आजकाल मुलांची लग्नं जुळणं फार कठीण…नेमकं नाटकेबाज कोण ??
अलका गांधी-असेरकर
आजकाल मुलांची लग्नं जुळणं फार कठीण झालंय असं चित्र दिसतंय अवतीभवती. मी मुलांबद्दल बोलतेय, मुलींबद्दल नाही. आणि मी अरेंज मॅरेजबद्दल बोलतेय. आणि आपल्याकडे सगळेच अजून प्रेमात पडून लग्न करत नाहीत. आपलं आपण जुळवत नाहीत. याचं एक कारण घरातील पार्श्वभूमी. अजूनही जाती-गोत्र-कुल-नाडी यात अडकणारी मानसिकता, शिवाय लहानपणापासून भिन्नलिंगी मैत्री असणं घरच्या लोकांना पसंत नसल्याने मुलींपासून चार हात लांब राहण्याची प्रवृत्ती.
तर अशा प्रकारे मुलांची लग्नं न जमणाऱ्या आईबाबांच्या तक्रारी मी ऐकत असते. तेव्हा त्यांचं म्हणणं असतं, की मुलींकडच्या अपेक्षा हल्ली खूप असतात. मोठं घर हवं, स्वतंत्र बेडरूम हवी, एकत्र कुटुंब नको, नवऱ्याला इतकाच पगार हवा, तमकीच नोकरी हवी, अमुकच एरियात राहणारा असावा. मुंबईत राहणाऱ्या मुलीही दादर, बांद्रा, पार्ले असा अमुकच एरियात राहणारा हवा अशा अटी घालतात. ठाणे, डोंबिवली तर कुणी यायला तयार नसतात. वगैरै वगैरे…
हे सगळं नवीन आहे ना… म्हणजे मुलींकडच्यांनी अटी घालणं वगैरे.. आजपर्यंत कथाकादंबऱ्यांमध्येही मुलीच्या बाबाला लाचार होऊन दारोदार चपला झिजवतानाच वाचलंय. आणि प्रत्यक्षातही पाहिलंय. ही उलटी गंगा गेल्या दहा पंधरा वर्षांतच वाहू लागलेय.
त्यामुळे सध्या मुलींच्या आई-बाबांना, त्यातही विशेषतः मुलींच्या आयांना जाम शिव्या पडताहेत. हल्लीच्या आयाच मुलींना कशा शेफारून ठेवताहेत, मुलींच्या वतीने त्याच कशा अटी घालताहेत, मुलींना नुसतं डॉक्टर, इंजिनिअर बनवतात, पण साधी भाकरी भाजायलाही शिकवत नाहीत. नाती सांभाळायला शिकवत नाहीत. ऍडजस्टमेंट करायला शिकवत नाहीत. वगैरे वगैरे.
तेव्हा जाम मजा वाटते.
आतापर्यंत हेच सगळं उलटं होतं, मुलांच्या सतरा अटी असायच्या, जास्तीत जास्त किती मुली बघितल्या आणि नाकारल्या तो आकडा त्यांच्या गौरवाचा, कौतुकाचा असायचा. शंभर मुलींचे फोटो मागवायचे, पत्रिका मागवायच्या, न्याहाळून बघायच्या, हिचं नाकच लहान आहे, तिचे केसच लहान आहेत, ही थोडी गव्हाळच आहे, ती थोडी उंचच आहे, हिला भाऊच नाही (मग सासू सासऱ्यांचं करावं लागेल ना.) अशा क्षुल्लक खोड्या काढायच्या. मुलीच्या बापाला सतरा खेटे मारायाला लावायचे. अजिजी करायला लावायचे, त्यातूनही पसंत केलीच एखादी तर मानपान, हुंडा, बैठकी, बोलणी यांत मुलीच्या बापाला जीव नकोसा करायचे, हे सगळं सुशेगाद चालू होतं, तोपर्यंत सगळी व्यवस्था सोयीची वाटत होती. मात्र आता मुली अचानक शेफारल्या वाटू लागल्या, त्यांच्या आया नकचढ वाटू लागल्या. गंमत आहे सगळी…
झालंय असं की या मुलींच्या आया माझ्या पिढीतल्या. या पिढिचं दोन पिढ्यांच्या मध्ये कचुंबर झालं. शिक्षण तर खूप घेतलं, नोकऱ्याही केल्या, पण सासरच्यांच्या अधीन राहून. त्यांची उस्तवार करून, दोरीवरची कसरत करून घर व नोकरी सांभाळली, आर्थिक खस्ता खाल्ल्या. तरी मनासारखं स्वातंत्र्य मिळालं नाही. मनासारखं जगता आलं नाही. सतत हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, सासू रागवेल, नणंद चिडेल, जाऊ नावं ठेवेल, शेजारीण गॉसिप करेल या भीतीतच राहिली ही पिढी. म्हणजे जाणीवजागृती झाली होती पण हिंम्मत नव्हती. अगदी आवडीचे कपडे घालायचीही मुभा नव्हती या पिढीला.
या आया आपल्या मुलींसाठी मात्र आता सावध आहेत. आपण जे भोगलं ते आपल्या मुलिंना नको. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळावं, मनासारखं आयुश्य कोणत्याही फालतू तडजोडी न करता मिळावं, करीअर करायला मिळावं, छंद जपता यावेत, आपली मतं जपता यावीत, यासाठी त्या प्रत्यक्ष त्यांच्या मुलींपेक्षाही अधिक जागृत झाल्यात. सावध झाल्यात, त्यात नवल ते काय.
मुली आणि त्यांच्या आया बदलल्या आहेत. मात्र त्याचवेळी मुलगे आणि त्यांच्या आया अजून पारंपरिक पठडीतच वधुसंशोधन करताहेत. त्यांना अजूनही घरचं सगळं करून, तडजोडी करत, अभावात आनंद मानणारी, नाती जोडत स्वतःचं मन मारणारी, करीअर, छंद सगळं सोयीप्रमाणे करणारी, व सोयीप्रमाणे दूर सारणारी मुलगी हवी.
तशी मुलगी आता सहजासहजी सापडणं कठीण. ( ती फक्त टीव्ही मालिकांतूनच सापडेल) त्यात वयाची पस्तिशी येते. त्यांना लग्नाची घाई होते, खानदानाला वारस हवा म्हणून उलघाल होते. पण त्याचवेळी मुली मात्र निवांत आहेत. त्यांना वय वाढल्याची चिंता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आमच्यावेळी २२ व्या वर्षी लग्नं नाही झालं तर मुलगी घोडनवरी, प्रौढ कुमारिका म्हणून ओळखली जायची. आता मुलींना स्वतःलाच तीशी उलटली तरी लग्नं नको वाटतं, मुलं जन्माला घालायची आणि त्यात गुंतायची घाई नसते. मुलींनी इतर जातीत प्रेमलग्नं केलेलीही प्रमाणात त्यांच्या आयांना अधिक चालू लागली.
लग्नं झालीच तर ठरलेलं लग्नं मोडण्याचे, घटस्फोटांचे प्रमाणही प्रचंड वाढत चाललेय. त्यातही मुलींच्या आयांनाच शिव्या अधिक बसतात. या आया म्हणे, मुलींच्या संसारात लुडबूड करतात. हे ऐकल्यावरही हसायला येतं.
शेकडो वर्ष तमाम मुलांच्या आयांनी त्यांच्या संसारात लग्नाच्या पहिल्या दिवसापासून लुडबूड केली, मुली जळून मेल्या, पिचून मेल्या, मन मारत मेल्या. तोपर्यंत व्यवस्थेतल्या या उणीवा कुणाला दिसल्या नाहीत. की मुलांच्या आयांचीच नव्हे, तर पार आते-मावस सासवांचीही संसारात लुडबूड चालायची, ती खटकली नाही कुणाला कधी.. गंमत आहे सगळी.
आता मुलींच्या आयांनाही एखादेच मुल असते. त्यात एक मुलगी त्यांना जड नसते परत आली तरी. तेही सधन असतात, मुलीही कमवत असतात. आणि जगाला भीक घालत भिण्याची सवय आता त्यांनी सोडून दिलेय.
काही लोकांना भलतीच काळजी असते. हे लोक ना मुलाचे आईबाप असतात, ना मुलीचे. त्यांना काळजी वाटते विवाहसंस्थेची, कुटुंबसंस्थेची. ती कशी टिकणार, लहान मुलांचं काय होणार, इ. इ,
तर गाडी रुळ बदलते तेव्हा खडखडाट होतोच. व्यवस्थाही कात टाकताहेत. खडखडाट तर होणारच. त्यात बदलाची तयारी ठेवली नाही तर अधिक त्रास होणार. आणि कोणतीही व्यवस्था शंभर टक्के सुयोग्य नसते. त्याचे दुष्परिणाम याला ना त्याला भोगावे लागणारच.
म्हणूनच मागची शेकडो वर्षे त्या सासवांची….तर आताची वर्षे या सासवांची….
अभी तो दौर शुरू हुआ है भैय्या…
आगे आगे देखो होता है क्या……..
(मला मुलगाच आहे बरं. मुलगी नाही. तरीही हे मी लिहिलंय… छातीवर दगड ठेवून :D)
मानसिक समस्येवर शास्त्रीय उपाय हवाय ???
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
हा लेख अर्धवट आहे असंच जाणवत आहे. यामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी यांच्याशी सहमत व्हावे लागेल. पूर्वी मुलाकडचे लोक मुलीच्या आई वडिलांना खूपच झिजवत होते. नको त्या अटींची पूर्तता व्हावी यासाठी प्रचंड दबाव टाकत होते. मुलीचे वडील हे स्वतःला नेहमीच कमजोर समजत आले आहेत त्यामुळे ते देखील त्या अटींची पूर्तता करण्यासाठी झटत असत. प्रसंगी कर्ज काढून संपत्ती गहाण ठेऊन. पण त्यामागे एकच भावना होते ती म्हणजे आपली मुलीचे चांगले व्हावे.
मुलींना लग्नानंतर त्यासुद्धा काळात त्रास व्हायचा जय काळाचा उल्लेख आपण केला आहात आणि आजही होत आहे. त्याकाळी स्रिया ह्या शोषिक होत्या आणि त्यामुळेच संसार टिकले आणि मुलांचे चांगल्या पद्धतीने भरण पोषण झाले. त्यातही काही स्रिया अशाही होत्या त्यांनी त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून स्वतःच आयुष्य चांगल्या प्रकारे जागून दाखवल. पण चांगलं की वाईट हे फक्त त्यांनाच ठाऊक.
पण कुटुंब पद्धत ही मानवी जीवनाला मिळालेलं वरदान म्हणावं लागेल. त्याची समृद्धता जपणे हे प्रत्येक मुला आणि मुलीचे पाहिले कर्तव्य आहे त्यात दोघांनीही शक्य ती तडजोड करावी आणि आपला संसार सुखी आणि समृद्ध करावा आणि आपल्या पुढच्या पिढीसमोर एक आदर्श ठेऊन त्यालाही समृद्ध अस जीवन जगण्याचे संस्कार द्यावेत. आता विषय असा आहे की मुलीच्या आई जरा जास्तच लक्ष घालत आहेत मुलीच्या लग्न जमवण्यात. हे मात्र अत्यंत दुर्दैवी आहे. मुलीच्या आईने आपली जेवढी गरज आहे तेवढंच लक्ष घालावं आणि घरातील पुरुषांनी स्रियांना जेवढी गरज आहे तेवढेच लक्ष घालू द्यावे. मुलींच्या आईने मुलींच्या संसारात प्रमाणापेक्षा जास्त लक्ष घालणे पूर्वी सुद्धा घातक होत आणि आज सुद्धा घातकच आहे. आपण आजूबाजूला जेव्हा अशा घटना पाहतो तेव्हा हेच लक्षात येत की मुलीच्या आईचा सर्वात जास्त हस्तक्षेप झाला आहे आणि त्याची शिक्षा म्हणा अथवा अजून काही हे मुलीलाच भोगावे लागते. मुलीला जरी करियर करायचं असेल तरी तिने आपल्या जीवन साथीदाराबरोबर विचारविनिमय करूनच करावं हे दोघांच्याही सुखी विवाहित जीवनासाठी अत्यन्त गरजेचे आहे..
आणि मुलीचं करियर हा शब्दच चुकीचा आहे. प्रथम मुलीच्या आईंनी हे लक्षात घ्यावे की मुलीच्या आयुष्याचे अंतिम ध्येय काय आहे? करियर करून मोठ्या हुद्द्यावर जाऊन लाखभर रुपये महिन्याला कमवावे की लग्न करून सुखी आणि समाधानी आयुष्य जगावं. स्त्री ही शक्ती स्वरूप आहे आणि शक्ती नसेल तर कोणालाही काहीही करता येणार नाही. एका पुरुषाला पण काही करायचे असेल तर एका शक्तीची गरज असतेच. ती शक्ती त्याची आई बहीण पत्नी मैत्रीण कोणीही असू शकत. पण एका पुरुषाच्या मागे शक्ती ही पाहिजेच. आपल्यात म्हणतातच की एका यशस्वी पुरुषमागे एका स्त्रीचा हात असतो. त्याचा अर्थ हाच होतो.
मुलीच्या आईने मुलीचे लग्न जमवताना आपल्या अधिकारात राहूनच आपला सहभाग द्यावा. अति लुडबुड करू नये. आणि लग्न झाल्यानंतर देखील आपल्या मुलीच्या संसारात अजिबात लुडबुड करूच नये. आपल्या मुलीला सुखी संसार करण्यसाठी ज्या संस्कारांची गरज आहे ते मात्र सर्व द्यावेत आणि तिला तीच आयुष्य स्वतंत्र पणे जगू दयावे तिचे निर्णय तिला स्वतःला घेऊ द्यावेत. गरज पडलीच तर आपले विचार मांडावेत अन्यथा शांतच राहावे.
एक मात्र नक्की आहे मुलीच्या आईने मुलीच्या संसारात लुडबुड थांबवली तर मुलीचा संसार नक्कीच सुखी होईल. मुलगी आपल्याकडे आहे तो पर्यंत तिला सर्व चांगले संस्कार द्यावेत.
विचारांमध्ये काही अतिशयोक्ती असेल किंवा कोणाला काही दुखावले असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागतो.
याला बदल म्हणत असतील मुली किंवा मुलींवाले तर हा अजिबात नाही, मुली जर इतक्या शिकल्या सवरल्या तर कायद्याचा दुरुपयोग करून आमचा हक्क आहे हे सांगत पैस्याची भीक का मागता स्वतः च्या पायावर उभे राहून कमावून दाखवा तर् काही बात..आम्ही मानू भिकेत दिलेल्या पैस्यात जगण्यात काय मज्जा..शेवटी भिकारी ते भिकारीच.. मॉडर्न भिकारी..
जे मुलीकडील लोक बदल्याची भावना ठेवून आता मुलांशी अन्यायकारी डील करू पाहताहेत त्यांनी लक्षात ठेवावे कि १३५ करोडच्या देशात तितकेच पर्यायसुद्धा आहेत !!
जबरी, नाण्याची दूसरी बाजू
mast