Skip to content

होय, मी शरीर विकते… पण माझी सुद्धा एक Love Story आहे!!

होय, मी शरीर विकते… पण माझी सुद्धा एक Love Story आहे!!


सौ. शमिका विवेक पाटील


साहेब, आज नको ना. सकाळ पासूनची चौथी वेळ आहे. खुप त्रास होतोय, आजची रात्र दुसरी कोणीतरी बघा, माझ्याने नाही होणारं. कमलाबाई अगदी विव्हळत समोरच्या राकट पुरुषाला विनवण्या करीत होती पण कसलं काय. त्या राक्षसाला फक्त शरीराची आग शांत करायची होती. एकदा दलालाने गिऱ्हाईकाला रूम मध्ये पाठवले की गिऱ्हाईकाच्या मर्जिशिवाय कुठलीही बाई खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाही. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो तुटून पडला २१ वर्षीय कमलावर.

एखादं फुलं पायाने तुडवावं तसं तो तिला तुडवत होता. अनंत कळा ती शांतपणे सहन करत होती. मध्यरात्री जाग आली तेव्हा खोलीत कोणीच नव्हते. कदाचित तो गेला असेल निघून. दरवाज्याला कडी लावून सुध्दा काय फायदा ? म्हणून ती तशीच पडून राहते. डोळे पाण्याने भरतात, घरची आठवण येते. कशी असेल माझी आई ?

नोकरीचं आमिष दाखवून कमलाला गावावरून शहरामध्ये आणले होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिचा सौदा होतो. रोज नवीन गिऱ्हाईक, ते काटे टोचनारे स्पर्श, मोगऱ्याचा घमघमाट, रोज नव्या अत्तराशी ओळख, इथे येणारा प्रत्येक जण वासनेचा भुकेला, शरीराच्या नुसत्या चिंध्या वेशीवर टांगलेल्या असायच्या, पोट भरण्यासाठी पोटाखालचा भाग विकावा लागायचा, विरोध करून पण किती करणारं. शेवटी गावी गरीब आईला आणि भावाला पैसे पोहोचतात हे कळल्यावर कमलाने आहे ती परिस्थिती स्वीकारली. आणि वेश्या नावाच्या अग्निकुंडात स्वतःच्या स्वप्नांची आहुती दिली. कमलाची कमला बाई बनली आणि लाज सोडून शरीर विक्रीचा धंदा सुरू केला…

एका रात्री त्याची आणि कमलाबाईची भेट झाली. गिऱ्हाईक बनुन तो आला. तो म्हणजे सडपातळ बांधा, शर्ट इन केलेला, डोळ्यावर मस्त लेटेस्ट डिझाईनचा चष्मा, गळ्यात लॅपटॉपची बॅग, केस घामाने भिजलेले. त्या दिवशी तो पहिल्यांदा मित्रांबरोबर आला होता. आणि पहिल्याच खेपेला त्यांची कमला सोबत डील फिक्स झाली… खोलीत प्रवेश केल्या केल्या त्याला एक वेगळीच घुसमट वाटू लागली आणि तो कमलाला डायरेक्ट बोलला, हे बघा मी इथे मित्रांनी जबरदस्ती केली म्हणून आलोय, मला ना तुमच्यात इंटरेस्ट आहे ना काही करण्यात. so plzz मी थोड्या वेळासाठी इथे बसतो. मित्रांचं झालं की जाईन मी निघून.

असे बोलत तिथे असलेल्या एका खुर्चीवर तो बसतो, कमला बिछान्यावरच बसलेली असते. दोघांची नजरा नजर होते आणि दोघेपण माना वळवतात. पुन्हा थोड्या वेळाने… Hi, माझं नाव हरीश, मित्र मला हरी म्हणतात. तुमचं नाव काय ? कमला प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पहातच बसते. आज पर्यंत तिला कोणी नाव विचारले नसते. ती तोंडातल्या तोंडात नाव पुटपुटते. काय म्हणालात ? कमला बाई ? त्यावर तो लगेच बोलतो, नावापुढे बाई हा शब्द लावायलाच हवा का ? नुसते कमला किती सुंदर वाटते ऐकायला. तुमचं वय काय असेल ओ ? आणि शिक्षण झालंय का नाही तुमचं ?

त्याच्या प्रश्नांचा भडीमार ऐकून कमला पुरती बावचळते. हे बघा आम्हाला वयक्तिक माहिती सांगण्यास मनाई आहे. असे बोलून कमला पाणी प्यायला ग्लास हातात घेते. मला पण थोडं पाणी मिळेल का ग कमला ? त्याच्या मधूर बोलण्याने ती क्षणात पाघळते. आज पर्यंत अनेक जणांनी हाक मारली पण ह्याने जे नाव घेतलं ते खूपच वेगळं वाटलं…

ए कमला, माझ्याकडे समोसे आहेत तु खाणारं का ग ? मगाशी ऑफिस मधून सुटलो तेव्हा भूक लागली होती उभ राहून खायला वेळ नव्हता म्हणून पार्सल घेतले आणि अचानक मित्र इथे घेऊन आले. तसे माझे मित्र चांगले आहेत, माझी सगळी family गावी राहते आणि मी कामासाठी इथे राहतो. माझे मित्र आणि मी एकत्रच राहतो. पगार पाणी सगळं व्यवस्थित आहे. ये ना, हा घे समोसा. हे काय सुरू आहे ह्याचं ?

कमलाच्या चेहऱ्यावर मात्र शुन्य हावभाव होते. ती काहीच न बोलता पुढे येते आणि समोसा घेऊन खायला सुरुवात करते. समोसा खाऊन तिला बरेच महिने झाले असतील तिला असा पटापट समोसा खाताना पाहून त्याला हसू येतं. का ग ? तुला काय समोसा खायला मिळतं नाही का ? जरा दमाने खा ना. ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि दुसरा समोसा घेऊन खायला सुरू करते…

साहेब, इथे येणारा प्रत्येक माणूस नुसती वासना घेऊन येतो, पण आज पहिल्यांदा कोणीतरी असे खायला आणले आहे. तुम्ही समोस्याचं काय घेऊन बसलात, खोलीच्या बाहेर जाऊन मला वर्ष झालं असेल. डाळ भात मिळेल ती भाजी खाऊन दिवस काढावे लागतात. पोटभर जेवायला मिळते तेच खुप आहे. इथे फक्त व्यवहार होतो शरीराचा. ना तारीख माहित ना वार माहित, आला दिवस कोणाच्यातरी वासनेखाली निजायचे.

कोणी उगीच सांत्वन करून शरीराचे मजे घेत असतं तर कोणी बॉसचा राग काढतं असतं तर कोणी पैसे वसूल करत असतं, सिगरेट चे किती चटके आणि दारूचा भयानक वास एक दिवस सुध्दा सुखाची झोप देत नाही. मला काय हवंय ? हा प्रश्न कोणी विचारातच नाही. आणि का विचारेल कोणी ? शेवटी मी एक वेश्या…

बरं, सांग तुला काय हवंय ? हरीच्या ह्या प्रश्नापुढे कमला त्याच्या पायाशी बसते आणि म्हणते माहित नाही पण तुमच्या नजरेत एक पारदर्शकपणा जाणवला.. कपट नाही, लोभ नाही, हवस नाही, तुम्ही खुप चांगले आहात…कमला, मला तुझ्या भूतकाळात काय घडलं हे नको सांगुस कारण तुझ्या बोलण्यातून तू खुप त्रास सहन केला असशील हे दिसून येते… तू मनाने खूप साधी भोळी आहेस. इथली लोकं तुझा खूप गैरफायदा घेत असणारं. उद्या येशील का माझ्यासोबत फिरायला ??

कमलाचे डोळे पाण्याने भरतात आणि ती अगदी मुसमुसुन रडायला लागते. अग खरंच विचारतोय मी, मला खास कोणी मैत्रिणी नाहीत, मित्र आहेत त्यांच्यासोबत जास्त शेअरिंग करत नाही पण तुझ्यासोबत खुप बोलवसं वाटलं, तुझं ऐकावंस वाटलं. मी बोलून बघतो तुझ्या दलालासोबत.

नको साहेब, राहुद्या… आता इथला अंधार हाच माझा सोबती आहे. बाहेर उजेडात लोकांच्या नजरा मला जगू देणारं नाहीत. प्रत्येक वाटेवर एक ना एक पांढरपेशी माणसं नजरेला येतील, मला भर गर्दीत नजरेनं नग्न करतील, मेल्याहून मेल्यासारखे होईल. माफ करा, पण बाहेरचा उजेड नकोच. मी तुला भेटायला इथे आलो तर चालेल का ग ? कमलाला हसू येते. काय साहेब, गरीबाची थट्टा करता का ? तुम्ही बदनाम व्हाल ह्या गल्लीत. आज आलात परत नका येऊ कधी. देवाची मुर्ती जरी आणून बसवलित तरी तुम्हाला नाव ठेवेल हा समाज.

आपला समाज आतून खूप पोकळ आहे, त्यांना वेश्या नकोत पण आया बहिणींनी सुरक्षित असायला हवे. आम्ही हा धंदा करतो म्हणून किती जणींची अब्रू जाण्यापासून वाचली आहे. हे सगळे अगदीच मनापासुन नाही करत कोणी, माझ्यासारख्या कितीतरी पोरींचा सौदा होत असेल दिवसाला पण त्यावेळी हा समाज कडक कपड्यांमध्ये फेटा घालून मिरवत असतो. जाऊदे साहेब, बोलायला गेलं तर अख्खी रात्र कमी पडेल. तुम्हाला उशीर होत असेल. नाही कमला, तु बोल मी ऐकतोय ना.. आणि सतत ते स्वतःला वेश्या म्हणून बोलू नकोस तू एक स्त्री आहेस स्वतःचा सन्मान कर, जे काम करतेय ते पोटासाठी करतेय… त्याच्या ह्या बोलण्यावर कमला प्रेमात पडली. पुर्ण रात्र त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या, कधी पहाट झाली हे समजलंच नाही. चल, येतो मी. नशिबात असेल तर पुन्हा भेटू. डोळे पुसत कमला त्याला दारापर्यंत सोडायला जाते.

मनात एक आशेची पालवी फुटते, दिवसभर त्याचेच विचार मनात घोळू लागतात. पहिल्या प्रेमाची चाहूल तिच्या मनाला प्रसन्न करून जाते आणि अचानक कोणाचातरी घाणेरडा स्पर्श तिच्या शरीराला भासू लागतो, पुन्हा तेच चक्र सुरू होते, शरीराची विक्री मनातल्या प्रेमाला साफ चिरडून टाकते. आणि एक दिवस अचानक…

दरवाज्याची कडी वाजते. कमला येऊ का ? आवाज ओळखीचा म्हणून ती वळून बघते तर, हरी हातात कसलीतरी पुडी घेऊन उभा असतो. खाणारं का गरमा गरम समोसे ? त्याचे बोलणे ऐकून तिच्या उदास चेहऱ्यावर प्रेमाची कळी पुन्हा उमलते…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “होय, मी शरीर विकते… पण माझी सुद्धा एक Love Story आहे!!”

  1. Khati vyatha aahe hi.. kitti chan mandani Kelli aahe….surekh fakt Sharir have asate premachya god nawakhali ….nahi mhatle tar prem khallas

  2. Sanjay Subhedar

    A really good issue, unfortunately a fact of our Society today and may be tomorrow but we should try to released them from such mental and physical extortion on Humanitarian ground, and hang them those who compelled them to live accordingly.
    Though it seems difficult but is possible if we decide.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!