एका पर्यायाने अपयश आलं तरी जगात पर्यायांची काही कमी नाही.
सौ. मिनल वरपे
काहीही करायचं म्हटलं तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास.. कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असेल तेव्हा लोक काही बोलले, नकारार्थी, हास्यास्पद, आपण जे करतोय त्याची कोणी थट्टा जरी केली तरी जर आपला आत्मविश्वास बळकट असेल तर आपण निवडलेल्या मार्गावर आपण न डगमगता पुढे जाण्याची हिंमत ठेवतो आणि यश मिळवण्याचा हमखास प्रयत्न करतोच..
पण आज बहुतेक जण लगेच माघार घेतात.. मला हे करायचं होत पण नाही जमल.. आता मला ते करण्याची इच्छाच उरली नाही.. इथे कमी पडतो तो आत्मविश्वास.. अपयश कोणालाही मिळतेच प्रत्येक व्यक्ती ही शिकत असते.. येणाऱ्या अपयशातून सुद्धा आत्मविश्वास वाढतो जस यश मिळालं तर आत्मविश्वास वाढतो फक्त आपले प्रयत्न थांबवायची चूक करू नये.
कष्टाला पर्याय नसतोच पण कष्ट करण्याची तयारी असेल तर भलेही एका प्रयत्नात यश मिळालं नाही तरी वेगवेगळे पर्याय आहेत आणि ते पर्याय आपल्यासाठीच आहेत हा विश्वास असेल तर आपले कष्ट योग्य मार्गी लागतात.
आमच्या शेजारच्या काकूंनी ठरवलं की घरात राहून घरची परिस्थिती बदलणार नाही.. काका तसे काम करायचे पण घरात कमवणारे एकटेच आणि खाणारी तोंड जास्त त्यामुळे महिना कसा काढायचा ही एक समस्याच होती.. कधी कधी तर मुलांचे चेहरे बघून आपण असताना यांना हे दिवस बघायला लागतात याच इतकं दुःख व्हायचं की जगण्याची हिम्मत नव्हती राहत.
काकूंनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला.. काही पैसे थोडे थोडे अस करत ओळखीच्या लोकांकडून जमा केले आणि त्यातच भाज्या आणल्या आणि रस्त्यावर कपडा टाकून त्या भाज्या विकायचा प्रयत्न केला.. पण भाज्या जास्त विकल्या जात नव्हत्या .. आणि खराब झाल्या की सगळं तोट्यात जायचं.. पण त्यांनी हार नाही मानली.. नंतर त्यांनी लहान मुलांचे कपडे विकायला ठेवले पण रस्त्यावरचे कपडे कोण घेतेय.. त्यामुळे त्यांनी आणलेला माल तसाच पडून राहायचा..
शेवटी त्यांनी उमेद न सोडता… तिथेच काही पैसे अजून जोडून एक चहाची टपरी लावली. अगदी घरगुती टेबल लावून.. सुरवातीला जास्त ग्राहक येत नव्हते.. नंतर त्यांच्या चहाची चव सर्वांना आवडू लागली मग त्यांचे ग्राहक वाढत गेले.. त्यातूनच त्यांनी त्यासोबतच वडापाव समोसे सुरू केले.. आज त्यांचं एक छोटंसं ढाब्यासारखं हॉटेल आहे.
त्या काकूंनी अपयश मिळते म्हणून सोडून देण्यापेक्षा वेगवेगळे पर्याय आहेत ते शोधून मार्ग बदलले आणि पण व्यवसाय करायचाच या त्यांच्या निश्र्चयावर त्या ठाम राहिल्या. म्हणून आज त्यांना इतकं यश मिळालं.त्यांच्यातील आत्मविश्वास, जिद्द आज त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास उपयोगी पडली.त्यांनी केलेलं प्रयत्न आणि कष्ट त्यांच्याच कामी आले. त्यांची परिस्थिती बदलली आणि ती सुद्धा त्यांनी हार न मानता वेगळे पर्याय निवडले म्हणून..
आपण आपल्या इच्छा, आपली स्वप्न, आपले ध्येय नक्कीच पूर्ण करू शकतो पण त्यासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे आणि जर अपयश आलं तर लगेच तिथेच न थांबता अजून जास्त पर्याय शोधून त्यासाठी आपला मार्ग निवडायला हवा….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

