंद निर्माण करेन…मीच माझे छंद जोपासून मला आनंदी ठेवेन…मला जे जे वाटतं ते सारं मी करेन…अशी विचारसरणी निर्माण करायला हवी.आपण आपल्या आयुष्यात स्वत:ची कधीतरी विचारपूस करतो का? आपल्या “स्व”ला नेमकं काय हवंय?याचा कधीतरी विचार करतो का? नाही करत ना! मग आता करा!
आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून झुरत बसून आपणंच आपलं आयुष्य दु:खाच्या खाईत लोटतो.आपण आपल्यावर कधी प्रेम करतंच नाही.म्हणूनच अपेक्षा भंगाच्या यातनांच ओझं आयुष्यभर वाहत राहतो.मी तर असं म्हणेन की,आपणाकडे कोणाचं लक्ष नसतं तेव्हाच खरं तर आपण आपल्यासाठी खूप काही करू शकतो.म्हणूनच हाच काळ आपल्यासाठी सुवर्ण संधी असतो.
कारण याच काळात आपण आपले असतो.आणि फक्त आपल्यासाठी जगतो.स्वत:मध्ये मश्गूल होवून बेधुंद होऊन जगण्याचा हाच काळ असतो.कारण आपल्याकडं कोणाचं लक्ष नसतं त्यामुळे कसली भीतीही मनात नसते.आणि जेव्हा मनात भीती नसते तेव्हाच मनसोक्त जगणं अनुभवलं जातं.
तसंही माणूस आयुष्यभर इतरांच्या नजरा झेलत जगत असतो.तेव्हा अनेक मर्यादा तो पाळत राहतो.इतरांचा विचार करता करता…इतरांचं लक्ष वेधून घेता घेता स्वत:ला कुठेतरी हरवून बसतो.पण जेव्हा आपणाकडे कोणाचं लक्ष नसतं तेव्हा तो वेळ हा फक्त आपला असतो.त्याचा वापर कसा करायचा हे मात्र ज्याचं त्यानं ठरवावं लागतं.
काहीजण आपल्या मनात खोलवर लपलेल्या अपेक्षा पूर्तीसाठी प्रयत्न करेल.जे जे करायचं राहुन गेलं ते ते करेल.आपल्या आयुष्यासाठी आपला वेळ देता आला की, आयुष्य सुंदर बनतं.म्हणूनच असा मिळालेला वेळ आपल्या आनंदासाठी, आपल्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी वापरावा.आपल्या लपलेल्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात.जेव्हा आपल्याकडे कोणाचं लक्ष नसतं तेव्हा आपण आपल्याकडे दिलेलं लक्ष आपणास उच्चतम शिखरावर नेऊ शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

