Skip to content

प्रेम एक अद्भुत ताकद.. ज्याने अनुभवलं तो खरंच ग्रेट माणूस!!

प्रेम एक अद्भुत ताकद.. ज्याने अनुभवलं तो खरंच ग्रेट माणूस!!


सौ. शमिका विवेक पाटील


बाहेर पावसाची रिमझिम. शितल वाऱ्याची झुळूक. सोबत गरमा गरम चहाचा कप आणि बोलायला कोणाची तरी सोबत. बस हे सर्व भेटले की जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. पण रोहन मात्र ह्या सर्वाला मुकला होता. त्याच्याकडे सारे काही होते पण सोबत मात्र कोणाची नव्हती.

रोहन एका मोठ्या कंपनमध्ये इंजिनिअर होता. मूळचा तो गावाकडचा. आई, वडील आणि भाऊ असे छोटेसे कुटुंब होते. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला मुंबई मध्ये मोठ्या पगाराची नोकरी लागली आणि तो इथेच स्थायिक झाला. स्वतःची गाडी, २ bhk फ्लॅट, बँक बॅलन्स हे सर्व काही त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर कमवले होते. लहान वयात त्याने खुप नाव, पैसा, संपत्ती मिळवले होते. आता तुम्ही विचार करत असाल एवढा श्रीमंत, दिसायला देखणा तरीही सिंगल कसा? काहीतरी गडबड असेल!!!

रोहन कॉलेज मध्ये असताना फार लाजाळू होता. कोणत्या मुलीशी बोलायचे म्हणजे ह्याची हवा टाईट. नवीन एडमिशन घेतलेल्या प्रिया ने जेव्हा रोहन कडे नोट्स मागितल्या तेव्हा त्याची नजर तिच्या नाजुक चेहऱ्यावर खिळली, स्वप्नातली परी जणु अवतरली असे काहीसे वाटू लागले. बघता बघता त्या दोघांची छान मैत्री झाली, दोघांची मन जुळली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

रोहन अगदी तिच्या प्रेमात पार बुडून गेला होता, मात्र प्रिया चे काही वेगळेच सुरू होते. ती फक्त रोहनचा वापर करून घेत होती नोट्स पूर्ण करायला. हे सत्य जेव्हा रोहनला समजले तेव्हा त्याच्या मनात मुलींबद्दल इतका तिरस्कार निर्माण झाला की त्याच्या मते जगातल्या सर्वच मुली फायद्यासाठी जवळ येतात असे वाटू लागते.

कॉलेज मध्ये घडलेल्या फसव्या प्रेमापासून त्याने स्वतःला इतके कठोर बनवले की ह्यापुढे कधी लग्नच करायचे नाही अशा वचनात स्वतःला बांधुन घेतले, आणि पुढचा प्रवास एकट्यानेच करायचा निर्णय घेतला…

तर त्या रात्री रोहन मस्त लॅपटॉप वर गाणी ऐकत फेसबुक चाळत बसलेला… एका हातात चहाचा कप आणि दुसरा कीबोर्ड वर, रोहन पूर्ण मग्न झाला होता. आणि अचानक एक फ्रेंड रिक्वेस्ट येते. तो इग्नोर करतो. पण काय माहित त्याच्या मनात काय येते तो दुसऱ्याच क्षणाला accept करतो… सायली नाव कधी ऐकले नव्हते, कोणीतरी एक तिची mutual फ्रेंड होती…

असेल कोणीतरी असे मनातल्या मनात बोलुन तो झोपायला जातो. झोप काही केल्या येईना, आज पर्यंत इतक्या मुली आल्या गेल्या कोणालाच भाव दिला नाही मग सायली कोण ? असा प्रश्न त्याच्या डोक्यात वळवळू लागतो. तो तडकन उठतो, लॅपटॉप उघडतो आणि फेसबुक ओपन करून सायली चे प्रोफाइल चेक करू लागतो. तिचा dp वरचा फोटो एकदम निरागस, बोलके डोळे, लाल चुटुक ओठ, फिकट गुलाबी रंगाचा घातलेला ड्रेस, सारे काही त्याला नवीन दिसत होते. फोटो वर त्याची नजर खिळून राहते पण क्षणात तो स्वतःला सावरतो आणि लॅपटॉप बंद करून झोपायला जातो.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. सुट्टीचा वार असल्याने नो वर्क. मग पुन्हा सोशल मीडिया वर टाईम पास सुरू झाला. का कुणास ठाऊक रोहनला सायली कोण आहे? हे जाणुन घेण्यात इंटरेस्ट होता. त्याच्याने काही राहवले नाही त्याने तडक तिला Hi मेसेज पाठऊन दिला. सायली ऑनलाईन होती तिने सुध्दा लगेच रिप्लाय केला Hi…

आता मात्र रोहनची टरकली कारण त्याने सहज मेसेज केला होता… सायली ने विचारले, तू अमुक अमुक कंपनी मध्ये जॉब ला आहेस ना? हो, एवढेच उत्तर होते साहेबांचे. तिने परत विचारले तिकडे माझी चुलत बहीण जॉब ला आहे. आणि डिपार्टमेंट चे नाव सांगितले. ओळखतोस का तु तिला? नाही, माहित नाही, एवढे बोलुन शांत बसला.. आता मात्र नजर खिळली तिच्या येणाऱ्या मेसेज कडे. तिने गप्पा मारायला सुरुवात केली. ह्याला सुध्दा मज्जा येऊ लागली एका अनोळखी व्यक्ती सोबत विचारांची देवाण घेवाण करताना.

स्वतःवर त्याचा विश्वास बसत नव्हता की आपण कुठल्या तरी मुलीसोबत एवढ्या मन मोकळे पणाने बोलतोय. सायलीचा बिनधास्त स्वभाव रोहनला आपलेसे करून गेला. मग काय, दिवसभर दोघांचे मेसेज सुरू झाले, रात्री लेट पर्यंत गप्पा रमु लागल्या, दोघे एकमेकांच्या आवडी निवडी ओळखू लागले. ऑनलाईन जवळीक इतकी वाढू लागली की भेटायची इच्छा निर्माण होऊ लागली.

४,५ महिने हे दोघे असेच एकमेंकसोबत चॅटिंग करत होते. कधी? कुठून? कशी? प्रेमाची चाहूल लागली आणि दोघेही प्रेमाच्या वचनात बांधले गेले. ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतलेल्या रोहनच्या मनाचा ताबा सुटला आणि पुढल्या महिन्यात आपण भेटूया असा आग्रह त्याने सायली पुढे ठेवला.

तिनेही जास्त वेळ न घालवता हो भेटुयात ना असा रिप्लाय दिला. रोहनने सायलीला आधीच पहिल्या प्रेमाचे सत्य सांगितले होते, आणि तिच्याकडून वचन घेतले होते की ती कधीही त्याला सोडून जाणार नाही. मुलींबद्दल असलेला राग, द्वेष सायलीच्या प्रेमाने नष्ट केला होता. रोहन आता अगदी मन मोकळे पणाने कुठल्याही मुलीसोबत बोलू शकत होता.

भेटायची तारीख जवळ येते. दोघेही मनातून खुप खुश असतात. तु भेटायला येताना तुझा dp वरचा पिंक कलरचा ड्रेस घालुन ये..त्यात तु खूपच खुलून दिसतेस. रोहनची फरमाइश ऐकुन सायली लाजते आणि hmm एवढाचं रिप्लाय देते. वेळ आणि जागा ठरते. रोहन वेळेच्या आधीच जाऊन उभा राहतो. मस्त लाईट ब्लू कलरचे शर्ट त्याच्या रंगावर अजुनच खुलून दिसत असते.

बराच वेळ झाल्यानंतर रोहन सायलीला मेसेज करतो… where are you ? कधी पासून मी वाट बघतोय.. पण तिचा काहीच रिप्लाय येत नाही. आता मात्र हळु हळू रोहनचा पारा चढत जातो. तब्बल २ तास वाट बघितल्यावर तो घरी निघुन जातो. डोके आधीच तापलेले असते, घरी येतो आणि सरळ बिछान्यावर जाऊन पडतो. कधी डोळा लागतो हे त्याला कळतच नाही.

डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जाग येते. घाई घाईत उठतो आणि लॅपटॉप उघडून बसतो. सायलीचा काहीच मेसेज नसतो. त्याचा खुपचं मूड ऑफ होतो. मनातुन रागाची भावना निर्माण होते. काय झाले?  ऑल ओके ना? असे अनेक प्रश्न तो विचार करत असतो. २ दिवस तिच्या मेसेज ची वाट बघतो, पण काहीच नाही. सर्व मुली शेवटी सारख्याच असतात. मुलींबद्दल द्वेष करू लागतो.

अचानक ३ दिवसांनी सायलीच्या बहिणीचा मेसेज येतो. रोहन, सायली तुला आता भेटू शकत नाही. तिचा अपघात झाला ज्या दिवशी तुम्ही भेटणार होतात तु नेहमी आनंदात रहावे ही तीची इच्छा आहे…जास्त दिवस नाहीत तिच्याकडे, मेंदूला मार लागल्याने डोक्यात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत… काही दिवसात ती शुध्दीवर नाही आली तर उपचार करून सुध्दा बरे नाही होणारं… तिला तुला बघायचं होते हीची तिची शेवटची इच्छा होती. जमल्यास हॉस्पिटल मध्ये एकदा भेटून जा…

क्षणभर रोहन स्तब्ध बसुन राहतो. २, ३ वेळा मेसेज वाचतो. आणि कसलाही विचार न करता तो लगेच सायलीला भेटायला हॉस्पिटल मध्ये जातो… सायली दिसताच त्याला हायसे वाटते… व्हेंटिलेटर वर तिचे श्वास सुरु असतात… रोहन भरल्या डोळ्यांनी तिच्या जवळ जातो आणि हात हातात घेतो… तिच्या कानात काहीतरी पुटपुटू लागतो.. तसेच सायली हळू हळू डोळे मिचकावत उघडण्याचा प्रयत्न करते…

रोहन समोर दिसताच मंद मंद अशी smile येते तिच्या चेहऱ्यावर… तो लगेच डॉक्टरांना हाक मारतो, डॉक्टर तो प्रकार पाहून आश्चर्यचकित होतात आणि लगेच ऑपरेशन साठी सायलीला घेतात… तब्बल ३ तासाच्या ऑपरेशन नंतर डॉक्टर हसत बाहेर येतात आणि म्हणतात अभिनंदन आता सायली is out of danger… काही दिवसांत तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतात… बरं, Mr. रोहन तुम्ही असे काय म्हणालात तिच्या कानात की तिला जगण्याचं बळ आलं ?

डॉक्टरांचा प्रश्न ऐकून, रोहन गालात मिश्किल हसतो आणि म्हणतो तु जर लवकर बरी नाही झालीस ना तर मी सुध्दा जिवाचं काहितरी करीन पण तुला सोडून कुठेच जाणारं नाही…कदाचित माझ्या दीर्घ आयुष्यासाठी सायलीला जगण्याची इच्छा झाली असेल…

कधी कधी प्रेम हे फक्त अनुभवायचे असते. शरीर आज आहे उद्या नाही, पण मनाचे मिलन हे सात जन्माचे असते. प्रेमाचा खरा अर्थ ज्याला समजला तोच अमर आहे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!