Skip to content

नव्याने प्रेमाचे सूर गवसले,अन् पुन्हा एकदा मोगरा फुलला…

नव्याने प्रेमाचे सूर गवसले,अन् पुन्हा एकदा मोगरा फुलला…


हर्षदा नंदकुमार पिंपळे


एक दरवळणारी प्रेमकथा-
पहिला पाऊस अन् मोगरा

पहिला पाऊस अनुभवला मी तो तुझ्या डोळ्यातून बरसताना….!!तुला मोगरा हवा होता अन् बाहेर पाऊस कोसळत होता.तुला आठवतय का….?? तु त्या मोगऱ्यासाठी माझ्याशी अबोला धरला होता.तसा मोगरा काही आपल्यापासून दूर नव्हता.आपल्या त्या पलिकडच्या अंगणातच तर तो होता.मी जाणारच होतो त्या अंगणात पण तो धो-धो कोसळणारा पाऊस , ढगांची गर्जना ,बेभान वाहणारा वारा आणि कडाडणाऱ्या विजा पाहून तुच मला अडवल होतं.

मला माहीत नाही मी पळुन जाऊ नये म्हणून की तु घाबरत होतीस म्हणून पण ,तू माझे हात हातात घेऊन मला घट्ट पकडलं होतं.तु तर इतकी रुसली होतीस की ,आपल्यासाठी कडक चहाही करायला तयार नव्हती.आणि मी चहा बनवला तर तो चहा तू प्यायलाही तयार नव्हती.किती किती हिरमुसली होतीस गं तू…..त्या गंधाळणाऱ्या मोगऱ्यासाठी..!! अगं आणि तुला मोगरा हवा होता ,पण तुझ्याच त्या लाडक्या पावसामुळे तो अंगणात भिजत होता.तो पांढरा शुभ्र मोगरा आनंदाने त्या पावसात मनसोक्त भिजत होता.

पण “सदा फुलणाऱ्या” माझ्या “मोगऱ्याची” केव्हा “अबोली” झाली क्षणभर मलाही काही कळाल नाही.मोगरा आणि तुझं काय connection होतं ते मला उमगतच नव्हतं.क्षणार्धात तु तर तुझ्या त्या लाडक्या पावसाला रागवागयला लागली होती.तो त्या अंगणात पावसात भिजत होता गं आणि तिथे मी… तुझ्यासोबत होतो.तरीही मी सोबत असताना तु का इतकी कावरीबावरी झाली होतीस गं..? असं मी तुला विचारलं तेव्हाही तु ते तुझे गोबरे गोबरे गुलाबी गाल टम्म फुगवून बसली होतीस.तुझे ते गोल गोल टपोरे डोळे आणि ते गुलाबी गाल बघताना माझ्या पोटात फुलपाखरं भिरभिरत होती.हो आणि मनात मोगराही दरवळत होता ,तुझ्या प्रेमाचा..!!

हळुहळू पाऊस ओसरत होता ,पण तो तुझा रुसवा काही कमी होत नव्हता.तुला काही केलं तरी तो अंगणातला मोगराच हवा होता.कदाचित पावसाने तुझ्या शिव्या ऐकल्या होत्या.त्यानी क्षणभर का होईना,विश्रांती घेतली होती.त्याने विश्रांती घेताच तु अंगणात धावत धावत जाऊन तुझ्या मोगऱ्याला मिठीच मारली.त्याला तु किती प्रेमाने न्याहाळत होतीस.त्या मोगऱ्याला पाहून तु खरच वेडी झाली होतीस गं.तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसणं म्हणजे जणू मला सुखाचा प्रेमळ स्पर्शच भासत होता.

तु कितीतरी वेळ मोगऱ्यातच गुंग झाली होती.आभाळातून बरसणाऱ्या त्या मंद सरी ,मंद वारा अन् सभोवताली पांघरलेल्या त्या हिरव्या शालीत मुक्तपणे पहुडलेला “मोगरा”…मी माझ्या डोळ्यांच्या कॅमेरात टिपला होता.तसचं तुझ्या त्या कोकणातल्या “बकुळी” आजीने दिलेल्या कॅमेरातही मी हा फुललेला मोगरा टिपला होता.केवळ तुझ्यासाठीच सखे….!! पण एवढ सगळ होऊनही तुझं आणि मोगऱ्याचं connection मला हवं तसं उमगलं नव्हतं.तु कधी सांगितलही असशील ,पण मला तेही आठवत नव्हतं.हे मोगरा आणि तु नक्की काय समीकरण…? (मी स्वत:शीच बडबडत होतो)… माझं हेच बोलण तु ऐकल आणि तु बोलायला लागलीस….

अरे ती आपली पहिली भेट…”अरे,अरे तो मोगरा” तु विसरलास कशी ती आठवण..?तुला आठवतय का..?का कोण जाणे मला मोगरा बिलकुल आवडायचा नाही आणि काॅलेजमध्ये असताना तू त्याच मोगऱ्याच्या बागेतल्या नाजुक कळ्यांचा,फुललेल्या फुलांचा माझ्यावर वर्षाव केला होता.मला ते तुझ वागणं मुळीच आवडल नव्हतं.कारण कुणी असं अचानक अनोळखी येतं आणि मला न आवडणारा मोगरा माझ्या अंगावर…..

मी मनात तुला शिव्याच दिल्या होत्या.तेव्हा मला तुझा खरचं खूप राग आला होता. माझ्याशी मैत्री करण्यासाठी तु तेव्हा काय काय केल होतस तुझ तुलाच माहीत.हळुहळू का होईना आपली मैत्री त्या मोगऱ्यासारखीच फुलत गेली.अजून एक गोष्ट ,तु मला मुद्दाम भेट म्हणून मोगऱ्याचं रोप दिलं होतं आणि एखादं झाड नाकारणं मला पटल नव्हतं.मीही ते रोप मनापासून नाही,पण स्विकारल होतं.तेव्हापासून तो मोगरा माझी जबाबदारी होती.

त्याला मी खूप जपलं.कधी कोमेजु नाही दिलं.मलाही त्या मोगऱ्याचा सहवास नंतर हवाहवासा वाटू लागला होता.त्याचा स्पर्श,त्याचा तो सुगंध मनाला मोहून टाकणारा होता.सख्या…तोच मोगरा आज आपल्या अंगणात बहरतोय.जो सतत मला माझ्या अवतीभवती हवा आहे.अंगणात नको…पाऊस आला की मग तो एकटाच भिजतो मला सोडून.मला आवडत नाही ते त्याच अस वागणं.मला त्याला कधीच अंतर नाही द्यायच रे.ऊन्हात-पावसात मला त्याच्यासोबतच दरवळायचय……..

मी तिचं बोलणं ऐकता ऐकता हरवून गेलो होतो.मी दिलेल्या मोगऱ्याला तिने फुलवलं होतं.तिच्या या शब्दांनी मला “माझा मोगरा” फुलल्याची जाणीव करुन दिली होती.मोगऱ्याचं आणि तिच ते गोड connection मला उमगल होतं.अन् क्षणात,गीतकार अशोक पत्कींनी रचलेल्या काही ओळी नकळत माझ्या ओठांवर आल्या…त्या अशा की, “दंवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला,क्षितिजावर लालिमा हसली…

मोगरा फुलला…नवा नवा भासतो चेहरा आज मला अपुला हा नजरेचा कौल अनोखा… मोगरा फुलला…” खरच मोगरा फुलल्याचा आनंद माझ्या डोळ्यातून बरसला….नव्याने प्रेमाचे सूर गवसले,अन् पुन्हा एकदा मोगरा फुलला..मोगरा हसला…!!



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!