पाऊस पडल्यावरच दोन मनं प्रेमात का पडतात?
सुधा पाटील I समुपदेशक
खटाव (पलूस, सांगली)
मानवी मन आणि निसर्ग या़ंच अतूट नातं आहे.निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा परिणाम मनावर होत असतो.निसर्ग फुलला की,मन फुलतं,आनंदी बनतं.तो रुक्ष झाला की,मन देखील रुक्ष बनतं.याचा अनुभव प्रत्येक जीवाला येतोच जेव्हा उन्हाळा सुरू असतो तेव्हा शरीराची आणि मनाचीही घालमेल सुरू असते.
मनाचा उत्साह निसर्गातील दाहकतेमुळे कमीच असतो.पण .या निसर्गाला नवं रुप देणारा, नवचैतन्य बहाल करणारा पाऊस हा ऋतू आहे.या पावसाला साहित्यात आगळवेगळं असं स्थान आहे.आणि तसंच या ओल्या ऋतुच मानवी मनातंही अनमोल असं स्थान आहे.अगदी आबालवृद्धांना देखील हा ऋतू वेडावून टाकतो.हाच ऋतू मनामनातील प्रेम भावनांना जागृत करतो.
दोन प्रेमी जीवांना प्रेमात पाडतो.एकमेकांना एकमेकांची ओढ लावतो.हात हातात घेऊन मनसोक्त पावसात भिजायला लावतो.पण अशी कोणती जादू या पावसात असते बर? का याच ऋतुत प्रेमाला बहर येतो?का याच ऋतुत मनांवरची मरगळ दूर होवून पुन्हा प्रेमाला पालवी फुटते? कधी याचा विचार केला आहे का आपण? चला नसेल केला तर आपण आता करुया…..
मानवी मन आणि निसर्ग यांची नाळ जोडलेली असते.कारण मानवी जीवन हेच मुळी निसर्गाची बहुमोल अशी देणगी आहे.त्यामुळे निसर्गातील प्रत्येक घटनेचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो.त्यातीलच निसर्गाचं सुंदर रुप म्हणजे पाऊस! हा पाऊस म्हणजे वेडा प्रियकर असतो.आणि ही धरती म्हणजे आतुरतेने वाट पाहणारी प्रेयशी आहे.या दोघांची प्रेमकथा एक आदर्श प्रेमकथा आहे.
या दोघांवर साहित्यिक मंडळींनी भरभरून प्रेम केलं आहे.कवी, लेखक यांच्या लेखणीतून पाऊस आणि धरणी यांच्या प्रेमाच्या कविता,कथा यांचा जणू पाऊसच कोसळतो.शतकानुशतके हा पाऊस साहित्य विश्वात पडत आहे आणि तो पडतंच राहिलं.पण हा पाऊस आणि प्रेम याचं नेमकं काय नातं असतं? तो जलधारांसोबत प्रेमधारा देखील घेऊन येतो की काय? हो!या जलधाराच प्रेमधारांच गोड रुप असतात.
पाऊस रूक्ष झालेल्या धरणीला आपल्या जलधारांनी तृप्त करतो.पावसाच्या प्रेमात चिंब चिंब भिजून धरणीच्या गर्भातून हिरवीगार झाडी जन्माला येते.सारी सृष्टी सौंदर्याने फुलून जाते, चैतन्याने भरून जाते.पाणी म्हणजे जीवन! आणि याच पावसांच्या सरी मानवी जीवनाला जीवन बहाल करतात.मनामनात चैतन्य निर्माण करतात.आणि म्हणूनच याच काळात चैतन्याच रुप असाणारं हे प्रेम मनामनात रुजायला लागतं.
पाऊस म्हणजे सर्वत्र प्रसन्नता, धरणीवरील हिरला गालीचा, विविध फुलांची फुलणं,शेतांचं पिकांसोबत आनंदाने डोलणं आणि आपल्या शेतातील डोलणारी पिकं पाहून शेतकरी राजाचं प्रसन्न राहणं हे सारंच मानवी मनाला उभारी देतं.आणि नकळतच मनातील प्रेम भावनांना उभारी येऊ लागते.अशा सुंदर वातावरणाचा परिणाम प्रेमी युगुलांच्या मनावर आपसूकच होतो.
पाऊस आपल्या जलधारांनी धरतीला ओलंचिंब करतो.आणि प्रेमधारा मानवी मनाला ओलंचिंब करतात.पाऊस धरणीला हरित मखमली लावण्य बहाल करतो.प्रेम मानवी मनाला आनंदाचा खजिना बहाल करतं.पाऊस आणि प्रेम निसर्गातील अद्भुतरम्य अशी रुपं आहेत.जीवनाला भरभरून जगण्याची शक्ती पाऊस आणि प्रेम यांच्यामुळेच मानवाला मिळते.म्हणूनच पाऊस येतो ते प्रेमधारा सोबत घेऊनच! पाऊस धरणीला फुलवतो आणि प्रेम मनाला फुलवतं!
पाऊस पडून गेल्यावर आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो.प्रेमात पडल्यावरच जीवनाच्या आकाशातही आनंदाचं सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू लागतं.पाऊस अवखळ,अल्लड असतो.कधी धो धो कोसळतो तर कधी कधी रिमझिम कोसळतो.प्रेमही असंच असतं….कधी प्रेमाचा धो धो वर्षाव होतो तर कधी ते शांत रिमझिम बरसत राहतं.पावसाच बरसणं आणि प्रेमाचं बरसणं सारखंच असतं.पाऊस धरणीला भिजवतो आणि प्रेम मनाला भिजवून मनाची माती ओली करतं.
पाऊस सृष्टीला नवजीवन देतो.आणि प्रेम मानवी मनाला नवचैतन्य देतं.पावसामुळे सारी सृष्टी हसती खेळती बनते.प्रेमामुळे आपलं जीवन हसत खेळत होतं.पाऊस आणि धरणी यांची प्रेमकथा चराचरापासून या विश्वात वर्णिली जाते.ही आतूर धरणी पावसाचा विरह सहन करून चार महिने त्याच्या सहवासात चिंब होऊन जाते.आणि त्याच आठवणीना जपत ती उरलेले महिने आनंदाने जगते.
प्रेमही तसंच असतं….ओल्या आठवणी जपत आयुष्यभर जगत राहतं.आणि म्हणूनच पाऊस बरसू लागला की,त्याची धरतीविषयी असणारी ओढ,धरणीला चिंब चिंब करून आनंद देण्याची धडपड मानवी मनात प्रेमाचा गारवा निर्माण करते.पावसात मानवी मनंही भिजून चिंब होतं.आजूबाजूची नटलेली धरणी मानवी मनात प्रेमाची बीजे पेरते.मानवी मनंही हरित मखमली बनू लागत.आजूबाजूच सौंदर्य मनात प्रेमाची पालवी फुलवतं.
प्रेम आणि पाऊस दोघंही बेधुंद असतात.पण दुर्मिळ आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त या दोघांमध्येच असतं.ओलचिंब करून स्वर्गीय सुख फक्त पाऊस आणि प्रेम हेच देऊ शकतात.म्हणूनच या बेधुंद पावसात दोन मनंही बेधुंद होऊन प्रेमात पडतात.पाऊस भावनाओल्या करतो.सृष्टीला जीवनदान देतो.प्रेमही पावसाचंच एक रुप असतं.तेही मानवी मनाला सुखाचं,तृप्तीचं दान देतं.
पाऊस आणि धरणीचं मीलन पाहून मानवी मनं देखील एकरुप व्हायला धडपडू लागतात.आणि म्हणूनच हा अदभुतरम्य मिलनाचा सोहळा मानवी मनाला प्रेमात पडायला प्रवृत्त करतो.पाऊस पडल्यावर सारं वातावरण कसं सुंदर, हवंहवंसं असं बनून जातं.प्रेमाचं वातावरणही असंच लाजवाब असतं.दोघांमधील हेच साम्य मानवी मनाला भुरळ घालतो. आणि म्हणूनच पाऊस बरसला की, मनातील प्रेमाचा पाऊसही बरसू लागतो.आणि साहजिकच पाऊस पडू लागला की,मनंही बरसू लागतात आणि एकमेकांकडे ओढली जातात आणि प्रेमात पडतात.
पाऊस हवाहवासा वाटतो तसं प्रेमही हवंहवंसं असतं.म्हणूनच पाऊस आणि प्रेम यावर लेखणी आजवर बरसत आली आहे.आणि ती जगाच्या अंतापर्यंत बरसत राहिल.जगाचा कोपरा अन् कोपरा पावसामुळे ओलाचिंब होवून नव्याने फुलतो.तसंच मनाचा कोपरा अन् कोपरा प्रेमामुळे भिजतो.मनाला जगण्याची उमेद प्रेमामुळेच मिळते.धरणीला नवपालवी फक्त पावसामुळेच मिळते.धरणी जशी पावसाची आतुरतेने वाट पाहते अगदी तसंच दोन मनंही प्रेमासाठी आसुसलेली असतात.
पाऊस आणि प्रेम यांचं नातंच अतुट असतं.एक धरणीला नवचैतन्य देतो.आणि एक मनाच्या धरणीला नवचैतन्य देतो.आणि म्हणूनच पाऊस धारा ह्या फक्त धरणीसाठी प्रेमधारा नसतात तर या पाऊस धारा दोन मनांसाठी देखील प्रेमधारा असतात.या पाऊस धारा प्रेमधारा बनून मानवी मनांवर बरसत राहतात.आणि म्हणूनच पाऊस पडू लागला की, दोन मनंही प्रेमात पडतात.एकमेकांना चिंब चिंब भिजवून आयुष्य ओलंचिंब करतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


Very nice