Skip to content

स्वतःचे डोळे स्वतःच पुसणारी व्यक्ती Life मध्ये काहीही करू शकते!

स्वतःचे डोळे स्वतःच पुसणारी व्यक्ती Life मध्ये काहीही करू शकते!


मेराज बागवान


‘दुःख’ ही अशी एक गोष्ट आहे जी आयुष्यात नसेल तर आयुष्य हे बेरंगी असेल. कारण दुःख आहे म्हणून तर जीवन जगण्याला अर्थ आहे . दुःख आहे म्हणून आयुष्य जगण्यात खरी मजा आहे आणि दुःख आहे म्हणूनच तर सुखाला किंमत आहे. असे सर्व आहे त्यामुळेच दुःखाला जीवनात खूप महत्व आहे.

कोणतेही दुःख आयुष्यात कायम नसते. दुःख असले की नकळत डोळे भरून येतात. कधी कधी घळाघळा अश्रू वाहतात तर कधी आतल्या आत अश्रूंचा पूर भरून साचू लागतो. पण कितीही दुःख झाले तरीही त्यातून उठून उभे राहावेच लागते , आयुष्यात पुढे जाण्यासाठी. काही व्यक्ती असतात अशा की स्वतःला आकंठ बुडवून घेतात दुःखात आणि जणू स्वतःच्या आयुष्यालाच ब्रेक लावतात. मात्र मनावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात आणि दुःख बाजूला सारून आयुष्याची पुन्हा नव्याने सुरवात करावी लागते. आणि अनेकवेळा स्वतःचे डोळे स्वतःच पुसून मार्गक्रमण करावे लागते.

आज आपले सर्वांचे आयुष्य असे झाले आहे की कोणाला कोणासाठी खास असा वेळ नाही.अगदी रक्ताची नाती देखील वेळप्रसंगी जवळ नसतात. काही मित्रपरिवार जरी असेल तरीही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ते व्यस्त असतात. म्हणून प्रत्येक वेळी त्यांची मदत मिळेलच असे नाही.काही समस्या असेल आयुष्यात तर आजकाल सर्वत्र ‘समुउपदेशक संस्था, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ’ उपलब्ध आहेत. आणि हे सर्व जण जरी असतील तरी ते फक्त मार्गदर्शन , सल्ला देऊ शकतात मात्र खरी समस्या ही आपली आपल्यालाच सोडवायची असते. दुःख आपले आपणच भोगायचे असते. म्हणून नेहमी कोणाची वाट न बघता , कोणी मला या दुःखातून बाहेर काढेल असा विचार करण्यापेक्षा स्वतःच स्वतःचे डोळे पुसले तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो.

कोणीतरी येईल आणि चमत्कार घडेल, कोणीतरी आपल्याला दया, सहानुभूती दाखवेल असे छोटे विचार करून आपण स्वतःलाच कमी लेखतो आणि नशिबावर सर्व गोष्टी सोडून देतो. जसे की , ‘माझे नशीबच फुटके’,’माझ्या नशिबात हेच लिहिलंय’ अशी वाक्ये आपण स्वतःलाच म्हणतो आणि स्वतःला कमकुवत सिद्ध करतो. पण आयुष्यात पुढे जायचे असेल तर खूप कणखर असणे गरजेचे आहे.

कोणतीही समस्या आली तर मी त्यातून मार्ग काढेन , जरी रडू आले , डोळे अश्रूंनी गचच भरून आले तरीही मी स्वतःच स्वतःचे डोळे पुसून पुन्हा नव्याने उठून उभी राहीन असा विचार करणे आज खूप गरजेचे आहे.

एक मध्यमवर्गीय घरातील गृहिणी होती.कधीही घर सोडून कुठेही बाहेर न गेलेली.घर , नवरा, मुले, सासू-सासरे एवढेच काय तिचे जग. तशी कम्फर्ट वातावरणात जगणारी ती एक गृहिणी होती. अचानक एके दिवशी तिच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडते. एका अपघातात तिच्या पतीचा अकाली मृत्यू होतो आणि जणू तिचे घरच उध्वस्त होते.

लहान मुले, वृद्ध सासू-सासरे सर्वांची सर्व जबाबदारी त्या गृहिणीवरच येऊन पडते. कधीही जग न पाहिलेली ती परिस्थितीशी लढत घराबाहेर पडते , स्वतःचा व्यवसाय उभारते , स्वतःच्या पायावर उभी राहून घर यशस्वीरीत्या सांभाळते आणि एक कर्तबगार उद्योजिका म्हणून नावारूपास येते.

मात्र वाटतो तेवढा तिचा हा प्रवास सोपा नाही. ती हे सर्व करू शकली कारण तिचा तिच्यावर विश्वास होता, कोणी येऊन आपल्याला मदत करेल , आपले डोळे पुसेल अशी अपेक्षा न ठेवता पती गेल्याचे दुःख बाजूला ठेवून ती आपल्या घरासाठी खंबीर बनते आणि आयुष्यात यशस्वी होऊन दाखविते. म्हणूनच स्वतःच स्वतःचा आधार होता आले पाहिजे. सारासार विचार करून सकारात्मक दृष्टी ठेवली तर हे साध्य करता येऊ शकते . स्वतःवर अटमविश्वास असेल तर आयुष्यात अशी व्यक्ती काहीही करू शकते. फक्त जे होईल ती जबाबदारी घेण्याची तयारी हवी. त्या गृहिणीसारखी जगात अशी अनेक उदाहरणे आहेत जी स्वतःच स्वतःचा मार्ग काढतात आणि आयुष्यात खूप काही करू शकतात.

आयुष्यात अनेक नकारांना सामोरे जावे लागते.कोणतीही गोष्ट पटकन नाही मिळत. काहींना शैक्षणिक जीवनात हव्या त्या कॉलेज मध्ये , शाळेत प्रवेश मिळत नाही. अनेकांना लग्न जुळविताना अनेकदा नकार मिळतात. तर काहींना नोकरी मिळविताना नकार मिळतो. काही नाती तुटतात,कायमचे विभक्त व्हावे लागते. अशा वेळी सहाजिकच थोडे वाईट वाटते. रडू कोसळते.नैराश्य देखील येऊ शकते. पण हीच वेळ असते , कोणाची वाट न बघता स्वतःला सावरून पुढे जाण्याची.

कारण आयुष्यात एक दरवाजा बंद झाला की दुसरा हा उघडतोच. काही काही वेळेस नकार मिळणे देखील गरजेचे असते. त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. ‘दिल में आग पैदा होने के लिये जिंदगी से ठोकर मिलना भी जरुरी होता है’.म्हणूनच जे होते ते चांगल्यासाठीच होते हा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो.

काही प्रमाणात आयुष्यात नशिबाचा देखील भाग असतो. पण तो फक्त काही प्रमाणात.बाकी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. कष्ट, जिद्द असेल तर आयुष्यात पुढे जात येते.कोणावरही कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक बाबतीत स्वतः मार्ग काढणे गरजेचे असते. पण या मध्ये आपल्या जवळच्या आपल्या माणसांना विसरून देखील चालत नाही.

काही माणसे आपल्या आयुष्यात अशी असतात की प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या सदैव ती आपल्यासोबत असतात. आणि आपण देखील असेच आपल्या प्रियजनांसाठी करीत असतो. पण काही वेळेस त्यांच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलू लागतात,काही जबाबदाऱ्या असतात ज्या त्यांना दुर्लक्षित करून चालत नाहीत.मग अशा वेळेस ‘आत्मनिर्भर’ होण्याची वेळ येते.

जीवनात असे काही क्षण येतात ज्यामुळे आपले आयुष्यच पूर्णतः बदलून जाते किंवा एका नवीन वळणावर येऊन थांबते. अशा वेळी स्वतःला जाणून घेणे गरजेचे असते. भावनांना बाजूला ठेवून काही कठोर निर्णय घ्यावे लागतात.म्हणून सतत डोळे ओले ठेवण्यापेक्षा त्याच ओल्या डोळ्यांना स्वतःची ताकद बनवता आले पाहिजे. ‘हे अश्रू च मला जीवनात पुढे घ्यायला आले आहेत.हे अश्रू जसे वाहून जातील त्या अश्रूंबरोबर माझे दुःख देखील वाहून जाईल’ हा विश्वास असावा लागतो.

आणि जर का दुःख अश्रूंबरोबर तिथेच अडखळत राहत असेल तर ‘मी स्वतःहून त्या अश्रूंना पुसून टाकेन म्हणजे दुःख देखील मागे पाडेन’ असा दृष्टिकोन असणे महत्त्वाचे असते. कारण त्याच त्या दुःखात कायम अडकून पडलो तर आयुष्यात पुढे कधी जाणार ?

स्वतःसाठी आयुष्यात ‘स्वार्थी’ होणे देखील जरुरीचे बनते. जसे की आयुष्यात अनेकदा आर्थिक परिस्थिती बेताची राहते. खूप काळ हलाखीच्या परिस्थिला सामोरे जावे लागते. स्वतःमध्ये तेवढी पात्रता असून देखील अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात.मग आयुष्याच्या एका वळणावरती एक नवीन मार्ग दिसू लागतो.आणि परिस्थिती सुधारण्याची एक संधी तो मार्ग दाखवू लागतो.मग अशा वेळेस स्वतःसाठी त्या नवीन मार्गावर च काही काळ संयम ठेवून टिकून राहणे शहाणपणाचे असते.

नवीन मार्ग निवडताना अनेक भावनिक गोष्टींना देखील सामोरे जावे लागू शकते. पण जर का हा नवीन मार्ग आपल्याला आपले दुःख कमी करण्यास , आयुष्यात प्रगती करण्यासाठी मदत करत असेल तर काही गोष्टी तिथेच ठेवून , काही काही वेळेस विसरून पुढे जावे लागते. आणि काही भावनिक गोष्टी असतीलच तर त्या गोष्टी देखील आपल्याला आपल्या नवीन मार्गात आपली साथ देतील , आपल्याला समजून घेतली. फक्त ह्या सगळ्यात गरजेचा असतो तो संयम आणि विश्वास.

काळ ह्या सगळ्यात खूप मोठी भूमिका बाजवतो. ‘काळ’ हे सर्व दुःखांवर प्रभावी औषध असते. काही गोष्टी काळानुरूप चांगल्या होतात. आणि अशा वेळी काळावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. पण या सोबतच स्वतःच स्वतःचे समुपदेशन करून आयुष्य जगणे देखील महत्वाचे असते.काही वेळेस भावनिक गुंता ,गोंधळेपणा इतका वाढतो की अनेक मार्ग दिसत असून देखील निर्णय घेणे जिकरीचे होते.मानसिक गोंधळ प्रचंड होतो, गुंतागुंत वाढू लागते. मग अशा वेळेस काही सुचत नसेल तर , स्वतःसाठी नाही पण आपल्या प्रियजनांसाठी तरी स्वतःचे डोळे पुसून आयुष्य जगणे योग्य ठरते.

काही गोष्टी आयुष्यातुन निसटून चाललेल्या आहेत असे वाटते. मग त्यांचा पाठपुरावा करणे , त्यासाठी प्रयत्न करणे आपल्यासाठी आवश्यक असते. पण तरी देखील त्या गोष्टी आपल्याला मिळत नसतील किंवा आपल्याला त्या साठी थांबावे लागत असेल तर थोडे थांबणे देखील बरोबर असते. जर त्या गोष्टी आपल्यासाठीच असतील तर त्या आपल्याला मिळतीलच पण तोपर्यंत प्रयत्न करणे, विश्वास ठेवणे, भावनिक समतोल साधून ठेवणे आणि संयमी राहणे एवढेच काय ते आपल्या हातात असते.

‘आत्महत्या’ , ही तर आजकाल खूप सहज केली जाणारी बाब झाली आहे. थोडे काही झाले की मागचा पुढचा कोणताच विचार न करता , संयम न दाखवता अगदी टोकाचा विचार करून आयुष्य माणसे एका झटक्यात संपवून टाकत आहेत आणि आयुष्याशी लढाई हरत आहेत. सतत वाढत जाणाऱ्या आत्महत्या हे अत्यंत कमकुवत समाजाचे आणि मानसिकतेचे लक्षण आहे. म्हणूनच बळकट असे मानसशास्त्र उभे करणे हे आपल्यापुढे खूप मोठे आव्हान आहे.

‘नियती’, ‘कर्म’, ‘भाग्य, ‘नशीब’ ह्या गोष्टी एक बाजूला आणि आपली ‘मानसिकता’, ‘मानसिक दृष्टिकोन’ ,’वैचारिकता’,’दृष्टिकोन’ ह्या दुसऱ्या बाजूला असतात. दोघांचा एकमेकांशी संबंध असतो. मात्र ही जी दुसरी बाजू आहे ती नेहमीच पहील्या बाजूपेक्षा वरचढ असायला हवी. जे की फक्त आपल्या हातात असते. त्याला इतर कोणीच काहीच बिघडवू शकत नाही. आपण मानसिकरित्या जेवढे बळकट असू तेव्हढे जास्त नियतीला, नशिबाला आपल्यासमोर झुकावे लागते. म्हणूनच ‘मानसिक आरोग्य’ जपणे आणि स्वतःच स्वतःचे डोळे पुसून जगता आले पाहिजे आणि हेच खरे जगणे असे म्हणता येईल.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “स्वतःचे डोळे स्वतःच पुसणारी व्यक्ती Life मध्ये काहीही करू शकते!”

  1. Chandrashekhar Barde

    👍तू ज्या मार्गाने जातोस, तो डोळा भरून बघ
    जे येतात ते येवू दे, जे जातात ते जावू दे
    नसेल कुणी सांगाती, तर आपल्याच डोळ्यातील पावसाचा वसा घेवून समोर जायचं,
    ज्या दगडाने ठेच दिली, त्याचाच देव करायचा
    आणि यशाची पणती तेवत ठेवायची.
    * मेघराज****
    चंद्रशेखर ल. बर्ड

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!