Skip to content

स्वबळावर जिंकलेल्या समस्या आपला स्वाभिमान कधीच ढळू देत नाही.

स्वबळावर जिंकलेल्या समस्या आपला स्वाभिमान कधीच ढळू देत नाही


सौ. मिनल वरपे


बहुतेकांना एक सवय नक्कीच झालेली असते ती म्हणजे काहीही अडचण आली की तिच्यावर व्यवस्थित स्वतःच विचार करण्याआधी पहिले ती अडचण कोणाला कधी सांगतो अस होते.

समोरच्याला सांगितल की माझं डोक्यावरचा अर्धा भार हलका होतो असा आपला समज आहे.. आणि हा तो अगदीच चुकीचा सुद्धा नाही.. कारण जेव्हा एखाद्या विचाराने, एखाद्या परिस्थितीत आपली अशी घालमेल होत असते आणि मग कोणाशीतरी ते बोलून आपल्याला हलकं हलकं वाटते.

कोणाला सांगणे अयोग्य नव्हेच पण पहिले आपण त्यावर योग्य काय तो विचार करावा.. त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येतील ते शोधावे .. आपल्याला त्यातून कोणत्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळता येतील ते पाहावं आणि त्यानंतर जर काहीच सूचेनास होत असेल.. कोणाची मदत हवी असेल तर त्यावेळी त्यांना आपली अडचण सांगावी..

बहुतेक जण स्वबळावर सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात काहीवेळेस इतरांची मदत लागलीच तर नक्की घेतात पण जास्तीत जास्त स्वतःला कस सगळं सांभाळता येईल, मार्ग काढता येईल यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न असतात.

आपल्या अडचणींसाठी इतरांची मदत घेणे यात काही वावग नाही.. पण आपल्या प्रत्येक समस्येत, आपल्या प्रत्येक अडचणीत इतरांवर अवलंबून राहणे हे केव्हाही अगदीच चुकीचं.. कारण आपल्याला स्वतः विचार करण्याची मार्ग काढण्याची सवय राहत नाही.. आपल्याला कोणत्याही वेळेला स्वतःवर विश्वास न ठेवता इतरांवर विश्वास ठेवावा असच वाटते आणि मग समोरचा जे म्हणेल ते आपण करायचं ठरवतो यामुळे आपण बुद्धी असून सुद्धा दुबळ झाल्यासारखे वागतो. दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्याने आपला स्वाभिमान कमी होत असतो..

कोणतीही समस्या ही काही काळासाठी असते ती कायमची राहत नाही अशी आपल्या मनाला शाश्वती दिली तर बराचसा धीर आपल्याला या विचारातूनच मिळतो. जेव्हा आपण कोणत्याच समस्येला न घाबरता सामोरे जातो त्यावेळी आपल्याला आयुष्यात येणाऱ्या कोणत्याच समस्येची भिती वाटत नाही.

आपल्यातील ऊर्जेचे योग्य नियोजन जर केले तर आपले विचार सुद्धा एका विशिष्ट दिशेने वाटचाल करतात. आपण फक्त आपली ऊर्जा कोणत्या ठिकाणी वापरावी ?? किती आणि कितपर्यंत वापरावी?? याकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला नविन दिशा मिळते.त्या अडचणीतून बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग मिळतात कारण आपली ऊर्जा वाया न जाता योग्य ठीकणी वापरली जाते.

आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी, समस्या यातून आपण जस जसे मार्ग काढतो तेवढीच आपला स्वतःवरचा विश्वास हा वाढतच जातो.आणि जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असेल तेव्हा कोणत्याही अडचणी आल्या तर आपण इतरांवर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातो.

इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे आपल स्वतःच वेगळं अस्तित्व, स्वतःची ओळख राहत नाही. आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी इतरांच्या मदतीशिवाय स्वतःची पाऊल पुढे टाकता येत नाही. आपल्याला स्वतःच वेगळं कर्तुत्व करून दाखवता येत नाही.

असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी परिस्थिती नसताना दुसऱ्यांची मदत न घेता स्वबळावर सगळ्या अडचणींवर मात केली आणि आज त्यांचं सगळेच कौतुक करतात.

ज्यांना शिक्षण घेण्यासाठी पैसे नसतात ते जमेल ते काम करून स्वबळावर शिकून पुढे स्वतःच उत्तम करिअर घडवतात.. शून्यातून जग निर्माण करणे आपण ऐकतोच आणि हे तेच लोक करतात जे कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच आपल्या परिस्थितीत बदल घडवतात.

आणि म्हणूनच स्वबळावर जिंकलेल्या समस्या आपला स्वाभिमान कधीच ढळू देत नाही..कारण त्यामधे आपण कोणाची मदत न घेता.. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचे मार्ग स्वतःच्या हिमतीवर निवडून त्यामधे पुढे जात असतो कोणावर अवलंबून न राहता आणि यामुळेच आपला स्वाभिमान कधीच दुखावल्या जात नाही.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “स्वबळावर जिंकलेल्या समस्या आपला स्वाभिमान कधीच ढळू देत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!