Skip to content

शेवटी मी माझं प्रेम मिळवलंच !!!

शेवटी मी माझं प्रेम मिळवलंच !!!


सौ. शमिका विवेक पाटील


रात्रीचे १२वाजले तरी अतुल अजून कसा आला नाही ? फोन पण लागत नाहीय, ह्या विचारात वर्षा गॅलरीत फेऱ्या मारत होती. विनोदला फोन करुन बघते, हॅलो विनोद, अतुल आहे का तुझ्यासोबत ? नाही वर्षा, पण त्याला मगाशी मी रॉकी सोबत जाताना बघितला होता. ठीक आहे, बोलून फोन ठेवते आणि टेन्शन वाढू लागते. तितक्यात एक फोन येतो. Hello वर्षा मॅडम आहेत का ? हो बोलतेय, तुम्ही अतुल देवधरला ओळखता का ? हो, काय झालं पण ? ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये या. अतुलला मारामारी करताना पकडण्यात आलंय.

वर्षाला घाम फुटतो, आणि पर्स उचलून तातडीने ती पोलीस स्टेशनला जाते. अतुल एका कोपऱ्यात बसलेला असतो. ओठातून रक्ताची धार आणि डोळे लाल बूँद झालेले असतात. वर्षाला बघताच मान खाली घालतो. वर्षा मॅडम तुम्हीच ना ? साहेबांनी आत बोलवले तुम्हाला. हे बघा मॅडम, तुम्ही चांगल्या घरातल्या दिसता म्हणून समजावतोय, त्या पोराने खुप मारहाण केलीय आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याने ड्रग्स घेतलेत, ड्रग्सचे पाकीट सापडले आम्हाला, आज वॉर्न करून सोडतोय परत जर असे सापडले तर सरळ आत टाकू. परत अशी चूक नाही होणारं साहेब, मी अतुलच्या वतीने माफी मागते. हाताचा आधार देत वर्षा अतुलला घरी घेऊन येते.

अतुल आणि वर्षा दोघेही जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधले गोल्ड मेडेलिस्ट. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःची फाईन आर्ट गॅलरी ओपन करतात. आवडी निवडी सारख्या असल्याने मनं जुळतात पण मॉडर्न विचारांचे असल्यामुळे लग्न बंधनात न अडकता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करतात.

बोलता बोलता ५ वर्ष होतात रेलेशनशिपला. तक्रारी ह्या सुरुच असतात पण त्या थोड्या वेळापूरता. दोघांमध्ये कमालीची understanding असते. त्या जोरावर आर्ट गॅलरी मस्त सुरु असते, अतुलने क्लिक केलेल्या जंगली प्राण्यांच्या फोटोंना मोठ मोठ्या हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते तर वर्षाने पेंट केलेल्या कॅनव्हासची किंमत गगनचुंबी असते. दोघेही इतके प्रोफेशनल असून सुध्दा संसार सांभाळत असतात, एकमेकांना समजून घेत असतात. त्या दोघांच प्रेम आणि करिअर बघून इतर लोकं त्यांचं कौतुक करत असतात. समाजात त्यांना फार मान असतो. शेवटी कलाकार, हा त्याच्या कलेनेच ओळखला जातो. पण इथे सगळंच गुडी गुडी कसं असणारं ?

अमोलला वाईट संगत लागली होती. त्याचे मित्र हे अट्टल दारुडे होते, सुरुवातीला अमोल अजिबात दारु घेत नसे पण घे रे थोडी, एक ग्लासाने काही नाही होणारं, असे बोलून तो कधी दारुच्या आहारी गेला समजलेच नाही. त्याचं हळू हळू कामाकडे दुर्लक्ष होऊ लागलं, मित्रांसोबत पार्टी, पब्स, ड्रिंक्स सारखे प्रकार रोजच होऊ लागले. त्यामुळे वर्षा आणि अतुल मध्ये कडाक्याची भांडणं होऊ लागली.

अतुल मित्रांवर पैसा उधळू लागला. वर्षाने अनेकदा वॉर्न करून सुध्दा अतुल ऐकायला तयार होत नव्हता. त्याचं आता पूर्णतः करिअर वरचे लक्ष उडून गेले होते. रोज मजा मस्ती करायची हाच जीवनाचा उद्देश राहिला होता. म्हणूनच मित्रांची संगत जीवनात फार महत्वाची असते, ज्याला कृष्ण सखा बनून लाभला त्याचा अर्जुन जाहला, अन् दुर्योधनास मित्र बनवून कर्ण धुळीत लोळला…

त्या दिवशी वर्षाला जेव्हा समजते, अतुल ड्रग्सच्या आहारी गेलाय त्या दिवशी तिला खुपचं अस्वस्थ वाटू लागते, माझा अतुल माझ्यापासून आता खुप दूर गेलाय, हा तो स्वप्नांच्या मागे धावणारा अतुल नाही, माझा अतुल खुप अंबिसिअस आहे, अजून आम्हाला मिळून बरीच मजल गाठायची आहे. मी ह्याला ह्यातून बाहेर काढणारं. अशी नाही ढकलू शकत नैराश्येच्या दरीत.

प्रेमात खुप ताकद असते असं म्हणतात, मी जीवाच्या आकांताने त्याला वाचवेन. त्याचंही प्रेम आहे माझ्यावर, तो माझं नक्की ऐकेल, उद्या सकाळी मी आधी ह्या विषयावर बोलेन. बघू तो कसा रिॲक्ट होतो. सकाळ होताच अतुल कान पकडून नेहा कडे माफी मागतो, परत अशी चूक नाही करणारं, मला एक चान्स दे. वर्षाचा राग अगदी काही क्षणांत शांत होतो.

एखाद आठवडा गेल्यानंतर अतुल पुन्हा मित्रांच्या नादी लागून ड्रग्स घ्यायला सुरुवात करतो, आणि त्याचं प्रमाण शरीरात इतके जास्त होते की त्याला फूड पॉइस्निंग होऊन हॉस्पिटल मध्ये admit करायची वेळ येते. ह्या वेळेस तो वर्षाच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता.. त्याने तिचा विश्वासघात केला होता. वर्षा ह्यावर काहीच react करत नाही. त्याची काळजी अगदी शांतपणे घेते, मात्र तिच्या मनात एकच विचार सुरू असतो, अतुल आता ह्या दलदलीत साफ अडकला आहे मला ह्यातून त्याला बाहेर काढावे लागेल. नुसती भांडणं आणि चिडचीड करून काही फायदा नाही उलट तो अजूनच व्यसनाधीन होत राहील.

ती लगेच मैत्रिणीला फोन करून सर्व हकीकत सांगते आणि व्यसनमुक्ती केंद्राला भेट देते. तिथले कौन्सेलर वर्षाला सर्व काही नीट समजावून सांगतात. अशा व्यक्तीसोबत कसे वागायचे हे तिला नीट समजावतात, तुमचं प्रेमच त्याला ह्या नरकातून वाचवू शकते. सावित्रीने तर यमाकडून तिच्या नवऱ्याचे प्राण मागितले होते, इथे तुमची लढाई तुमच्या सोबतच आहे. त्याला मायेने समजून घ्या. जी गोष्ट तु करत आहेस ती किती वाईट आहे हे न सांगता ह्याने तुझं काय नुकसान होतंय हे शांतपणे समजून सांगा. वर्षा मनात ठाम निर्णय घेते, मी माझ्या अतुलला पूर्वीसारखा बनवणार. माझं जून प्रेम मी परत मिळवणारं, हीच माझी जिद्द आहे.

काही दिवसांत अतुल मध्ये कमालीचा बदल दिसू येऊ लागतो, मित्रांचे फोन आले की, उडवा उडवीची उत्तरं देऊन टाळाटाळ करू लागतो. रात्रीची झोप लागत नसेल तर वर्षा स्वतः त्याला मांडीवर डोके ठेवून झोपावत असे. कधी कधी स्वतःच्या हाताने भरवत असे. सर्व त्याच्या आवडीचे करी, जेणेकरून त्याचं मन प्रसन्न राहील. आणि बघता बघता अतुल पुर्णतः ड्रग्सच्या कचाट्यातून मुक्त होतो. हे शक्य करुन दाखवले वर्षाच्या प्रेमाने. अतुलने आता त्या मित्रांचे नंबर मोबाईल मधून कधीच डिलिट केले होते. दोघांनी मिळून आधीसारखे काम सुरू केले.

हो, ती हट्टी होती आणि म्हणूनच तिने मोडलेला डाव जिंकला. सारा खेळ इच्छा शक्तीचा असतो. शेवटी तिने तिचं प्रेम मिळवलचं.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!